Friday, May 30, 2008

मराठी लेखनाच्या ब्लॉगसाठी - इनस्क्रिप्ट

मराठी लेखनाच्या ब्लॉगसाठी - इनस्क्रिप्ट
- लीना मेहेंदळे, भा.प्र.से.

सुमारे नव्वद ते नव्व्याण्णव टक्के मराठी किंवा कोणत्याच भारतीय भाषेतील लेखकांना हे माहीत नाही कि एका युक्ती मुळे मराठी व तत्सम भारतीय भाषांचे टायपिंग शिकायला फक्त अर्धा तास पुरतो. आणि आता ऑफिसेस मध्ये सर्वत्र संगणकांचा बोलबाला झाल्यावर खूप अधिका-यांनी गरजपुरते एका बोटाने करण्याइतपत इंग्रजी टायपिंग शिकून घेतले आहे. पण त्यांना देखील हे माहीत नाही की त्याच संगणकामध्ये अर्ध्या तासांत मराठी टायपिंग शिकण्याची युक्ती देखील आहे. या युक्तीचे नांव इनस्क्रिप्ट की बोर्ड ले आऊट. पुढे वाचा

----------------------------------------------------

Thursday, May 22, 2008

सत्यवचनाचे वैज्ञानिक तथ्य मटा रविवार 8.6.2008 गेस्ट रूम

सत्यवचनाचे वैज्ञानिक तथ्य
दिवसभरांत आपण जी कांही कामें करतो, त्यांतील एक महत्वाचे काम म्हणजे बोलणे -- वार्तालाप. आपले विचार इतरांपर्यंत पोचवणे हा त्या मागचा हेतू असतो.

बोलण्याआधी एक विचार मनांत स्फुरतो त्याप्रमाणे आपण शब्दांची जुळवाजुळव करतो. आपली भाषा कोणती असेल - मराठी की हिंदी - इंग्रजी? भाव कोणते असतील - सुखाचे, दु:खाचे, सांत्वनांचे, धीराचे, रागाचे, प्रेमाचे की प्रश्नांचे? संभाषण किती असेल - लहान की मोठे? त्याचा विषय कांय असेल? एखादी नवीन घटना की पाऊस पाणी की पैशांचे व्यवहार की शुभेच्छा? आणि सर्वात मोठा प्रश्न- आपण बोलू ते खरे असेल की खोटे? त्यांत किती खरे असेल आणि खोटे किती असेल?

अर्थात्‌ हे सर्व प्रश्न प्रगटपणे आपल्या मनांत नाही जाणवत. पण शब्दांची जुळवणी करतांना हे प्रश्नच त्यांचे स्वरूप ठरवतात.

शब्द जुळणीच्या आधी मनांत एक खळबळीची, मंथनाची प्रक्रिया घडत असते. आपल्या मेंदूतील आणि शरीरातील अपरिमित ज्ञानभांडाराची छाननी होत असते - त्यातूनच कोणते शब्द प्रगटणार ते ठरते.

म्हणूनच आपल्याकडे वाणीची चार स्थित्यंतरे सांगितली आहेत - परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी.

वैखरी म्हणजे प्रत्यक्ष बोलली आणि ऐकली जाणारी शब्दांकित भाषा - तिच्यामुळे प्रत्यक्ष संभाषण घडते. त्या आधीची मध्यमा ही अवस्था - ज्या मधे शब्दांचे प्रगटन होते. त्या आधी पश्यन्ति जिच्या योगे आपल्या विचारांचे आकलन व ज्ञानाचे संकलन करणा-या मेंदूत आपले विचार घनीभूत होत असतात. असं म्हणता येईल की मेंदूला ते विचार "दिसू" लागतात - म्हणूनच पश्यन्ति हा शब्द योजलेला आहे. पण त्याही आधीची अवस्था म्हणजे परा. या अवस्थेत शरीरातील प्रत्येक पेशी आपापल्या परीने - आपल्या संवेदना मेंदूकडे पाठवीत असते. त्यांच्या जोडीलाच मेंदूतील पूर्वसंचित संवेदनाची छाननी व उजळणी देखील होत असते. त्यातूनच आपले शब्द - त्यामधील भाव व त्यांच्या सोबतचे हातवारे आणि क्रिया ठरत असतात. आपण खरे बोलणार की खोटे हे देखील या प्रक्रिये मधून ठरत असते.

खरे तर परा वाणीच्या स्थितिच्याही आधी शरीराची एक अवस्था असते अपरा. पण ती वाणीची स्थिती नसते. ज्या वेळी अपरा स्थितीतून बाहेर पडून वाणी प्रगटनांची क्रिया सुरू होते, तिची पहिली पायरी म्हणजे परा वाणी. अगदी सुरूवातीच्या काळांत आपल्या मनांतील विचारांचे शक्य तेवढे वस्तुनिष्ठ प्रगटन करणे हेच वैखरी वाणीचे उद्दिष्ट होते. त्या मधे खरे की खोटे हा संभ्रम नव्हता कारण खोटेपणाचा विचारच उद्भवलेला नव्हता. त्या प्रगटीकरणातून ज्ञानाची योग्य देवाण-घेवाण व विस्तार होणार होता - होत होता. त्या काळात खोटेपणाचे शब्द वापरून दिशाभूल करण्याची गरज नव्हती. किंबहुना दिशाभूल न होऊ देता, जास्तीत जास्त एकवाक्यता साधून एकत्रितपणे विकासाच्या वाटा शोधल्या जात होत्या.

मग कधीतरी वाणी मधे अनृत किंवा खोटेपणा शिरला. आपण चुकीची माहिती - देऊन इतरांची दिशाभूल करून आपला स्वार्थ साधू शकतो हे मानवप्राण्याच्या लक्षांत आले. ज्ञानभांडारातील माहिती मधून आविर्भूत होणारी वस्तुस्थिती आणि वाणीमधून प्रगट होणारी वस्तुस्थिती यात फरक पडू लागला.

हा फरक आधी पण होताच. कारण परावाणीचे शंभर टक्के तंतोतंत रूपान्तरण वैखरी वाणीत होऊच शकत नाही. त्याला आपल्या शरीरातील व मेंदूतील पेशींच्या मर्यादा कारणीभूत असतात. पण तो फरक मानव शरीराच्या व मनाच्या अपूर्णत्वामुळे होता. अनृतामुळे येणारा फरक हा विचारपूर्वक होता.

अनृतामुळे समाजाची अपरिमित हानी होऊ शकते, ज्ञानाचा विस्तारच थांबवला जाऊ शकतो हे लक्षांत आल्यावर सत्याचे संस्कार करणे हे आवश्यक ठरले. समाज- धुरिणांनी - "ऋतं वच्मि, सत्यं वच्मि" अशी सूत्र ठरविली. "सत्यमेव जयते नानृतम्‌" असे उपनिषदांनी सांगून टाकले. ईशावास्य उपनिषदांत एक सुंदर प्रार्थना आहे –
"हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम्‌ |
तत्‌ त्वम्‌ पूषन्‌ अपावृणु, सत्यधर्माय दृष्टये ||"

"हे सूर्या, माझ्या मनांतील सत्याचे स्वरूप सोन्याच्या आवरणाने झाकले गेले आहे. ते आवरण तू दूर सार आणि मला सत्यधर्माचे दर्शन घडू दे".

आजही समाजाचा विकास व्हायचा असेल तर सत्य माहितीची देवाण- घेवाण, सत्यनिष्ठता हेच भारतीय समाजाला तारून नेतील. सत्यवचनी रामाचे महत्त्व आहे ते याचसाठी. बुध्दाने बोधिसत्त्व मिळवले म्हणजे नेमके कांय झाले? तर परा वाणीचे तंतोतंत प्रगटीकरण वैखरी वाणी मधे होण्याची प्रक्रिया भगवान्‌ बुध्दांनी आत्मसात केली. यासाठी मागील व पुढील क्षणांची अनुभूति टाकून आत्ता आहोत त्या क्षणाचीच अनुभूति घेता आली पाहिजे. भूतकालीन क्षणांच्या अनुभूतिंतून पूर्वसंस्कार प्रस्फुटित होत असतात व ते वर्तमान क्षणाच्या अनुभूतिंवर प्रभाव टाकून त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपापासून वेगळे करतात. म्हणून ते पूर्वसंस्कार विरळ करणे हा बोधीमार्गातील एक उपाय आहे - अशा अर्थाने विपश्यनेतील शिकवण आहे. मनसा, वचसा व कर्मणा एक वाक्यता असली पाहिजे हा विपश्यनेतील सल्लाही याच साठी आहे. जे मनांत आहे, तेच बोला. जे बोलाल, तेच करा. तुकाराम म्हणतात "बोले - तैसा चाले, त्याची वंदीन पाऊले".

मी याकडे फिजिक्सच्या दृष्टिकोणातून पहाते. जे माझ्या मनांत, त्यापेक्षा वेगळ बोलल, तर दुप्पट ऊर्जा खर्च होते. जे बोलल त्यापेक्षा वेगळ वागल तर पुन्हा एकवार ऊर्जा खर्च होते. माझी ऊर्जा मला वाचवायची असेल, टिकवायची असेल, तिचा अपव्यय होऊ द्यायचा नसेल, तर मी मनांत असेल तेच बोललं पाहिजे आणि तेच केलं पाहिजे. माझ्या ऑफिसातील काही जणांनी मला सांगितले - "तुमच्या या सवयीमुळे आमची पण कितीतरी ऊर्जा वाचते कारण तुम्ही जे बोलला, त्याचा काही वेगळा अर्थ असेल कां अशी काळजी आम्हाला कधीच करावी लागत नाही.

आपल्या शरीर रचनेतील सर्वात लहान - किंवा मूलभूत घटक म्हणजे पेशी - Cell. पेशींमधे स्वत:ला विभाजन करून दोन पेशी निर्माण करण्याची म्हणजेच व्दिगुणित होण्याची क्षमता असते. जीवाची उत्पत्ति होत असतांना एकच पेशी असते. मग एकापासून दोन, दोनापासून चार, चारातून आठ, सोळा, बत्तीस, चौसष्ट ----------- अशाप्रकारे पेशींची संख्या वाढत जाते. पण मग ---?

पेशींची संख्या कमी असते, तेंव्हा त्या प्रत्येकीचे महत्त्व, अधिकार, स्टेटस सारखे असतात. शरीरशास्त्रज्ञ असे मानतात की एका विशिष्ट संख्येवर पोचल्यानंतर या पेश्‌ींचे ध्रुवीकरण होण्यास सुरूवात होते. कित्येक पेशी एकत्र येऊन टिश्यू बनतात. आपल्या शरीरात असे वेगवेगळी कामे करणारे वेगवेगळया गुणधर्मांचे टिश्यू असतात. रक्ताचे टिश्यू वेगळे, हाडांचे वेगळे, मेंदूचे वेगळे. एकदा का असे ध्रुवीकरण झाले की मग त्या त्या टिश्यूमधल्या पेशींचे भवितव्य ठरून जाते. हाडांच्या पेशींच्या व्दिगुणित होणा-या पेशी फक्त हाडांच्या टिश्यूचाच भाग होऊ शकतात. मग या प्रत्येक प्रकारच्या टिश्यूने कांय काम करायचे ते ठरवण्याची बरीच सत्ता मेंदूच्या टिश्यूंकडे असते. अशा प्रकारे पेशींमधील समानाधिकाराचे तत्त्व संपून कांही पेशी सत्ता गाजवणा-या तर कांही पेशी सत्ता गाजवून घेणा-या अशी त्यांची कामाची वाटणी होते.

विपश्यनेमुळे आपल्याला सम्यक्‌ सत्य कळते म्हणजेच पर्यायाने या पेशींमधील दूरत्व कमी होऊ शकते. त्या interchangeable होऊ शकतात आणि ज्ञानाचा व क्षमतेचा अपरिमित विस्तार क्षणार्धात होत जातो. याच अवस्थेत असलेल्या ईश्र्वराचे वर्णन ईशावास्य उपनिषदात अस्नाविरं, शुध्दं आणि अपापविध्दं असे केलेले आहे.

अस्नाविरं व्यक्तीला म्हणजे ज्याला स्नायु नाहीत असा. एका पेशीचे ज्ञान दुस-या पेशीकडे पाठवायला स्नायूंची गरज लागत नाही - त्याच्या पेशींमधील ज्ञान संचार स्नायूंच्या माध्यमातून विद्युत्‌ वेगाने होत नसून त्याही पेक्षा तीव्र अपरिमित - infinite वेगाने होतो - instantly होतो - त्याचे वर्णन अस्नाविरं !
शुध्दं - कारण instantly सर्वत्र पसरणा-या ज्ञानामध्ये अशुध्दता येऊच शकत नाही - अशुध्दतेचा स्कोपच उरत नाही. अपापविध्दं - म्हणून तो कोणत्याही पापाने, अनृताने विध्द किंवा अभिभूत होत नाही. आणि त्याचा संचार फक्त मानवी देहापर्यंत मर्यादित नसून चराचराच्या शेवटापर्यंत असतो - चराचराच्या एका कोप-यात प्रगटणारे ज्ञान, किंवा चैतन्य instantly चराचराच्या प्रत्येक कानाकोप-यात पोचलेले असते. असे त्या चैतन्याचे, किंवा चैतन्य स्वरूप ईश्र्वराचे वर्णन केले आहे.
थोडक्यांत सत्य बोलणे, सत्य वागणे व सत्याचाच विचार या क्रियेने आपल्याला बोधिसत्त्व, अमिताभ होता येते. तसेच समाजही ज्ञानवान - विचारवान व संस्कारवान होऊन समाजही बोधिपदाच्या मार्गी लागतो.
------ x ------
मटा, दि 8 जून 2008. गेस्ट रूम सदराखाली प्रकाशित