Thursday, March 18, 2010

त्या स्त्रियांच्या सोबतीसाठी

त्यांच्या सोबत कोण असेल ?
म.टा. 21 Sep, 2004, 1959 hrs IST

नागपूरमध्ये भर दिवसा , भर कोर्टात काही महिलांनी बलात्काराच्या प्रकरणातील एका आरोपीला सामूहिकरीत्या हल्ला करून ठार केलं. अक्कू यादव नावाच्या गुंडाची गेल्या महिन्यात भर कोर्टात झालेली ही हत्या एखाद्या सिनेमात शोभावी अशीच! या घटनेप्रकरणी अटक झालेल्या पाच महिलांना जामीन देणंही जमावाच्या दबावामुळे न्यायालयाला भाग पडलं होतं. अशा या खळबळजनक घटनेला देशभरातील वृत्तपत्रातून प्रसिद्धी मिळाली. न्यूज चॅनल्सनी तर सलग दोन दिवस या घटनेशी संबंधित घडामोडींचा साग्रसंगीत रतीब घातला. त्यामुळे या प्रकरणाची थोडीफार चर्चा सर्वसामान्यांमध्ये झाली. पण पुढे काही नाही. इथून पुढची

लढाई आता त्या पाच महिलांना आपल्या कुणाच्याही मदतीविनाच लढायची आहेे... आपल्या आणि कायद्याच्याही संवेदनहीनतेकडे लक्ष वेधणारा लेख :

नागपूरमध्ये दिवसाढवळ्या भर कोर्टात अक्कू यादव नावाच्या बलात्काराच्या आरोपीला तिथे जमलेल्या स्त्रियांनी ठार केलं. याची खूप चर्चा मीडियाने केली. पण प्रबुद्ध समाजाने केली नाही. आता त्या खुनाच्या केसमध्ये अडकलेल्या स्त्रियांना इथून पुढचा प्रवास एकट्यानेच करायचा आहे. त्यांना सोबत म्हणून आहे एक गोष्ट आणि एक कायदा.

गावाकडचा एक शेतकरी एकदा चांगल्याच आथिर्क अडचणीत सापडला. निरूपाय म्हणून त्याने आपला एकमेव बैल विकायला काढला. मोठ्या बाजारात बैलाला चांगली किंमत मिळेल म्हणून घेऊन गेला. तेवढ्यात एक धटिंगण आला आणि बैलाची दोरी हिसकावून आपल्या हातात घेतली. शेतकऱ्याने विचारलं , हे तू काय चालवलं आहेस ? धटिंगण म्हणाला , ' काही नाही. बैल विकायला घेऊन चाललो आहे. ' शेतकरी म्हणाला , ' अरे , पण बैल माझा आहे. ' वाद वाढला , तशी गदीर् झाली. बैल शेतकऱ्याचाच असणार , अशी बऱ्याच लोकांची खात्री होती. गदीर्तला एक माणूस पुढे आला आणि आपल्या डोक्यावरचं पागोटं सोडून बैलाच्या चेहऱ्यावर पांघरलं. मग तो धटिंगणाला म्हणाला , ' बैल तुझा ना ? मग सांग पाहू , तुझ्या बैलाचा कोणता डोळा जखमी झालाय ? उजवा की डावा ?' धटिंगणाला नीट उत्तर देता येईना. मग त्या माणसाने शेतकऱ्याला विचारले. शेतकरी म्हणाला , ' दोन्ही डोळे नीटनेटके आहेत. कुठलीच जखम झालेली नाही. ' बैलाच्या झाकलेल्या तोंडावरून पागोटं दूर केल्यावर शेतकऱ्याचं बोलणं खरं निघालं. लोकं म्हणाले , ' पाहा , एका हुशार माणसामुळे किती पटकन आणि योग्य न्याय मिळाला. '

पण शहर कोतवालाला हे पटेना. त्याने आपल्या रॅकवरून सगळी कायद्याची पुस्तकं काढून पालथी घातली. कोतवालीत वदीर् नाही , एफआयआर नाही , मग न्याय कसा होणार ? त्याने शेतकऱ्याला हटकलं , ' आधी वदीर् दे. न्याय केला , तो सरकारने नेमलेला न्यायाधीश होता का ? बाजाराच्या एरियामध्ये त्याची ज्युरिसडिक्शन होती का ?' शेतकऱ्याला हे इंग्रजी शब्द आणि सरकारी नेमणुकीचा संबंध कळेना. पण वाद नको म्हणून चौकीवर गेला. एफआयआर आणि कोर्टाच्या बाबतीत इतरांचं जे होतं , तेच त्याचंही झालं. तात्पर्य हे की , सामान्य वाटणारा माणूस प्रसंगी योग्य न्याय करू शकतो. पण पुस्तकाबरहुकूम निकाल द्यायचा झाल्यास न्यायाची पायमल्ली होऊ शकते.

इंडियन एव्हिडन्स अॅक्ट हा एक गंभीर कायदा आहे. तिथे चित्र काय दिसतं ? न्यायदानाचं मुख्य पुस्तक तरी स्त्रियांची बाजू घेतं का ? तिथेही स्त्रीवर अन्याय होत आहे का ? तर , हो! न्यायदानाच्या पुस्तकातच स्त्रीवर अन्याय होत आहे , असं म्हणावं लागेल. एका माणसावर तीन वेळा बलात्काराचा आरोप होऊन प्रत्येक वेळी तो पुराव्याअभावी सुटला आहे. त्यानंतर चौथ्या वेळीही त्याला पुन्हा त्याच आरोपाखाली न्यायालयात आणलं गेलं आहे. फिर्यादी पक्षाने हा मुद्दा कोर्टापुढे मांडला , तर इंडियन एव्हिडन्स अॅक्टचं कलम 54 दाखवून आरोपीचा वकील सांगेल , ' आरोपीचं पूर्वचरित्र तपासायचं नाही. फक्त चालू गुन्ह्याबाबत बोला. '

त्याच इंडियन एव्हिडन्स अॅक्टचं कलम 155 (4) सांगतं , की एखाद्या स्त्रीने कुण्या पुरुषावर बलात्काराचा आरोप केला असेल आणि अशा स्त्रीचं पूर्वचरित्र संशयास्पद होतं , हे सिद्ध केल्यास तिने दिलेला साक्षीपुरावा अग्राह्य मानला जाऊ शकतो.

म्हणूनच कुठलीही स्त्री बलात्काराच्या केसमध्ये साक्ष देण्यासाठी उभी राहिली , की सर्वात आधी तिच्या पूर्वचरित्राचे धिंडवडे निघतात. बलात्कार होत असताना ती आवडीने मिटक्या मारत होती , असं म्हणायलाही आरोपीचे वकील मागेपुढे पाहात नाहीत. न्यायाधीश त्यांना अडवू शकत नाहीत. तिला एवढे अपमानस्पद आणि लांछनास्पद प्रश्न विचारले जातात , की हतबल होऊन रडण्यापलीकडे ती काही करू शकत नाही. मग समोर असलेल्या चौकशीवरून तिचं लक्ष उडतं. तिने दिलेली साक्ष अग्राह्य ठरवायला सगळे मोकळे होतात.

155 (4) कलमामधील ' प्रोसिक्युट्रिक्स ' हा शब्ददेखील अन्यायकारक आणि दूषित वाटतो. संपूर्ण एव्हिडन्स अॅक्ट वाचा. गुन्ह्याच्या सर्व केसेसमध्ये राज्य सरकारच फिर्यादी असतं. अपवाद मात्र बलात्काराचा आरोप करणारी स्त्री. एव्हिडन्स अॅक्टमध्ये तिचं वर्णन प्रोसिक्युट्रिक्स असं असल्याने , जणू काही आरोप सिद्ध करायची जबाबदारी फक्त तिचीच आहे. कदाचित हा शब्द फक्त सिम्बॉलिक म्हणून आला असेल. पण शेवटी त्यातूनच स्त्रीविरोधी मनोभूमिका तयार होते.

ज्या न्यायव्यवस्थेत आरोपीच्या पिंजऱ्यात 54 च्या कलमाचं सुरक्षाकवच मिळालेला पुरुष आहे आणि फिर्यादीच्या पिंजऱ्यातल्या बलात्कारित स्त्रीच्या पूर्वचारित्र्याचे धिंडवडे काढण्याची मुक्त परवानगी आरोपी पक्षाला आहे , त्या न्यायव्यवस्थेसमोर ' आम्हीच न्याय केला ' असं म्हणत काही स्त्रिया उभ्या ठाकल्या आहेत. त्याची ' न्यूज ' करून मीडिया आपल्या कर्तव्यातून मोकळी झालेली आहे. प्रबुद्ध समाज डोळ्यावर कातडं घेऊन निदादेवीची आराधना करत आहे...

लीना मेहेंदळे

( लेखिका ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत.)

No comments: