Saturday, February 13, 2021

तरूण विचारांचे वारे

 

तरूण विचारांचे वारे!



आजच्या तरूण मुला-मुलींबद्दल तुम्हाला काय वाटत?

अलीकडे मी कुठेही गेले तरी, हा प्रश्न मला हमखास विचारला जातो. अगदी अलीकडच्या काळापर्यंत ‘तरूण पिढी म्हणजे माझीच पिढी’ असे मला वाटत असे, त्यामुळे ‘तुम्हाला काय वाटते?’ या प्रश्नांचे उत्तरही माझ्याकडून अगदी भरभरू न दिले जाई.

पण लवकरच दिवस बदलले. माझी मुले मोठी झाली. त्यांच्या-माझ्या संवादाचे स्वरुप बदलले. नेहमीच्या बोलण्यात मैत्रीच्या ऊब असणारे ‘नवे नाते’ जाणवू लागते. माझ्या घरात एका नव्या पिढीचा, नव्या स्वप्नांचा जन्म होताना पाहणे, हा विलक्षण रोमांचक अनुभव आजही मी घेते आहे. या अनुभवातून जात असतानाच लक्षांत येते की आता आपली पिढी जुनी झाली. नवी आशा, नवी स्वप्ने घेऊन नव्या पिढीने जगायला सुरुवात केली आहे! आणि ती आक्रामक अशी पिढी आहे. आम्हाला समजावून सांगा, पण तुमचे मत लादू नका, प्रसंगी आम्ही आमची मते मांडण्यासाठी वकील म्हणून तुमची नेमणूक करू, पण आमची मते बनविण्याचा अधिकार आमच्याकडे ठेवू, अशी या पिढीची भाषा आहे.

त्यामुळे अलीकडे ‘तुमची पिढी आमची पिढी’ असे शब्द अगदी सहज माझ्या बोलण्यात येतात आणि नंतर माझे मलाच आश्चर्य वाटायला लागते.

हा बदल कधी आणि कसा झाला, हे सांगता येणार नाही, पण एवढे खरे, की माझी ‘भूमिका’ बदल्याचे मला स्पष्टपणे जाणवते आहे.

एकदा भूमिका बदली, आणि आपण “मागच्या पिढीत” जाऊन बसलो की आपण पुढच्या पिढीला नाकारायला सुरुवात करते. हे चित्र मी अनेक ठिकाणी पाहिले आहे.

अशी ‘नकारात्मक’ भूमिका स्वीकारली की नव्या पिढीशी नातेच तुटते. ‘सांगीन गोष्टी युक्ताच्या चार’ असे म्हणत सहजपणे रूळ बदलणारी माणसे फार थोडी, शिवाय जुन्या युक्तीच्या गोष्टी नव्या जमान्यात चालेनाशाही होतात, पण त्यांच भानही ज्येष्ठ पिढीला असतेच असे नाही.

नव्या पिढीशी ‘मैत्री’ मला आवडते, गरजेची ही बाटते. त्यांच्या आयुष्याबद्दल माझ्या मनात विलक्षण कुतूहल आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या बी.वाय.के कॉलेजमध्येएका छोट्या समारंभासाठी मी प्रमुख वक्त्या या नात्याने उपस्थित होते. कार्यक्रम फक्त ‘भाषणबाजीचा’ असू नये हे मी आधीच ठरविले. नाशिकच्या भविष्यकाळातबद्दल कॉलेज सुवक-सुवतींना काय वाटते, हे जाणून घ्यावे असा मुख्य उद्देश होता. संयोजक, प्राध्यापक मंडळींशी बोलून आधी सारे नक्की केले होते.

मोठ्या हॉलमध्ये निवडक मुला-मुलींचा एक गट, एफ.वाय.बी.कॉमपासून एम.ए. पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला. तरूण, हसरे चेहरे. विलक्षण उत्साह आणि चैतन्याने भरलेले.

बहुसंख्य मुले नाशिकची होती. नाशिकमध्ये शिकत होती आणि भविष्यातही नोकरी-व्यावसायासाठी येथेच राहण्याची शक्यता होती. त्यांना विषय दिला होता ‘येत्या 20 वर्षात नाशिक कसे असावे? कसे दिसावे ? असे तुम्हाला वाटते ?’ या विषयाला आणखी स्पष्टता यावी म्हणून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, उद्योग आणि पर्यटन या मुद्य़ांच्या आधाराने मुलांनी बोलावे असे मी सुचविले होते. येत्या वीस वर्षात तुम्ही काय योगदान करू शकता असाही उपप्रश्न होता.

चर्चा सुरु झाली.... मुलांसाठी सर्वात जिव्हाळ्याचा मुद्दा होता शिक्षण! त्यांच्या मनात इतके साचले होते की हवेने तट्ट फुगलेल्या फुग्याला टाचणी लावण्याचे निमित्त व्हावे, तसे झाले! त्यातही सगण्यात ज्वलंत मुद्दा होता कॅपिटेशन फीचा! एका हाताने इतके लाख द्या, आणि दुसऱ्या हाताने अडमिशन मिळवा असे जाहिरपणे सांगणाऱ्या व्यवस्थेबद्दल धुमसणारा राग व्यक्त करायला त्या तरुण मुलांकडे शब्द पुरत नव्हते.

‘अमुक लाख रुपये दिल्याशिवाय आम्हाला हवी तिथे अडमिशन मिळत नाही. आधी पोत्यांनी मार्क मिळवायचे आणि वर लाखो रुपयांची दक्षिणा! हे करून आम्ही जगायला बाहेर पडू तेव्हा आमच्याकडून तुम्ही कसल्या सामाजिक बांधिलकीची अपेक्षा करता आणि का म्हणून? ’ हा त्या मुलांचा पहिला प्रश्न होता. वशिलेबाजी आणिपॉपिटेशन फीचे जंगल तुडवून बाहेर पडणाऱ्या मुलांची सामाजिक बांधिलकी केव्हाच संपलेली असते, हेही मुलांनी स्पष्टपणे सांगून टाकले. कालबाह्य शिक्षण

त्यांचा दुसरा मुद्दा होती व्यावसायिक शिक्षणाचा! हे शिक्षणक्र आपल्या शाळा-कॉलेजमध्ये कधीच धडपणे राबवले जात नाहीत, अशी त्यांची तक्रार होती. विद्यापीठांतच्या अभ्यासक्रमातून फक्त पुस्तकी शिक्षण दिले जाते, त्यांचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध नसतो ही आता सर्वसामान्य वस्तुस्थिती आहे. पण त्या मुलांनी आणखी पुढे जाऊन.....

‘पुस्तकी’ असतेच, पण ते अत्यंत जुनाटही असते! इकॉनॉमिक्स, कॉम्प्युटर सायन्स शा क्षेत्रांमध्ये रोज नवे बदल घडतात, पण आपल्या शिक्षणपद्धतीला, महाविद्यालयांना, प्राध्यापकांना त्याचा गंधसुद्धा नसतो. दहा वर्षापूर्वीची पुस्तके हाच ‘सिलॅबस’ आणि तोच शिकवायचा!

पण एखाद्या क्षेत्रात नवे काय घडले आहे हे मुलांना माहित असते का? या माझ्या प्रश्नावर अनेकांनी आत्मविश्वासाने होकारार्थी उत्तर दिले. त्यांना बाहेरच्या जगाचे ‘एक्सपोजर’ जास्त मिळते. जे वाचन करतात, त्यांचे वाचनही जास्त विस्तारलेले असते. मुख्य म्हणजे जगात नवीन गोष्टी घडत आहेत, तंत्रज्ञान अफाट वेगाने पुढे जात आहे हे कानांवर तर पडतच असते. इलेक्ट्रॉनुक्समध्ये ‘आयसी’ बाबत शिकवण्याऐवजी व्हॉल्व्ह किंवा फार तर सेमी कंडक्टर आधारित सर्किट शिकविणे किंवा कॉम्प्युटर कोर्समध्ये ‘सी’ आणि ‘विंडोज’ ऐवजी अजूनही बेसिक, कोबोलसारख्या भाषेपर्यंत येऊन थबकणे हे दोन्ही कशाचे द्योतक आहे? आपला शिक्षणक्रम तंत्रज्ञानाच्या पुढे जाणारा नसला तरी निदान त्याच्या बरोबरीने जावा. कॉम्प्युटरच्या जगात दर सहा महिन्यांनी नवे बदल घडत असतील, पण विद्यापीठाचे सिलॅबस पाट वर्षांनी बदलणार असेल तर आपले शिक्षण अप-टू-डेट कसे राहणार? असा मुलांचा प्रश्न होता.

नव्या घडामोडी मुलांकडून प्राध्यापकांकडे आणि प्राध्यापकांकडून (सवडीने) विद्यापीठाकडे पोहचतात. मग विद्यापीठ जागे होते आणि सिलॅबसमध्ये असा बदल करते की जगाने केव्हाच चो बदलही ‘जुनाट’ म्हणून मोडित काढलेला असतो! हे सारे रोखठोकपण सांगणाऱ्या मुलांमधील नाराजी फार स्पष्टपणे जाणवली.

हुशारीचे वादग्रस्त निकष

चर्चा मग अपरिहार्यपणे वळती ती मेडिकल आणि इंजिनीअरिंगकडे! उपस्थित मुलांमध्ये जवळजवळ प्रत्येकजण वाणिज्य शाखेत शिकणारा, पैकी काहीजण दोन-तीन टक्क्यांचा फरक पडल्याने, सायन्सचे दरवाजे बंद शाले म्बणून कॉमर्सकडे नाराजीनेच आलेले. मार्कांच्या ‘रेटरेस’ बद्दलची चीड या मुलांमध्ये जास्त तीव्र दिसली, पण हेही जाणवले की आज ते घेतात त्या शिक्षणक्रमातून त्यांना अनेक रस्ते, दिसताहेत. ‘डॉक्टरच’ किंवा ‘इंजिनिअरच’ असे झापड डोळ्यांवरून निघून पडल्यामुळे बाहेरच्या जगात करिअरची इतर दालने आहेत ती त्यांना कळली आहेत.

एक मुलगा म्हणाला, “डॉक्टर होईल तो सर्वात हुशार. इंजिनिअर म्हणजे त्याच्यापेक्षा कमी. पण हुशारच! बाकीचे सगळे त्यांच्यानंतर. हुशारी मोजण्याचा हा प2रामीटर कधी बदलणार आपण?”

आणखी एकाने सांगितले, “जो सर्वात जास्त पैसे मिळवील तो जास्त हुशार, असेही असतेच ना?”

‘लाख रुपये पर डे’ हे टारगेट गाठायचे म्हणजे मग मेडिकल स्टुडंटस्मध्ये पण रेस असतेच. जनरल प्रक्टिशनर होउन काही फायदा नाही, व्हायचे ते सर्जनच आणि त्यातही कार्डिक सर्जन झाले म्हणजे ‘टारगेट’ लवकर गाठता येते. या मनोवृत्तीसाठी कोर्सेससाठी पळापळी चालली आहे. जितका कोर्स महागडा, तितका जास्त पैसा तो कोर्स संपविल्यानंतर मिळवावा लागणार!

नव्या व्यवस्थेचे हे नवे तत्वज्ञान चुकीचे आहे असे मुले बोलत होती. साहित्य, कला या विषयांचा संबंध हुशारीशी जोडला जात नाही. खेडेगावांतील शाळेतून आलेल्या व हे विषय घेणाऱ्या मुलांची नंतर फार घुसमट होते. गावाकडूल शाळेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या वस्तुस्थिती समजावून देऊन त्यांना करिअर गाईडन्स देऊ शकतील अशा संस्था नाशिकात येत्या दोन-पाच वर्षात उभ्या राहिल्या पाहिजेत. अशीही सूचना पुढे आली. अशी संस्था कुणी काढली तर कॉलेजातील दुसऱ्या, तिसऱ्या वर्गाचे विद्यार्थीच “बेस्ट फॅकल्टी” ठरतील असेही त्यांनी सांगून टाकले.

कॉपिटेशन फीबद्दल जळफळाट

चर्चा वारंवार सरकत होती ती डोनेशन आणि कॅपिटेशन फीकडे! या गोष्टीबद्दल बोलताना होणारा जळफळाट मुलांच्या चेहऱअयावर, हातवाऱ्यांमध्येही दिसत होता.

एक मुलगा म्हणाला, “आपण साखरसम्राटांना नाव ठेवतो. हल्ली परिस्थिती अशी आहे की एक शिक्षणसम्राट पाच साखरसम्राटांना विकत घेईल!”

“ही माणसे आमच्या नावावर मान्यता मिळवतात, आमच्या बळावर पॉलिटिक्स करतात, आणि पैसा तर काय आमचाच असतो. मग पैसे वाजवून घेता तर चांगल्या क्वालिटीचे शिक्षँण तरी द्या ना! त्याचे तर नाव नाही.”

उसळून बोलणाऱ्या एका मुलाला मी म्हटले, “पण कॉपी करून देतात ना!”

तेव्हा सारी मुले सुचक हसली. कुणीतरी बोलून टाकले, “पण मॅडम, कॉपी करायलं देणं म्हणजे चांगलं शिक्षण नव्हे, हे आम्हालाही कळतं....”

