तलासरीची साथ आणि माझे प्रश्नचिन्ह
मी डॉक्टर नाही. म्हणजे लौकिक अर्थाने डॉक्टरीचा पेशा करण्यासाठी जी एम.बी.बी.एस किंवा त्याहून श्रेष्ठ कॉलेजची डिग्री लागते ती माझ्याकडे नाही. परंतु डिग्री असणे आणि अनुभव व समज असणे यात फरक आहे.
गेले महिनाभर ठाणे जिल्ह्यांतील तलासरी आणि डहाणू येथे मलेरियाची साथ आल्याबाबत ज्या बातम्या सतत येत आहेत आणि रोगग्रस्तांची आकडेवारी ज्या त-हेने फुगत चालली आहे ते वाचून मला असे वाटले की याबाबत वाराक्षार पद्धतीची माहिती लोकांसमोर ठेवण्यास हरकत नाही.
बाराक्षार पद्धतीची मुलभूत कल्पना अशी आहे की शरीराच्या सर्व भागांमधील रासायनिक समतोल टिकवून ठेवण्यासाठी व वेगवेगळ्या अवयवांना त्यांचे काम नीटपणे करता येण्यासाठी शरीराला बारा त-हेच्या मुख्य क्षारांची (म्हणजे लवण- किंवा सॉल्ट्स ची) मोठी गरज असते. फार सूक्ष्म प्रमाणात इतरही काही लवणांची गरज असते उदा. आयोडिन किंवा सोन्याचे लवण, पण ती इतर लवण देखील शरीरात उपयोगी पडतील अशा रितीने शोषली जाऊ शकतात की नाही आणि शरीराचे अवयच त्यांच्या योग्य वापर करू शकतात की नाही हे सुद्धा या प्रमुख बारा लवणांवर अवलंबून असते. यांच्या पैकी एखादे लवण शरीराला कमी प्रमाणात मिळाले तर निर्माण होणा-या रासायनिक असमतोलामुळे कित्येक त-हेचे रोग होऊ शकतात किंवा कित्येक त-हेचे रोग एकाच प्रकारच्या लवणामुळे बरे पण होऊ शकतात. ही बारा औषधे म्हणजे काली फॉस, काली सल्फ, काली मूर, नेट्रम फॉस, नेट्रम सल्फ, नेट्रम मूर, कल्केरिया फॉस, कल्केरिया सल्फ, कल्केरिया फ्लूअर, फेरम फॉस, मॅग्नीशिया फॉस, व सिलिका. वरील बारा लवणांचा औषध म्हणून वापर करणारी व बायोकेमिस्ट्री किंवा टिश्यू रेमेडी या नावाने वापरली जाणारी एक अतिशय जुनी पद्धत जर्मनी, मध्य यूरोप व ऑस्ट्रेलियात अजूनही अस्तित्वात आहे. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी श्यूझलर या जर्मन डॉक्टरने या लवणांच्या वापराबाबत बरेच लिखाण केले आहे.
पुढे होमियोपथी चिकित्सा पद्धती आली तेंव्हा ही औषधे देखील होमियोपथीची पद्धत वापरून अती सूक्ष्म प्रमाणात तयार करून त्यांचा वापर केला जाऊ लागला. इतकेच नव्हे तर होमियोच्या इतर शेकडो औषघांमध्ये यांचा समावेश केला गेला. बाराक्षार पद्धतीमध्ये मात्र फक्त हीच बारा औषधे आहेत.
भारतात आपण जी बाराक्षार किंवा लवण- चिकित्सा पद्धती म्हणतो ती ही वर सांगितलेली- म्हणजे या बारा लवणांचे होमियोपधीच्या पद्धतीने सूक्ष्मीकरण करून- त्याच पद्धतीने त्यांच्या १X, ३X, ६X, १२X, ३०X, २००X, १०००X अशा पोटेन्सीची वेगवेगळी औषधे तयार करून वापरणे. जर्मनीत मात्र अजूनही क्वचित प्रसंगी जुनी पद्धत वापरतात. फरक एवढाच की त्या पद्धतीत औषधाचा डोस खूप मोठा असतो- उदाहरणार्थ कल्केरिया फॉस द्यायचे असेल तर अर्धी वाटी चुना खायला लावायचा (मग त्याचे इतर साइड इफेक्ट्स होऊ नयेत म्हणून त्यांत खूप लोणी मिसळायचे) इत्यादि. हे प्रकार आयुर्वेदातही आहेतच- फक्त त्यांचे माहात्म्य थोडे किंवा खूपसे कमी असेल. मात्र या लवणांचे अति सूक्ष्मीकरण करून ती रोग्याला दिल्याने इतर साइड इफेक्ट होत नाहीत. असो.
