Sunday, July 21, 2013

हे वाचत्येय-- लोकसत्ता वाचनरंग दि 08-07-09 डीटीपी + चित्रप्रत

हे वाचत्येय--  लोकसत्ता वाचनरंग दि 08-07-09


लोकसत्ता

हे वाचतेय....

गुप्तहेर कथांमधील गूढपणामूळे आजही रॉ चं आकर्षण आहे.

बाबुराव अर्नाळकरांचा काळा पहाड, त्यानंतर जे.बी. जासूस यांची गुप्तहेर कथांची मालिका वाचनात आली. त्या कथांनी मला रमवलं. गुप्हेर कथांमधला गूढपणा, त्यातील चातुर्य या साऱ्यांची मोहिनी आजही कायम आहे. इतकी की आज जर मला विचारल, की या क्षणी कुठलं काम करायला आवडेल, तर 'रॉ' चं प्रमुख व्हायला असं माझं उत्तर असेल. असा माझ्यावर या पुस्तकांचा प्रभाव होता. अजूनही आहे.

एका सुसंस्कारित कुटुंबात जन्मल्याने वाचनाचे संस्कार सहजच झालेत. लेक वाचतेय अस लक्षात आल्यावर घरच्यांनी सगळ्यात प्रथम हाता दिलं ते चांदोबा मासिक. वयानुसार वाचन बदललं असलं री चांदोबा आजही हातात घेतलं की तितक्याच आवडीनं मी वाचते. राम, श्रीकृष्ण यांची ओळख मला चांदोबातून झाली. त्यामध्ये येणाऱ्या रामायण, महाभारत कथांच्या मालिकेमुळे ते वाचण्याची गोडी वाढली. राजपुतांचा इतिहास मला त्यातून कळला. वडिलांनी गोडी लावलेल्या श्रीमद्भगवद्गीतेचा प्रभाव आजही कायम आहे. त्यामुळेच की काय आताही भगवद्गीता मला कंठस्थ आहे.

सध्या नंदन नीलेकणी यांचं 'इमॅजनिंग इंडिया- आयडियाज फॉर द न्यू सॅच्युरी' हे पुस्तक वाचतेय. डॉ. कलाम यांनी व्हीजन-2020 या पुस्तकातून सांगितलेल्या 2020च्या भारताच्या वास्तववादी स्वप्नांच्या दिशेने केलेली प्रत्यक्ष वाटचाल, असं हे पुस्तक आहे. कलामांनी सांगितल्याप्रमाणे प्रशिक्षित, सुशिक्षित युवाशक्ति हीच उद्याचा भारत घडवेल. नीलेकणींनी याच युवकांच्या डोळ्यांत स्वप्न पेरण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे ज्यांनी कलाम वाचलेत, त्यांनी आवर्जून हे पुस्तक वाचावं. तशा अर्थांने हे पुस्तक कलामांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं केलेली आगेकूच !

जबलपूरला आमच्या शाळेत पहिली, दुसरीच्या वर्गांना वरच्या वर्गातले विद्यार्थी शिकवित असत. त्या शिकवणाऱ्यांमध्ये मी होते. त्यामुळे अभ्यासासोबतच अवांतर वाचनाची सवय जडली. आम्हाला श्री दाणी नावाचे मुख्याध्यापक होते. आम्ही वर्गात शिकवताना ते येऊन बसत. त्याचा प्रभाव शिकवताना पडत असे. अशा वातावरणातच वाढल्यामुळे वाचनाचे संस्कार खोलवर झालेत ते कायमस्वरूपीच. भौतिकशास्त्र, अध्यात्म हे माझे आवडते विषय. गोविंद वल्लभ पंत यांची भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावरील 'अमिताभ' ही कादंबरी अजूनही स्मरते. त्यातील भाषा, वर्णन, रसाळ शैलीमुळे सिद्धार्थ कळला, समजला, उमगला. नंतर इगतपुरीला विपश्यनेस जाण्याचाही योग आला. पण जेंव्हा जेंव्हा बुद्ध, त्यांचे विचार वाचायला घेतले, तेव्हा तेव्हा सारखं वाटायचं की हे पात्र माझ्या परिचयातलं आहे. त्याला मी ओळखते. या आधी मी ते समजून घेतल आहे. एका पुस्तकामुळे पुढचं तत्वज्ञान समजून घ्यायला अशी मदत झाली.

त्यानंतर रामधारी सिंह दिनकर' यांचं 'रश्मीरथी' हे दानशूर कर्णाच्या जीवनावरचं हिदींतलं खंडकाव्य वाचनात आलं. या पुस्तकाचं वर्णन मी हिदींतले 'मृत्युंजय' असं करीन. त्यामुळे कर्ण समजला.

घरात आईवडीलांनी वाचनसंस्कृती रूजवली. मी इयत्ता चौथीमध्ये पहिली आल्यांतर 'अरेबियन नाईटस बक्षीस मिळालं. ते वाचून खरं बोलण्याचा संस्कार आपोआपोच झाला. आपलं आयुष्य सच्चेपणानं जगता आलं पाहिजे. इतरांनाही ते शिकवता आल पाहिजे, हा संस्कार दृढ झाला. अजून एक इंग्रजी पुस्तक ज्याचा उल्लेख करावासा वाचतो. ते म्हणजे 'गुड अॅण्ड द ग्रेट' महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चार महामानवांवरचं हे पुस्तक आम्हाला दहावी-अकरावी साठी होतं. त्यातला गांधींजींनी सांगितलेला सत्याग्रह आजही आठवतोय. ते म्हणत, सत्याग्रह म्हणजे 'स्टॅडिंग फर्म ऑन द ग्राउंड ऑफ ट्रुथ युझींग ओन्ली द फोर्स ऑफ लव्ह'. यामुळे सत्याग्रहानं अवघा भारत ढवळून निघाला होता. गांधींच्या जीवनामध्ये स्वावलंबनाचं प्रतीक असलेल्या चरख्यानं अगदी अलीकडच्या काळात मलाही आकर्षित केल. मी स्वत वेळ काढून सूत कातायला शिकले. नंतर एक प्रयोग करून बघितला, चालताना टकळीवर सूत कातण्याचा, अन् तो जमलाही. त्यामुळे यंदाच्या आषाढीच्या वारीत मी स्वतः वारकऱ्यांसमवेत सूत कातत वारीत फिरले.

असच एक पुस्तक मी वयाच्या साधारण सोळाव्या वर्षी वाचलं. 'लाल रेखा'. बिहारच्या जीवनावर, तेथील संस्कृतीवर असलेलं हे पुस्तक आजही विस्मरणात गेलेलं नाही. एका क्रांतिकारकाची ही कथा. त्याची आई आसपासच्या गावातल्या लोकांकडे चरख्यावर विणण्यासाठी पेळू देते गावकऱ्यांनी कातलेलं सूत त्यांना मोबदला देऊन परत केंद्रात घेऊन जाते. असं हे साधं काम. पण आजारी असताना तू हे काम करू नकोस, असं तो मुलगा त्याच्या आईला विनवतो. तेव्हा आईच उत्तर असत – "अरे, आज जर मी हे काम केल नाही तर त्यांच्या घरात सात दिवस चूल पेटणार नाही". तत्कालीन भारतांच,, त्यातही बिहारमधील दारिद्र्याच हे चित्र. मला मात्र त्यातून उमगलं ते चरख टकळीचं तत्वज्ञान, जे आजही आचरणात आण्याचा प्रयत्न करतेय.

आयएएसच्या परीक्षेसाठी अभ्यासासाठी म्हणून केटलबी यांच 'युरोपियन हिस्ट्री' या पुस्तकातून इतिहास नव्यानं समजून घेतला. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील कथा नव्हे, तर तत्कालीन समाजपरिवर्तनाचे संदर्भ, उत्थान, पतन साऱ्यांचा ऊहापोह म्हणजे इतिहास हे समजाऊन देणार ते पुस्तक अजून आठवतय.

अलिकडच्या काळात एडवर्ड डी बोनो यांची 'लॅटरल थिंकिंग' वरची पुस्तकहीं भावली. पीटर ड्रकर हा लेखकही वाचून काढला. कुठलं पुस्तक वाचावं, या प्रश्नावर मात्र आता मुलांची मदत होते. कारण ते निश्चितच काळासोबत राहतात. वाचतात. टीव्हीमुळे मुलं वाचनापासून दूर गेली हे काही अंशीच खरं आहे. सध्या संघर्षपूर्ण कथा, वास्तविक जीवनाशी नाळ जोडणाऱ्या साहित्याकडे मुलांचा कल मला दिसतो.

काही पुस्तके अकारण गाजली, असंही मला वाटतं. भालचंद्र नेमाडयांचं कोसला हे त्यातलच एक. त्यामध्ये केवळ हॉस्टेलभोवती फिरणार कथानक, नायकाला आलेलं अन् शेवटपर्यंत टिकलेलं वैफल्य. परत तशाच वैफल्यावस्थेत झालेला पुस्तकाचा शेवट, यामुळे मला कदाचित तसे वाटत असेल. याखेरिज पुलंचं अपूर्वाई, पूर्वरंग या पुस्तकांनी मला रमवलं. गो.नी. दांडेकरांचं 'मोगरा फुलला' श्री.ना. पेंडसे यांचं रथचक्र त्यातील भाषेमुळे आशयामुळे मला आवडलं.

अर्थात माझ्या लहानपणीच्या काळात किर्लोस्कर, वसंत यातू अनेक लेखकांशी वाचनामुळे ओळख झाली. सिंदबादच्या सफरी, शेक्सपिअरची नाटकं वाचलीत. ' धर्मयुग' हे साप्ताहिक, पराग यांसारख्या मासिकाच्या वाचनातून वाचनाचे चिरस्थायी संस्कार झालेत. या साऱ्या वाचनप्रवासात एक अजून उमगलं. जे जे चांगलं वाचलयं ते ते इतरांना सांगितल पाहिजे. रामदासांनी म्हटलच आहे, 'जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे,, सकल जन. यातूनच रवींद्रनाथ पराशर या एका आयएएस आधिकाऱ्याने इंग्रजीत लिहिलेल्या द लास्ट पास या कादंबरीचे मराठीत भाषांतर केले. खिंडिच्या पलीकडे ही ती कादंबरी. जे जे सर्वोत्तम आपणास मिळेल, त्याचा वाटा सर्वांना दिला पाहिजे, इतरांना अर्पण केला पाहिजे, ही भावना दिवसेंदिवस अधिकच दृढ होतेय. वारीतून सूत कातणे असो किंवा प्रशासनातले काम असो. कदाचित हे सारं त्यातूनच येत असेल.

Friday, July 5, 2013

आजचे स्त्री जीवन

आजचे स्त्री जीवन

आजच्या  स्त्रीचे जीवन समजावून घेतांना निरनिराळया कालखंडातील स्ञियांचे जीवन समजून घ्यावे लागेल तसेच त्यांच्या पुढील समस्या, त्यावरील उपाययोजना स्ञियांचा भविष्यकांल याचाही विचार करावा लागेल. भारतीय संदर्भापुरते बोलायचे झाले तर स्ञीयांना आपल्या समाजात फार आदराचे स्थान दिले गेलेले आहे. सर्वप्रथम मातृदेवो भव असच म्हणतात. आपल्या संस्कृतिमधील ही अत्यंत भावनात्मक बाब कायम डोळयापुढे  ठेऊनच  स्त्री जीवनाच्या इतिहासाचे विश्र्लेषण करावे लागेल, आजच्या  स्त्री बाबत कांही निश्चित निष्कर्ष काढता येतील. प्राचीनकाळापासून  स्त्रीच्या सामाजिक  इतिहासाचे दोन महत्वपूर्ण टप्पे पडतात. वैदिक काळातील स्ञी कशी होती ? तिचे सामाजिक स्थान काय होते ? भारतीय संस्कृतिमधे स्ञीचे जे आदराचे स्थान मूलभूत धरलेले आहे. त्या भावनेपोटी तिला आदर मिळत होता की कांही अन्य कारणाने ? यासाठी त्या काळी सम्मानित ठरलेल्या सरस्वती, उमा, लक्ष्मी, सती, गायञी इत्यादि स्ञियांचा विचार करावा लागेल. या सर्व स्वतः कतृत्वशालीनी स्ञिया होत्या. देवसेनेचे सेनापतित्व एकेकाळी दुर्गेकडे होते तर स्वसामर्थ्याने जगाचा दैनंदिन व्यवहार सुरू करणारी देवता म्हणून उषा या देवतेचा लौकिक होता. एकूण स्ञीला, तिच्या कर्तृत्वाला सम्मान देताना  स्त्री पुरूष हा भेदभाव समाजात ठेवला जात नव्हता. स्त्रियांवर उपनयन इत्यादि संस्कार देखील केले जात असत अस वैदिक काळाचं चिञ दिसत.

महाभारत काळानंतर माञ आपल्याला 'न  स्त्री स्वातंत्र्यमर्हति' हे चिञ प्रभावीपणे दिसते. स्ञी ने कुमारिका असतांना पित्यावर, लग्न झाल्यावर पतिवर वृद्धकाळी मुलावर संपूर्णपणे अवलंबून रहावे.  तिच्या मुलांना जर कांही शिक्षण तिने दिले असेल तर फक्त त्यातूनच तिचे कर्तृत्व दिसावे. तिचे शिक्षणदेखील व्रतवैकल्याचे पालन करण्यापुरतेच व्हावे. कुठे वैदिक कालीन सरस्वतीचे चिञ कुठे हे चिञ. भगवद्गीतेत असे मुद्दाम सांगावे लागले की योग्यता असल्यास स्ञीलादेखील मोक्षाचा अधिकार आहे. आणि हा अधिकारदेखील फक्त मोक्षापुरताच मर्यादित राहिला. तशी योग्यता निर्माण करणा-या शिक्षणाचा अधिकार ऐहिक जीवनात इतर कुठलाच सामाजिक अधिकार नव्हता.  स्त्री ने फक्त चूल मूल या दोन गोष्टी सांभाळाव्या. फक्त स्वंयपाकधरातून माजघरात अगर अंग चोरून सोप्यात डोकावयाचे किंवा पुरूष मंडळी नसतील त्यावेळी दरवाजापर्यत यायचे. तिथे तिची हद्द संपली.

स्ञियांभोवती अशी एक पोलादी चौकट दिवसेदिवस जास्तच ढृढ होत होती. ब्रिटिश कालखंडाच्या सुरूवातीला ही बंधने पराकोटीला पोचलेली होती. ब्रिटिश समाजाच्या दृष्टीने अत्यंत आक्षेपार्ह मानवी स्वातंत्र्यमूल्यांवर घाला घालणा-या प्रथा इथे रूढ होत्या. विशेषतः बालविवाह, सती प्रथा, विधवा  स्त्रीयांचे केशवपन, पडदा गोषा पध्दती अशा त्या प्रथा होत्या. त्यातून ब्रिटिश भारतीय विचारवंतांना चालना मिळाली. राजा राममोहन रॉय, आगरकर, महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे या सारख्या समाजसुधारकांनी  स्त्री शिक्षण स्ञी स्वातंत्र्याचा प्रसार तर केलाच पण त्याला पूरक असे योग्य ते कायदे देखील करवून धेतले.                       

या सर्वादा फायदा असा झाला कीं, स्ञी जीवन फक्त चूल मुलात अडकलेले होते त्याऐवजी स्ञिया घराबाहेर येऊ लागल्या. याचे दोन फायदे झाले.  एक म्हणजे असूर्यम्पश्या अशा स्ञियांना जग दिसले. त्यांची दृष्टि वाढली दुसरे म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत ब-याच स्ञियांनी  भाग घेतल्याने ही चळवळ घरादारापर्यत, खेडोपाडयापर्यत जाऊन पोचली यामुळे महात्मा गांधीच्या पुढाकारामुळे स्वातंत्र्यानंतर एक फार मोठा राजकीय विजय स्ञियांच्या पदरांत पडला तो म्हणजे लोकशाही च्या प्रक्रियेत निवडून येण्याची निवडून येण्याची संधी. जगातला इतिहास आपण वाचला तर असे दिसून येते कीं मतदानाचा हक्क मिळण्यासाठी कित्येक देशांत  स्त्रीयांनी लढे दिले आहेत तर कांही देशांत हे लढे चालू आहेत.  अजून देखील कित्येक देशांत राजकीय अधिकारपदावर महिला येऊ शकत नाहीत पण भारतात  स्त्रीयांना हा हक्क मिळालेला आहे.

ही  झाली राजकीय स्थिती. पण सामाजिक स्थिती कांय आहे ? आजतरी अस वाटतं कीं भारतीय संस्कृतितील स्ञीचे जे आदराचे स्थान आहे ते फक्त भावनेच्या दृष्टिकोनातून मिळालेले आहे. कर्तृत्व करण्याची पुरेशी संधी त्यांना मिळत नाही किंवा त्या. कर्तृत्वाचा गौरव केला जात नाही केलाच तर हातच कांहीतरी राखून केला जातो.  स्त्रीच्या शारिरीक दुर्बलतेमुळे तिचे मन बुघ्दिदेखील दुर्बळच असेच असे गृहित धरण्यांत येते. त्यामुळे स्ञियांनी त्यांच्या नाजुकतेला साजेल अशील कामे करावी हा अट्टाहास एकीकडे धरला जातो. हा अट्टाहास फक्त पुरूषच धरतात असे नाही तर  स्त्रीयादेखील धरतात याला गेल्या कित्येक हजार वर्षांच्या सवयीचा परिणाम म्हणावा लागेल दुसरे काय ?

पण  स्त्रीचे बुघ्दिकौशल्य पणाला लागेल, तिच्या कर्तृत्वामुळेच तिला सामाजिक स्थान मिळेल अशी स्थिली निर्माण झाली आहे ती आजच्या आर्थिक परिस्थितीमुळे. दुस-या महायुध्दानंतर जगभर फार मोठया प्रमाणावर महागाई वाढली, औद्योगिकरण वाढले आणि स्ञियांना चरितार्थासाठी नोक-या करणे भाग पडले. त्यातून जास्त प्रमाणावर स्ञी शिक्षण, त्यातून स्ञियांच्या व्यक्तिमत्वाचा विकास आणि त्यातून त्यांच्या कर्तृत्वाला वाव असे घडू लागले. आज भारतात फक्त राजकीय पदावरच  स्त्री पुढारी नाही तर डॉक्टर्स, इंजिनियर्स, आर्किटेक्ट, शास्ञज्ञ, गिर्यारोहण, चिञपट निर्मिती दिग्दर्शन अशा सर्व क्षेञात स्ञी जाऊन पोचलेली आहे. प्रशासकीय क्षेञातदेखील स्ञियांच्या नोक-या फक्त र्क्लाक, टायपीस्ट, स्टेनो अशा रहाता उच्च पदावरदेखील  स्त्रीया दिसून येतात. मात्र ही प्रगती अजूनदेखील प्रारंभावस्थेत आहे असेच म्हणावे लागेल. देवदासीसारख्या प्रथा अजूनही रूढ आहेत, आर्थिकदृष्टया विपन्न कुटुंबातील स्त्रीचे शोषण अजूनही पराकोटीचे आहे.

मात्र या अवस्थेत एका वेगकया दिशेने नव्या अडचणी येऊ लागल्या आहेत, ज्यांचे निराकरण केल्याशिवाय  स्त्रीची सामाजिक प्रगति टिकून राहणार नांही. आजचे यांञिकी युग जीवनातल्या प्रत्येक क्षेञांना स्पर्श करून जात आहे. यामुळे  स्त्रीचे जीवनदेखील यंञवत्‌ होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्त्रीयांनी  घराबाहेरील क्षेञांत कितीही मोठी जबाबदारी उचलायचे ठरविले तरी घरातली जबाबदारी फक्त तिचीच मानली जाते. त्यामुळे घरातले स्वयंपाकपाणी, मुलाचे पालन पोषण, या बरोबरच नाती गोती सांभाळणे, यापैकी कुठल्याही  जबाबदारीतून  स्त्री अजूनही मुक्त झालेली नाही. अजूनही अशा ब-याच रूढी   परंपरामुळे  स्त्री जीवनांतील कर्तृत्वाच्या. दिशा विस्तीर्ण होण्यावर बंधन आहे. 

वेळी - अवेळी ज्या  स्त्रीयांना घराबाहेर थांबावे लागते त्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे घराबाहेर पडता देखील - मागासलेल्या आणि सुशिक्षित उच्चभ्रू अशा दोन्ही स्तरातील  स्त्रीया हुंडयासारख्या पुरूषप्रधान रूढींच्या बळी ठरत आहेत.

यावर उपाय एकच.  स्त्रीयांनी आपले स्ञीपण, त्यात अंतर्भूत असलेली नाजूकता, प्रसंगी त्याचे भांडवल करण्याची प्रवृत्ती, किंवा हयाला दैवदुर्विलास मानून निराशात्मक भूमिका पत्करणे सोडून दिले पाहिजे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे "मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः" अर्थात्‌ माणसाच्या बंधनाचे किंवा मुक्तीचे एकंमेव कारण हे त्याचे मनच असते या उक्तीचे सतत स्मरण ठेवले पाहिजे आणि मनाचा कणखरपणा सतत जपला पाहिजे. आपण  स्त्री  आहोत किंवा पुरूष आहोत आणि                
आपल्या समोरील व्यक्ती  स्त्री आहे किंवा पुरूष आहे यावर आपले सामाजिक संबंध आधारित राहता एका मानवाचे दुस-या मानवाशी जे सामाजिक संबंध असतील, जशा पध्दतीचे असतील ते संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न सर्व समाजने विशेषतः स्ञियांनी केला पाहिजे. आजच्या संक्रमणाच्या अवस्थेत सामाजिक कार्यकत्यांनी थोडी काळजी घेऊन याप्रकारचे वैचारिक वळण समाजाला दिले तर  स्त्रीयांचा सामाजिक उन्नतीचा काळ निश्चित उज्वल असेल.


लीना मेहेंदळे,
मुख्य कार्यकारी अधिकारी
सांगली जिल्हा परिषद, सांगली