ठावकीच नाही
एक छोटासाच प्रश्न, पण त्याने भला मोठा अंधार उजेडात आणला. हा अंधार आहे अज्ञानाचा अस कुणाला वाटेल. छे, छे. हा अंधार आहे कृतघ्नतेचा. हा अंधार आहे बेदरकारपणाचा. हा आहे मूल्यशून्यतेचा. निरुत्साहाचा, शिकणार नाही, सुधारणार नाही या वृत्तीचा. ग्लोबलायझेशनच्या जमान्यांत राष्ट्रमूल्य हरवून बसलेल्यांचा.
की ही पराकोटीची सत्यवदिता म्हणायची? ठावकी नव्हते ना - मग सांगून टाकले की ठावकी नाही म्हणून. फायली पाहिल्या - त्यांत दिसले नाही. मग सांगून टाकले की दिसत नाही. तर त्यांत कांय चूक?
आपल्याकडे टोचणी, बोचणी, असा कांही प्रकार असतो कां हो ? कांही गोष्टी अशा आहेत की ज्या फायलीत नसल्या तरी त्या नाहीत हे लिहितांना पेन गळून पडले पाहिजे.
करोडपतिमध्ये प्रश्न विचारा - बिडी जलायले कुणी लिहिले - लाखो लोकांच्या कंठातून चालीवर नाचत - थिरकत उत्तर मिळेल. पुढचा प्रश्न विचारा - एक कोटी रुपयांसाठी - 'जय हिंद' चा नारा या देशांत कुणी आणला? एकजात सगळे करोडपतिच्या स्क्रीन वरून पळ काढतील. होय ना? मग फायलींचा कांय दोष ? जे केबीसीला ठावकी नाही ते फायलींना कसे ठावकी असणार?
कांही जुन्या पठडीतील लोक आहेत. त्यांच्या ज्ञानानुभावासहित असलेल्या हेकेखोरपणाला हिणवण्यासाठी हिंदीत शब्द आहे - बूढा उल्लू, तर इंग्रजीत आहे बँडीकूट ! अशा कांही लोकांनी कान टवकारले, मान उंचावली, डोळयांच्या पापण्यांची उघडमीट केली आणि आपल्या म्हाता-या घोग-या आवाजात सांगून टाकले - ते होते ना ! आधी आयसीएस् ची परिक्षा पास होऊनही त्या नोकरीला झटकून टाकून देशासाठी देशांत परत आले होते.
ते होते ना ! कलकत्ता म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये आधी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि १९३१ मेयर झाले. तोवर त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती.
ते होते ना ! कांग्रेसचे ऍक्टिव्ह सदस्य तर होतेच - पण स्वातंत्र्यलढा जोर धरु लागला तेंव्हा झालेल्या १९३७ च्या इंडियन नॅशनल कांग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनांत जवाहरलाल नेहरुंच्या खांद्याला खांदा लावून मिरवणूकीच्या अग्रभागी होते. त्या भव्य मिरवणुकीचे आयोजकही तेच होते. आणि नंतर १९३८ मधे इंडियन नॅशनल कांग्रेसचे अध्यक्ष निवडले गेले.
ते होते ना ! आमच्या इतिहासाच्या पुस्तकांत ते होते. त्यांना १९३९ मध्ये ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. तिथे केलेल्या उपोषणांत प्रकृति खालावली तेंव्हा ब्रिटीशांनी त्यांना सोडून दिले. पण हाऊस ऍरेस्ट मध्ये टाकले होते - त्यांनी आजारपणाचे सोंग घेऊन दाढी वाढवली - मग पठाणाचा वेष घेऊन पळ काढला. देशांतून निघून जाऊन - देशाला पारखे होऊन - पख्खुनिस्तान, काबुल मार्गे यूरोप गाठला. आणि स्वातंत्र्यलढयाची ध्वजा रोवली.
त्या तुरुंगवास व हाऊस ऍरेस्टचे कागदपत्र डी क्लास मध्ये टाकून दिले असतील (म्हणजे किरकोळ फायली - ज्या एका वर्षानंतर नष्ट कराव्या असा फतवा आहे ) असे मला वाटत नाही. कारण ब्रिटिश राजवटीत तर नाहीच नाही, पण स्वातंत्र्यानंतरही १९६०-७० पर्यंत तरी त्या फायलींना डी करण्याची कुणाची हिंमत झाली नसणार. नंतर त्या फायली इतर गठ्ठयांखाली खोल खोल गाडल्या गेल्या असणार. त्यामुळे त्या नष्ट झाल्या असण्याची शक्यता फार कमी.
ते होते ना ! अंदमान मधील रॉस आयलंड वर जेथे ते जपानी सैन्य घेऊन भारतीय स्वातंत्र्य लढयाचे विजयी सेनापति बनून आले आणि तिरंगा फडकावला ती जागा स्मारक म्हणून जपली आहे - ते फायलींमध्ये आहे.
ते होते ना ! 'चलो दिल्ली' म्हणत त्यांनी हिंदुस्तान्यांची आझाद हिंद फौज (मराठी भाषांतर - हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणारी फौज) बर्मा मार्गे नागालँड मधील कोहिमा पर्यंत आणली. तिथे त्या लढाईत जे ब्रिटिश सैनिक मारले गेले त्यांचे स्मारक ब्रिटिशांनी उभारले - आपल्या सरकार ने ते स्मारक जपले आहे. मग त्या स्मारकाच्या फायलीत कुठेतरी ते असतीलच ना !
ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेत लढणा-यांच्या विरुध्द खटले लावले तेंव्हा त्यांचे वकीलपत्र पंडित जवाहरलाल नेहरुंनी घेतले होते. त्याचे 'ब्रीफ' त्यांनी तयार केले असेलच ना ! त्यांत कांय युक्तिवाद मांडला होता - की ही आझाद हिंद सेना म्हणजे हिंदुस्तानला लुटायला आलेल्या चोर डाकू लुटारुंची टोळी होती ? कांय मुद्दे घेऊन केस चालवणार होते पंडितजी ? ज्यांनी देशासाठी प्राण तळहाती घेतले आहेत अशा वीरांची ही आझाद हिंद फौज आहे - हिंदुस्थान हे त्यांचे वतन आहे - अशा हिंदुस्तानाला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र करण्यासाठी लढणे हा प्रत्येक हिंदी माणसाचा जन्मसिध्द अधिकार आहे - म्हणून त्यांचा लढा हा स्वातंत्र्यलढा आहे - म्हणून ते सर्व स्वातंत्र्यसैनिक आहेत - असा पंडितजींचा युक्तिवाद नव्हता कां ? हाही प्रश्न माहितीच्या अधिकाराखाली विचारता येईल.
फायलींना हे कांहीच ठावकी नाही. म्हणूनच सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्य सैनिक होते का या माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला - 'तसा कोणताही पुरावा किंवा उल्लेख आमच्या फायलींमध्ये नाही' असे उत्तर देण्यांत आले. म्हणून करोडपतिला प्रश्न - लाहोर कांग्रेसमध्ये 'संपूर्ण स्वराज्य' चा नारा कुणी दिला ? उत्तर - पंडित जवाहरलाल नेहरुंनी ! म्हणजेच पंडितजींना ब्रिटिशांचे राज्य मंजूर नव्हते तर ! म्हणजेच त्याविरुध्द आजाद हिंद सेनेची स्थापना करणारे स्वातंत्र्य सैनिकच ठरतात.
देशाची स्वतःची अशी जी शाळा साखळी - म्हणजे केंद्रीय विद्यालये - त्यांनी मान्य करुन देशभर लागू केलेले - एनसीआरटीने आठवी - नववी - दहावी साठी लिहून, छापून काढलेले बालभारती - वाचा. त्यांत एक कविता घातलीय्. तिच्या या दोन ओळी -
आजानुबाहू उंची करके वे बोले
रक्त मुझे देना
इसके बदले में भारत की
आजादी तुम मुझसे लेना
मग आता फायली पुस्तकांना फतवा काढणार की पुस्तके फायलींना ?
पण त्या आधी जास्त महत्वाचा प्रश्न ! सुओ मोट (suo motu) नोंद घेणे म्हणजे कांय ते फायलींना ठावकी आहे कां?
---------------------------------------
Also kept on http://www.geocities.com/chakori_baheril_prashasan_16/chintaman_moraya/Thavkich_nahi_TBIL_Mangal.zip
5 comments:
(ही प्रतिक्रिया आपल्या सुभाषचंद्रांवरील नोंदीवर नाही, तर "हिंदीला धोपटणे बंद करा"वरील आहे. ती नोंद जुनी असल्याने प्रतिक्रिया इथे देत आहे. क्षमस्व.)
नमस्कार.
आपले हिंदीवरील लेखन चांगले होते. मात्र माझ्यासारख्या मराठी माणसांची काळजीची जागा आहे त्याकडे थोडे दुर्लक्ष झाले आहे असे वाटते.
आज भाषाविवादाचे जुने संदर्भ थोडे मागे पडत आहेत असं मला वाटतं. दूरसंचार आणि वाहतुकीतल्या सोयींमुळे जग खरोखरच छोटं झालं आहे. अशावेळी स्वतःची ओळख कायम ठेवणं हे आव्हानच आहे. मराठी हिंदीशी (इतर भाषांच्या तुलनेत) जवळची असल्यामुळे प्रथमपासूनच हिंदी भाषिकांना महाराष्ट्रात व्यवहार करणं सोयीचं आहे. त्यातच महाराष्ट्र खूपच प्रगत राज्य आहे. साहजिकच परप्रांतियांचा प्रश्न वाढतो आहे.
हा प्रश्न केवळ महाराष्ट्राचा नाही. आज अमेरिकेतही मेक्सिको आणि लॅटीन अमेरिकेतून आलेल्या लोंढ्यांचा प्रश्न आहेच. ब्रिटनमधे उपरे म्हणून गेलेले आशियायी आज जणू त्या भूमिवर आपलाच पहिला हक्क आहे अशा पद्धतीने वागत आहेत (उदा. भारतीय डॉक्टरांचे आंदोलन).
तसंच महाराष्ट्रात आहे. २६ जुलैच्या पुरानंतरचे जया बच्चन यांचे उद्गार होते "मुंबई सांभाळणं महाराष्ट्र सरकारला जमत नसेल तर उत्तर प्रदेश सरकारला द्या."!
हिंदी मराठी हा वाद फक्त भाषिक नाही. सामाजिक आहे. सांस्क्रुतिक आहे. हिंदीला अकारण विरोध करण्याचं कारण नाही, पण आपल्या राज्यात दुस-या भाषेचं प्रस्थ किती वाढवू द्यायचं हा प्रश्न आहे.
इंग्रजीचा प्रश्न वेगळा आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. ते सगळं ज्ञान मराठीत आलं पाहिजे हा अट्टहास कशाला? आपण दोन भाषा शिकू शकतो की! दोन कशाला , आपण अनेक भाषा (लहानवयापासून) सहज शिकू शकतो. त्यात हिंदी आलीच. पण मराठी माणसांनी हिंदी शिकणं वेगळं आणि हिंदी लोकांनी इथे येऊन राहाणं वेगळं. या दोन मुद्द्यांची गल्लत होऊ नये असं वाटतं.
मराठी माणसाने वेळोवेळी हिंदीला पाठींबाच दिलेला आहे. पण माझा प्रश्न असा आहे की राष्ट्रीय राज्यभाषा सभेचं मुख्यालय मुंबईत कशाला? दिल्लीत का नाही? मध्य रेल्वेतले ७०% लोक बाहेरचे का? मुंबईतले जवळपास सगळे सनदी अधिकारी परभाषिक का? शिवसेनेला प्रांतीय म्हणून हिणवताना तमिळनाडूतल्या लोकांच्या तमिळप्रेमाचं कौतुक का?
आपण केवळ "भाषा" आणि "राष्ट्रीय एकात्मता" हेच निकष न लावता या मुद्द्यांवरही विचार करावा असं वाटतं. आपलयाला विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. त्या अनुभवावरून तुम्ही माझ्या या प्रश्नांना उत्तरं देऊ शकाल का?
माझी ही प्रतिक्रिया निव्वळ भावनिक असेलही पण माझं प्रामाणिक मत मी मांडलं. काही रुचलं नसेल तर माफ करा.
-रोहित
तुम्ही माझ्या या प्रश्नांना उत्तरं देऊ शकाल का?
अस म्हणत खूप प्रश्न विचारले आहेत आणि होय, त्यांना सयुक्तिक उत्तरे आहेत.
केवळ भाषा आणि राष्ट्रीय एकात्मता हे मुद्दे नकोत, कबूल, पण अजिबात नकोत का?
मग त्यांचा विचार कधी कुणी आणि कसा करायचा?
प्रश्न रहातो लोंढयाचा आणि आनुषंगिक मराठी माणसाच्या बेरोजगारीचा. त्याला हिंदी भाषा आणि हिंदी प्रातीयांचा आत्यंतिक दुस्वास या शिवाय दुसरे उत्तर असुच शकत नाही का?
पण विचारपूर्वक तसा उपाय शोधून तो अंमलात आणायला हवा,
त्यापेक्षा कुणाचा तरी दुस्वास करणे कितीतरी सोपे
नाही का?
असो, तुम्हाला नक्की आवडेल असे काहीतरी....(आजच अपलोड करीत आहे..... बलसागर भारत)
भावनिक म्हणा हवे तर…..
PS
आपली प्रतिक्रिया आली सबब पटकन अपलोड करीत आहे
नमस्कार.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. माणूस इतका गुंतागुंत असलेला प्राणी आहे की त्याचे सगळे प्रश्नही गुंतागुंतीचे आहेत :) एकाच प्रश्नाकडे आपण इतक्या बाजूंनी बघू शकतो की हे चूकच आहे आणि ते बरोबरच आहे असं म्हणायला मन धजावत नाही.
भाषाप्रश्नातली तुमची बाजूही मला पटते, नाही असं नाही, पण शाळेतल्या आपल्या नेहमीच्या बाकावर दुसराच कुणीतरी बसल्यावर जे वाटतं किंवा आपल्या घरात ठेवताही येत नाही आणि हाकलताही येत नाही असा पाहुणा घुसल्यावर जसं होतं तसंच काहीसं मला महाराष्ट्रातले (लक्षणीय संख्येत असलेले) अमराठी बघून होतं.
याठिकाणी हा वाद प्रतिवाद अजूनही चालू शकेल, पण ही दैनिक सकाळमधली वाचकांच्या पत्रव्यवहाराची जागा आहे असा लोकांचा समज होऊ नये :) म्हणून तुम्हाला माझी बाजू ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद देऊन थांबतो.
आपली अनुदिनी स्तुत्य आहे. मला भीती वाटतेय की सारखं सारखं तुमच्या नोंदी वाचल्या तर माझात विचार परिवर्तन वगैरे घडेल... :)
मला भीती वाटतेय की सारखं सारखं तुमच्या नोंदी वाचल्या तर माझात विचार परिवर्तन वगैरे घडेल... :)
धन्यवाद. एका लेखकाला या पेक्षा दुसरे कांय हवे?
पण म्हणूनच शेवटी तुम्ही बलसागर भारत.... वाचली की नाही ही तीव्र उत्सुकता तशीच रहाणार...
Post a Comment