ज्यावेळी शरीरात एखाद्या लवणाची कमतरता भासू लागते तेंव्हा आपण झोपलो असतांना शरीर ते लवण निर्माण करण्याचा प्रयत्न करते, त्याची एक मुख्य फेंक्टरी असते जिभेत. त्यामुळे सकाळी किंवा दुपारी झोपेतून उठल्यानंतर जिभेवर त्या लवणाचा बारीकसा थर निर्माण झालेला पहायला मिळतो. बाराक्षार पद्धतीमध्ये रोग निदानासाठी जिभेवर बनलेल्या या थराचे अनन्यसाधारण महत्व आहे. बाराक्षाराच्या कोणत्याही चांगल्या पुस्तकात शरीरात नेट्रम पूर कमी झाले तर जिभेवर कसा थर दिसेल, काली फॉस कमी झाले तर कसा थर दिसेल इत्यादि बाबत विस्तृत वर्णन मिळते व त्यावरून रोग्याला कोणते औषध द्यावे हे ठरवले जाते. इथे दोन गोष्टी नमूद करण्यासारख्या आहेत. आयुर्वेदात सांगितले आहे कि शिळी थुकी कित्येक गोष्टींवर इलाज म्हणून वापरता येते. याच साठी झोपेतून उठल्या बरोबर चूळ न भरता पेलाभर पाणी प्यावे असे आयुर्वेद सांगतो. मात्र ही माहीती बाराक्षार चिकीत्सावाल्यांना माहीत नाही आणि बाराक्षारातील जिभेवरून रोगनिदान व रोग चिकित्सा पद्धतीची माहिती आयुर्वेदवाल्यांना नाही. तिकडे एलोपथी मध्ये स्पूटम टेस्ट हे महत्वाचे अस्त्र म्हणून रोगनिदानसाठी वापरले जाते. पण त्यांत कोणते जंतू आहेत ते तपासण्यापुरते. कोणते लवण वाढले किंवा कमी झाले आहे ते तपासण्यासाठी नव्हे. आपल्या कडील विभिन्न चिकित्सा पद्धतीत मेळ आणण्याची काय गरज याला हे वरील उत्तम उदाहरण आहे. मग मी माझ्या सवडीने कधी कधी हा तुलनात्मक अभ्यास करीत असते.
माझ्याकडे बाराक्षारांचे जे पुस्तक आहे त्यातील मलेरिया बाबत वर्णन असे- मलेरियाचे पॅरासाइट्स (आपण सोप्या भाषेत त्यांना जंतुच म्हणू) डासांच्या माध्यमातून शरीरात शिरतात. त्यावेळी कोणत्याही कारणाने जर शरीरात बॉडी फ्ल्युइड्स वाढलेले असतील तर मलेरियाच्या जंतूंना चांगले ब्रीडींग ग्राऊंड मिळून त्यांची वाढ होते. परंतु हे शरीरांतले ज्यादा झालेले द्रव (फ्लुइड्स) बाहेर काढण्याची सोय केली तर आजार बरा होऊ शकतो. यासाठी सुचवलेले औषध नेट्रम सल्फ ६X असे आहे. एका वेळी चार गोळ्या या पद्धतीने चार वेळा हे औषध देऊन चालते. मी मात्र साधारणपणे पेलाभर गरम पाण्यांत दहा गोळ्या टाकून ते पाणी दर अर्घ्या तासाला दोन-तीन चमचे ही माझी सास-यांची पद्धत वापरते. औषध दिल्या नंतर वारंवार लघवी होणे हे नेट्रम सल्फने आपले काम सुरू केल्याची खूण असते. अशा वेळी तहान लागल्यास घोट-घोट पाणी प्यायला द्यावे. तसेच सुरुवातीस एका तासात ताप न उतरल्यास किंवा फार वाढल्यास याच पद्धतीने फेरम फॉस ६न् द्यावे. तापाचा परिणाम डोक्यावर होण्याची (सेरेब्रल फीव्हर) शक्यता वाटल्यास किंवा फार थकवा वाटूनही झोप लागत नसल्यास काली फॉस द्यावे. क्वचित गरज वाटल्यास पूरक म्हणून चौथे औषध नेट्रम मूर पण द्यावे. इतक्या भिन्न पद्धती त्या पुस्तकात दिलेल्या आहेत.
या पद्धतीच्या सोपेपणाचा आणखी एक नमुना म्हणजे जरी मलेरिया झाला नसला किंवा रक्त तपासणी होऊ शकली नसली तरी ही औषधे देण्यास हरकत नाही असे ते पुस्तक सांगते. आपण एरवी मलेरियावर क्विनाइन देतो. एलोपथीच्या शास्त्राप्रमाणे त्याचा उद्देश जंतु (पॅरासाईट्स) मारणे हा असतो पण शरीरांत रोग निर्माण करणारे जंतु मलेरियाचे नसून इतर रोगांचे असतील तर क्विनाइनचा उपयोग होणार नाही. नेट्रम सल्फचे तसे नाही. शरीरातले जादा पाणी व इतर द्रव बाहेर काढून टाकून जंतूंची वाढ थांबवणे हा उद्देश असल्याने त्या द्रवांवर पोसणारे कोणतेही जंतू असले, कोणताही ताप असला तरी त्यावर नेट्रम सल्फ चालू शकेल असे बाराक्षार सिद्धांताचे म्हणणे आहे.
माझा वैयक्तिक अनुभव असा की व्हायरल किंवा पॅरासाइट मुळे येणा-या तापावर नेट्रम सल्फ उपयोगी पडते. फंगल किंवा बॅक्टीरीयल इन्फेक्शन ने होणा-या आजारांबाबत किंवा बाराक्षारातील इतर औषधांचा अनुभव मी अजून फारसा घेतलेला नाही.
ही साथ थांबवण्यासाठी बाराक्षार औषधांचा उपयोग आपल्या PHC मधे करून घेता येईल का। याचे उत्तर मला सोपे वाटते पण डॉक्टरांना कठिण वाटते. प्रत्येक PHC मधे एखादा होमियोपॅथीचा डॉक्टर ठेऊन त्याच्या सल्ल्याने वरील औषधे देऊन PHCमधील डॉक्टरांनी काळजीपूर्वक रेकॉर्ड ठेऊन प्रयोोोोग केले तर मोठ्या प्रमाणावर डेटाबेस गोळा होईल. पण हे करणाऱ्या डॉक्टरला अधिक श्रम, अधिक प्रयत्न करावे लागतील. कुठे चुकलं तर जबाबदारी येइल पण सगळं सुरळित झालं तर पाठ थोपटायला कुणीच पुढे येणार नाही. म्हणूनच PHC मधील डॉक्टरांना हे उत्तर कठिण वाटणर. तरीही माझ्या मते PHCमधील ऍलोपथी डॉक्टरांनी हा प्रयोग करून बघायला हवा. अर्थात ते करताना अत्यंत काळजीपूर्वक प्लान करूनच निर्णय घ्यावा लागेल. मात्र असे काही करताच येत नाही- किंवा असे काही करण्यासाठी तिथले डॉक्टर्स व शासन मिळून अक्षम आहेत किंवा काही यंत्रणाच तयार करता येणार नाही असे मला वाटत नाही.
माझी बहीण स्वतः MBBS डॉक्टर असून तिला पूर्वी मलेरियांचे बरेचदा अटॅक येत असत. अशा एका वेळी माझ्या सल्ल्याने नेट्रम सल्फ घेतल्यानंतर तिला पुन्हा अटॅक आलेला नाही. सबब तिच्या मलेरिया पेशंटना ती वरील प्रमणे औषधे देते. मात्र हे आमचे अनुभव थोडया प्रमाणातले आहेत. मला वाटते की सध्या डहाणू परिसर व पूर्ण ठाणे जिल्ह्यांत जी मोठी साथ आहे तिची फार कमी माहिती इतरांना आहे. या साथीचे कारण मलेरिया नसेल तर दुसरी कशाची साथ आहे? निदान व्हायरल की पॅरासाइटल की फंगल की बॅक्टीरियल एवढी तरी निश्च्िाती झली आहे का? तीन-चार दिवस तीव्र ताप येऊन नंतर तो बरा होतो मात्र खूप थकवा येतो एवढेच वर्णन वर्तमानपत्रांत आहे. इतर विस्तृत वर्णन पेपरात देता येणार नाही कां? माणसाचे वजन घटते का हा अति महत्वाचा प्रश्न. त्याचेही उत्तर पेपरात नाही.
जे रूग्ण दवाखान्यात येतात त्यांना नेमकी कोणकोणती औषधे दिली जातात? त्यांचा उद्देश काय? जर तीन दिवसांनी ताप आपोआप ओसरत असेल तर औषधे देण्याची गरज काय? की ती तापावर नसून फक्त थकव्यावर असतात? याबाबतची जास्त माहिती वर्तमानपत्रात वाचायला मिळली नाही.
मागे सूरत-बडोद्याला प्लेगची साथ आली होती. तेव्हां उत्स्फूर्तपणे होमिओपथीची कोणती औषधे ध्यावी किंवा आयुर्वेदाचे कोणते उपचार करावे हे पेपरांत छापून आले होते. पण ठाणे जिल्हयातील आदिवासी समाज साथीने ग्रस्त असतांना तसे का घडत नाही? त्या भागांत डॉक्टरांची कमी आहे तर तात्पुरती वैद्यकीय सेवा देणारी स्वयंसेवक पथके कां जात नाहीत? की आदिवासींच्या सुखदुःखात सहभागी होण्याची आपली संवेदनाच संपली आहे? या साथीला इतर उपाययोजना करून बघणे शक्य आहे असे जर शासनाला वाटत असेल तर वर उल्लेख केलेली बाराक्षार औषधे वापरून पहाता येतील.
-----------------------------------------------------------------------------------
Wednesday, March 7, 2007
3/ तलासरीची साथ आणि माझे प्रश्नचिन्ह -Reg failure to tackle Malaria
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 11:11 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment