Tuesday, October 20, 2009

योगत्रयी

योगत्रयी
ही प्रस्तावना मी लिहिली आहे माझ्या वडिलांचे पुस्तक योगत्रयी साठी. सदरहू पुस्तकामधे कठ, मांडूक्य आणि श्वेताश्वतर उपनिषदांमधील आत्मतत्त्वाचे विवेचन केलेले आहे. पुस्तक आळंदी देवस्थानाकडे मिळू शकेल.
Earlier kept on geocities non-unicode. Now that site is closed by yahoo group. Hence shifted here.
-----------------------------------------------------
योगत्रयी : आमुख
माझे वडील डॉ. बलराम सदाशिव अग्निहोत्री यांनी त्यांच्या योगत्रयी या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहायला सांगितल्यानंतर हे काम मला कसे जमेल असा प्रश्न सहाजिकच माझ्या मनांत आला. त्यांच्या कडून आणि त्यांच्या भल्या मोठया पुस्तक - संग्रहातून थोडे फार संस्कृत, तर्कशास्त्र आणि दर्शन-शास्त्र हे विषय शिकायला मिळाले होते. माझ्या अभ्यासाचे व आवड़ीचे विषय म्हणजे भौतिक शास्त्र आणि गणित होते. पण प्रशासनिक सेवेत आल्यानंतर हे सगळे विषय मागे पडून एका नव्याच विषयांत प्रवेश घ्यावा लागला.
नंतर हळू-हळू लक्षात येऊ लागले की ज्ञानाची आणि ज्ञान कौशल्याची एक विशिष्ट पातळी ओलांड्ली की तिथून पुढे हे विषय एकमेकांत सरमिसळ होऊ लागतात. त्या मुळे प्रशासन कार्यात भौतिक शास्त्राचे आणि दर्शन शास्त्राचे नियम लागू होतात हे समजले. किंबहुना, ते प्रभावी पणे कसे लागू करता येतील हे ही सुचू लागले. त्यामुळे पुनः एकदा त्या विषयांकडे वळणे आणि त्यांचा अभ्यास करणे हे हे ओघाने आलेच.
भारतीय तत्वज्ञानाचा गाभा हा वेद, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद या सारख्या साहित्यामधून स्पष्ट होतो. त्यातही वेदातील ऋचा या एकेकटया ऋषींनी एकातात बसून विचार करतांना त्यांच्या ज्ञानचक्षूंसमीर प्रकट झाल्या आहेत. त्या अर्थाने दर्शन शास्त्र हा शब्द चपखल ठरतो. उपनिषदांमधे गुरू शिष्य संवाद मुख्यत्वे करून आहेत. उपनिषद या शब्दाचा अर्थ शेजारी बसून चर्चा व ज्ञानार्जन असा आहे. मात्र उपनिषदे वाचताना असे जाणवते की हा फक्त गुरूने शिष्यांस केलला उपदेश नाही, तर एखाद्या ज्ञानी ऋषीकडे जाऊन इतर अनेक ज्ञानी व्यक्तीनी केलेली चर्चा हे त्यांचे स्वरूप आहे. आजच्या जगांत सेमिनार आणि वर्कशॉप चालतात त्यामधे साधारण काय प्रक्रिया होत असते ? एखादा विषय निवडून त्यात तज्ज्ञ किंवा संबंधित व्यक्तीनां एकत्र बोलावून सविस्तर चर्चा केली जाते. कांही शिफारसी, कांही निष्कर्ष काढले जातात, मग त्यांचे रिपोर्ट्स प्रकाशित होतात. ते सर्वानां चिन्तनासाठी उपलब्ध होतात. उपनिषदांची एकूण मांडणी पाहिली की हे देखील चर्चासत्रांचे फलित असावे असे वाटून जाते.
वैदिक काळात आत्मा, परमात्मा, ब्रह्म इत्यादि विषयांवर सखोल चर्चा झाली. पण प्रत्येक उपनिषदाचा तोच विषय नाही. तसेच आत्मतत्वापर्यंत पायरी पायरीने कसे पोचायचे याचे सविस्तर विवेचन हाही प्रत्येक उपनिषदाच्या विषय नाही. प्रमुख म्हणून जी दहा उपनिषदे सांगितली जातात, अर्थात ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्डक, माण्डूक्य, तैत्त्िारीय, ऐतरेय, छान्दोग्य आणि बृहदारण्यक यांपैकी फक्त कठोपनिषद आणि मुण्डकोपनिषदामधे पद्धतशीरपणे आणि क्रमाक्रमाने आत्मतत्व कसे मिळवावे याची चर्चा आहे. तशीच ती श्र्वेताश्र्वतर उपनिषदांत आहे. या तीनही ग्रन्थांत योगाभ्यासाचे विशेष महत्व सांगितले आहे. योगाभ्यासाने मन एकाग्र करणे, त्या मनाच्या योगाने आत्म्याचे चिन्तनं करणे. त्याचे स्वरूप समजावून घेणे, आणि अंतर्चक्षूंनी त्याला पहाणे हा सर्व व्यवहार ज्याला जमला त्याची जन्म मरणाच्या फे यातून सुटका होते. तो मृत्यूला पाार करून अमृतत्वाला प्राप्त होतो.
यामधील कठोपनिषदाचा संदर्भ सर्वात विलक्षण आहे. यज्ञात आपले वडील चांगल्या गाई दान देण्याऐवजी भाकड गाई देत आहेत आणि त्याचा त्यानां दोष लागेल असे वाटून नचिकेत त्यानां म्हणतो मला कोणाला देता इथेच त्याची सारासार विवेक बुद्धि आपली चुणुक दाखवते. असे तीनदा विचारल्यावर वडील चिडून मृत्यवे त्वा ददामि मी तुला मृत्युला देतो अस सांगतात. ते पितृवचन खर करण्यासाठी नचिकेत उठून यमाकडे जातो आणि यम नसल्यामुळे तीन दिवस रात्र त्याची वाट बघन बसतो. हे खरोखर विलक्षण . स्वतः यम देखील इतका दचकतो की तो म्हणतो स्वस्ति मे अस्तु - माझ कल्याण (कायम) असो. चल तू तीन वर घेऊन टाक. मग या वरांच्या स्वरूपांत नचिकेत अमरत्वाच आणि आत्मतत्वाच ज्ञान मिळवतो.
पुनः इथे अमरत्व आणि आत्मतत्व या दोनही गोष्टींमधे भेद केलेला आहे नचिकेताला जरी दुस या वराने अमरत्वाची विद्या मृत्यूने शिकवली तरी आत्मतत्वाचे ज्ञान ही काही तरी वेगळी वाब होती - ती अमरत्वापेक्षाही श्रेष्ठ होती कारण नचिकेत त्यासाठी हट्ट धरतो आणि यम त्याला परावृत करण्याचा प्रयत्न करतो. संगळ कांही घे, पण हे विचारू नकोस. मात्र नचिकेतही हट्ट सोडत नाही आणि यमाकडून आत्मतत्वाचा उपदेश मिळवतो. त्या यमानेच याचे वर्णन अतर्क्यम्‌ (नुसत्या तर्काने न मिळू शकणारं) आणि अणुप्रमाणात्‌ अणुहूनही सूक्ष्म अस केल आहे. ज्या गूढ गुहेत हे आत्मतत्व दडून बसलेल आहे त्या मधेच कर्मफलांचे संस्कार बनून त्यांचा साठा पण साठून राहिलेला आहे. त्याला डावलून तीक्ष्ण सु याप्रमाणे धारदार अशा आत्मतत्वावर लक्ष केंद्रित करणे कठिण आहे.
कठोपनिषद् सांगते - आत्मचिंतन आणि आत्मज्ञान हा जरी मोक्षाचा मार्ग असला तरी नुसत्या ज्ञानाने मोक्ष मिळत नाही. त्या ज्ञानाचे मनन, मंथन करून, त्याचा झोत स्वतःच्या हृदयांतरात वळवणे हे महत्वाचे. कर्मफलाचा झोनही हृदयांतरात वळलेला असतोच. तिथल्या गुहेत छाया आणि प्रकाशाइतके परस्पर भिन्न दोन आहेत (दोन कोण त्याचे उत्तर श्र्वेताश्र्वतर आणि मुंडक उपनिषदांमधे दिले आहे. ज्या दोन पक्ष्यांची उपमा दिली ते आहेत तरी कसे तर सयुज आणि सखा असलेले - दोन शरीर आणि एक प्राण असलेले - असे ते दोन पक्षी) दोघांनाही कर्मफल सामोरे आहेत. एक त्यांचा आस्वाद घेणार, तर दुसरा आत्मज्ञानाचा वापर करून फक्त साक्षी आणि निरासक्त भावनेने कर्मफलांकडे बधणार.
कुठल्याही ज्ञानापेक्षा किंवा तर्कापेक्षा हा निरासक्त भावच मानवाला आत्म्याच्या जवळ नेऊ शकतो. भगवद्गीतेतही म्हटले आहे - कर्माचा त्याग ( हे अर्जुना ) तू करूच शकत नाहीस. म्हणून तुझ्या हातांत कांय आहे ? तर कर्मफलाचा त्याग. तेवढाच तुझ्या हातात आहे.
त्या निःसंग अवस्थेप्रत जाण्यासाठी आत्मतत्वाचे अध्ययन, मनन, व्यासंग, अभ्यास, यामधे सातत्य कसे असावे, याचा ऊहापोह करणारी ही तीन उपनिषदांची - योगत्रयी.
यांच्या मानाने इतर उपनिषदांचे विषय वेगळे आहेत म्हणूनच ही तीन उपनिषदे एकत्र वाचणे हे अभ्यासकाच्या दृष्टीने जास्त उपयुक्त ठरेल - निदान माझ्यासारख्या नवख्या अभ्यासकासाठी तरी नक्कीच . त्यानंतर त्यांचा वापर आपापल्या कार्यक्षेत्रात कसा करायचा त्याचे मार्गही दिसू लागतील यावर माझा विश्र्वास आहे.
-------------------------------------------------------------

No comments: