काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां ?
-- लीना मेहेंदळे
' कश्मीर हमारे खून में है ' -- दोन वेळा मुशर्रफ यांनी पाकिस्तान टीव्ही वर या वाक्याचा उच्चार केला आहे. त्या मागचा उद्देश अर्थातच स्पष्ट आहे --- पाकिस्तानी जनतेला भावनिक आव्हान !
मी टीव्ही बघत असेन तेंव्हा मधून मधून पीटीव्ही वर पण डोकावून बधत असते. आपल्या कडील रक्षा, गृह किंवा सूचना मंत्रालयामधील कुठल्यातरी सेलला दर रोज चौवीस तास पीटीव्ही पाहून, त्याचा फीड बॅक देण्याची डयूटी लावलेली असेल अशी मला खात्री आहे, तरी पण मीही त्या विभागात असल्या प्रमाणे मी पीटीव्ही चे मॉनिटरिंग करत असते. आपले दूरदर्शन त्यांच्या प्रोपोगंडाच्या मानाने खूप मागे आहे असेही माझे मत आहे -- पण हा सर्व वेगळा विषय होईल म्हणून सोडून दिला तरी काश्मीर बद्दल आपण जास्त विचार करायला आणि मांडायला हवा आहे हे मात्र नक्की !
काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां या आधी जरा मुशर्रफच्या विधानाला उत्तर दिले पाहिजे. मुशर्रफच्या रक्तांत काश्मीर आहे -- मग दिल्ली ( त्यांचं जन्मगांव ) नाहीं कां? सत्तेचाळीस मधे जे लोक मुंबई, दिल्ली लखनऊ किंवा पटणा सोडून पाकिस्तानात गेले त्यांच्या रक्तांत ते ते प्रांत नाहीत कां? अडवानींच्या रक्तांत सिंध, कराची नाही कां? अयोध्येचं राज्य कुशाकडे सोपवतांना श्रीरामाने लवाला नवीन राजधानी स्थापून दिली होती -- ते लवपूर म्हणजेच लाहौर आमच्या रक्तांत नाही कां? सिकंदरच्या युद्धासमयी जे राजे लढले त्यांचे प्रांत, किंवा ज्या तक्षशिला मधून चाणक्याने सिकंदर विरूद्ध मोहिमेची सूत्र सांभाळली आणि चंद्रगुप्ताला सम्राट केले - कित्येक विद्यार्थी धडवले आणि अर्थशास्त्र लिहिले ने तक्षशिला आमच्या रक्तांत नाही कां? गुरु नानकांचं तलवंडी किंवा महाराजा रणजित सिंहची राजधानी लाहौर आमच्या रक्तांत नाही कां? लाला लाजपत राय यांनी सायमन कमिशन विरोधी मोठी चळवळ चालवली आणि भगतसिंगनीं जिथे बॉम्ब विस्फोट धडंवून आणला ने लाहौर आमच्या रक्तांत नाही कां?
हे सगळं मुशर्रफ यांना ऐकवायला चांगल आहे. पण आपल्यालाच विचारायचे झाले तर हा प्रश्न नीट विचारला पाहिजे - की काश्मीर आपल्या रक्तात आहे कां? आपल्या हजारो जवानांच रक्त आणि श्रम जिथे सांडत आहे - ते काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां? लक्षावधी काश्मीरी पंडित गेल्या दहा वर्षात इथून परागंदा झाले. कुणी जम्मूत, कुणी दिल्लीत, कुणी पुण्यांत तर कुणी गोव्यापर्यंत धावून गेले -- त्यांच्या आणि आपल्या रक्तांत काश्मीर आहे कां? ज्या काश्मीर चे वारे आणि बर्फ पंजाब, हिमाचल आणि दिल्लीतल्या वार्या--पावसावर प्रभाव टाकत असतात, ते काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां? वेदांच्याही अगोदर ज्या ठिकाणी आगम तत्वज्ञानाचा उद्गम झाला ते काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां? अनंत नाग, वैष्णोदवी, ज्वालामाता पासून इतर असंख्य तीर्थस्थानं असलेल काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां? कबाइल्यांच्या आक्रमणाविरूद्ध काश्मीरी मुसलमान नागरिकही लढला, आणि हवालदार अब्दुल हमीद सारखे वीरही लढले -- ते काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां?
असेल तर आपण कांय करतोय्? स्वातंत्र्यानंतर गेली सहा दशक आपण काश्मीर प्रश्न चिघळत ठेवला -- आपले स्वतःचे हात बांधून घेऊन आपण काश्मीर जपण्याची भाषा करत राहिलो. संविधानातील कलम तीनशे सत्तर -- आपण स्वतःवर लादून घेतले -- त्याचे पर्यवसन आज काश्मीर मधील आतंकवादात झाले आहे.
सुझारे दहा वर्षापूर्वी काश्मीर मधे आतंकवाद इतक्या मोठया प्रमाणावर उसळला कि भारत सरकार ने
अक्षरशः हात टेकले. मोठया संख्येने हिंदूंनी आपली जमीन जुमला आणि संपत्त्िा सोडून पलायन केले आणि आज ने विस्थापितांच जिणं जगत आहेत. खेडोपाडीचा सामान्य मुसलमान नागरिक हिंदू द्वेषी नव्हता. हिंदूंच्या कित्येक मंदिरातल्या उत्सवात आणि सणा-समारंभात मुसलमानांचा सहभाग असायचा. असे कित्येक मुसलमान
आतंकवादाला बळी पडले. त्यांचे वयही वाढत होते समाजातील त्यांचे वर्चस्व जाऊन ज्या नवीन युवा पिढीच्या हाती सामाजिक पुढारीपण येणार होतं ती सबंध पिढी हळू हळू हिंदू द्वेषी होऊ लागली -- अजूनही होत आहे.
याला कारणं तीन -- सर्वात मोठं कारण म्हणजे काश्मीर मधील विपन्नता, बेकारी आणि रोजगाराच्या साधनांचा अभाव. आतंकवादातील हिंसाकांडामुळे जेवढे हिंदू - मुसलमान प्रत्यक्ष मारले गेले असतील त्यापेक्षा कित्येक पट जास्त लोकांची रोजी रोटी बुडाली. आतंकवादापायी काश्मीर मधील पर्यटनाचा धंदा साफ बुडाला. अशी अर्धपोटी, बेकार, तरूण माणस कुणीकडेही वळतील.
त्याच वेळी त्यांना मोठया प्रमाणवर हवाला पैशांचे आमिष दाखवण्यांत आले. पाकिस्तानी एजेंट त्यांना रिकूट करत, सीमापार घेऊन जात - तिथे आतंकवादाचे प्रशिक्षण देत - त्याच बरोबर कडवा हिंदू विरोधही त्यांना शिकवत. मग त्यांना पुनः सीमा पार करून इकडे आणून पोचवत. सीमेच्या अलीकडे, पलीकडे हे आवागमन चालत असे. त्यासाठी लाच हे मोठे उपयोगी तंत्र होते है कुणालाही पटेल. लाचखोरीचे परिणाम कधी हळू - हळू दिसतात, कधी पटकंन. कधी ते महत्वाच्या क्षेत्रांना प्रभावित करतात कधी ते खपवून घेतले जाऊ शकतात. पण कुठल्याही प्रकारची लाचखोरी आज ना उद्या वाईट परिणाम दाखवणारच. तरीसुद्धा निदान क्रिटीकल सेक्टर्स मधे तरी लाचखोरी थांबवावी हे आपल्या राजकीय पुढार्याना कधीच गरजेचे वाटलेले नाही. असो.
गेल्या दहा वर्षात अजून एक गट कडवा हिंदू विरोधी झाला आहे -- तो म्हणजे ज्यांनी पलायन केलेल्या हिंदूंच्या घरा- दारावर आणि जमीनीवर कब्जा केलेला आहे त्यांचा गट. शेवटचं कारण म्हणजे हिंदू मुसलमानांमधील नैसर्गिक द्वेषाला खतपाणी घालण शक्थ असत, पण त्याला परस्पर सामंजस्यातून कमी करणही शक्य असत. तिकडेही दुर्लक्ष होता कामा नये.
काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां हा प्रश्न विचारण्याच कारण म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही आपण ३७० वे कलम रद्द केले -- तर परिस्थिती वर ताबा मिळवता येईल. तीन गोष्टी धडू शकतील. देशाच्या इतर भागातून हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शिख, डोगरी, नेपाळी मंडळी तिथे गेल्याने त्यांचे लोकसंख्यात्मक प्रमाण बदलेल. जे काश्मीर पंडित अल्पसंख्यांक असल्या मुळे बाहेर पडले, तेही या इतर मंडळींचा आधार असल्याने पुनः परत जाऊ शकतील. काश्मीरांत उद्योग धंदे सुरू करता येतील . मोठया प्रमाणावर फळा - फुलांचे उत्पादन, निर्यात आणि बुडालेला पर्यटन व्यवसाय पुनः उभे राहू शकतील. सीमावर्ती क्षेत्रांमधे कैण्टोनमेंट्स उभारता येतील. ज्या सैनिकी अथवा नागरी अधिकार्यांनी काश्मीरांत नौकरी केली, रक्त नसेल पण घाम गाळला, ज्यांना तिथल्या इतिहास - भूगोलाची आणि सांस्कृतिक वारशाची माहिती आहे, असे लोक तिथे परत जाऊ शकतील आणि विकासाला हातभार लावू शकतील. तसे झाले की आतंकवादांला आपोआप खीळ बसू शकेल.
