काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां ?
-- लीना मेहेंदळे
' कश्मीर हमारे खून में है ' -- दोन वेळा मुशर्रफ यांनी पाकिस्तान टीव्ही वर या वाक्याचा उच्चार केला आहे. त्या मागचा उद्देश अर्थातच स्पष्ट आहे --- पाकिस्तानी जनतेला भावनिक आव्हान !
मी टीव्ही बघत असेन तेंव्हा मधून मधून पीटीव्ही वर पण डोकावून बधत असते. आपल्या कडील रक्षा, गृह किंवा सूचना मंत्रालयामधील कुठल्यातरी सेलला दर रोज चौवीस तास पीटीव्ही पाहून, त्याचा फीड बॅक देण्याची डयूटी लावलेली असेल अशी मला खात्री आहे, तरी पण मीही त्या विभागात असल्या प्रमाणे मी पीटीव्ही चे मॉनिटरिंग करत असते. आपले दूरदर्शन त्यांच्या प्रोपोगंडाच्या मानाने खूप मागे आहे असेही माझे मत आहे -- पण हा सर्व वेगळा विषय होईल म्हणून सोडून दिला तरी काश्मीर बद्दल आपण जास्त विचार करायला आणि मांडायला हवा आहे हे मात्र नक्की !
काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां या आधी जरा मुशर्रफच्या विधानाला उत्तर दिले पाहिजे. मुशर्रफच्या रक्तांत काश्मीर आहे -- मग दिल्ली ( त्यांचं जन्मगांव ) नाहीं कां? सत्तेचाळीस मधे जे लोक मुंबई, दिल्ली लखनऊ किंवा पटणा सोडून पाकिस्तानात गेले त्यांच्या रक्तांत ते ते प्रांत नाहीत कां? अडवानींच्या रक्तांत सिंध, कराची नाही कां? अयोध्येचं राज्य कुशाकडे सोपवतांना श्रीरामाने लवाला नवीन राजधानी स्थापून दिली होती -- ते लवपूर म्हणजेच लाहौर आमच्या रक्तांत नाही कां? सिकंदरच्या युद्धासमयी जे राजे लढले त्यांचे प्रांत, किंवा ज्या तक्षशिला मधून चाणक्याने सिकंदर विरूद्ध मोहिमेची सूत्र सांभाळली आणि चंद्रगुप्ताला सम्राट केले - कित्येक विद्यार्थी धडवले आणि अर्थशास्त्र लिहिले ने तक्षशिला आमच्या रक्तांत नाही कां? गुरु नानकांचं तलवंडी किंवा महाराजा रणजित सिंहची राजधानी लाहौर आमच्या रक्तांत नाही कां? लाला लाजपत राय यांनी सायमन कमिशन विरोधी मोठी चळवळ चालवली आणि भगतसिंगनीं जिथे बॉम्ब विस्फोट धडंवून आणला ने लाहौर आमच्या रक्तांत नाही कां?
हे सगळं मुशर्रफ यांना ऐकवायला चांगल आहे. पण आपल्यालाच विचारायचे झाले तर हा प्रश्न नीट विचारला पाहिजे - की काश्मीर आपल्या रक्तात आहे कां? आपल्या हजारो जवानांच रक्त आणि श्रम जिथे सांडत आहे - ते काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां? लक्षावधी काश्मीरी पंडित गेल्या दहा वर्षात इथून परागंदा झाले. कुणी जम्मूत, कुणी दिल्लीत, कुणी पुण्यांत तर कुणी गोव्यापर्यंत धावून गेले -- त्यांच्या आणि आपल्या रक्तांत काश्मीर आहे कां? ज्या काश्मीर चे वारे आणि बर्फ पंजाब, हिमाचल आणि दिल्लीतल्या वार्या--पावसावर प्रभाव टाकत असतात, ते काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां? वेदांच्याही अगोदर ज्या ठिकाणी आगम तत्वज्ञानाचा उद्गम झाला ते काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां? अनंत नाग, वैष्णोदवी, ज्वालामाता पासून इतर असंख्य तीर्थस्थानं असलेल काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां? कबाइल्यांच्या आक्रमणाविरूद्ध काश्मीरी मुसलमान नागरिकही लढला, आणि हवालदार अब्दुल हमीद सारखे वीरही लढले -- ते काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां?
असेल तर आपण कांय करतोय्? स्वातंत्र्यानंतर गेली सहा दशक आपण काश्मीर प्रश्न चिघळत ठेवला -- आपले स्वतःचे हात बांधून घेऊन आपण काश्मीर जपण्याची भाषा करत राहिलो. संविधानातील कलम तीनशे सत्तर -- आपण स्वतःवर लादून घेतले -- त्याचे पर्यवसन आज काश्मीर मधील आतंकवादात झाले आहे.
सुझारे दहा वर्षापूर्वी काश्मीर मधे आतंकवाद इतक्या मोठया प्रमाणावर उसळला कि भारत सरकार ने
अक्षरशः हात टेकले. मोठया संख्येने हिंदूंनी आपली जमीन जुमला आणि संपत्त्िा सोडून पलायन केले आणि आज ने विस्थापितांच जिणं जगत आहेत. खेडोपाडीचा सामान्य मुसलमान नागरिक हिंदू द्वेषी नव्हता. हिंदूंच्या कित्येक मंदिरातल्या उत्सवात आणि सणा-समारंभात मुसलमानांचा सहभाग असायचा. असे कित्येक मुसलमान
आतंकवादाला बळी पडले. त्यांचे वयही वाढत होते समाजातील त्यांचे वर्चस्व जाऊन ज्या नवीन युवा पिढीच्या हाती सामाजिक पुढारीपण येणार होतं ती सबंध पिढी हळू हळू हिंदू द्वेषी होऊ लागली -- अजूनही होत आहे.
याला कारणं तीन -- सर्वात मोठं कारण म्हणजे काश्मीर मधील विपन्नता, बेकारी आणि रोजगाराच्या साधनांचा अभाव. आतंकवादातील हिंसाकांडामुळे जेवढे हिंदू - मुसलमान प्रत्यक्ष मारले गेले असतील त्यापेक्षा कित्येक पट जास्त लोकांची रोजी रोटी बुडाली. आतंकवादापायी काश्मीर मधील पर्यटनाचा धंदा साफ बुडाला. अशी अर्धपोटी, बेकार, तरूण माणस कुणीकडेही वळतील.
त्याच वेळी त्यांना मोठया प्रमाणवर हवाला पैशांचे आमिष दाखवण्यांत आले. पाकिस्तानी एजेंट त्यांना रिकूट करत, सीमापार घेऊन जात - तिथे आतंकवादाचे प्रशिक्षण देत - त्याच बरोबर कडवा हिंदू विरोधही त्यांना शिकवत. मग त्यांना पुनः सीमा पार करून इकडे आणून पोचवत. सीमेच्या अलीकडे, पलीकडे हे आवागमन चालत असे. त्यासाठी लाच हे मोठे उपयोगी तंत्र होते है कुणालाही पटेल. लाचखोरीचे परिणाम कधी हळू - हळू दिसतात, कधी पटकंन. कधी ते महत्वाच्या क्षेत्रांना प्रभावित करतात कधी ते खपवून घेतले जाऊ शकतात. पण कुठल्याही प्रकारची लाचखोरी आज ना उद्या वाईट परिणाम दाखवणारच. तरीसुद्धा निदान क्रिटीकल सेक्टर्स मधे तरी लाचखोरी थांबवावी हे आपल्या राजकीय पुढार्याना कधीच गरजेचे वाटलेले नाही. असो.
गेल्या दहा वर्षात अजून एक गट कडवा हिंदू विरोधी झाला आहे -- तो म्हणजे ज्यांनी पलायन केलेल्या हिंदूंच्या घरा- दारावर आणि जमीनीवर कब्जा केलेला आहे त्यांचा गट. शेवटचं कारण म्हणजे हिंदू मुसलमानांमधील नैसर्गिक द्वेषाला खतपाणी घालण शक्थ असत, पण त्याला परस्पर सामंजस्यातून कमी करणही शक्य असत. तिकडेही दुर्लक्ष होता कामा नये.
काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां हा प्रश्न विचारण्याच कारण म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही आपण ३७० वे कलम रद्द केले -- तर परिस्थिती वर ताबा मिळवता येईल. तीन गोष्टी धडू शकतील. देशाच्या इतर भागातून हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शिख, डोगरी, नेपाळी मंडळी तिथे गेल्याने त्यांचे लोकसंख्यात्मक प्रमाण बदलेल. जे काश्मीर पंडित अल्पसंख्यांक असल्या मुळे बाहेर पडले, तेही या इतर मंडळींचा आधार असल्याने पुनः परत जाऊ शकतील. काश्मीरांत उद्योग धंदे सुरू करता येतील . मोठया प्रमाणावर फळा - फुलांचे उत्पादन, निर्यात आणि बुडालेला पर्यटन व्यवसाय पुनः उभे राहू शकतील. सीमावर्ती क्षेत्रांमधे कैण्टोनमेंट्स उभारता येतील. ज्या सैनिकी अथवा नागरी अधिकार्यांनी काश्मीरांत नौकरी केली, रक्त नसेल पण घाम गाळला, ज्यांना तिथल्या इतिहास - भूगोलाची आणि सांस्कृतिक वारशाची माहिती आहे, असे लोक तिथे परत जाऊ शकतील आणि विकासाला हातभार लावू शकतील. तसे झाले की आतंकवादांला आपोआप खीळ बसू शकेल.
अफगानिस्तानातील अराजक थांबवण्यासारी एकेकाळी रशियाने आणि आता आतंकवाद थांववण्यासाठी नुकतेच अमेरिकेने तिथे आपले सैन्य घुसवले. मग काश्मीर तर आपल्या देशांतच आहे. आपल्या रक्तांत आहे आपले कित्येक हजार कोटी रुपये तिचे खर्ची पडत आहेत. हे पैसे तुमच्या आमच्या खिशातून जाऊनच तिथे खर्ची पडतात ना.
तर मग काश्मीरात वापरली जाणारी हिंदुस्तान विरुद्ध काश्मीर अशी विभागणीची भाषा आपण अजून किती दिवस मान्य कराचयी आणि कशासाठी?
संविधानातील तीनशे सत्तराव्या कलमाला फाटा देण्याची वेळ होऊन ठेपली आहे. आता उशीर नको. -------------------------------------------------------------------------------------
पता ई - १८, बापू धाम, सेंट मार्टिन मार्ग, चाणक्यपुरी, नई दिल्ली ११००२१
Saturday, March 20, 2010
3/ काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां ?
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 11:33 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment