Also on the site of 3rd Marathi Sangrah, Chintaman Morya
संस्कृती अशी घडते
- लीना मेहेंदळे
जगाच्या इतिहासात अत्यंत प्राचीन संस्कृति म्हणून भारतीय आणि चिनी संस्कृतिचा उल्लेख केला जातो. इतरत्रही हडप्पा किंवा मोहंजोदाडो संस्कृति किंवा रोमन आणि मिस्र संस्कृतिचा उल्लेख केला जातो. पण तो मृत संस्कृतिची आठवण म्हणून.
कुठलीही संस्कृति कशी कशी घडत जाते ? किती काळ लागतो? मला एक प्रसंग आठवतो. आम्हाला ज्या दिवशी पहिल्या प्रथम बीजगणित शिकवलं तेव्हा मास्तरानी (अ+ ब) चा वर्ग आणि (अ - ब) चा वर्ग ही दोन सूत्र फळ्यावर लिहून सगळ्यांकडून दहा वेळा घोकून घेतली होती. इतकच नाही तर हे सूत्र वापरून ३२ चा वर्ग, ५९ चा वर्ग अशासारखी सुमारे चाळीस पन्नास गणित करवून घेतली होती. तेंव्हा त्यांनी एक गोष्ट समजावली होती - अंकगणितात गुणाकार करताना आपण उजवीकडून डावीकडे गणित करत जातो, पण बीजगणितातल्या पद्धतीने वर्ग करताना आपण डावीकडून उजवीकडे गुणाकार केला आहे. जशी तुम्ही पहिली पद्धत आत्मसात केली होती. तसंच आता हे नवं वळण पण आत्मसात होईल.
मला वाटत संस्कृतीच पण काहीस असंच असावं.एखादे नवीन वळण उपयोगी आहे असे पटल्यानंतर ते खूप लोकांच्या अंगवळणी पडण्याची प्रक्रिया म्हणजेच संस्कृति असेल. हे वाटायला एक दोन उदाहरणं घडली.
सात-आठ वर्षापूर्वी माझ्या वाचनात एक पुस्तक आलं. आरनॉल्ड नावाच्या एका ब्रिटिश अभ्यासकाने एकोणीसाव्या शतकात भारतात असणार्या साथीच्या तीन रोगावर मात करण्यासाठी ब्रिटीश सरकारने काय काय आणि कसे कसे केले याचे विवेचन केले होते, मात्र सर्वत्र ब्रिटिशांचा बडेजाव अशी भूमिका नव्हती. देवी, कॉलरा आणि प्लेग हे ते तीन रोग. पैकी देवीच्या रोगाबद्दल लिहिताना त्याने एक अत्यंत महत्वाची आणि आपल्याक़डे फारशी चर्चित नसलेली माहिती दिली होती. ती देताना आपल्याकडील कित्येक सांस्कृतिक संदर्भ तो देऊ शकला नाही. तो त्याचा प्रांत नसावा. पण वाचताना आपल्या लक्षात येऊ शकते.
त्याच्या वर्णनावरून असे कळते की सोळाव्या आणि सतराव्या शतकात देवीवर प्रतिबंधात्मक उपाय करण्याची कामगिरी वाराणसी येथील काही ब्राह्मण घराण्यावर होती. हिवाळा संपून वसंत ऋतूला सुरुवात झाली की त्यांचे शिष्य साधनसामुग्री घेऊन आपापल्या नेमून दिलेल्या गावामधे जात, तिथल्या बारा वर्षाखालील ज्या मुला-मुलीना शीतला मातेचा प्रसाद मिळाला नसेल त्यांच्या आईबापांना गोळा करून देवी माहात्म्य सांगत. मग त्या मुलांना गोळा करून प्रत्येकाच्या हातावर तीक्ष्ण सुरीने रक्ताचा फक्त एखादाच थेंब येईल, एवढी जखम करत. मग आपल्या मंजूषेतून कापसाचे बोळे काढून एकेका, बोळ्यातील औषध एकेका मुलाच्या जखमेवर रगडत. दोन तीन दिवसात सर्व मुला-मुलीना अगदी कमी प्रमाणात देवी निघत. मग अंगात देवी आली असे शिष्यानेच जाहीर करायचे. या काळात त्या मुलांना जे हवं ते द्यायचं, रडवायच नाही, केळी व मिठाई द्यायची पण मांसाहार त्या घरादाराला पूर्ण वर्ज्य करायचा - इत्यादी पथ्ये असत. निघालेल्या देवीच्या फोडांपैकी टपोरे फोड सुईने छेदून त्यातील स्त्राव नवीन कापसाच्या बोळ्यावर टिपून घेत. ती त्याची पुढील वर्षाची बेगमी असायची. दहा दिवसांनी देवीला निरोप देण्यासाठी मुलांना कडुलिंबाच्या पानांनी आंघोळ घालून नवीन वस्रे देत. (कदाचित जुन्या वस्त्राची होळी किवा विसर्जन करीत असावेत) या प्रमाणे ज्यांच्या अंगात देवी येऊन गेली, किंवा ज्यांना देवीचा प्रसाद मिळाला, त्यांना आयुष्यात पुढे कधीही देवीचा त्रास होणार नसल्याची गॅरंटी मिळायची.
आरनॉल्ड ने त्या काळातील सरकारी आकडेवारीतून असाही निष्कर्ष काढला आहे की ही गॅरटी खोटी नसायची. जेल मधील कैद्यांच्या सर्वेक्षणांवरून १८७० च्या सुमारास हा निष्कर्ष काढला गेला होता की सुमारे ८०ऽ कैद्यांना अशा प्रकारे गॅरंटी मिळाही होती. व ती खरी ठरली होती. बिहार व बंगाल मधे आजही सरस्वतीला वासंती देवी म्हणून वसंत पंचमीला तिची स्थापना करुन दहा दिवसांनी तिचे विसर्जन करतात. आपल्याकडील गणेश उत्सवासारखाच हा प्रकार असतो. मध्य प्रदेशात होलिका मातेची मूर्ती बसवून होळीच्या तिचे दहन करण्याची पद्धत आहे. ओडिसा मधे गावोगावी वेशीवर मंगला मातेची मूर्ती असते. आपल्याकडे मरिआई असते. कडुलिबाचा पाला डोक्यावर बांधून ओलेत्याने देवीच्या पाया पडायला मुला-मुलींना न्यायचे. हाही सोहळा महाराष्ट्र व कर्नाटकात सर्रास पहायला मिळतो. या
सर्व कर्मकांडामधील आरोग्य-रक्षणाची जी बीजात्मक प्रक्रिया होती - म्हणजेच शरीरात देवीची लस पोचवणे - ती लुप्त झाली. कारण एकोणविसाव्या शतकांत ब्रिटिशांनी ही सर्व पद्धत 'गुन्हेगारी' ठरवली आणि डॉ जेनर प्रणीत देवीची लस (गाईच्या देवी पासून तयार केलेली) भारतात आणली. कर्मकांड मात्र शिल्लक राहीले. या कर्मकांडातील इतर गोष्टी गावाच्या सवयीचा एक भाग बनून गेल्या असाव्या. त्याच कालांतराने 'संस्कृती' या सदरात मोडल्या. त्यांची संगति आपल्याला लागली नाही तरी त्यांचे रूप मनोहर असेल तर आपण त्यांत रमतो, त्यांचे रूप गबाळे असेल तर आपण नाक मुरडतो. मात्र ते कर्मकांड संस्कृति या नावाने शिल्लक रहाते.
मला वाटते की विकेंद्रीकरणाची प्रक्रिया आणि संस्कृतीचे जडण - घडण यात महत्वाचा संबंध आहे. यामधे निसर्गातील घटनाक्रमांबरोबर तंत्रज्ञानाचा पण मोठा वाटा आहे. आपण नारायण पेठी साडयांचे उदाहरण पाहू या. रेशमी साडयांना एका अत्यंत आकर्षक पण खास डिझाइनचे आणि खास रुंदीचे काठ असणे हे नारायण पेठी साडयांचे वौशिष्ट. (हे लक्ष्मीरोड वर मिळालेले ज्ञान) साडीचे अंग कसेही असेल - प्लेन, चेक, किंवा साध्या रेघा, पण काठ मात्र त्या नेमक्या डिझाईनचाच असला पाहिजे. असं कां? याचे उत्तर कोणी दिले नाही.
नंतर एकदा कर्नाटकच्या एका गांवात गेले असतांना तिथेही सर्व विणकरांच्या घरी बनलेल्या साडयांना एकाच डिझाईनचा (पण नारायण पेठी डिझाईनचा नाही) कांठ दिसला. 'ही आमच्या गांवची खासियत आहे - आमची संस्कृति'! बहुधा त्याला 'आमच्या ब्रान्ड' म्हणायचे असेल. मग खूप नंतर एकदा सोलापूरला हातमाग उद्योगाच्या 'तपासणी' साठी गेले असताना माझी टयूब पेटली. हातमागावर कापड विणताना कांठ हवा असेल तर तो ताना - बान्यातून करता येत नाही, त्यासाठी हातमागाला दोन्ही बाजूंनी एका विशिष्ट डिझाईन ने भोकं पाडलेला केलेला जाड कागद जोडतात आणि त्या भोकांमधून विणायचा धागा ओवून घ्यावा लागतो. याला जकार्ड असे म्हणतात. पुलीच्या सहाय्याने हे कार्ड वर खाली होत असते आणि त्यातून गुंतागुंतीच्या पद्धतीने धागा बाहेर निघून कापडाबरोबर विणला जातो ज्यामुळे कांठावर त्या जकार्ड बरहुकूम डिझाईन तयार होते. ज्यांनी हातमागावर काठपदरासकट होणारे विणकाम पाहिले असेल त्यांना हे सर्व चटकन आठवेल
माझ्या असे लक्षात आले ती अशी डिझाईन पंच केलेली कार्ड तयार करणं, त्यातून ओवल्या जाणार्या या धाग्यांचा क्रम ठरवून देणं आणि त्यातून कशा प्रकारचे डिझाईन 'विणले' जाईल याचे व्हिज्युअलायझेशन करणं ही अत्यंत जिकिरीची प्रक्रिया आहे. कधीही कुणाही उठावं आणि एका नव्या डिझाईनच कार्ड तयार करावं असं होत नाही. म्हणून मग एखादा 'आर्टीस्ट' विणकर असं एखाद कार्ड बनवत असेल - ते डिझाईन पसंत पडल्यास त्या गांवची किवा त्या घराण्यातील सर्व विणकर कुटुंब त्याच्या प्रति तयार करत असतील - मग त्या गांवात किंवा घरांत तोच एक नमूना वापरला जात असेल - की झाला ब्रॅण्ड तयार. मग तो काठपदर त्या गांवाची संस्कृती बनत असेल.
आता संगणकांच्या युगांत नव्या नव्या डिझाइनची कार्ड बनवणं खूप सोपं आहे. पण टेक्स्टाइल मिनिस्ट्री किंवा त्या क्षेत्रातले व्यापारी किंवा संगणक साफ्टवेअर तज्ञांच इकडे लक्ष गेलेलं दिसत नाही.
हा सर्व विचार झाला उत्सवात्मक किंवा उपभोगात्मक संस्कृती बाबतचा. पण समाजाची मानसिक जडण - घडण आणि नैतिक मूल्ये कशी घडतील त्यावरही संस्कृती अवलंबून असते. 'अतिथी देवो भव' ही भारतीय संस्कृती आहे - ती कशी घडली असावी?
समाजात रहाणारी सर्व माणसं समाजाची ऋणी असतात. या समाजाला जगवण्याचं, पुढे नेण्याचं काम कित्येक जण आपापल्या परीने करत असतात. त्या प्रत्येक कार्याचं मोजमाप दृश्य स्वरुपात होईलच असं नसते. प्रसंगी त्यांचे मूल्यमापन खूप काळानंतरही होते. म्हणूनच भारतीय समाजात 'प्रत्येक बाब पैशाने मोजायची नाही' असा एक संकेत ठरून गेलेला असावा. ज्ञानार्जन आणि ज्ञानाचा प्रसार या साठी 'भटकंती' - फिरणे हे फार गरजेचे आहे. अशा 'फिरन्तु' लोकांमुळे समाजाचं ज्ञान आणि विकासाची गति वाढते. ही बाब ज्यांच्या लक्षांत आली असेल त्यांनी अतिथी देवो भव ही कल्पना घालून दिली असेल आणि रुजवली असेल.जेणेकरून अशा फिरन्तु लोकांची योग्य ती सोय व्हावी.
' मा गृधः कस्यस्विद्धनम् ' - दुसर्याने कमावलेल्या धनाची आस धरू नकोस किंवा 'सत्यमेव जयते नानृतं' - सत्याचाच विजय होईल - असत्याचा कदापि होणार नाही. - अशा सारखी बीज वाक्य आपल्या उपनिषधामध्ये येण्यापूर्वी या विचारांचे किती मोठया प्रमाणात आणि किती मोठया काळापर्यंत
मंथन झाले असेल त्याचा अंदाज घेणे कठीण आहे. आसेतु - हिमाचल एवढया मोठया खंडप्राय देशाने ही मूल्यें स्वीकारण्यापूर्वी किती जणांचे वैयक्तिक उदाहरण लोकांसमोर ठेवलं गेलं असेल? एकदाच या संकल्पना रुजून भागत नाही. त्यांचे स्खलन होत रहाते - पण त्या पूर्ण नष्ट होण्याअगोदर कुणीतरी पुनः एकदा आपले उदाहरण लोकांपुढे ठेवले. असे पिढयान् पिढया, शतकानुशतके घडले असेल. जसे बुद्ध, किंवा महावीरांच्या नंतर पुनः एकदा देशव्यापी स्तरावर महात्मा गांधींनी अहिंसेचं तत्वज्ञान मांडले तसेच. ज्या ज्या मूल्याच्या बाबतीत वारंवार घडत गेले तेच मूल्य लोकांच्या मनांत आणि व्यवहारात उतरले - तेच मूल्य 'संस्कृती' झाले.
एखादा पर्वत तयार होण्यासाठी युगानुयुगे लागतात, पण माणसाने त्यांना कापून काढून नष्ट करायचे म्हटले तर लौकर होऊन जाते. तसेच संस्कृतीचे पण आहे ! त्यामुळे काही अत्यंत पुरातन संस्कृती नष्ट झाल्या तर त्यांत आश्चर्य कांहीच नाही ! पण संस्कृती टिकवायची असेल तर फार मोठया स्थळाकाळा पर्यंत, फार मोठया जनसंख्येच्या 'रक्तांत', नसानसात, हाडामांसात आणि 'दिलोदिमागात' त्या गोष्टी खिळाव्या लागतात. त्यांचा फायदा सर्वांना होणार याची खात्री असल्याशिवाय ते होऊ शकत नाही. म्हणून मला वाटते की विकेंद्रीकरण हीच ती पद्धत असणार ज्यातून संस्कृति घडत जाते. विकेंद्रीकरण, मंथन, भ्रमण, देशाटन, चरैवैतु ही सांस्कृतिक जडण घडणीची बैठक असावी. यात योग्य वाटा मिळावा म्हणून आजच्या स्त्र्िायांनी मोठया प्रमाणावर देशभ्रमणाची मोहीम केली पाहिजे, हे ही जाता - जाता सांगून टाकायला हवे..
-------------------------------------------------------------
Unicode file also on website 16
लीना मेहेंदळे, ई-१८, बापू धाम, चाणक्यपुरी, नई दिल्ली ११००२१
Friday, October 26, 2007
3/ संस्कृती अशी घडते
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 11:05 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
संस्कृतीचा विस्तृत आढावा घेणारा लेख आवडला. लेखातील उदाहरणेही रोचक आहेत. या संदर्भात रिचर्ड डॉकिन्स यांनी संस्कृतीच्या प्रवाहाबाबत मांडलेली मीमची कल्पना आठवते. त्यांच्या मते ज्याप्रमाणे उत्क्रांतीचे एकक जनुके असतात, त्याचप्रमाणे सांस्कृतिक प्रवाहाच्या एककाला मीम म्हणता येईल. दुर्दैवाने आजच्या काळात संस्कृतीची व्याख्या फारच सैल झाली आहे असे मला वाटते. उदा. व्हॅलेंटाइन डे साजरा केला तर आपली संस्कृती बुडाली यासारखे समज. म्हणूनच संस्कृती म्हणजे नेमके काय, यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असतो या गोष्टींचे विवेचन करणार्या यासारख्या लेखांची नितांत गरज आहे.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
Dhanyawad for writing in Marathi from the far-awawy Italy.. You may like my blog Yugantar Ghadtana.
Post a Comment