अफगानिस्तानातील अराजक थांबवण्यासारी एकेकाळी रशियाने आणि आता आतंकवाद थांववण्यासाठी नुकतेच अमेरिकेने तिथे आपले सैन्य घुसवले. मग काश्मीर तर आपल्या देशांतच आहे. आपल्या रक्तांत आहे आपले कित्येक हजार कोटी रुपये तिचे खर्ची पडत आहेत. हे पैसे तुमच्या आमच्या खिशातून जाऊनच तिथे खर्ची पडतात ना.
तर मग काश्मीरात वापरली जाणारी हिंदुस्तान विरुद्ध काश्मीर अशी विभागणीची भाषा आपण अजून किती दिवस मान्य कराचयी आणि कशासाठी?
संविधानातील तीनशे सत्तराव्या कलमाला फाटा देण्याची वेळ होऊन ठेपली आहे. आता उशीर नको. -------------------------------------------------------------------------------------
पता ई - १८, बापू धाम, सेंट मार्टिन मार्ग, चाणक्यपुरी, नई दिल्ली ११००२१
Saturday, March 20, 2010
3/ काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां ?
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 11:33 AM 0 टिप्पणियाँ
Thursday, March 18, 2010
त्या स्त्रियांच्या सोबतीसाठी
त्यांच्या सोबत कोण असेल ?
म.टा. 21 Sep, 2004, 1959 hrs IST
नागपूरमध्ये भर दिवसा , भर कोर्टात काही महिलांनी बलात्काराच्या प्रकरणातील एका आरोपीला सामूहिकरीत्या हल्ला करून ठार केलं. अक्कू यादव नावाच्या गुंडाची गेल्या महिन्यात भर कोर्टात झालेली ही हत्या एखाद्या सिनेमात शोभावी अशीच! या घटनेप्रकरणी अटक झालेल्या पाच महिलांना जामीन देणंही जमावाच्या दबावामुळे न्यायालयाला भाग पडलं होतं. अशा या खळबळजनक घटनेला देशभरातील वृत्तपत्रातून प्रसिद्धी मिळाली. न्यूज चॅनल्सनी तर सलग दोन दिवस या घटनेशी संबंधित घडामोडींचा साग्रसंगीत रतीब घातला. त्यामुळे या प्रकरणाची थोडीफार चर्चा सर्वसामान्यांमध्ये झाली. पण पुढे काही नाही. इथून पुढची
लढाई आता त्या पाच महिलांना आपल्या कुणाच्याही मदतीविनाच लढायची आहेे... आपल्या आणि कायद्याच्याही संवेदनहीनतेकडे लक्ष वेधणारा लेख :
नागपूरमध्ये दिवसाढवळ्या भर कोर्टात अक्कू यादव नावाच्या बलात्काराच्या आरोपीला तिथे जमलेल्या स्त्रियांनी ठार केलं. याची खूप चर्चा मीडियाने केली. पण प्रबुद्ध समाजाने केली नाही. आता त्या खुनाच्या केसमध्ये अडकलेल्या स्त्रियांना इथून पुढचा प्रवास एकट्यानेच करायचा आहे. त्यांना सोबत म्हणून आहे एक गोष्ट आणि एक कायदा.
गावाकडचा एक शेतकरी एकदा चांगल्याच आथिर्क अडचणीत सापडला. निरूपाय म्हणून त्याने आपला एकमेव बैल विकायला काढला. मोठ्या बाजारात बैलाला चांगली किंमत मिळेल म्हणून घेऊन गेला. तेवढ्यात एक धटिंगण आला आणि बैलाची दोरी हिसकावून आपल्या हातात घेतली. शेतकऱ्याने विचारलं , हे तू काय चालवलं आहेस ? धटिंगण म्हणाला , ' काही नाही. बैल विकायला घेऊन चाललो आहे. ' शेतकरी म्हणाला , ' अरे , पण बैल माझा आहे. ' वाद वाढला , तशी गदीर् झाली. बैल शेतकऱ्याचाच असणार , अशी बऱ्याच लोकांची खात्री होती. गदीर्तला एक माणूस पुढे आला आणि आपल्या डोक्यावरचं पागोटं सोडून बैलाच्या चेहऱ्यावर पांघरलं. मग तो धटिंगणाला म्हणाला , ' बैल तुझा ना ? मग सांग पाहू , तुझ्या बैलाचा कोणता डोळा जखमी झालाय ? उजवा की डावा ?' धटिंगणाला नीट उत्तर देता येईना. मग त्या माणसाने शेतकऱ्याला विचारले. शेतकरी म्हणाला , ' दोन्ही डोळे नीटनेटके आहेत. कुठलीच जखम झालेली नाही. ' बैलाच्या झाकलेल्या तोंडावरून पागोटं दूर केल्यावर शेतकऱ्याचं बोलणं खरं निघालं. लोकं म्हणाले , ' पाहा , एका हुशार माणसामुळे किती पटकन आणि योग्य न्याय मिळाला. '
पण शहर कोतवालाला हे पटेना. त्याने आपल्या रॅकवरून सगळी कायद्याची पुस्तकं काढून पालथी घातली. कोतवालीत वदीर् नाही , एफआयआर नाही , मग न्याय कसा होणार ? त्याने शेतकऱ्याला हटकलं , ' आधी वदीर् दे. न्याय केला , तो सरकारने नेमलेला न्यायाधीश होता का ? बाजाराच्या एरियामध्ये त्याची ज्युरिसडिक्शन होती का ?' शेतकऱ्याला हे इंग्रजी शब्द आणि सरकारी नेमणुकीचा संबंध कळेना. पण वाद नको म्हणून चौकीवर गेला. एफआयआर आणि कोर्टाच्या बाबतीत इतरांचं जे होतं , तेच त्याचंही झालं. तात्पर्य हे की , सामान्य वाटणारा माणूस प्रसंगी योग्य न्याय करू शकतो. पण पुस्तकाबरहुकूम निकाल द्यायचा झाल्यास न्यायाची पायमल्ली होऊ शकते.
इंडियन एव्हिडन्स अॅक्ट हा एक गंभीर कायदा आहे. तिथे चित्र काय दिसतं ? न्यायदानाचं मुख्य पुस्तक तरी स्त्रियांची बाजू घेतं का ? तिथेही स्त्रीवर अन्याय होत आहे का ? तर , हो! न्यायदानाच्या पुस्तकातच स्त्रीवर अन्याय होत आहे , असं म्हणावं लागेल. एका माणसावर तीन वेळा बलात्काराचा आरोप होऊन प्रत्येक वेळी तो पुराव्याअभावी सुटला आहे. त्यानंतर चौथ्या वेळीही त्याला पुन्हा त्याच आरोपाखाली न्यायालयात आणलं गेलं आहे. फिर्यादी पक्षाने हा मुद्दा कोर्टापुढे मांडला , तर इंडियन एव्हिडन्स अॅक्टचं कलम 54 दाखवून आरोपीचा वकील सांगेल , ' आरोपीचं पूर्वचरित्र तपासायचं नाही. फक्त चालू गुन्ह्याबाबत बोला. '
त्याच इंडियन एव्हिडन्स अॅक्टचं कलम 155 (4) सांगतं , की एखाद्या स्त्रीने कुण्या पुरुषावर बलात्काराचा आरोप केला असेल आणि अशा स्त्रीचं पूर्वचरित्र संशयास्पद होतं , हे सिद्ध केल्यास तिने दिलेला साक्षीपुरावा अग्राह्य मानला जाऊ शकतो.
म्हणूनच कुठलीही स्त्री बलात्काराच्या केसमध्ये साक्ष देण्यासाठी उभी राहिली , की सर्वात आधी तिच्या पूर्वचरित्राचे धिंडवडे निघतात. बलात्कार होत असताना ती आवडीने मिटक्या मारत होती , असं म्हणायलाही आरोपीचे वकील मागेपुढे पाहात नाहीत. न्यायाधीश त्यांना अडवू शकत नाहीत. तिला एवढे अपमानस्पद आणि लांछनास्पद प्रश्न विचारले जातात , की हतबल होऊन रडण्यापलीकडे ती काही करू शकत नाही. मग समोर असलेल्या चौकशीवरून तिचं लक्ष उडतं. तिने दिलेली साक्ष अग्राह्य ठरवायला सगळे मोकळे होतात.
155 (4) कलमामधील ' प्रोसिक्युट्रिक्स ' हा शब्ददेखील अन्यायकारक आणि दूषित वाटतो. संपूर्ण एव्हिडन्स अॅक्ट वाचा. गुन्ह्याच्या सर्व केसेसमध्ये राज्य सरकारच फिर्यादी असतं. अपवाद मात्र बलात्काराचा आरोप करणारी स्त्री. एव्हिडन्स अॅक्टमध्ये तिचं वर्णन प्रोसिक्युट्रिक्स असं असल्याने , जणू काही आरोप सिद्ध करायची जबाबदारी फक्त तिचीच आहे. कदाचित हा शब्द फक्त सिम्बॉलिक म्हणून आला असेल. पण शेवटी त्यातूनच स्त्रीविरोधी मनोभूमिका तयार होते.
ज्या न्यायव्यवस्थेत आरोपीच्या पिंजऱ्यात 54 च्या कलमाचं सुरक्षाकवच मिळालेला पुरुष आहे आणि फिर्यादीच्या पिंजऱ्यातल्या बलात्कारित स्त्रीच्या पूर्वचारित्र्याचे धिंडवडे काढण्याची मुक्त परवानगी आरोपी पक्षाला आहे , त्या न्यायव्यवस्थेसमोर ' आम्हीच न्याय केला ' असं म्हणत काही स्त्रिया उभ्या ठाकल्या आहेत. त्याची ' न्यूज ' करून मीडिया आपल्या कर्तव्यातून मोकळी झालेली आहे. प्रबुद्ध समाज डोळ्यावर कातडं घेऊन निदादेवीची आराधना करत आहे...
लीना मेहेंदळे
( लेखिका ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत.)
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 1:24 AM 0 टिप्पणियाँ
हक्कांसाठी स्त्रियांनी कोर्टाची पायरी अवश्य चढावी
हक्कांसाठी स्त्रियांनी कोर्टाची पायरी अवश्य चढावी
म.टा.27 Sep, 2004, 2033 hrs IST
-- विजयालक्ष्मी बेडेकर , वापी.
लीना मेहेंदळे यांचा सहवेदनापूर्ण लेख वाचला. त्यांनी मांडलेल्या विचारांशी आपण सहमतच होतो. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये , ही जुनी म्हण! पण मी तर म्हणेन की , बायकांनी कोर्टाची पायरी जरूर चढावी. कायद्याने स्त्रियांना हक्क देऊ केले ; परंतु त्यांची अंमलबजावणी व्हावी ही जागरुकताही सरकारी यंत्रणा व समाज दोन्ही घटकांनी ठेवली पाहिजे , नाहीतर अक्कू यादव प्रकरणाची पुनरावृत्ती अटळ आहे. अत्याचार झालेली स्त्री आधीच अर्धमेली होऊन स्वत:ला लांच्छित समजत असते. त्यातही कोर्टात अवघड प्रश्ानंची उत्तरे देणे तिला मरणास्पद वाटते. कायद्यानुसार प्रश्ान् विचारणे जरूर असले , तरी ते अश्लीलतेच्या स्तरावर नसावेत.
आधीच स्त्रियांना वकील मिळत नाहीत. ' मिटवून घ्या ', ' मी कौटुंबिक भांडणाच्या केस घेत नाही ', असे म्हणणारे वकील जेव्हा न्यायाधीशाची खुचीर् ग्रहण करतात , तेव्हा असे म्हणू शकतील का ? एकीकडे देशाचा ' भारतमाता ' म्हणून गौरव केला जातो ; परंतु वस्तुस्थिती काय आहे ? स्त्रियांविरुद्धचे गुन्हे वाढत आहेत. स्वरक्षणासाठी जागृतता ठेवून , आपण समाजाचा समान व जबाबदार घटक आहोत , हा आत्मविश्वास स्त्रियांनी बाळगावा व स्वत:च्या हक्कांचा आग्रह धरावा.
माहेरची चोळी-बांगडी स्त्रीची हक्काची समजली जाते. त्यालाच अनुसरून तिचा वडिलोपाजिर्त इस्टेटीत हिस्सा देय आहे. तो मागणारी स्त्री अजूनही टीकेस कारणीभूत ठरते , असे का ? तिला दुसऱ्याचा हिस्सा नको असतो , फक्त स्वत:चा वैध हिस्सा हवा असतो. अशा वेळी केसशी असंबंधित प्रश्ान् विचारले जातात , वारंवार तुम्ही खोटे बोलताहात हेही ऐकावे लागते. वस्तुत: हा प्रश्ान् पैशांचा नसतो , तर पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या वारशाचा असतो. तरीही तुम्ही लालची आहात , अशासारखे अपमान ऐकावे लागतात.
कोर्टात जाणाऱ्या सुशिक्षित स्त्रियांचे हे अनुभव , तर अशिक्षित स्त्रियांची काय दशा होत असेल ?
------------------------------------------------
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 1:04 AM 0 टिप्पणियाँ