‘दळण दळणे’ नको वाटते !

मेडिकल- इंजिनिअरींगच्या या चक्रातून सुटायचे असेल, तर काय करायला हवे?

या प्रश्नावर मुले म्हणाली, “नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘कौन्सिलींग सेल्स’ निर्माण करा. संधी देणार असाल तर आम्हीही त्यात स्वयंस्फूर्तीने काम करु, पण कॅपिटेशन मोजून, मार्कांच्या मागे जीव खाऊन पळण्यापलीकडे काही शिक्षण आहे हे विद्यार्थ्यांना, त्यांच्या आई-बापांना कळू द्या!”

स्वतःच्या करिअरची दिशा निवडण्यासाठी या मुलांना सल्ला आणि मार्गदर्शनाची गरज वाटते आहे. जे नवे आहे, भविष्यकाळात टिकणारे आहे, असे काही त्यांना शिकायचे आहे. अभ्यासाच्या नावाखाली वर्षानुवर्षे तेच दळण दळत राहणे त्यांना फारच ‘बोअर’ वाटते. त्याचप्रमाणे असे मार्गदर्शन त्यांना स्वतःला मिळाले नसले तरी आपल्या मागून येणाऱ्यांना तरी ते मिळावे अशी तळमळही त्यांना होती हे दिसून आले.

अनेकांना ‘इंडस्ट्री’ मध्ये जाण्याची इच्छा आहे, तिथेही इंजिनियर्स खेरीज इतरांची गरज असते ना? पण त्यासाठी काय करायला हवे ते माहीत नाही. उद्योजकांना त्यात मोठी भूमिका करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

“शाळेत मुलांना कितीतरी जुनाट शिकवतात. ज्यांना काहीच जमत नाही, त्यांना प्राथमिक शाळेत शिक्षक व्हायचे, अशी आपल्याकडे प्रथाच पडली आहे. त्या शिक्षकांपेक्षा आम्हीसुद्धा शाळेतल्या मुलांना उत्तम शिकवू”- कुणीतरी म्हणाले.

“तुम्हाला खरोखरीच परवानगी मिळाली तर शाळेत जाऊन शिकवाल का आजच्यापेक्षा जास्त योग्य आणि उपयोगी असे काही तुमच्याकडून विद्यार्थी शिकतील का?” या प्रश्नावरही त्यांचे उत्तर ‘हो’ असेच होते.

“आम्हाला झोपडपट्टीतल्या मुलांसाठी काम करावसं वाटतं. आमच्या कॉलेजने प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, तर आम्ही मनापासून काय करू” मुलींच्या एका गटाने सांगितले.

एवढे होईपर्यंत बराच वेळ उलटून गेला होता. शिक्षणाखेरीज बाकीच्या मुद्यांना जाता जाता स्पर्श होत होता तेवढेच! पण कुठूनही सुरुवात तरी करा या मुद्यावर सर्वांचे एकमत झाले.

अशी सुरुवात या नाशिकांत घडवून आणणे ही आपणा सर्व नाशिककरांची जबाबदारी आहे. मुक्त विद्यापीठातर्फे आम्ही एक पाऊल टाकीत आहोत. तो आहे झोपडपट्टीतील मुलांसाठी सायंशाळा. याला सर्वांचा हाताभार लागो.



Friday, February 5, 2021

नागरिकशास्त्रातील कर्तव्य हरवत चालले आहे का ? राजकीय चिंतन मधे पण अपूर्ण

 नागरिकशास्त्रातील कर्तव्य हरवत चालले आहे का ?   

राजकीय चिंतन मधे पण अपूर्ण

Monday, February 1, 2021

स्त्री कर्तृत्वाचा सन्मान..लीना मेहंदळे (आयएएस)

स्त्री कर्तृत्वाचा सन्मान..लीना मेहंदळे (आयएएस)

------ मनोज गोविंदवार जळगाव.

महाराष्ट्रातील सुशिक्षित वर्गासाठी लीना मेहंदळे हे नाव चांगलच परिचयाचं आहे. आपल्या कर्तृत्वाने स्वतःच्या अस्तित्वाची व स्त्रीशक्तीची दखल घ्यायला लावणाऱ्या महाराष्ट्रातील अगदी बोटावर मोजण्याएवढया कर्तृत्वान महिलांपैकी त्या एक आहेत. सुजाण पालक आपल्या मुलांना, विशेषतः मुलींना सर्व क्षेत्रात नाव कमावून पुढे जाण्याची प्रेरणा देताना लीनाताईचे उदाहरण आवर्जून देतात.

आजच्यासारखी महिलांच्या विकासासाठी तेवढीशी जागरूकता नसलेल्या काळात लीनाताईंनी शैक्षणिक, प्रशासकिय व सामाजिक या तीनही क्षेत्रात घेतलेली झेप समाजाचा महिलांविषयीचा पारंपारिक दृष्टिकोन मुळातूनच बदलवून टाकणारी आहेत. लीनाताईंच्या कर्तृत्त्वाची झेप एवढी उत्तुंग आहे की ती लोकांच्या नजरेस आणून द्यायला त्यांना स्वतःला काहीच करावे लागले नाही. आकाशातला सप्तरंगी इंद्रधनुष्य जसा काहीही न करता सर्वांचे लक्ष वेधून घेतो अगदी त्याचप्रमाणे लीनाताईचे बहुआयामी कर्तृत्व समस्तांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडते. आणि केवळ भागच पाडत नाहीत, तर त्यांना त्यांच्या कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा सुद्धा देते.

लीनाताईचे पूर्वाश्रमीचे आडनाव अग्निहोत्री. संस्कृत व फिलॉसफी विषयाचे प्राध्यापक असलेले डॉ.बी.एस. अग्निहोत्री हे त्यांचे वडील. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे त्यांचा जन्म झाला. लीनाताईंना आज संपूर्ण महाराष्ट्र एक अत्यंत यशस्वी महिला, कर्तृत्वान व कार्यतत्पर प्रशासक, संवेदनशील विचारवंत व लेखिका म्हणून ओळखतो. लीनाताईकडे भारत व परदेशातील विविध अशा पाच पदव्या आहेत. त्यांना एकूण तेरा भाषा अत्यंत चांगल्या पद्धतीने अवगत आहेत. आणि आपल्या स्त्रीत्वाचा त्यांना अभिमान आहे.

१९६८ मध्ये बिहार विद्यापीठातून बी.एस.सी केल्यानंतर लीनाताईंनी १९७० मध्ये पटना विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एम्.एस्सी. ची पदवी घेतली. त्यानंतर लगेचच आपल्या पायावर उभं होत त्यांनी लेक्चरर म्हणून नोकरी करायला सुरवात केली. या काळात त्यांचे प्रशासकीय क्षेत्रात यायचे प्रयत्न सुद्धा सुरू होते. त्यांच्या प्रयत्नांना १९७४ मध्ये यश मिळाले व त्यांची प्रशासकीय सेवेत निवड झाली इतर कुठल्याही सामान्य स्त्रीने या टप्प्यावर आपल्या शिक्षणाला पूर्णविराम देऊन आपली नोकरी व आपले घर एवढाच सामान्य दृष्टीकोन ठेवला असता. पण लीनाताई एवढयावरच थांबणाऱ्यांपैकी नव्हत्या.

लीनाताईंची शिक्षणाची ओढ एवढी तीव्र होती की प्रशासकीय सेवेत असतानाही सर्व व्याप सांभाळून त्यांनी पुढचे शिक्षण सुरूच ठेवले. त्यांनी १९८९ मध्ये इंग्लंड मधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून प्रोजेक्ट प्लॅनिंग विषयात एम्.एस्सी. ची पदवी घेतली. पुढे २००७ मध्ये त्यांनी हिस्सार येथील जी.जे. विद्यापीठातून ह्यूमन रिसोर्स विषयात एम.बी.ए. केले व २०१० मध्ये मुंबई विद्यापीठून एलएल.बी ची पदवी देखील मिळवली. यातूनच शिक्षणाविषयची त्यांची ओढ लक्षात येते. त्यांचे शिक्षण केवळ आपल्या नावापुढील पदव्यांची बाराखडी वाढवण्यासाठी किंवा आणखी मोठी नोकरी मिळवण्यासाठी नसून आपल्या ज्ञानाच्या व जाणीवेच्या कक्षा अधिकाधिक रूंदावण्यासाठी होते. आपल्या या ज्ञानोपासनेच्या काळात त्यांनी विविध भाषांवरही प्रभुत्व मिळवले. त्यांची लेखन व वाचनाची आवड त्यांना आणखी नवनव्या भाषा शिकण्यांची प्रेरणा देत होती.

लीनाताईंनी विविध भाषांमधील साहित्याचे वाचन करत स्वतः लेखनसुद्धा केले. त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजी भाषांमधून लिखाण केलेले आहे. सोबतच अहिराणी, बंगाली ,पंजाबी, गुजराती, नेपाळी, मैथिली, ओरिया, आसामी, भोजपुरी व संस्कृत या भाषषाही त्यांना समजतात. इंटरनेटच्या सुरवातीच्या काळात मराठी, हिंदी भाषांमधील इंटरनेटवरचे लिखाण तेवढे काही प्रभावी नसायचे. याचे कारण म्हणजे मराठी व हिंदी भाषांमध्ये टाईप करणे इंग्रजीच्या तुलनेत बरेच कठीण असते. शासनाने यासाठी इस्क्रिप्ट नावाची पद्धती खूप आधी सुरू केली होती. पण काळाच्या ओघात ती पद्धत अडगळीत चालली गेली. पण ती पद्धत वापरायला एवढी सोपी होती की लीनाताईंनी त्या पद्धतीला पुन्हा एकदा प्रवाहात आणून तिला एक प्रकारे संजीवनीच दिली. त्यासाठी त्यांच्या प्रत्येक पोस्टिंगमधे त्यांनी स्वतः आपल्या स्टाफला ही पद्धत तसेच संगणकाचे बेसिक व्यवहार शिकवले. अजूनही ती पद्धत शाळांमधे मोठया प्रमाणात शिकवली जावी म्हणून त्यांचा कौशलम् न्यास प्रयत्नशील आहे.

वडिलांच्या नोकरीमुळे महाराष्ट्रात जन्मलेल्या लीनाताईचे सुरवातीचे शिक्षण बिहारमधील दरभंगा या जिल्ह्याच्या शहरात झाले. दरभंगा येथील मेडीकल कॉलेज त्याकाळी संपूर्ण आशिया खंडात प्रसिद्ध होते. इतके की परप्रांतातील अनेक विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी यायचे. असे असतानाही देखील दरभंगा शहर मात्र तितकेसे प्रगत नव्हते. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अजूनही बिहारचे सामाजिक परिस्थितीविषयीचे चित्र काही चांगले नाही.पण असे असतानाही देशातील आयएएस स्तरावरचे सर्वाधिक प्रशासकीय अधिकारी उत्तरप्रदेश व बिहार यांसारख्या राज्यामधूनच बाहेर पडत होते. आपल्या जळगांवमधे गेल्या 7-8 वर्षात दीपस्तंभ फाउंडेशनच्या प्रयत्नांमुळे स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण होताना दिसते .मात्र बिहारमध्ये खूप आधीपासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन दिले जायचे. लीनाताईच्या वडिलांचे प्रशासकीय सेवेतील अनेक मित्र लीनाताईना आएएस होण्यासाठी प्रोत्साहित करायचे. त्यासाठी पटना विद्यापीठात अगदी नाममात्र शुल्कात मार्गदर्शनपर वर्ग सुद्धा भरवले जायचे. त्याच काळात लीनाताईच्या मनात प्रशासकीय सेवेत काम करण्याचे बीज रोवले गेले.

सुभाषबाबू, महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांनाच आपले आदर्श मानणाऱ्या लीनाताईंना प्रशासकीय सेवेत रूजू होऊन प्रामाणिकपणे देशाची सेवा करायची होती. आज महिला सक्षमीकरणाबद्दल खूप बोललं जांत . मात्र १९६०-७० च्या दशकात दरभंगा नावाच्या त्या तुलनेने मागास शहरात लीना अग्निहोत्री ही एकमेव सायकल चालवणारी मुलगी होती. त्या शहरात त्यांच्यानंतर तब्बल वीस वर्षांनंतर दुसऱ्या एका मुलीने सायकल चालवली. आणि ती देखील लीनाताईंचीच जुनी सायकल घेऊन. या घटनेबाबत लीनाताईं सांगतात की सायकल चालवणे हे मुलींना आकाश मोकळे झाल्याचे प्रतीक आहे. पुढे पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोशिएशन मध्ये काम करत असताना लीनाताईंनी याच प्रसंगाची जाणीव ठेवीत महिलांसाठी सायकल व टू व्हिलर रॅलीच्या आयोजनाची सुरवात केली.

आज महिला सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. पण असे असतानाही दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणांसारख्या घटनेमुळे स्त्रियांचा हा विकास केवळ भ्रम तर नाही ना असे प्रश्न मनात घोंघावायला लागतात. लीनाताईंना हे प्रश्न खूप आधीपासून सतावत. समाज व न्यायव्यवस्था यामधे सुधारणा सुचवणारे कित्येक लेख त्यांनी लिहिलेत, प्रसंगी त्यावर कामही केले आहे. प्रशासकीय सेवेत काम करत असताना विविध प्रशासकीय, राजकीय व कधीकधी सामाजिक घटकांतूनही तुम्हाला नैतिकतेच्या विरूद्ध काम करण्यासाठी विविध प्रकारची प्रलोभने दाखवली जातात. या प्रलोभनांना बळी पडतो तो वरकरणी प्रशासकीय अधिकारी वाटत असला तरी तो कुणाच्या तरी हुकुमाचा ताबेदार असतो.

खरं तर प्रशासकीय सेवेसारखी देशसेवेची दुसरी संधी नाही. देशाच्या व देशवासीयांच्या सुरक्षेसाठी सीमेवर प्राणपणाने लढणारा सैनिक व प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्याचे पालन करणारा प्रशासकीय अधिकारी हे दोघेही सारख्याच सन्मानास पात्र असतात. आपल्या कर्तव्याचे पालन करताना दोघांनाही त्याग करावा लागतो. एक सैनिक लोकशाहीच्या सन्मानासाठी लढतो, तर एक प्रशासकीय अधिकारी लोकशाहीच्या मूल्यांसाठी. म्हणूनच देशासाठी काहीतरी करू इच्छिणा-या तरूण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ प्रामाणिकपणे आपले काम केले, तरी ती खूप मोठी देशसेवा ठरते. त्यातून असा अधिकारी कर्तव्यनिष्ठ व विचारी असेल तर तो समाजात खूप चांगले बी पेरीत जातो.

प्रशासकीय अधिकारी म्हणून विविध विभागात काम करताना लीनाताईना अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या. महसूल विभागात काम कराताना लीनाताईंना जाणवलं की, त्या विभागाचे काम जवळपास कोर्टाच्या कामकाजासारखेच असायचे. महसूल विभागात सुद्धा विविध केसेसच्या सुनावण्या होत असतात. दोन्ही बाजूचे वकील आपापली बाजू मांडत असतात. महसूल विभागातल्या या केसेसचा निकाल लांबत जाणे ही तर नित्याचीच गोष्ट. पण लीनाताईंनी त्या विभागात त्यांच्या पहिल्याच ज्यूनियर पदावर काम करत असताना तब्बल 2000 हून अधिक केसेस ची सुनावणी करून त्यांचा निकालही लावण्यात यश मिळवल.

प्रशासकीय सेवेत काम करत असताना आपल्या सहकाऱ्यांचे योगदान यावरही खूप काही अवलंबून असते. याबाबतचे काही चांगले वाईट अनुभव लीनाताईंनाही आले. पण असहकाराच्या प्रसंगी लीनाताई प्रत्येक वेळी खंबीर राहिल्या. कधी समजाऊन तर कधी सक्ती करून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून आपल्याला हव्या त्या पद्धतीने काम करवून घेतले. प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याला हे जमले पाहिजे असे त्यांना वाटते. कारण त्याशिवाय त्यांना त्या वातावरणात प्रभावीपणे काम करता येणार नाही. पण आपल्या सहकाऱ्यांवर आपली भूमिका लादण्यापेक्षा त्यांना जर ती पटवून देता आली तर त्यांना आपल्या कामात सहभागी करणे खूप सोपे असते असे त्यांना वाटते. त्यांनी स्वतःही याच पद्धतीने काम केलेले आहे. लीनाताई म्हणतात की एकदा का तुमच्या सहकाऱ्यांना तुमची भूमिका पटली की कामाची गती वाढून लगेच निकाल मिळू लागतो. मग तुम्ही तिथून दुसरीकडे गेल्यानंतरही तुमच्या प्रकल्पांची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू राहते.

कधीही न संपणाऱ्या कामासोबतच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आणखी एक सोबती म्हणजे दर तीन वर्षांनी नियमिपणे होणारी बदली. अनेकांना ही बदली म्हणजे ताप वाटत असतो. पण लीनाताईंसाठी दर तीन वर्षांनी होणारी ही बदली म्हणजे नव्या संकल्पांची नांदी असायची. जुन्या अनुभवांचं गाठोड घेऊन नव्या प्रकल्पांना आणखी कार्यक्षम पद्धतीने राबवायला लीनाताईंना खूप आवडतं. त्यामुळे नियमितपणे होणाऱ्या या बदल्यांना सुद्धा लीनाताई अत्यंत सकारात्मकपणे प्रतिसाद देतात. आणि जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कामाशी या पद्धतीने एकरूप होऊन जाते तेव्हा ते काम केवळ काम राहात नाही तर त्याला ईश्वराच्या आराधनेचे स्वरूप प्राप्त होते. आणि हा ईश्वर इतर कुणीही नसून जनता जनार्दन असते.

कोणतेही यश हे कोणा एकाचे कधीच नसते. लीनाताईंना ही गोष्ट खूप चांगली ठाऊक आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा त्यांच्या यशस्वी करीयरची गोष्ट निघते तेव्हा त्याचे श्रेय त्या आपल्या परिवाराला देण्यास विसरत नाहीत. त्यांचे पती प्रकाश हे स्वतः इंजिनियर आहेत. त्यांचा मोठा मुलगा आदित्यकडे मेकॅट्रानिक्स या विषयाची डॉक्टरेट ची पदवी आहे. त्यांचा लहान मुलगा हृषीकेश हा सुद्धा कॉम्प्युटर इंजिनियर आहे. आणि दोघांनाही आपल्या कर्तृत्ववान आईचा अभिमान आहे. आपल्या कुटूंबाचे प्रोत्साहनपर सहकार्य हेच कठीणाल्या कठीण प्रसंगीसुद्धा आपल्याला बळ देत असतात. जेव्हा जिवाभावाची माणसं सोबत असतात, तेव्हा रस्त्यातील लहानमोठे खाचखळगे आपल्याला आपल्या लक्ष्यापासून परावृत्त करू शकत नाही.

लीनाताईचे आजवरचे काम, आपल्या कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा ही आजच्या तरूण पिढीसाठी एक आदर्श आहे. आपल्या कार्यकाळात लीनाताईंनी अनेक वैशिष्टयपूर्ण उपक्रम राबवले. सांगली येथे कलेक्टर असताना जत या गावातील मंदिरामधे देवदासी सोडण्याची प्रथा बंद केली व त्या परिसरातील देवदासींसाठी आर्थिक पुनर्वसन प्रकल्प राबवून सांगली-कोल्हापूर परिसरात या प्रथेच्या उच्चाटनाचे मोठे समाजकार्य पार पाडले. समाजामध्ये ऊर्जा बचतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी टीव्ही व रेडिओ वर सुरू केलेला कार्यक्रम सलग तीन वर्ष यशस्वीपणे चालला. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरूद्ध वर्तमानपत्रूंन लिखाण केले. अनेक पीडित महिलांना त्यांनी मार्गदर्शनही केले. त्यातून त्या महिलांचे संपूर्ण आयुष्य बदलून त्यांना जगण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली. अधिक तत्परतेने काम करता यावे यासाठी त्यांनी नाशिक येथे आयुक्त म्हणून काम करत असताना संपूर्ण कार्यालयाचे संगणकीकरण केले.

एक संवेदनशील विचारवंत व लेखिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या लीनाताईंनी विविध विषयांवर विविध भाषांमध्ये २७ पुस्तके व हजाराहून अधिक लेख लिहीलेले आहेत. विविध विषयांवर जनजागृतीसंदर्भातले टीव्ही वरचे 250 तर रेडिओवरचे 350 एपिसोडस् त्यांच्या कल्पक कार्यक्षमतेची ग्वाही देतात. त्या यशदा सारख्या संस्थांमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून सुद्धा जात असतात. टीव्ही आणि रेडिओवर त्यांच्या भाषणाचे वेळोवेळी प्रसारण होत असते.

१९७४ साली IAS Probationer या पदापासून सुरू झालेला त्यांचा करिअर प्रवास अत्यंत प्रेरक असा आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या उपसचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, डब्ल्यू. एम. डी.सी. च्या व्यवस्थापकीय संचालक, भारत सरकारच्या नॅचरल इन्स्टिट्यूट ऑफ ऩॅचरोपॅथीच्या डायरेक्टर, नाशिकच्या विभागीय आयुक्त, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू, सेटलमेंट कमिशनर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सचिव, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव तथा अतिरिक्त मुख्य सचिव, केंद्रीय लवादच्या सदस्य व गोवा राज्याच्या मुख्य सूचना आयुक्त असा त्यांच्या यशाचा आलेख आयुष्य उन्नत करणारा आहे, माणसाने (आणि बाईनेसुद्धा) मनापासून ठरवलं व प्रामाणिक प्रयत्न केलेत, तर आयुष्यात काय काय करता येऊ शकतं, याचं आदर्श उदाहरण म्हणजे लीनाताई मेहंदळे.