Wednesday, September 24, 2008

युगान्तर घडतांना लोकप्रभा 18.5.2007


युगान्तर घडतांना

नेहमी आपण ऐकतो कि हिंदू धर्मांत चार वेद संगितले आहेत -- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तसेच चार वर्ण आहेत -- ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आश्रम पण चार आहेत -- ब्रह्मचर्य, गार्हस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. युगे देखील चार आहेत -- सत्ययुग, त्रेतायुग द्वापरयुग आणि कलीयुग. मला तरी वाटते की या सर्व संकल्पना एकांत एक गुरफटलेल्या आहेत.
असे मानतात की सत्ययुगांत समाज ही संकल्पना उदयाला आली होती पण राजा आणि राज्य ही संकल्पना मात्र उदयाला आलेली नव्हती. आगीचा शोध, आकडयांची व गणिताची संकल्पना या सर्वांच्या पुढे मानवजात पोचलेली होती. शेतीला तसेच पशुपालनाला सुरुवात झाली होती पण तरीही ज्ञानाच्या कक्षा फारश्या रुंदावल्या नव्हत्या. माणूस समाजात रहात होता, तरी शेती आणी गांव-समाजावर अवलंबून नव्हता. अजूनही वने त्याला तेवढीच जवळिकीची होती ज्ञानसाधना मोठया प्रमाणावर होण्याची गरज होती. ज्ञानाच्या नव्या कक्षा शोघणे शोघलेल्या ज्ञानाचा प्रसार इतरांपर्यंत करणे आणी त्या ज्ञानाच्या आधारे उपजीविका करण्याची घडी बसवणे या तीनही बाबी महत्वाच्या होत्या. म्हणूनच जंगलात राहून ज्ञानासाधना चालत असे. तिथेच ज्ञानाच्या प्रसारासाठी गुरुकुलेही चालत. अशी मोठी गुरुकुले चालवणारे ऋषि आपल्याकडे विद्यार्थी आणून ठेवीत. त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करीत. त्यांच्याकडून कामेही करून घेत. फार मोठी विद्यार्थी संख्या असेल त्या ऋषिंना कुलगुरु हे नाव संबोधन होते. या संबोधनाचा वापर महाभारतात झालेला आहे.
एकीकडे व्यवसायज्ञानाचा प्रसार होऊन शेती, पशुसंवर्धन, शस्त्रास्त्रांचा शोध इत्यादि गोष्टी घडत होत्या. आरोग्य रक्षणासाठी आयुर्वद निर्माण होत होता. जलदगति वाहने तयार होत होती. शंकराचा नंदी, दुर्गेचा सिंह, विष्णूचा गरुड, कार्तिकेयाचा मयूर, गणपतिचा मूषक, लक्ष्मीचे घुबड, सरस्वतीचा हंस, यमाचा रेडा, सूर्याचा घोडा या सारखी वाहने नेमकी कुठल्या दिशेने संकेत करतात हे आज समजणे कठीण आहे. पण वायुवेगाने जाणारा व तशी गति लाभावी म्हणून जमीनी पासून काही अंगुळे वरून चालणारा इंद्राचा रथ होता तसेच पुढील काळांत आकाश मार्गे जाणारे पुष्पक विमान कुबेराकडे व त्याच्याकडून लंकाधिपती रावणाकडे आलेले होते. त्याही पलीकडे मनाच्या वेगाने संचार करण्याची व तीनही लोकांत कुठेही क्षणार्धात पोचण्याची युक्ति नारदाकडे होती. प्रसंगी आपल्या बरोबर ते इतंरानाही या प्रवासात सामिल करुन घेऊ शकत होते. थोडक्यांत तीव्र गतीच्या वाहनांचा शोध खगोल शास्त्र आणि अंतरिक्षशास्त्र या सारखे विषय लोकांना अवगत होते. या भौतिक विषयां बरोबरच जीवन म्हणजे कांय, मरण म्हणजे कांय, जीव कुठून आला, चैतन्य म्हणजे कांय, मरणोत्तर माणसाचे काय होते हे प्रश्न देखील माणसाच्या कुतूहलाचा विषय होते. सत्य आणि अमरत्वाचा कांहीतरी गहन संबंध आहे व तो नेमका काय याची चर्चा वारंवार होताना दिसते. कठोपनिषदात यम नचिकेत संवादातला कांही भाग मला नेहमीच विस्मित करतो. वडिलांनी सांगितले -- जा, तुला मी यमाल दान करतो. म्हणून नचिकेत उठून यमाकडे जातो, व तो घरी नाही म्हणून त्याच्या दारात तीन दिवस रात्र वाट बघत बसतो. याचा अर्थ यम ही कोणी आवाक्या बाहेरील व्यक्ति नव्हती. पुढे आलेली सावित्रीची कथा किंवा कुंतीने यमाला पाचारण करून त्यापासून युधिष्ठिरासारखा पुत्र मिळवणे या कथाही हाच संकेत देतात. यमाची पत्नी त्याला सांगते -- हा ब्राह्मण तीन दिवस कांही न खातापिता आपल्या दारांत बसून राहिला आहे. आधी त्याला कांहीतरी देऊन शांत कर जेणेकरून त्याचा आपल्यावर क्रोध न होवो व आपले कांही नुकसान न होवो.
यम नचिकेताला तीन वर मागायला सांगतो. त्यापैकी दोन वरातून नचिकेत वडिलांचे प्रेम व पृथ्वीतलावरील सौख्य मागतो पण तिसर्‍या वरातून मात्र मृत्युपलीकडील ज्ञानाची मागणी करतो. यम त्याला परावृत्त करण्यासाठी स्वर्गसुख व अमरत्व देऊ करतो तेंव्हा नचिकेत उत्तरतो --ज्या अर्थी तू मला या ज्ञानाऐवजी ती सुखे देऊ करतोस त्या अर्थी या ज्ञानाची महती नक्कीच त्या सुखा पेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणून मला तेच ज्ञान हवे. त्यानंतर यम प्रसन्न होऊन त्याला यज्ञाचा अग्नि कसा सिद्ध करायचा व त्यातून सत्याचे ज्ञान कसे मिळवायचे व त्यातून मृत्युपलीकडील गूढ रहस्य कसे समजून घ्यायचे हे शिकवतो.
दुसर्‍या सत्यकाम जाबालीच्या कथे मधे देखील जाबालीच्या सत्य आचरणावर प्रसन्न होऊन
स्वत आग्नि हा हंसाचे रूप धारण करून चार वेळा त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो. त्याचे वर्णन करताना -- ऐक, आज मी तुला सत्याचा पहिला पाद काय ते शिकवतो -- अशी भाषा वापरली आहे. त्रिलोकाच्या पलीकडे जाऊन अंतरिक्षातील ज्ञानाच्या संबंधात जे सात लोक सांगितले आहेत त्यापैकी सर्वांत शेवटच्या व सर्वात तेजोमय लोकाचे नाव सत्यलोक असे आहे. तिथे पोचण्यासाठी ब्रह्मज्ञान आवश्यक आहे. ईशावास्योपनिषदात याच ज्ञानाला विद्या व पृथ्वीवरील भौतिक ज्ञानाला अविद्या असे म्हटले आहे पण विद्या आणि अविद्या या दोन्ही सारख्याच महत्वाच्या मानल्या आहेत. जाणकार माणसे विद्या आणि अविद्या या दोघांना पूर्णपणे समजून घेतात मग अविद्येच्या सहाय्याने मृत्युपर्यंत पोचून मृत्यूला पार करून विद्येच्या सहाय्याने अमरत्वाचे प्राशन करतात -- म्हणूनच ईशोपनिषदात सत्यधर्माय दृष्टये ही प्रार्थना तर मांडूक्योपनिषदात सत्यमेव जयते नानृतम्‌ हे ठाम प्रतिपादन केलेले आहे. अशा या सत्ययुगात देखील गणितशास्त्र फार पुढे गेलेले होते. विशेषत कालगणनेचे शास्त्र. पृथ्वीतलावरील कालगणना वेगळी आणी ब्रह्मलोकातील कालगणना वेगळी होती. ब्रह्मलोकातील अवघा एक दिवस म्हणजे आपत्याकडील कित्येक हजार वर्षे असे गणित होते. विविध देवतांनी किंवा असुरांनी कित्येकशे वर्ष तपस्या केली. पार्वतीने शंकरासाठी एक हजार वर्षे तप केले या सारखी वर्णने जर सुसंगत असतील तर त्यांचा संबध या इतर लोकांशी असावा असे मला वाटते. अशा कालगणनेच्या आधारे पृथ्वीतलावर सत्ययुगाचा काळ वर्षे आहे अस सांगितले आहे. त्या काळांत ज्ञानाच्या शोध आणि विस्तार हे समाजाचे प्रमुख ध्येय होते.

त्यानंतर आलेल्या त्रेतायुगाची कालगणना वर्षे सांगितली आहे. या काळात राजा ही संकल्पना उदयाला आली. तानचा विस्तार होताच पण आता जोडीला नगर रचना, वास्तुशास्त्र, भवन निर्माण, शिल्प यासारखे व्यावहारिक पैलू महत्वाचे ठरू लागले. ज्ञानातून सृजन झाले व संपत्ती निर्माण झाली, त्याच बरोबर संपत्तीचे रक्षण महत्वाचे ठरले. धनुर्वेदाचे शास्त्र जन्माला आले. आग्नेयास्त्र, महेंद्रास्त्र, वज्र, सुदर्शन चक्र, ब्रह्मास्त्र यासारखी बलाढय अस्त्र शस्त्र निर्माण झाली. समाजाचे रक्षण करण्यासाठी तसेच समाजातील व्यवस्था टिकवून धरण्यासाठी राजे राजवाडे आले. त्यांनी सैन्य ठेवले. त्याचा खर्च भागवण्यासाठी कर बसविण्याची कल्पना उदयाला आली. शेतीच्या जमीनींवर मालकी हक्क निर्माण झाले. उत्पादनावर कर बसवला जाऊ लागला. हे सर्व सांभाळले जावे म्हणून समाजाची धुरा क्षत्रियांच्या खांद्यावर आली. ज्ञानसाधनेच्या कारणासाठी ब्राह्मणांचा मान कायम होता पण पुढारीपण क्षत्रियांकडे आले. महत्वाच्या प्रसंगी राजगुरूंचा सल्ला घेतला जाई -- ब्रह्मदंडाचा मान राजदंडाच्या मानापेक्षा मोठा होता. पण राजगुरू व ब्रह्मदंड या दोघांचा वापर नैमित्त्िाक होता.
रोजच्या व्यवस्थेसाठी राजा हाच प्रमाण झाला. राजाच्या रूपाने विष्णु भगवान्‌ स्वतचा वावरतात अशी संकल्पना पुढे आली. संपती निर्माण होण्यासाठी इतर कित्येक नवे व्यवसाय आणि तंत्रज्ञान पुढे यायला हवेत. भवन निर्माणासाठी धातुशास्त्र हवे तसेच सुतार लोहार ओतारी हवेत. इतर गोष्टींसाठी विणकर धनगर चांभार हवेत. आयुर्वेदातील स्वस्थवृत्तातील यम-नियम दुय्यम महत्वाचे होऊन औषध निर्मितीला अधिक महत्व आले कारण लढाईतील जखमांवर औषधे हवीत पशुवैद्यकातील ज्ञान एवढे वाढले की सहदेव नकुल आणि भीम यांच्या सारखे क्षत्रिय अनुक्रमे गाई-घोडे आणी हत्तींच्या वंशवृद्धिच्या शास्त्रात पारंगत होते. रथ निर्मिती, रथ हाकणे, होडया, रस्ते, बांधणे तलाव धरणे आणी कालवे बांधणे ही शास्त्र लोकांनी हस्तगत केली. भगीरथाने तर प्रत्यक्ष गंगाच स्वर्गातून उतरवून पृथ्वीवर आणल्याची कथा आहे- हिमालयातून निघून पश्च्िामेकडे वहाणार्‍या गंगेचा प्रवाह ज्या तहेने एकाएकी पूर्वाभिमुख झाला आहे त्यावरून धरणांचे शास्त्र देखील प्रगत झाले असावे असे कळते. रामाने समुद्रातच पूल बांधला. नाणी, विडा आरसे, धातुंचे शिल्प इत्यादी कित्येक उद्योग जन्माला आले.
सत्ययुगामधे शेतीचा जन्म झाला पण द्वापर युगात उद्योग व हस्तकलांचा जन्म झाला त्याचबरोबर वर्णाश्रमांची संकल्पना मोठया प्रमाणात मूळ धरू लागली. ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार करेल तो ब्राह्मण. लढाया व राज्यकारभार बघेल तो क्षत्रिय. कृषि, गोरक्ष, व्यवसाय किंवा व्यापार करेल तो वैश्य आणि सेवा शुश्रुषा व देखभाल करेल तो शूद्र असे वर्ण भेद पडले. तरीपण हे प्रत्येक माणसाच्या जन्मावर अवलंबून नसून गुण व कर्मावर अवलंबून आहेत असे भगवद् गीता सांगते. त्याप्रमाणे खरेच विष्णुला क्षत्रिय तर त्याचाच पुत्र असलेल्या ब्रह्मदेवाला ब्राह्मण मानले जाते. शंकर वर्णांच्या पलीकडे आहे पण गणपति मात्र ब्राह्मण मानला जातो. पण कार्तिकेय मात्र क्षत्रिय. अश्र्िवनी कुमार व धन्वन्तरी कोण म्हणायचे? पण ही एवढी थोडी उदाहरणं सोडली तर समाजात मात्र एखाद्याचा जन्मजात वर्ण वेगळा असूनही अंगी असलेले गुण व केलेले कर्म यांच्या आधारे त्याचा वर्ण वेगळा ठरला असे विश्र्वामित्रासारखे एखादेच उदाहरण त्या काळाच्या वाड्मयात सापडते. की हे फक्त समाज धुरिणांचे स्वप्नच राहिले असे म्हणायचे? असो.
त्रेतायुगानंतर आलेल्या द्वापर युगाचा काळ वर्ष मानला जातो. या युगांत राज्य ही संकल्पना पूर्ण पणे भरभराटीला आली. असे मानतात की महाभारत युद्ध हे द्वापर युगाच्या शेवटच्या टप्प्यात घडले. या काळांत राज्य व्यवस्थेबरोबरच व्यापार व्यवस्था भरभराटीला आली. महाभारताच्या युद्धात त्या काळी शीर्षस्थ असलेले बहुतांश राजे व क्षत्रिय मारले गेले तेंव्हा सुव्यवस्या टिकवण्यासाठी कशाप्रकारची समाज रचना झाली किंवा आधी सत्ययुगांत राजे नव्हते तेंव्हा, त्यानंतर परशुरामाने एकवीस वेळा क्षत्रियांसोबत युद्ध करून निक्षत्रिय पृथ्वी केली त्या काळांत व महाभारत युद्धामुळे क्षत्रियांचा संहार झाला. त्याही काळांत राजे व राज्यव्यवस्था फारसे प्रभावी राहिलेले नसूनही समाज व्यवस्था कशी टिकून राहिली हा एक अभ्यासाचा विषय आहे. त्यानंतर आले ते कलियुग. त्याचा कालावधी वर्षांचा सांगितला जातो. सध्या त्यापैकी ---वे वर्ष चालू आहे. त्यामधे गेल्या दोन अडीच हजार वर्षात जे घडले ते आपल्या समोर आहेच. इ.स.च्या पंधराव्या शतकात लोकशाहीची कल्पना पुढे आली व गेल्या पाचशे वर्षात जगभर ही कल्पना ग्राहय होऊन तीच राज्यव्यवस्था ठरली. कांही देशांचे राजे व डिक्टेटर्स वगळता लोकशाही हा शब्द परवलीचा होऊन बसला.
याचाच अर्थ असा झाला की त्रेता व द्वापर युगांत जी राजा ही संकल्पना रूढ झाली ती आता कालबाह्य ठरत आहे. सोळाव्या शतकापासून खुष्कीच्या मार्गाने ससैन्य आक्रमण इत्यादिंच्या जोडीने समुद्री मार्गातून प्रवास व त्यातूनच व्यापार उदीम ही कल्पना उदयाला आली. काल्पनिक असूनही सिंदबादच्या सफरींच्या गोष्टींना अरेवियन नाइट्स मधे मानाचे स्थान होते. या कालांत इंग्लंड स्पेन पोर्तुगात या देशांमधे समुद्र सफरी, सागर मार्गांचे नकाशे तयार करणे, उच्च दर्जाच्या नौका व नौदल बांधणे हे महत्वाचे ठरले. त्या काळांत खुष्कीच्या मार्गाने व्यापारासाठी भारतातून यूरोपात येणारा माल उच्च कोटीचा असे त्यामधे कापड, रेशीम, जडजवाहिर, कलाकुसर, मसाले इत्यादि असत. त्याच्या बदल्यांत या देशांकडे व्यापारासाठी शस्त्रास्त्रे होती. तलवारी आणी तीरकामठयांचा जमाना चालू राहिला पण त्या जोडीला तोफा आल्या. हळू हळू बंदुका पण आल्या. भारता बरोबर व्यापार चालू ठेवायचा तर शस्त्रास्त्रातील प्रगति वाढायला पाहिजे. इथूनच पुढे यूरोपात शस्त्रनिर्मिती हा मोठा उद्योग आणि व्यापार बनून वाढू लागला.
समुद्री मार्गानेच भारतात यायचे हे ठरवून वास्को डि गामा सर्व प्रथम भारतात पोचला. त्यानंतर भारत शोधायला निघालेल्या कोलंबसने अमोरिका हा नवा प्रदेश, नवे जग शोधून काढले. हा प्रदेशही खनिजांच्या दृष्टीने सुसंपन्न होता. यूरोपीय देशांतून बोटीने भारतात तसेच अमेरिकेतही फे-या सुरू झाल्या. इकडे आपण मात्र त्याच सुमारास समुद्रोल्लंघन हे धर्माबाहेरचे ठरवून टाकले. पृथ्वी प्रदक्षिणा आणि वसुधैव कुटुम्वकम्‌ ही संकल्पना असणा-या आपल्या देशांत समुद्र ओलांडायचा नाही, समुद्रयात्रा निषिद्ध ही संकल्पना कशी व कां आली? जर समुद्रोल्लंघन करणारा मारूति हा पूजनीय तर इतरांना समुद्रयात्रा कां बरे निषिद्ध? असो. पण कधी काळी हे झाले खरे. अठरावे व एकोणविसावे शतक दोन तर्‍हेने विशिष्ट म्हणता येईल. याकाळांत विज्ञानाची प्रगति भरधाव झाली. तसेच प्रगत व शस्त्रे आणि नौदल बाळगून असणार्‍या देशांनी इतर देश जिंकून तिथे आपली राजवट प्रस्थावित केली. एव्हाना लोकशाठीची कल्पना सगळीकडेच मूळ धरू लगली होती. विसाव्या शतकांत ज्यांनी वसाहतवादाच्या विरूद्ध लढा दिला त्यांनी लोकशाही आणि त्यातील तीन तत्वे समता, बंधुता आणि न्याय यांच्यावर भर देऊनच लढा दिला. आज आपल्याल सर्वत्र लोकशाही रूढ झालेली दिसते त्याचे कारण देखील हेच आहे.
लोकशाही मधे राजे संपले पण समाजव्यवस्था चालण्यासाठी राज्यव्यवस्था मात्र अजूनही आवश्यक राहिली. या नव्या राज्यव्यवस्थे मधे प्रत्यक्ष सैन्य, त्याने भूभाग जिंकणे समोरा समोरच्या लढाया इत्यादी संकल्पना मागे पडल्या. व्यापावी संकल्पना समोर येऊ लागल्या आहेत उत्पादनक्षम व्यावसायिक व्यापारी तसेच ज्याला आज आपण सर्विस सेक्टर म्हणतो ते म्हणजेच विविध प्रकारच्या सेवा पुरवू शकणा-या कंपन्या पुढे आल्या आहेत. ब्रह्मदंड किंवा राजदंडापेक्षा आता आथिर्क शक्ति अधिक प्रभावी ठरू लागली आहे. त्याच बरोबर काम हा पुरुषार्थ -- उपभोग घेणे, हेही समाजात जास्तीत जास्त मान्यता पाऊ लागले आहे. परंतु उपभोगवाद जास्त पसरला की त्याचे रूप विकृत होऊ शकते. महाभारत काळांतही असा प्रसंग आला की युद्धानंतर पृथ्वीवरील जवळ जवळ सगळीच राज्ये नष्ट झाली किंवा संपली. उरले ते हस्तिनापूर येथे युधिष्ठिराचे आणि लांब द्वारकेत यादवांचे. यादवांनी लढाईत भाग घेतलेला नव्हता. मग द्वारकेत चंगळवाद वाढू लागला. मद्य, शिकार, खेळ, मनोरंजन यातच सर्व गुरफटले. शेवटी त्या मनोरंजनाची परिसीमा झाली ती ज्ञानी सच्छील मुनींची टिंगल टवाळी करण्यांत आणि त्यांच्या शापातून यदुवंशी वीरांनी आपापसात भांडणे करून एकमेकांना नष्ट केले.
आज जगाकडे पहातांना अर्थकारण, अर्थव्यवहार, व्यापारी उलांढाली यांना अतिशय महत्व आलेले आहे हे कळून येते. याचा उगमही यूरोप मधे अठराव्या शतकांत जी औद्योगिक क्रान्ती आली त्यामधून झाला. उद्योगधंदे किंवा उत्पादन हे केंद्रित असू शकते तसेच विकेंद्रित देरवील असू शकतो विकेंद्रित उत्पादन व्यवस्था बहुतांश सर्वसमावेशक असते. तशीच ती टिकाऊ असते. दीर्घकाळ चालणारी असते. पण केंद्रित उत्पादन व्यवस्थेमधे त्या मानाने हजारोपट मोठी उत्पादनक्षमता असते. अशी क्षमता असेल तेंव्हा सर्व तर्‍हेचे मागचे व पुढचे धागेदोरे देखील त्याच पद्धतीने विणावे लागतात. उदाहरणार्थ एक फळ प्रक्रियेचा कारखाना असेल तर त्याला दररोज इतकी टन फळे, इतके पाणी, इतकी वीज, इतके टिनचे डबे लागणारच. तसेच तितके गिर्‍हाईक, तितके मार्केट, तितकी जाहिरातबाजी लागणारच. अशा वेळी नैतिक अनैतिक हा विचार फार जास्त करता येत नाही. अमेरिकेला तिथल्या शस्त्र कारखान्यांत बनणारी शस्त्रे विकली जायला हवी असतील तर जगांत कुठल्या तरी दोन देशांना आपसांत लढत ठेवणे हे देखील ओघाने आलेच. किंवा एखाद्या कंपनीने लाखो युनिट इन्सुलिन बनवणारा कारखाना काढला तर तेवढया लोकांना डायबिटिस होणे गरजेचे आहे तरच इन्सुलिन खपेल. असो ही टोकाची उदाहरणे आहेत. पण वस्तुस्थितीला धरूनच आहेत.
अठरावे आणि एकोणविसावे शतकांत हे औद्योगिक उत्पादन वाढीचे शतक होते. आधीची कृषिवर आधारित अर्थव्यवस्था झपाटयाने उद्योग आधरित बनत गेली. प्रायमरी सेक्टर चे वर्चस्व जाऊन सेकंडरी सेक्टर (उद्योग) पुढे आले. त्याबरोबर त्याला लागणारे वेगळ्या त-हेचे कसब पुढे आले. पूर्वीची कृषिला पोषक अशी बारा बलुतं मोडीत निघून नव्या प्रकारच्या कौशल्याची गरज निर्माण झाली. विसाव्या आणि एकविसाव्या शतकांत सेकंडरी सेक्टर देखील मागे पडले आहे. आता तिसरा टप्पा टर्शियरी किवा र्सव्हिस सेक्टरचा आहे. याला लागणारी कौशल्ये आणि प्रशिक्षण हे पुन्हा ओद्योगिक काळांत लागणा-या कौशल्यापेक्षा वेगळे असते.
या ही पुढे जाऊन आर्थिक क्षेत्रांत आता अर्थ उत्पादनाचा विचार करतांना प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी क्षेत्राखेरीज तीन सेक्टर्स महत्वाची टरत आहेत. आपण हवेतर त्यांना चौथे, पाचवे आणि सहावे क्षेत्र म्हणूं. त्यातले एक इन्फ्रास्टूक्चर किंवा मूलभूत सुविधा निर्माण करण्याचे क्षेत्र व दुसरे इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन चे क्षेत्र आहे. त्यांचा अंतर्भव पूर्वी जरी तिस-या सेक्टर मधे व्हायचा तरी आता त्यांची वेगळी नोंद घेण्याची गरज वाटू लागली आहे. सहावे सेक्टर आहे ते आरडी-एचआरडी चे. म्हणजे संशोधन आणि त्याचबरोबर मानव विकासाचे. म्हणूनच आता कौशल्य- प्रशिक्षण, पेटंट, इन्टेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट हे विषय वेगळे सेक्टर म्हणून हाताळण्याची गरज जाणवू लागली आहे. कदाचित उद्याचे युगांतर घडतांना ते या मुळेच घडेल.
या आधी औद्योगिक क्रान्ति ने एक नव्या युगाला जन्म दिला होता तसेच विजेचा शोध आणि त्याही पेक्षा मोठया अर्थाने विजेच्या बल्बच्या शोधाने एक नवे युगान्तर घडवले. बल्बचा आविष्कार एडिसन ने केला त्या अगोदर सर्वत्र तेलावर चालणारे दिवे किंवा मशाली होत्या. रात्रीवर अंधाराचे साम्राज्य असायचे. फार थोडया जागी व फार थोडया प्रमाणात रात्रीच्या वेळी व्यवहार चालू शकत. आता चोवीस तास उजेडाची व चोवीस तास काम करत रहाण्याची सोय झाली आहे ती या आविष्कारामुळे. बल्ब आले आणि रात्रीची अशी एक वेगळी संस्कृती तयार झाली. अशीच क्रान्ति रेडियो, टीव्ही, कम्प्यूटर व मोबाइल यांनी आणली आहे. टिशू कल्चर आणि क्लोनिंग मधून एक वेगळी क्रान्ति निर्माण होणार आहे. पण निव्वळ अशी क्रान्ति म्हणजे युगांतर नाही. जेंव्हा त्या नव्या आविष्काराने समाजाचे जीवन मूल्यच बदलते, समाज व्यवस्था बदलून जाते तेंव्हा युगान्तर घडतं.
थोडक्यांत कांही नवे आविष्कार व त्यांच्या सोबत एक नवी वैचारिक दिशा, नव्या मूल्यांचा आकृतिबंध आणि त्यांची पडताळणी असे सर्व कांही जुळून येतात तेंव्हा युगांतर घडते. यासाठी मूल्यांची चर्चा सतत होत राहिली पाहिजे. महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता संपवून एका नवीन मूल्याचं वळण लावल. एक युगान्तर घडवलं. राजा रायमोहन राय यांनी विधवा स्त्रीया सती जाण्याची प्रथा बंद पाडून तर कर्वे आणि सावित्री बाईनी स्त्रीशिक्षणाचा पाया रचून एक युगान्तर घडविले. अशा युगान्तराच्या वेळी वर्णव्यवस्था अर्थव्यवस्था कौशल्य प्रबंधन. राज्यव्यवस्था अशा सर्वांचीच कसोटी लागते. आणि तावून सुलाखून जे निघते ते टिकते. तसे कांहीच निघाले नाही तर एक अराजकाची परिस्थती तयार होते त्या अराजकाच्या परिस्थितीत कांही समाज, सभ्यता पार पुसून जातात तर कांही समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील गटांची कांस धरून टिकून रहातात, त्यांची डोळसपणे नोंद ठेवली तरी पुढच्या पिढींना मार्गदर्शक ठरते. आरडी-एचआरडी चे महत्व आहे ते यासाठीच.

----------------------------------------------------------------------------------------

Friday, May 30, 2008

मराठी लेखनाच्या ब्लॉगसाठी - इनस्क्रिप्ट

मराठी लेखनाच्या ब्लॉगसाठी - इनस्क्रिप्ट
- लीना मेहेंदळे, भा.प्र.से.

सुमारे नव्वद ते नव्व्याण्णव टक्के मराठी किंवा कोणत्याच भारतीय भाषेतील लेखकांना हे माहीत नाही कि एका युक्ती मुळे मराठी व तत्सम भारतीय भाषांचे टायपिंग शिकायला फक्त अर्धा तास पुरतो. आणि आता ऑफिसेस मध्ये सर्वत्र संगणकांचा बोलबाला झाल्यावर खूप अधिका-यांनी गरजपुरते एका बोटाने करण्याइतपत इंग्रजी टायपिंग शिकून घेतले आहे. पण त्यांना देखील हे माहीत नाही की त्याच संगणकामध्ये अर्ध्या तासांत मराठी टायपिंग शिकण्याची युक्ती देखील आहे. या युक्तीचे नांव इनस्क्रिप्ट की बोर्ड ले आऊट. पुढे वाचा

----------------------------------------------------

Thursday, May 22, 2008

सत्यवचनाचे वैज्ञानिक तथ्य मटा रविवार 8.6.2008 गेस्ट रूम

सत्यवचनाचे वैज्ञानिक तथ्य
दिवसभरांत आपण जी कांही कामें करतो, त्यांतील एक महत्वाचे काम म्हणजे बोलणे -- वार्तालाप. आपले विचार इतरांपर्यंत पोचवणे हा त्या मागचा हेतू असतो.

बोलण्याआधी एक विचार मनांत स्फुरतो त्याप्रमाणे आपण शब्दांची जुळवाजुळव करतो. आपली भाषा कोणती असेल - मराठी की हिंदी - इंग्रजी? भाव कोणते असतील - सुखाचे, दु:खाचे, सांत्वनांचे, धीराचे, रागाचे, प्रेमाचे की प्रश्नांचे? संभाषण किती असेल - लहान की मोठे? त्याचा विषय कांय असेल? एखादी नवीन घटना की पाऊस पाणी की पैशांचे व्यवहार की शुभेच्छा? आणि सर्वात मोठा प्रश्न- आपण बोलू ते खरे असेल की खोटे? त्यांत किती खरे असेल आणि खोटे किती असेल?

अर्थात्‌ हे सर्व प्रश्न प्रगटपणे आपल्या मनांत नाही जाणवत. पण शब्दांची जुळवणी करतांना हे प्रश्नच त्यांचे स्वरूप ठरवतात.

शब्द जुळणीच्या आधी मनांत एक खळबळीची, मंथनाची प्रक्रिया घडत असते. आपल्या मेंदूतील आणि शरीरातील अपरिमित ज्ञानभांडाराची छाननी होत असते - त्यातूनच कोणते शब्द प्रगटणार ते ठरते.

म्हणूनच आपल्याकडे वाणीची चार स्थित्यंतरे सांगितली आहेत - परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी.

वैखरी म्हणजे प्रत्यक्ष बोलली आणि ऐकली जाणारी शब्दांकित भाषा - तिच्यामुळे प्रत्यक्ष संभाषण घडते. त्या आधीची मध्यमा ही अवस्था - ज्या मधे शब्दांचे प्रगटन होते. त्या आधी पश्यन्ति जिच्या योगे आपल्या विचारांचे आकलन व ज्ञानाचे संकलन करणा-या मेंदूत आपले विचार घनीभूत होत असतात. असं म्हणता येईल की मेंदूला ते विचार "दिसू" लागतात - म्हणूनच पश्यन्ति हा शब्द योजलेला आहे. पण त्याही आधीची अवस्था म्हणजे परा. या अवस्थेत शरीरातील प्रत्येक पेशी आपापल्या परीने - आपल्या संवेदना मेंदूकडे पाठवीत असते. त्यांच्या जोडीलाच मेंदूतील पूर्वसंचित संवेदनाची छाननी व उजळणी देखील होत असते. त्यातूनच आपले शब्द - त्यामधील भाव व त्यांच्या सोबतचे हातवारे आणि क्रिया ठरत असतात. आपण खरे बोलणार की खोटे हे देखील या प्रक्रिये मधून ठरत असते.

खरे तर परा वाणीच्या स्थितिच्याही आधी शरीराची एक अवस्था असते अपरा. पण ती वाणीची स्थिती नसते. ज्या वेळी अपरा स्थितीतून बाहेर पडून वाणी प्रगटनांची क्रिया सुरू होते, तिची पहिली पायरी म्हणजे परा वाणी. अगदी सुरूवातीच्या काळांत आपल्या मनांतील विचारांचे शक्य तेवढे वस्तुनिष्ठ प्रगटन करणे हेच वैखरी वाणीचे उद्दिष्ट होते. त्या मधे खरे की खोटे हा संभ्रम नव्हता कारण खोटेपणाचा विचारच उद्भवलेला नव्हता. त्या प्रगटीकरणातून ज्ञानाची योग्य देवाण-घेवाण व विस्तार होणार होता - होत होता. त्या काळात खोटेपणाचे शब्द वापरून दिशाभूल करण्याची गरज नव्हती. किंबहुना दिशाभूल न होऊ देता, जास्तीत जास्त एकवाक्यता साधून एकत्रितपणे विकासाच्या वाटा शोधल्या जात होत्या.

मग कधीतरी वाणी मधे अनृत किंवा खोटेपणा शिरला. आपण चुकीची माहिती - देऊन इतरांची दिशाभूल करून आपला स्वार्थ साधू शकतो हे मानवप्राण्याच्या लक्षांत आले. ज्ञानभांडारातील माहिती मधून आविर्भूत होणारी वस्तुस्थिती आणि वाणीमधून प्रगट होणारी वस्तुस्थिती यात फरक पडू लागला.

हा फरक आधी पण होताच. कारण परावाणीचे शंभर टक्के तंतोतंत रूपान्तरण वैखरी वाणीत होऊच शकत नाही. त्याला आपल्या शरीरातील व मेंदूतील पेशींच्या मर्यादा कारणीभूत असतात. पण तो फरक मानव शरीराच्या व मनाच्या अपूर्णत्वामुळे होता. अनृतामुळे येणारा फरक हा विचारपूर्वक होता.

अनृतामुळे समाजाची अपरिमित हानी होऊ शकते, ज्ञानाचा विस्तारच थांबवला जाऊ शकतो हे लक्षांत आल्यावर सत्याचे संस्कार करणे हे आवश्यक ठरले. समाज- धुरिणांनी - "ऋतं वच्मि, सत्यं वच्मि" अशी सूत्र ठरविली. "सत्यमेव जयते नानृतम्‌" असे उपनिषदांनी सांगून टाकले. ईशावास्य उपनिषदांत एक सुंदर प्रार्थना आहे –
"हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम्‌ |
तत्‌ त्वम्‌ पूषन्‌ अपावृणु, सत्यधर्माय दृष्टये ||"

"हे सूर्या, माझ्या मनांतील सत्याचे स्वरूप सोन्याच्या आवरणाने झाकले गेले आहे. ते आवरण तू दूर सार आणि मला सत्यधर्माचे दर्शन घडू दे".

आजही समाजाचा विकास व्हायचा असेल तर सत्य माहितीची देवाण- घेवाण, सत्यनिष्ठता हेच भारतीय समाजाला तारून नेतील. सत्यवचनी रामाचे महत्त्व आहे ते याचसाठी. बुध्दाने बोधिसत्त्व मिळवले म्हणजे नेमके कांय झाले? तर परा वाणीचे तंतोतंत प्रगटीकरण वैखरी वाणी मधे होण्याची प्रक्रिया भगवान्‌ बुध्दांनी आत्मसात केली. यासाठी मागील व पुढील क्षणांची अनुभूति टाकून आत्ता आहोत त्या क्षणाचीच अनुभूति घेता आली पाहिजे. भूतकालीन क्षणांच्या अनुभूतिंतून पूर्वसंस्कार प्रस्फुटित होत असतात व ते वर्तमान क्षणाच्या अनुभूतिंवर प्रभाव टाकून त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपापासून वेगळे करतात. म्हणून ते पूर्वसंस्कार विरळ करणे हा बोधीमार्गातील एक उपाय आहे - अशा अर्थाने विपश्यनेतील शिकवण आहे. मनसा, वचसा व कर्मणा एक वाक्यता असली पाहिजे हा विपश्यनेतील सल्लाही याच साठी आहे. जे मनांत आहे, तेच बोला. जे बोलाल, तेच करा. तुकाराम म्हणतात "बोले - तैसा चाले, त्याची वंदीन पाऊले".

मी याकडे फिजिक्सच्या दृष्टिकोणातून पहाते. जे माझ्या मनांत, त्यापेक्षा वेगळ बोलल, तर दुप्पट ऊर्जा खर्च होते. जे बोलल त्यापेक्षा वेगळ वागल तर पुन्हा एकवार ऊर्जा खर्च होते. माझी ऊर्जा मला वाचवायची असेल, टिकवायची असेल, तिचा अपव्यय होऊ द्यायचा नसेल, तर मी मनांत असेल तेच बोललं पाहिजे आणि तेच केलं पाहिजे. माझ्या ऑफिसातील काही जणांनी मला सांगितले - "तुमच्या या सवयीमुळे आमची पण कितीतरी ऊर्जा वाचते कारण तुम्ही जे बोलला, त्याचा काही वेगळा अर्थ असेल कां अशी काळजी आम्हाला कधीच करावी लागत नाही.

आपल्या शरीर रचनेतील सर्वात लहान - किंवा मूलभूत घटक म्हणजे पेशी - Cell. पेशींमधे स्वत:ला विभाजन करून दोन पेशी निर्माण करण्याची म्हणजेच व्दिगुणित होण्याची क्षमता असते. जीवाची उत्पत्ति होत असतांना एकच पेशी असते. मग एकापासून दोन, दोनापासून चार, चारातून आठ, सोळा, बत्तीस, चौसष्ट ----------- अशाप्रकारे पेशींची संख्या वाढत जाते. पण मग ---?

पेशींची संख्या कमी असते, तेंव्हा त्या प्रत्येकीचे महत्त्व, अधिकार, स्टेटस सारखे असतात. शरीरशास्त्रज्ञ असे मानतात की एका विशिष्ट संख्येवर पोचल्यानंतर या पेश्‌ींचे ध्रुवीकरण होण्यास सुरूवात होते. कित्येक पेशी एकत्र येऊन टिश्यू बनतात. आपल्या शरीरात असे वेगवेगळी कामे करणारे वेगवेगळया गुणधर्मांचे टिश्यू असतात. रक्ताचे टिश्यू वेगळे, हाडांचे वेगळे, मेंदूचे वेगळे. एकदा का असे ध्रुवीकरण झाले की मग त्या त्या टिश्यूमधल्या पेशींचे भवितव्य ठरून जाते. हाडांच्या पेशींच्या व्दिगुणित होणा-या पेशी फक्त हाडांच्या टिश्यूचाच भाग होऊ शकतात. मग या प्रत्येक प्रकारच्या टिश्यूने कांय काम करायचे ते ठरवण्याची बरीच सत्ता मेंदूच्या टिश्यूंकडे असते. अशा प्रकारे पेशींमधील समानाधिकाराचे तत्त्व संपून कांही पेशी सत्ता गाजवणा-या तर कांही पेशी सत्ता गाजवून घेणा-या अशी त्यांची कामाची वाटणी होते.

विपश्यनेमुळे आपल्याला सम्यक्‌ सत्य कळते म्हणजेच पर्यायाने या पेशींमधील दूरत्व कमी होऊ शकते. त्या interchangeable होऊ शकतात आणि ज्ञानाचा व क्षमतेचा अपरिमित विस्तार क्षणार्धात होत जातो. याच अवस्थेत असलेल्या ईश्र्वराचे वर्णन ईशावास्य उपनिषदात अस्नाविरं, शुध्दं आणि अपापविध्दं असे केलेले आहे.

अस्नाविरं व्यक्तीला म्हणजे ज्याला स्नायु नाहीत असा. एका पेशीचे ज्ञान दुस-या पेशीकडे पाठवायला स्नायूंची गरज लागत नाही - त्याच्या पेशींमधील ज्ञान संचार स्नायूंच्या माध्यमातून विद्युत्‌ वेगाने होत नसून त्याही पेक्षा तीव्र अपरिमित - infinite वेगाने होतो - instantly होतो - त्याचे वर्णन अस्नाविरं !
शुध्दं - कारण instantly सर्वत्र पसरणा-या ज्ञानामध्ये अशुध्दता येऊच शकत नाही - अशुध्दतेचा स्कोपच उरत नाही. अपापविध्दं - म्हणून तो कोणत्याही पापाने, अनृताने विध्द किंवा अभिभूत होत नाही. आणि त्याचा संचार फक्त मानवी देहापर्यंत मर्यादित नसून चराचराच्या शेवटापर्यंत असतो - चराचराच्या एका कोप-यात प्रगटणारे ज्ञान, किंवा चैतन्य instantly चराचराच्या प्रत्येक कानाकोप-यात पोचलेले असते. असे त्या चैतन्याचे, किंवा चैतन्य स्वरूप ईश्र्वराचे वर्णन केले आहे.
थोडक्यांत सत्य बोलणे, सत्य वागणे व सत्याचाच विचार या क्रियेने आपल्याला बोधिसत्त्व, अमिताभ होता येते. तसेच समाजही ज्ञानवान - विचारवान व संस्कारवान होऊन समाजही बोधिपदाच्या मार्गी लागतो.
------ x ------
मटा, दि 8 जून 2008. गेस्ट रूम सदराखाली प्रकाशित

Monday, March 31, 2008

कार्यक्षम व्यवस्थेसाठी मटा रविवार 29.6.2008 गेस्ट रूम

कार्यक्षम व्यवस्थेसाठी
सुप्रशासन म्हणजे काय याचे उत्तर देताना
कार्यक्षमता (Efficiency), उत्तरदायित्व (Responsibility), सुयोग्य व्यवस्थापन व कार्यपध्दती (System & Procedure) पारदर्शकता (Transparency), संवेदनशीलता (Sensitivity), व दूरदृष्टी (Vision) हे आवश्यक गूण आहेत.
एखादे कार्यालय, संस्था किंवा राष्ट्र मोठे होण्यासाठी कित्येक मुद्दे महत्वाचे ठरतात.त्यापैकी एक आहे, व्यवस्था उभारणीचा, व्यवस्थेची घडी बसविण्याचा.
पुढे वाचा
-----------------------------------------------------------
Also in a doc file at http://www.geocities.com/chakori_baheril_prashasan_16/chintaman_moraya/Karyasham_Vyavastha.doc---dvb fonts

Monday, March 24, 2008

सांगलीचे दिवस

सांगलीचे दिवस

सांगली म्हटल की मला सगळयांत आधी आठवतात भाप्रसे मधील माझे उत्तर हिंदुस्तानी सहकारी. महाराष्ट्रांत पोस्टिंग झाल्यावर मराठी शिकण्याच्या प्रयत्नात सांगली - चांगली हा अनुप्रास त्यांना फार उपयोगी पड़तो व सुरवातीला तरी ते या जोडशब्दांचा बराच वापर करतात. पुढे ज्यांना प्रत्यक्ष सांगलीला पोस्टिंग मिळाले ते नेहमीच हा अनुप्रास शब्दशः खरा असल्याची ग्वाही देतात. इथेच १९८२ ते ८५ काम करण्याची संधी मला मिळाली.
सांगली जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी (मुकाअ) म्हणून रुजू झाल्यावर पहिल्याच आठवडयांत घडलेली एक घटना !
प्रौढ़ वयाचे, अत्यंत सौजन्यशील असे देशपांडे माझे पीए होते. एक अध्यक्ष सोडले तर इतर कुणीही त्यांना विचारल्या शिवाय मुकाअ कडे येत नसे किंवा फोन करीत नसे. ते देखील मुकाअ यांना इंटरकॉमवर सूचना देऊन व त्यांचा कल पाहूनच परवानगी देत. शिवाय खोली बाहेर कामाला अतिशय तत्पर असा जाधव शिपाई होता - तो ही तसाच शिस्तीचा. त्याने आत येऊन मला विचारल्याशिवाय बाहेरील कोणीही व्यक्ति आत येणे अशक्य.
आणि मी फाईली पहात असतांना कोणत्याही पूर्व सूचने शिवाय दार ढकलून एक बाई रुबाबाने आत शिरल्या. वय साठ - बासष्ट, प्रकृतीने दणकट, पहाता क्षणी त्या खेडुत, शेतकरी आणि अल्पशिक्षित असल्याची जाणीव होणार्या. रोजच्याच वापरातल नऊवारी लुगड ! बहुधा शेतातून उठूनच इकडे आल्या असाव्यात. मी बेल वाजवून, जाधवला बोलावून "न सांगता सवरता या बाई इथे कशा"----- हा प्रश्न विचारणार तोच माझ्या टेबलापुढे येऊन अत्यंत अधिकार वाणीने दरडावून मला म्हणाल्या - "पुरूष मंडळीना अजिबात घाबरायच कांही कारण नाही - कांय?"
एव्हाना कनवटीतून एक पुडी सोडून त्यामधून लाल कुंकू, काळा बुक्का इ. गोष्टी बाहेर काढून झाल्या होत्या. टेबलाला वळसा घालून माझ्या खुर्चीजवळ येत माझ्या कपाळाला दोन मोठे टिळे लावले. आणि म्हणाल्या - "बाईला खुर्चीवर पाहून कस बरंऽऽ वाटल ! हा सगळयाच बायकांचा स्वाभिमान !"
क्षणापूर्वीचा माझा राग आणि या कोण उपर्या हे प्रश्नचिन्ह विरू लागल होत आणि आश्चर्य मनात डोकावू लागल होत. तेवढयांत "कुणी कांही त्रास दिला तर माझी आई इथे आहे म्हणून सांग चक्क त्यांना" - की पुनः माझं प्रश्नचिन्ह परत आल. त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले - "येईन मी परत - आता लौकर दौरा करा वाळवा तालुक्याचा". मी कसाबसा हसरा चेहरा करुन हो हो म्हटल, आणि उठून उभी राहिले, तस त्या तरातरा चालत निघून गेल्या.
एव्हाना देशपांडे आणि जाधव दारांत येऊन उभे होते. देशपांडे आत आले. "कोण या ? कस येऊ दिल तुम्ही यांना मला न विचारता?"
अहो, यांना कोण अडवणार ? यांनी भेटायचय् म्हटल तर खुद्द दादा देखील (वसंतराव दादा पाटील - त्या वेळी राजस्थान गव्हर्नर, पण मागे एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री !) रस्त्यांत गाडी थांबवून विचारपूस करतात !
पण या कोण? - आता माझा आवाज अत्यंत सौम्य.
या लक्ष्मीबाई नायकवडी !
यावरून मला कांय कप्पाळ बोध होणार? मी देशपांडेना म्हटल - बसा, आणि मला व्यवस्थित सांगा - या कोण !
"या वाळव्याच्या लक्ष्मीबाई नायकवडी - तसा सांगली जिल्हा क्रांतिकारकांनी गजबजलेला - पण हुतात्मा किसन अहिर, क्रांतिसिंह नाना पाटील - आता दोघे हयात नाहीत - वसंतदादा पाटील आणि नागनाथ नायकवडी ही जास्त गाजलेली नांव. लक्ष्मीबाई या जणू सर्वांच्या आई. वय असेल पंच्यात्तरीच्या आसपास (अरेच्चा !) १९३५-४० च्या दरम्यान जेंव्हा सांगलीतील खूप क्रांतिकारक भूमिगत झाले होते तेंव्हा या बाई रोज दीड-दोनशे भाकरी करून त्यांना पोचवत - दादांसकट सगळी यांच्या भाकर्या खाऊन राहिली आहेत."
आता बोला !
------------------
नोकरीत येण्यापूर्वी माझ आयुष्य बिहार मधे गेलेल. नोकरी निमित्त औरंगाबाद, पुणे, मुम्बई - मंत्रालय - हे पाहून झालेले. पण प्रत्येक जिल्ह्याचा स्वतःचा इतिहास आहे - स्वतःची संस्कृति आहे, ती तिथे जाऊनच समजून घेता येते. तिथे पोचल्यावर सर्वांत आधी तीच समजावून घेतली पाहिजे.
महाराष्ट्राचा नकाशा कसा आहे ? डावीकडे एक उभी रेघ - उत्तर ते दक्षिण. उत्तर टोकाहून निघणारी एक आडवी रेघ - पश्च्िाम ते पूर्व. अन् या दोघांनी जोडणारी एक तिरपी रेष - दक्षिण पूर्व - धावणारी. त्रिकोणाच्या तीन टोकांवरील जिल्हे - ठाणे, कोल्हापूर आणि गडचिरोली.
उत्तर-दक्षिण रेघेवर सह्याद्रीचा कडा उभा आहे. कडयाच्या पूर्वेला लागून असलेल्या जिल्हयांना पश्च्िाम महाराष्ट्र म्हणतात. आहे की नाही गंमत? कडयाच्या पूर्वेला डोंगर अगदी हळू - हळू उतरतो, त्या मुळे हे सगळे जिल्हे घाटमाथ्याचेच जिल्हे आहेत. कडयाच्या पश्च्िामेला डोंगर सरकन् उतरतो आणि जेमतेम वीस पेचवीस किलोमीटरच्या आंतच समुद्र गाठतो. तो अरुंद पट्टा म्हणजे कोकण प्रदेश.
सांगली हा देखील असाच घाटमाथ्यावरचा जिल्हा. येरळा, कृष्णा आणि वारणा नद्यांच्या खोर्यांनी बनलेला. अति पश्च्िामे कडील शिराळा तालुका कोकणच मानला जानो. अत्यंत डोंगराळ आणि दुर्गम - लाल माती - मुख्य पिकं भात, नाचणी, वरई आणि हल्ली ऊस ! शहरी आयुष्यातल्या सुखसोई अगदी कमी प्रमाणांत - वीज, रस्ते, शाळा, दवाखाने या चारही सरकारी सोईंचा बराच अभाव.
मात्र क्रांतिकारक घडवण्यांत अग्रगण्य. पत्री सरकारच्या काळात गाजलेला. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून लपून बसायला क्रांतिकारकांना योग्य असा भूगोल.
तिथून जरा उतारावर आणि पूर्वेकडे वाळवा तालुका - हा अत्यंत सुपीक आणि सर्वात श्रीमंत - पिकाच्या नांवाने फक्त ऊसच ऊस. काळी माती. हा दरोडे, गुन्हेगारी, गांवागावातील हेवेदाव्यांनी भरलेला तालुका.
वाळव्याच्या पूर्वेला तासगांव तालुका. त्याच्या उत्तरेला खानपूर आणि दक्षिणेला मिरज तालुका. तासगांवला येरळा आणि कृष्णा दोघींचे पाणी आहे. हा ही वाळव्याइतकाच श्रीमंत तालुका. उसाबरोबरच द्राक्ष, गुलाब, हळद यासारखी पिकं. हा तालुका प्रयोगशील. सिडलेस द्राक्षांचे पहिले प्रयोग इथेच झाले. किर्लोस्कर कंपनी (आता तिचे मुख्य कार्यालय पुण्यांत आहे) आणि चितळे डेअरी इथले मानबिंदु. शिवाय इथल्या कुंडल गांवाला देखील क्रांतीकारकांची परंपरा. कृष्णा आणि येरळेचा संगम हेते ते गांव ब्रह्मनाळ. फार पूर्वीपासून राजस्थान मधील पुष्कर येथे ब्रह्मनाळेतून ब्रह्मदेव उत्पन्न झाला म्हणून माहित होते. आता हे नवे नाम महात्म्य. असो.
मिरज - सांगली हे जोड - शहर ! यांच्या जरास पूर्वेला हरिपूर गांवात वारणा आणि कृष्णा नद्यांचा संगम आहे. तिथून पुढे कृष्णा नदी दक्षिणेला कोल्हापूर जिल्हयाच्या सीमारेषेवरून जात जात कर्नाटकात उतरते.
उत्तर टोकावर खानापूर तालुका. सोन्याचा व्यापार आणि द्राक्ष इथले वैशिष्टय. त्यामुळे नदी नसली तरी सुबत्ता. त्याच्या पूर्वेकडील आटपाडी तालुका, आणि मिरजेच्या पूर्वेकडील कवठे महाकाळ आणि जत तालुका हे तिघेही नद्यांच्या पाण्यापासून वंचितच आहेत. इथल्या जमिनी सुपीक असूनही हे तिघे गरीब तालुके. येरळेच्या पात्रांत खूप खोल पर्यंत वाळू आहे. त्यांत पाणी झिरपून जमिनीखालून कवठे नहांकाळला पोचायचे. त्यामुळे एके काळी इथल्या विहिरींना चांगले पाणी लागायचे, आणि कवठयांत खूप पान मळे पिकायचे. पण सातारा जिल्ह्यांत येरळेवर बांध घातले त्यानंतर इथले पाणी कमी होत गेले.
त्यातच जतच्या पूर्वेकडे कर्नाटकांतील विजापूर जिल्हा. त्यांची मागणी की जत तालुका आम्हाला द्या. तो निर्णय लागणार बेळगांव - निपाणीच्या जोडीने. पण हे ही एक कारण - जत तालुक्या कडे दुर्लक्ष करण्यासाठी कि कधी तरी हा कर्नाटकात जाईल.
या सर्व भौगोलिक विविधतेच्या अनुषंगाने सांगली मधे सांस्कृतिक विविधता देखील खूप आहे. जवळपास प्रत्येक गांवाचे असे कांहीतरी खास वैशिष्टय आहे.
------------------------------
सांगली जिल्हा परीषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माझी बदली तशी अचानकच झाली होती. मंत्रालयात सकाळी मला ऑर्डर मिळाली - ती मी सेक्रेटरींना दाखवली व म्हटल तिथे मुकाअ करंदीकर आहेत - सध्या ट्रेनिंगला मसूरीला गेले आहेत - ते परत आल्यावर त्यांच्याशी बोलून मग जाईन सांगलीला. सेक्रेटरीनी मला थोपवल - तुला मंत्रालय आवडत नव्हतं - जिल्ह्यांत जायची इच्छा आहे, होय ना? मग या कुठल्याही चांगुलपणाच्या मोहात पडायच नाही. हातात ऑर्डर आहे - ती घेऊन संध्याकाळची गाडी गाठ - उद्या तिथे जाऊन हजर हो, नाहीतर चान्स घालवून बसशील.
नोकरीत पुढेही हे वारंवार दिसून आलं -- बदलीची ऑर्डर निघणे आणि रद्द होणे. सरकार मधे एक भल मोठ पर्सोनेल डिपार्टमेंट असत, ते खुद्द मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असत - पण मॅनपॉवर प्लानिंग किंवा बदल्याबाबत एखाद योग्य धोरण अजून पाहिलेल नाही. असो.
मी सांगलीला येऊन रूजू झाल्यावर जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींमधे गडबड उडाली. करंदीकर लोकप्रिय अधिकारी होते, पण याहून मुख्य म्हणजे एक स्त्री अधिकारी जिल्हा परिषदेत कस काम करेल - सर्व पुरुष मंडळींना हा प्रश्न होता - आपण यांच्याशी मोकळे पणाने बोलू शकणार नाही - मग आपली कामे होणार नाहीत - - - - - वगैरे.
हा प्रश्न त्या काळात सर्वच स्त्री अधिकार्यांबाबत वारंवार विचारला जाई, मलाही आधी हा अनुभव होताच.
दोन दिवस उलाघालीत गेल्यावर मी सरळ अध्यक्षांकडे गेले. त्यांना म्हटल - माझ सामान अजून औरंगाबादला आहे आणि मुल आईकडे खानदेशांत. माझी इथे झालेली नेमणूक रद्द करून घेण्यासाठी तुमचे प्रयत्न चालू आहेत अस मी ऐकल - मला स्पष्ट कांय ते सांगाल तर मी देखील सामान वगैरे आणणार नाही.
ज्याला आइस - ब्रेकिंग वगैरे म्हणतात, ते त्या क्षणी झाल असाव. श्री संपतराव माने यांनी निर्णय घेतला की माझी नेमणूक रद्द करून घेण्याची गरज नाही, व मला तस स्पष्टपणे सांगितल. ते वसंतदादांचे सर्वांत जवळचे मानले जात. प्रश्न समजून तो सोडवण्यासाठी झटपट निर्णय घेण्याची विलक्षण क्षमता त्यांच्याकडे होती. त्यांनी कबूल केल की त्या सर्वांच्या मनांत माझ्या बद्दल एक रिझर्व्हेशन होत पण आता ते गेल. त्यानंतर मला पुनः कधीही ही प्रश्न भेडसावला नाही आणि जिल्हा परिषद सदस्यांना देखील नाही. हळू हळू ते सर्वच माझ्या बरोबर मोकळेपणाने बोलू लागले, तावातावाने योजनांची
चर्चा करू लागले. माझ्या दीड वर्ष मुकाअ च्या पोस्ट मधे आणि पुढे दीड वर्ष कलेक्टरच्या पोस्ट मधे एक पुढारी वगळता कुणीही माझ्याशी बोलतांना - वागतांना सभ्यतेचा संकेत मोडला नाही.
-----------------------------------------------
सांगलीच्या जवळच कवठे एकंद गांव आहे - इथल वैशिष्टय म्हणजे सिद्धनाथाचे 'जागृत' मंदिर आणि त्याला बोलला जाणारा नवस. कांय? तर इतक्या इतक्या किलोची शोभेची दारु तुझ्या पालखी समोर उडवेन !
दर दसर्याला सिद्धनाथाची मोठी पालखी निघते. गांवातील बहुतेक घरांतील लहान - थोर, बायका - पुरुष - सगळयांना दारुचे फटाके करण्याचे तंत्र अवगत. पालखी संध्याकाळी सात ते रात्री बारा पर्यंत चालते. त्या वेळी प्रत्येकाने पालखी समोर आपापले फटाके उडवायचे. बारांनतर एका मोठया पटांगणात जमून पुढे रात्रभर ठेवणीतले मोठे फटाके उडवायचे. असा तो सोहळा. भरपूर आतिषबाजी पहायला मिळाली, त्यांनतर दरवर्षी आमच्या घरी दिवाळीच्या फटाक्यांची आगाऊ बेगमी कवठे एकंद मधून होऊ लागली. पुढे मी कलेक्टर झाल्यावर तिथल्या तीन चार होतकरु युवकांना फटाक्यांचा लघु - उद्योग काढायला परवानगी पण मिळवून दिली.
नंतर दहाएक वर्षांनी माझा मोठा मुलगा म्हणाला - आई, मला पण शिकावस वाटत - फटाके कसे बनवतात ते. त्यावेळी मी पुण्याला होते. पण निरोप पाठवला. कवठे एकंदचे एक चांगले पारितोषक - विजेते शिक्षक तोडकर गुरूजींनी जबाबदारी पत्करली. आदित्य पंधरा दिवस सांगलीला जाऊन राहिला. रोज सकाळी बसने कवठयाला जाऊन दिवसभर शिक्षण घेत असे. परत आला तो त्याला वीस एक प्रकारचे फटाके करता येत होते. पुढली खूप वर्ष आमच्या घरांत त्यानेच बनवलेले फटाके उडवत होतो. मग ती क्रेझ संपली - किती धूर निघतो ती जाणीव वाढली. मग आमच्या घरांत दिवाळीत फटाके उडवणे बंद केले.
मात्र अजूनही दर दसर्याला मुलांनी कवठयाला यावे याबद्दल तोडकर गुरूजींचे आमंत्रण असते. आदित्यच्या हुषारी आणि विनम्रतेचे गुण गाइले जातात. मुल देखील मधेच एखाद्या दसर्याला मित्रांबरोबर कवठयास जातात. एकदा त्यांच्या बरोबर स्काटलंडहून आलेला आदित्यचा एक मित्र पीटर पण जाऊन आला. त्यांच्या देशांत फटाक्यांवर किती एक बंधनं - सेफ्टी चे नियम - इथे लहान लहान मुलं देखील फटाके बनवण्यांत आणि उडवण्यांत तल्लीन - तो अगदी अवाक् झाला. पुनः एकदा कवठयाला येणार आहे अस अजूनही अधून मधून लिहितो.

सांगलीच्या आधी औरंगाबाद येथे देखील मी मुकाअ म्हणून वर्षभर काम केले होते. पण तिथे औरंगाबाद जिल्ह्याची विभागणी होऊन नवीन जालना जिल्हा निर्माण झाल्याने जिल्हा परिषद बरखास्त झालेली होती आणि प्रशासक म्हणून सर्व अधिकार माझ्या कडेच होते. इथे सगळ कारभार लोकप्रतिनिधींच्या हातात. शिवाय सांगलीची जिल्हा परिषद श्रीमंत म्हणून ओळखली जाते. सरकारकडून मिळणार्या सात आठशे कोटी रुपयांबरोबरच जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्न आणि बजेट दीडशे कोटीच्या जवळपास होते. अख्ख्या महाराष्ट्रांत ही एकच जि.प. होती जिचा स्वतः चा प्रिंटींग प्रेस होता - तो ही नफ्यांत चालणारा. त्याच प्रमाणे लोकप्रतिनिधींचा स्वभाव अधिकार्याशी मिळते जुळते घेऊन विकासाची कामें पार पाडण्याकडे होता. शिवाय अध्यक्षांच्या शब्दाबाहेर सहसा कुणी जात नव्हत. तेही कधी एखादे चुकीचे काम करा म्हणून अडून बसणार्यांपैकी नव्हते. इतर जिल्हा परिषदांमधील किस्से आणि अनुभवांपेक्षा हा अनुभव खूपच वेगळा आणि चांगला होता. संघर्षाचे प्रसंग आलेच नाहीत असे नाही - पण त्यांची हाताळणी वेगळया तर्हेने कशी करायची ते पहायला मिळाले.
पहिल्या पंधरवडयातच कुठलासा मोठा सभारंभ होता आणि वसंतदादा मुख्य अतिथी म्हणून आले. तेंव्हा ते राजस्थानचे गव्हर्नर होते. ओळरव करून दिल्यावर "कांय सीईओ साहेब, जिल्हा ओळखीचा झाला का नाही?" - शब्द ऐकले आणि मला आठवल - मागे ते सहकारमंत्री व मी प्रांत-ऑफिसर असतांना कात्रज दूध डेअरीच्या एका सभारंभात आम्ही एकत्र होतो तेंव्हाही त्यांनी असच 'प्रांत साहेब' हे संबोधन वापरले होते. पुढे ते पुनः मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी माझी सांगलीलाच कलेक्टर म्हणून नेमणूक केली - तेंव्हाही नेहमी - "कांय कलेक्टर साहेब?" असेच संबोधन असायचे. अत्यंत रागाच्या क्षणी सुद्धा अधिकार्यांचा मान सांभाळायचा आणि कुठल्याही कामासाठी आले तरी कलेक्टर, सीइओ आणी एस् पी यांच्या बरोबर अर्धा ते एक तास घालवून जिल्हयांतील प्रशासनाची अद्ययावत माहिती घ्यायची ही त्यांची दोन तंत्र होती.
--------------------------------------------
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा, या दोन कायद्यांच्या अंतर्गत जिल्ह्यांतील त्रिस्तरीय विकास प्रशासन चालते. ग्राम पंचायतीचे पंच व सरपंच निवडून येतात त्याच प्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य पण. या प्रत्येकांना सरकार तर्फे प्रशासनिक अधिकारी पुरवले जातात ते क्रमशः ग्राम विकास अधिकारी, बीडीओ आणि सीईओ. त्यांच्या जोडीला कित्येक खात्यांचे तज्ज्ञ देखील असतात. विकेंद्रीकृत प्रशासनाची ही व्यवस्था १९६० मधे सर्वप्रथम महाराष्ट्रांत (त्यावेळी गुजरात एकत्र असल्याने तिथेही) आली आणि आजही इतर राज्यांच्या तुलनेत आपली पद्धत जास्त चांगली आहे याचे श्रेय आपल्या त्या काळातील पुढारी आणि अधिकार्याना जाते.
या विकास प्रशासनाने करायची कामे म्हणजे कृषि, पशुपालन, सिंचन, रस्ते, आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण - यांत आता महिला कल्याण, बाल कल्याण, अपंग कल्याण, मागास वर्गीयांचे कल्याण इत्यादि आहेत -- यासाठी कित्येक खास अधिकारी आणि यंत्रणा जि.प. कडे दिलेली आहे.
जमीन महसूलाच्या जोडीनेच सरकार शेतकर्यांकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायतीसाठी सेस गोळा करते - हेच त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नाच साधन. शिवाय शासनच्या कित्येक योजना एजेन्सी तत्वावर विकास यंत्रणेकडून राबवून घेतल्या जातात. त्या पोटी त्यांना मिळणारे - कमिशन हे देखील त्यांचे उत्पन्न. शिवाय कांही योजना सरकार त्यांच्या कडे अशाच सुपूर्द करते. या सर्व बजेटचे नियोजन आणि नेमून दिलेली कामे वेळच्या वेळी पूर्ण होतात की नाही - त्या मधे तालुकावार कांही असमतोल किंवा पक्षपात होत नाही ना वगैरे सर्व बघण्याची जबाबदारी सीईओची.
याच काळात केंद्र सरकारने नव्यानेच एकात्मिक ग्रामीण विकास, तसेच दुष्काळ-प्रवण क्षेत्र विकासाच्या योजना सुरू केल्या होत्या, त्याही राबवायच्या होत्याच.
मुकाअ च्या हाताखाली प्रचंड मोठा स्टाफ आणि यंत्र सामुग्री असते. जिल्हयांतील सर्व शाळांचे शिक्षक, आरोग्य खात्याचे दवाखाने व डॉक्टर्स, नर्सेस, कृषि आणि पशुसंवर्धनाच्या कामासाठी नेमलेले कर्मचारी वर्ग - - - - सगळा स्टाफ सुमारे पंधरा हजाराच्या घरात जातो. वाहनं - मग त्यांत रस्त्यासाठी लागणार्या बुलडोझर, ट्रॅक्टर पासून तर उच्च अधिकार्यांच्या ऍम्बेसेडर गाडयां पर्यंत सगळ आल - सुमारे पाचशे. गांवातील रस्ते, शाळा, पाणी पुरवठा योजना, सिंचन तलाव, पाझर तलाव, बोअर वेल्स, विहिरी बांधण, इमारती, पशु दवाखाने वगैरे. आरोग्य खात्याच्या विविध योजना येत जात - परिवार नियोजन, मलेरिया उन्मूलन, अंधत्व निवारण - मग या सर्वांचे कॅम्पस् लावण, त्यासाठी पुढची- मागची व्यवस्था लावण!
कृषि क्षेत्रात नवीन नवीन जाती निधत होत्या - त्यांच्या बियाणांची प्रसिद्धी आणि वाटप. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, जनावरांच्या सुधारित जाती - अगदी गाई, बकर्या आणि कोंबडया सुद्धा! शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळे प्रयोग. विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन व इतर कार्यक्रम, खेळ, गुणदर्शन, शिक्षकांना पारितोषक सगळया योजनांची यादी करायची म्हटली तर - ?
त्यासाठी सांगली जि.प. मधे दरवर्षी एका छापील पुस्तकाचे प्रकाशन केले जाई - सुमारे दोनशे पानांच !
याच काळांत शासनाने गोबर गॅस प्लॅण्ट बांधायची योजना मोठया प्रमाणावर घेतली आणि मुकाअ यांना प्रयोगासाठी काही मुभा पण दिली. त्यामुळे सांगलीत आम्हीं वेगवेगळ्या एजन्सीज कडून गॅस प्लान्ट बांधून घेतले - फिक्स्ड डोम, फ्लोटिंग डोम, वॉटर-जैकेट सह, वॉटर-जैकेट शिवाय, फायबर-ग्लास डोमचे - - वगैरे. आजही सुस्थितित असलेले गोबर गॅस प्लॅन्ट मोजले आणि त्यांचे वैविध्य पाहिले तर कदाचित सांगलीचा पहिल नंबर लागेल.
सांगली जि.प. चे स्वतचे उत्पन्न असल्याने नेहभीच्या शासकीय योजनांपलिकडे जाऊन त्यांना 'व्यापारी' व "नफा मिळवण्याच्या तत्वावर" कांही योजना राबवता येत होत्या. त्यांत वर्षा -दोन वर्षात नफा मिळण्याचे उद्दिष्ट असे. अशा योजनांची एक मोठी यादीच होईल. कृषि जमीनीत नारळ, केशर आंबा, कलमी पेरु, सीताफळ, बोर इत्यादींची रोपं तयार करुन ठराविक नफा घेऊन शेतकयांना विकणे, तासगांव व जत येथे कुक्कुट पालन केंद्र चालवणे - त्यांत 1 आठवडयाची कोंबडीची पिलं आणून त्यांना उत्कृष्ट औषधपाणी व खाद्य देऊन दहाव्या आठवडयांत शेतकर्यांना विकले जाई - या मुळे
शेतकर्यांना त्या कोंबडया तीन चार महिन्यांत चांगला नफा मिळवून देत, जत येथे वन-नर्सरी, ग्रामपंचायतींना शाळा किंवा बाजारपेठ बांधण्यासाठी कर्जाऊ रकम देऊन ती ब्याजासहित परत घेणे, अशा कांही योजना सांगता येतील.
वाळवा, तासगांव, व मिरज हे श्रीमंत तालुके. इथे नवे नवे प्रयोग होणार - इथले पुढारी पण जास्त जागरूक - नवी योजना आली की लगेच त्यांतला जास्तीत जास्त भाग आपल्या क्षेत्रांत वळवून घेणार - योजना पण राबवणार - नाही असे नाही. त्या खालोखाल खानापूर, शिराळा इथे नेतृत्व चांगले होते. जत, आटपाडी, कवठे महांकाळ मागे पडत. मी जतच्या वन-नर्सरी मधे स्प्रिंकल इरिगेशन सिस्टम बसवण्याची योजना आखली - हेतू हा की इतर शेतकर्यांना त्याचे डेमॉन्स्ट्रेशन पण होईल. फाइल सहमति साठी अध्यक्षांकडे गेल्यावर त्यांनी विचारले - ही योजना जतच्या पुढार्यांनी मागितली आहे? कुणी? (मला न विचारता? असा थोडासा भावही त्यांत असावा.) मी सांगितले - हा मी केलेला तक्ता बधा - प्रत्येक सरकारी किंवा जिप योजनेखाली कोणत्या तालुक्याला किती पैसे दिले ते एकाच तक्त्यांत दर्शवले आहे. त्यावरून कळते की आटपाडी, जत, कवठे महांकाळ इथे खर्च कमी आहे. मग आपणच योजना सुचवायला नकोत कां?
अध्यक्षांनी तक्ता पाहिला. म्हणाले - ठीक आहे. मग जिथे जिथे खर्च खूपच कमी दिसतो - तिथे अजून योजना सुचवा. मी कुणाकडे दुर्लक्ष केले असा ठपका नको यायला.
या घटनेची बर्यापैकी चर्चा झाली. नंतर एकदा नरसिंहपूर गांवचे सरपंच आले, फारसे शिक्षण नव्हते. म्हणाले - "आमच्या गांवला शिक्षणाची मोठी परंपरा आहे. शाळा अपुरी आहे. सगळी जमीन काळ्या खोल मातीची, सोन्याच्या भावाची. शाळेला जास्त जागा कशी देणार? म्हणून तीन मजली शाळा बांधायची - त्यासाठी पाइल फाउंडेशन लागेल."
'मग करा की.'
"जिप कडून कर्ज पाहिजे. तुमच्या योजनेत एखाद्या गांवाला जास्तीत जास्त किती कर्ज द्यावे त्याचे सीलिंग आहे. त्यांत आमची योजना बसत नाही. नॉर्म रिलॅक्स करावे लागतील."
'शिक्षण सभापतींना सांगा.'
"अस आहे, आमची पार्टी एकच - पण आपापसांत हेवे दावे आहेत - ते ऐकणार नाहीत !"
'मग मी कांय करू ?'
'जत वन-नर्सरी ची घटना आमच्या कानांवर आली आहे. तुम्ही सांगितल तर अध्यक्ष ऐकतील.'
'शाळा किती दिवसांत बांधणार ?'
'तीन महिन्याच्या आंत आणि ग्रामपंचायत सर्व कर्ज फेडेल तीन वर्षांत. हव तर शाळा उद्घाटनाची तारीख आजच ठरवू या।'
मी चाळा म्हणून कॅलेंडर उलटू लागले तशी ते म्हणाले - एक इयर प्लानर का कांय असत बघा - संपूर्ण वर्षाच कॅलेंडर एकाच पानावर!
मी थक्कच झाले. त्या आधी मी कधीही इयर प्लानर वापरले नव्हते आणि त्यांनतर कधीही इयर प्लानर चुकवले नाही.

दोन अडीच महिन्यातच शाळा उद्घाटनाला गेले. तिथे तिसर्या मजल्याच्या गच्चीवर लोखंडी कांबी वर काढून ठेवल्या होत्या - गरज पडल्यास पाच मजली इमारत करण्यासाठी.
त्यांनी मला नरसिंहाच्या मंदिरात पण नेले. फारसे माहीत नसलेले मंदिर. काळ्याशार दगडाची अत्यंत कोरीव, तेजस्वी मूर्ती. जवळ-जवळ अर्धा पुरूष उंचीची. मंदिरात तळधर, भुयार, अस कांय कांय आहे. एका ठिकाणी टाकलेली नाणी भुयाराच्या दुसर्या टोकाला निघतात. नरसिंहाची मंदिरं अगदी मोजक्या ठिकाणी आहेत. त्यांतलच हे नरसिंहपूर. चहासाठी त्यांच्या घरी गेलो. त्यांनी अभिमानाने स्वयंपाकघरांत नेले - बायो गॅस - त्याचा वापर शेगडीत. शिवाय एक चूल होती - पण स्मोकलेस डिझाइनची (चिमनी च्या मार्गे धूर बाहेर!) - "या स्वयंपाकघरांत धुरानी काळवंडलेल्या भिंती दिसायच्या नाहीत" - घरांत मोठी मुल, सुना होत्या - सगळी जण सुशिक्षित - बीए - वगैरे. अंगणातल्या एका कोपर्यांत अगदी हळू आवाजात रेडियो चालू होता. "आमच्याकडे कोणी मोठयाने रेडियो ऐकणार नाही. मी त्यांना म्हणतो - उगीच आवाजासाठी रेडियो लावू नका. लक्षपूर्वक ऐकण्याइतका वेळ असेल तरच ऐका. आवाज हळू ठेवला तर लक्ष द्यावे लागते. नसेल लक्ष तर आवाज बंद ठेवा. आपण रेडियो ऐकला पाहिजे - रेडियोने आपल्यावर आदळता कामा नये."
मग आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो. भाषणं झाली. सर्वांत शेवटी सरपंच भाषणाला उठले. शाळा, शिक्षक, त्यांचं
मुलांशी नातं, पालकांशी नातं - इत्यादी बद्दल बोलले - "शिक्षक आपल्या छडीपेक्षा आणि ज्ञानापेक्षा आपल्या आचरणाने मुलांना घडवतो. शिक्षकाला कुठल्याही गांवात स्वत बद्दल आपुलकी व मान निर्माण करावा लागतो. पालकांशी नातं निर्माण कराव लागत. या साठी आठ- दहा वर्ष सहज लागतात. मगच शिक्षकाचा गांवांत विद्यार्थ्यांवर दरारा तयार होतो. मग तो चांगले विद्यार्थी घडवतो. शिक्षक कुणी असा स्टाफ नाही की झाली दोन वर्ष - घ्या ताव्यांत त्यांचं कारकुनी दफ्तर - उचलून टाका त्याला दुसर्या गांवात - तलाठी किंवा ग्रामसेवकाला करतात तस!
पण आजकाल नवी नवी मुल सीइओ म्हणून येतात - बदल्यांच्या याद्या करतात - झाली पांच वर्ष - बदला. अशाने एखादा शिक्षक मुलांना कसा घडवणार ?" ----वगैरे.
आता इतक्या वर्षांनी सांगायला हरकत नाही. माझ्या ऑफिस मधे शिक्षकांच्या बदल्यां साठी याद्या करण्याचे काम चालू होते. दुसर्या दिवशी मी ऑफिस मधे आले आणि माझ्याकडे आलेली सर्व प्रपोजल्स फाडून टाकली. एकच सरकारी नियम, तंत्र, पण सरसकट सगळयांना लावून चालत नाही. तलाठी असेल तर वेगळा, शिक्षक असेल तर वेगळा निकष लावावा वागणार असा विचार मनांत रुजला. वाढला.
प्रशासन म्हणजे कांय? असे नियम, अशी पद्धत, जी एकदा ठरवली की जास्तीत जास्त लोकांवर लागू होईल आणि प्रत्येक माणसासाठी किंवा परिस्थितीसाठी पुनपुन्हा विचार करत बसावा लागणार नाही. पण म्हणजे तुम्ही विचारांना फारकत देणार कां? नाही. सिस्टम मधे तुम्हीं ऐंशा टक्के लोकांना कव्हर करू शकाल. दहा टक्के सिस्टमच्या एका टोकाला तर दहा टक्के दुसर्या टोकाला दिसतील. ते सिस्टम मधे बसणार नाहीत. ते अति दुर्बल तरी असतील किंवा अति हुषार तरी. त्यांची नोंद घ्यावी लागेल - त्यांच्यासाठी मुळापासून, वेगळा विचार करावा लागेल. तो करण्याची पात्रता आणि योग्य निर्णय घेण्याचे धाडस असेल तोच शासक चांगले प्रशासन देऊ शकेल.
-----------------------------------------------

काळाच्या पडद्याआड डोकावून बघायचे तर सांगलीचे एक विशिष्ट स्थान आमच्या घरांत होते. श्रीयुत मेहेंदळे म्हणजेच प्रकाश यानी सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मधून अडुसष्ट साली मेकॅनिकल इंजिनियरची डिग्री घेतली होती. वालचंद कॉलेज आणि वालचंद इंडस्ट्रीचा परिसर हा एक विशाल कुटुंबासारखा आहे. इथे लोकांनी आपापसातले ऋणानुबंध वर्षोन् वर्ष जपले आहेत. अगदी दुसर्या तिसर्या पिढी पर्यंत. इंजिनियरिंग कॉलेजच्या जोडीनेच वालचंद इंडस्ट्रीज देखील त्या कुटुंबाचा एक घटक होती आणि विद्यार्थ्यांना या गोष्टीचा हमखास फायदा मिळत असे. या कॉलेजात प्रकाश एक हुषार, उत्साही, आणि मेकॅ. इंजि. मधे हातखंडा असलेला विद्यार्थी म्हणून ओळखला जाई. सहाजिकच त्याच्या खूप ओळखी. लग्नानंतर आम्हीं खास दौरा करून कॉलेज परिसर फिरलो होतो व भेटी - गाठी घेतल्या होत्या. ते पंचात्तर मधे. विद्यार्थी काळात प्रकाशने केलेली कांही छान इंजिनियरिंग मॉडेल्स आणि फोटोग्राफीचे नमूने अजूनही कॉलेज मधे ठेवलेले आहेत ते पाहिले. आणि आता सात वर्षांनतर माझी इथेच नेमणूक झाली. सहाजिकच वालचंद कॉलेज मधे येण-जाण सुरु झाल. मात्र मर्यादित स्वरूपांत. कारण इथे टूरिंग भरपूर कराव लागत असे. महिन्यातले दहा बारा दिवसतर नक्कीच. त्यामुळे 'वालचंद' परिसराशी माझे तेवढे ऋणानुबंध कांही जुळू शकले नाहीत हे खरे!
स्वातंत्र्य काळापूर्वी सांगली हे एक संस्थान होत आणि इथले राजे बर्यापैकी संपत्त्ि बाळगून होते. संस्थानचे राजे पटवर्धन, हे मूळ तासगांवचे. कित्येक पिढयांपूर्वी पटवर्धन हे पेशव्यांकडे सरदार होते आणि त्यांनी कित्येक लढाया मारल्या. संस्थानाच्या काळातही पटवर्धन राजेसाहेबांनी सांगली तासगांव परिसरात कारखानदारी निर्माण व्हावी म्हणून मोठा हातभार लावला. त्यातील कित्येक व्यापार उदीम ब्राह्मणांच्या हातात होते.
म्हणूनच गांधी वधानंतर पश्च्िाम महाराष्ट्रांत जरी मोठया प्रमाणावर ब्राह्मणांच्या घरांची जाळपोळ, हुसका हुसकी झाली आणि ते देशोधडीला लागेल तरी सांगली - मिरज - तासगांव परिसरात त्याची झळ कमी होती.
संस्थानचे दैवत गणपति. तासगांव आणि सांगली दोन्हीं ठिकाणी आतिशय सुंदर गणपति मंदिरं आहेत.
मी सर्वप्रथम मंदिरात गेले तेंव्हा राजवाडयांत वर्दी देऊन राजेसाहेब आणि राणीसाहेब यांची पण भेट घेतली. आता कांही ते राजे किंवा राणी नाहीत - ते ही आपल्या सारखेच देशाचे एक नागरिक. पण पूर्व सुकृतांचा परिणाम टिकून असेल तो पर्यंत मान मिळतच रहातो. तो त्यांना आजही आहे.
मी दोधांची वेगवेगळी भेट घेतली. भेट तशीच ठरलेली होती. राणीसाहेबांनी आठवण म्हणून शाल - श्रीफळ दिलं. एक पुस्तकही दिलं - दीपाशिखा.
कांही दिवसांनी ते पुस्तक वाचल आणि आश्चर्य वाटले. स्त्र्िायांनी फारसे लिहायची पद्धत त्याकाळी नसूनही एक चांगले कथाबिज असलेली ही कादंबरी. शांताबाईं किर्लोस्करांनी आवर्जून छापवून आणली होती. दीपशिखा या कादंबरी मधे राजघराण्याच्या युवराजांमधे कांही वैगुण्य आणि कमतरता होती, म्हणून गरीब घराण्यातील एका तेजस्वी मुलीचा शोध घेऊन त्यांनी लग्न लावून दिल होत. अशा वेळी त्या तेजस्वी मुलीचे कांय होते तेच झाले होते. तिच्या सर्व आशा आकांक्षांवर निखारे पडत होते. दोन मुल झाली तरी मनाला लागलेली जिव्हारी जखम बुजत नव्हती. सासरे वारले तशी ती जखम जास्त चिघळू लागली. शेवटी एक अधिकारी मदतीला धावले. दोधांचे नाजुक भावबंध जुळले - लग्नबंधनाने ते अजून दृढ़ होणार, त्यांना सामाजिक मान्यता मिळणार, तो काळाने झडप घालून त्यांना उचलले. अशी ती कथा. याच राणीसाहेबांचा मुलगा मुंबई फिल्म इंडस्ट्रीज मधे मोठा फायनान्सर आहे आणि नात भाग्यश्री एका बॉक्स ऑफिस हिट फिल्म मधे चमकून गेली - मैंने प्यार किया.
नंतरही तीन चार वेळा त्यांची भेट झाली. सर्व श्रीमंती असूनही राजेपणाची मर्यादा आली की माणूस कस एकाकी पडतं ते पाहिलं. आमच्या वयांत अंतर फार. त्या मर्यादेत जेवढा मोकळेपणा येऊ शकत होता तेवढाच आमच्या बोलण्यांत आला. दोन वर्षांपूर्वी राणीसाहेब पद्मजा राजे पटवर्धन, सांगली यांचे निधन झाल्याची बातमी वाचण्यांत आली आणि डोळ्यांचा कडा ओलावल्या.
आटपाडी तालुक्याची पहिली भेट अशीच लक्षांत रहाणारी. आटपाडी हे एक अगदी छोटस गांव. अजून सी क्लास म्युनिसिपालटी देखील न होऊ शकलेल. ओसाड जमीनी, पाणी फक्त पावसाच - तेही कमी. पण का कुणास ठाऊक - मला इथे आल की नेहमी कोकणांत आल्याचा भास होई. कदाचित गर्द झाडी मुळे असेल. पहिल्या दौर्यातच बीडीओ मला आवर्जून माडगूळला घेऊन गेले. महाराष्ट्राचे गीत-वैभव गदिमांचे जुने घर दाखवले. गदिमांचे वडील ज्या शाळेत मुख्याध्यापक होते ती सरकारी शाळा अजूनही चालू आहे, पण आता शिक्षणाची दिशाच बदलली आहे. नंतर बीडीओ मला घेऊन गेले स्वतंत्रपूरला. स्वतंत्रपूर? हे कांय नांव? कांही इतिहास आहे कां?
आहे. देशातील पहिली ओपन जेल इथे आहे. जवळ जवळ तीनशे एकर परिसरांत. चार जन्मठेपेचे कैदी व कांही इतर कैदी. एका चिंतनशील आणि प्रयोगशील जेलरच्या प्रयत्नातून उभी राहिलेली - 'माणसावर विश्र्वास ठेवा' हा संदेश देणारी. याच जेलरची कहाणी पुढे व्ही शांताराम यांनी 'दो आँखे बारह हाथ' मधे अजरामर करून टाकली. (तो सिनेमा मी पहिलेला नव्हता - या व्हिजिट नंतर आवर्जून पाहिला.) मात्र त्या पाहिल्या जेलर बद्दल फारशी माहिती - त्याचे नांव - त्याच्या नांवाने कांही महाराष्ट्र शासनाचे इनाम - कांही कांही घडलेले आठवत नाही. आज या लेखाच्या निमित्ताने मागे वळून पहातांना वाटत - अरे, आपणही या बाबत कांही केले नाही! अशी करु शकत असलेल्या पण न केलेल्या कामांची यादी करायची तर खूप मोठी होईल. न्यूटनच्या शब्दांत सांगायचे तर 'ज्ञानाच्या' (माझ्या बाबतीत 'कर्माच्या') अफाट सागर किनार्यावरील वाळूचे जे कण मी उचलू शकलो असेन त्यांच्या तुलनेत न उचलू शकलेल्या कणांची संख्या अगणित, अपरंपार अशी आहे.
-------------------------------------------------------------------------
प्रकाशित -- अंतर्नाद, पुणे,
Also on chakori_baheril_prashasan_16/chintaman_moraya/26_sangli_che_diwas_TBIL.doc

सुस्त दंड प्रक्रिया आणि तेलगी --पूर्ण

सुस्त दंड प्रक्रिया आणि तेलगी
-लीना मेहेंदले
म.टा. 5 Jan, 2004,
कुठल्याही देशाची सार्वभौम प्रभुसत्ता चार गोष्टींनी ठरत असते- जमीन, सैन्य, संविधान आणि नाणी. या पैकी एकाही बाबीवर संकट आल तर ते देशाच्या प्रभुसत्तेवर संकट मानल जात.
तेलगी कांड सुरू झाल तेंव्हा माइया डोळयासमोर एका गरीब माणसाची आकृति तरळली. कारकूनाचेही बिरूद नसलेला हा माणूस पुणे कलेक्टर कचेरीच्या कम्पाउंड वॉल शेजारी एका दगडी कट्टयावर बसून स्टॅम्प पेपर्स विकत असे. या गोष्टीला जवळ जवळ तीस वर्ष होत आली. तेंव्हा मी नुकतीच शिकाऊ असिस्टंट कलेक्टर म्हणून पुण्यात दाखल झाले होते
ट्रेनिंग चा एक भाग होता ट्रेझरी आणी सबट्रेझरी इन्स्पेक्शन. त्या काळी बँकिंग यंत्रणा फारशी विस्तारलेली नव्हती. तालुक्याच्या ठिकाणी व कधी-कधी तर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीही बँका नसायच्या. सरकारी पैशांचे सर्व व्यवहार जिल्हा ट्रेझरी आणि तालुक्यातील सबट्रेझरी यांच्या मार्फतच होत. त्यावर नियंत्रण असायचे कलेक्टरचे. म्हणूनच तहसिलदारांकडून प्रत्येक सबट्रेझरीचे दर महिन्याला परीक्षण होत असे.

माझे पहिले सब ट्रेझरी इन्सपेक्शन होते मुळशी तालुक्यांत. एक एक करून रजिस्टर्स तपासली जात होती व सही साठी माइया पुढे येत होती. मला समजावूत सांगितली जात होती. एक रजिस्टर घेऊन एक माणूस समोर आला. दिसायला, वेशभूषेला थेट कलेक्टर कचेरीतल्या स्टॅम्प व्हेण्डर सारखाच. हा मुळशीचा स्टॅम्प व्हेण्डर होता. याचा माइया इन्स्पेक्शनशी काय संबंध?
पण होता, हे मला तेंव्हाच कळले. कुठल्याही देशाच्या जमीनीवर प्रभुसत्ता ही तिथल्या सरकारची असते. लोकांचा हक्क फक्त त्यावर रहाण्याचा, शेती पिकवायचा, व्यापार करायचा इत्यादि. म्हणूनच कोणत्या जमीनवर कोणाचे व्यवहार चालले आहेत याची नोंद सरकार दफ्तरी - म्हणजे कलेक्टर कचेरीत ठेवली जाते. जमीन हस्तांतरणाची नोंद देखील सरकार दफ्तरी अचूकपणे व्हावी म्हणून हे सर्व व्यवहार स्टॅम्प पेपर्स वरच नोंदवले जातात. प्रत्येक हस्तांतरणाच्या वेळी जमीनीच्या किंमतीच्या अनुपाता प्रमाणे कांही रकम सरकारी ट्रेझरीत जमा करावी लागते. म्हणून तेवढया किंमतीचे स्टॅम्प पेपर्स विकत घेऊन त्यावर हे व्यवहार नोंदवतात.
स्टॅम्प पेपर्स म्हणजे जणू कांही रोकड रक्क्मच. त्यांच्या वर लिहिलेल्या दर्शनी आकडया इतकीच त्यांची किंमत असते. त्यावर पन्नास लिहिले असेल तर पन्नास रूपये आणी पांच हजार लिहिले असेल तर पाच हजार रूपये. हे स्टॅम्प पेपर्स बाळगण्याची व विकण्याची परवानगी सहजासहजी मिळत नाही. एखाद्या डेप्युटी कलेक्टर रँक च्या अधिका याने चौकशी करून योग्य ठरवले तरच स्टॅम्प व्हेण्डर चा परवाना मिळतो त्याच्या कडे ठेवलेले स्टॅम्पस् आणि त्याने विकलेले स्टॅम्प पेपर्स यांची दर महिन्याला तहसिलादाराकडून तपासणी होते आणि सब ट्रेझरीच्या एकूण हिशोबत त्याची नोंद ठेवली जाते.
हे सारे प्रशिक्षण त्या पाच मिनिटांत झाले.पुढे भी कलेक्टर असतांना स्टॅम्प व्हेण्डरचे रजिस्टर तपासले असेल तेवढेच. नंतर मी या जमातीच्या अस्तित्वाबद्दल विसरूनच गेले.
गेल्या तीस वर्षात प्रशासनामधे ब याच चांगल्या व्यवस्थांची वाट लागली आहे. शेवटचे स्टॅम्प व्हेण्डरचे इन्सपेक्शन कुणी बरे केले असेल?
आता स्टॅम्प व्हेण्डर्सना परवाना मिळवण्यासाठी तपासणी, खात्री, कॅरॅक्टर सर्टिफिकिट, सचोटी वगैरेची गरज नसते. ते थेट मंत्र्यांची शिफारसी आणू शकतात आणि एखाद्या पोलिस कमिशनरलाही शंभर दोनशे कोटींची लाच सहज देऊ शकतात. आता त्यांना नाशिक सेक्युरिटी प्रेस मधून आधी सरकारच्या ताब्यात येऊन तिथून जिल्हा जिल्हयात येणा या स्टॅम्प पेपर्सची गरजही नाही, ते स्वतःच वाटेल तेवढया रकमेचे स्टॅम्प पेपर्स छापू शकतात. झालच तर नोटाही छापू शकतात. मग देशाच्या सरकारने छापलेल्या नोटांची काय गरज आहे? त्या सरकारची नोकरी करून सरकारने छापलेले शंभर दोनशे रूपये खिशांत मिरवणारी मी कुठे आणि तेलगी बाबांनी छापलेल्या साठ हजार कोटी रूपयांच्या नोटा खिशांत बाळगणारे कुठे? कशी तुलना व्हावी त्यांच्या श्रीमंती व माइया गरीबीची?
फक्त एकाच त हेने ती करावी असंच देशाचा कुठलाही प्रामाणिक माणूस म्हणेल- ती तुलना फक्त अशा
त हने करा की ज्यामुळे देशाच्या सार्वभौम प्रभुसत्तेवर टाच येणार नाही. याचसाठी या व्यवहारांत गुंतलेल्या एकेका व्यक्तीला लवकरांत लवकर दंड द्या - अद्दल घडवा.
भारतीय दंड संहिता आणि त्यांच्या नियमावलीत दोन गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातली एकच आज अमलात आणली जाते कारण ती पोलिसांना सोइस्कर आहे. किंवा आपण अस म्हणू कि गुन्हेगारांना वाचवणा या पळवाटा त्यामधे भरपूर आहेत. म्हणूनच दुस या गोष्टी कडे दुर्लक्ष केले जाते.
यापैकी पहिला नियम असा की ज्यावेळी एकाच घटनेचे कैक पैलू असतील आणी त्यांतून वेगवेगळया प्रकारचे गुन्हे घडले असतील तेंव्हा शक्यतो त्यांची एकत्र, पूर्णत्वाने चौकशी व्हावी- हेतू हा की न्यायालयांचा वेळ वाया जाऊ नये. दुसरा नियम सांगतो की क़क्ष्ङ दाखल झालेल्या सर्व गुन्हयांची चौकशी लवकरांत लौकर संपवून सहा महिन्याच्या आंत तो गुन्हा कोर्टा- समोर आणावा. यापैकी फक्त पहिल्या नियमावर बोटे ठेवले जाते आणि दुसरा नियम धाब्यावर बसवला जातो.
आपल्याला दंड प्रक्रिया गतिमान करायची असेल तर पहिल्या नियमा मधे कांही बदल स्वीकारावे लागतील. या साठी कुठल्याही घटना दुरूस्तीची वाट पहायला नको. कारण नियमामधे 'शक्यतो' असा शब्द वापरला आहे.
याचा परिणाम समजून येण्यासाठी एक उदाहरण घेऊ या. तेलगी प्रकरणांत त्याच्या घरांच्या झडतीत मोठी रकम सापडली. बाकी गोष्टी थोडा वेळ विसरा. फक्त द्वदठ्ठड़ड़दृद्वदद्यड्ढड्ड पैसा बाळगल्या बद्दल एकच खटला तत्काळ भरा आणि त्याल शिक्षा द्या. इतर गुन्हयांची चौकशी होत राहील.
किंवा दुसरे उदाहरण घेउ या. शर्मा यांनी कबूल केले की मुम्बई पोलिस कमिश्नर या पदावर नियुक्ति होण्यासाठी चार कोटी रूपये लाच द्यायचे होते-ते मी तेलगी कडून घेतले. तर मग एक गुन्हा फक्त एवढाच नोंदवा आणी त्वरेने खटला सुरू करा. त्यांच्या ''संपूर्ण'' गुन्हयांची '' संपूर्ण'' चौकशी होईल, मग खटला भरू, मग दीर्घकाळ ''संपूर्ण'' सुनावणी करू मग संपूर्ण शिक्षा देऊ ही पद्धत यांबवा.
हा प्रयोग मी एकदा करून पाहिला आहे. एका मंडल अधिकार याने सुमारे शंभर भूखंडांमधे घोटाळे करून श्रीखंड लाटायचा उद्योग केला होता. आम्हाला एकूण गुन्हयांची जाणीव झाल्यावर भी त्यातले फक्त चार भूखंड आधी निवडले व चौकशी शुरू केली. नंतर पंधरा, नंतर पन्नास व नंतर एकतीस अशी चार टप्प्यांमधे चौकशी सुरू केली त्याने हायकोर्टात दाद मागून सर्व चौकश्या एकत्र व्हाव्या अशी मागणी केली. आमची पहिली चौकशी एव्हाना पूर्ण होत आली होती. आम्ही हायकोर्टात हा मुद्दा तर मांडलाच पण मुख्य मुद्दा असा मांडला की एकाच माणसाने एकाच पद्धतिने एवढे घोटाळे केले असले तरी ज्यांना त्याने फसवले त्या प्रत्येक माणसाच्या दृष्टीने तेवढी एक केस महत्वाची आहे व त्या प्रत्येक माणसाला त्याच्या एका केस मधे लौकर न्याय मिळण्याचा हक्क आहे. सर्वात मुख्य म्हणजे कलेक्टरला यातून जेवढया जमीनी लौकर सोडवता येतील तशा तशा लौकर सोडवून घेण्याचा हक्क आहे. म्हणून आम्ही जमतील तशा केसेस चालवू - एक एक करून किंवा काही केसेस एकत्रपणे.
हायकोर्टाने हा मुद्दा मान्य केला व त्याची मागणी फेटाळली.
एकाच गुन्हयाची छोटी शिक्षा पण तत्काळ की संपूर्ण गुन्हयांची- खूप मोठी शिक्षा पण सुमारे वीस वर्षा नंतर ते ही जनता. पोलिस आणि कोर्टाचा धीर टिकून राहीला तरच, या पैकी आपल्याला कांय हवे आहे?
---------------------------------------------------------------
पता- ई-१८, बापूधाम, सेंट मार्टिन मार्ग, नई दिल्ली- ११००२१
---------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र टाइम्स दि. ----
योग्य सूचना
14 Jan, 2004, 2058 hrs IST
प्रतिक्रिया नोंदवा
लीना मेहेंदळे यांचा लेख वाचला. लेखिकेने व्यक्त केलेले विचार अत्यंत योग्य आहेत. घोटाळ्याअंतर्गत झालेले विविध खटले एकाच वेळी न्यायप्रविष्ट करून एकाच न्यायालयात चालविण्यात खूप वेळ वाया जातो. त्यापेक्षाही दुदैर्वाची बाब म्हणजे '' घोटाळे करा , पैसे कमवा , उडवून मौज-मजा करा. दहा-बारा वषेर् खटला चालवून थोडीफार (झालीच तर) शिक्षा भोगा '' हा मेसेज समाजात जातो. त्यामुळे कायद्याची जरब बसत नाही. सुप्तावस्थेतील गुन्हेगार प्रोत्साहित होतात.

कायद्यातील त्रुटी आणि पळवाटा यांचा फायदा घेऊन आरोपी नेहेमीच तुरुंगाबाहेर राहतात. सर्वसामान्य नागरिक एखाद्या महिन्यानंतर असे घोटाळे विसरत जातो ; कारण त्या दरम्यान एखादा नवीनच घोटाळा वर्तमानपत्रातून झळकलेला असतो.

तेव्हा प्रत्येक प्रकरण ताबडतोब न्यायालयात प्रविष्ट करून तो खटला निकालात काढावा आणि शिक्षा होईल , असे लवकरात लवकर करावे. असे जर होत नसेल तर या संदर्भात एखादी जनहित याचिका दाखल करता येते का हे पाहावे.
डॉ. विजय गजेंदगडकर , डॉ. भरत आगाशे , डॉ. त्र्यंबक मगरे.