Thursday, January 21, 2016

भारतीय प्रजासत्ताकाचे आधारस्तंभ-zzz

भारतीय प्रजासत्ताकाचे आधारस्तंभ
***लीना मेहेंदळे***
1950 ते 2016 - 66 वर्षांपूर्वी आपण भारतीय राज्यघटना स्वीकारली आणि प्रजासत्ताक पध्दतीची पाळेमुळे देशात रुजायला सुरुवात झाली. राज्यघटनेची जी प्रस्तावना - प्रिऍम्बल - त्यात उद्देश स्पष्ट करण्यात आले - 'To constitute India into a Sovereign Democratic Republic'.
पण हे प्रजासत्ताक कसे असेल? तर सर्व जणांसाठी न्याय, स्वातंत्र्य आणि समत्व यांची हमी देणारे व सर्वांमध्ये बंधुभाव वाढावा यासाठी प्रयत्नशील असणारे.
आणि हे सर्व कोण घडवणार? - याचे उत्तर देण्यासाठी आपल्याला प्रस्तावनेच्या वाक्यातील पहिले पाच शब्द आणि शेवटचे पाच शब्द बघावे लागतील - ‘We the people of India, give to ourselves this constitution.’
मला आठवते, 1974मध्ये मी IAS परीक्षेत उत्तीर्ण होऊन मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात आले. आम्हाला ‘Indian Constitution’ हा विषय प्रो. माथुर उत्कृष्टपणे शिकवत. ते म्हणत, ''सबंध राज्यघटनेमधील सर्वात महत्त्वाचे, पण लोकांचे सर्वात कमी लक्ष वेधून घेणारे हे दहा शब्द आहेत.''
नागरिकशास्त्राच्या परीक्षेत प्रश्न विचारला - प्रजासत्ताकाचे आधारस्तंभ किती व कोण? तर तुम्हाला उत्तर लिहावे लागते - तीन - विधिमंडळ, कार्यपालिका व न्यायपालिका. विधिमंडळात व संसदेत कायदे केले जातात, कार्यपालिकेमार्फत त्यांची अंमलबजावणी व्हावी ही व्यवस्था केली जाते आणि न्यायपालिकेमार्फत कायदा उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा वा दंड केला जातो. परीक्षेच्या उत्तरात या तीनशिवाय इतर काही लिहिले, तर उत्तरावर चूकची खूण लागून मार्कांची कपात होईल. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र असे दिसून येते की, प्रजासत्ताकाला याहीपेक्षा अधिक व इतर आधारस्तंभांची गरज आहे. प्रा. माथुर यांचे शब्द वापरायचे, तर 'द पीपल'मधील जनता हाच प्रजासत्ताकाचा अंतिम आधारस्तंभ आहे. आपण मात्र 'द पीपल' असा सर्वसमावेशक शब्द न वापरता त्याची फोड करून त्यातील वेगवेगळया घटकांची छाननी केली पाहिजे, तसेच त्यांची आजची क्षमताही तपासली पाहिजे.
पण थोडेसे थांबून आजच्या भारतीय प्रजासत्ताकासमोर काय काय चॅलेंजेस आहेत, ते पाहू या. आपल्या समोरील सर्वात मोठा प्रश्न आहे आपली लोकसंख्या. ही संकट न वाटता आश्वासक कशी वाटेल? त्यासाठी 15 ते 55 या वयोगटातील स्त्री-पुरुषांना अधिकाधिक कौशल्य शिक्षण देऊन त्यांची उत्पादन क्षमता कशी वाढवता येईल? दुसरा प्रश्न आहे तो आपल्या देशातील वैज्ञानिक संस्थांमध्ये शोधकार्य कसे पुढे नेता येईल? तिसरा प्रश्न आहे की देशांमध्ये असलेली पारंपरिक कौशल्ये जपून त्यांना अधिक व्यवसायात्मक कसे करता येईल? आणखी एक मोठा प्रश्न आहे, तो पर्यावरण, डोंगर, खोरी, नद्या, वायुमंडल, झाडे, वने, वन्य प्राणी यांच्या संरक्षण व संवर्धनाचा. हा प्रश्नच आपल्या कृषी, जीवविविधता, पशुधन, शुध्द अप्रदूषित अन्नाची उपलब्धता आणि जनतेच्या सर्वसाधारण स्वास्थ्यासंबंधी प्रश्नांशी निगडित आहे, हे लक्षात घेतले तर या दोन्ही प्रश्नांची तीव्रता अधिक स्पष्ट होते. इतकेच नव्हे, तर या सर्व विषयांची उकल एकात्मतेने होणार आहे, वेगवेगळया विखुरलेल्या योजनांतून नाही, हेदेखील समजून येते. याशिवाय देशाअंतर्गत वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि देशाबाहेरून होणारे आघात - म्हणजे पाकिस्तानचा दहशतवाद, चीनची अरेरावी, अमेरिकेचे तळयात-मळयात असलेले धोरण, परकीय कंपन्यांचे आर्थिक आक्रमण, शेजारील देशांबरोबर मधुर संबंध नसणे या बाबीही विचार करायला लावणाऱ्या आहेत.
अशा परिस्थितीत प्रजासत्ताकाला समर्थ करण्यासाठी कोणाकोणाकडे आशेने बघता येईल?
लोकसभेचे संसद सदस्य, राज्यातील विधिमंडळ सदस्य, जिल्हा पंचायत, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांचे लोकप्रतिनिधी यांची काय अवस्था आहे? त्यांच्यापैकी किती जणांना वर नमूद केलेल्या प्रश्नांची आच माहीत आहे? किती जणांनी याच्या जोडीला त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील प्रश्नांचा अभ्यास केला आहे? त्यांचा अभ्यास आहे की नाही हे तपासून कसे पाहता येईल? त्यांना ही जाणीव कशी करून देता येईल? आणि तशी जाणीव नसूनही त्यांचे स्थानिक मतदार जर त्यांनाच निवडून देत असतील, तर काय?
यासाठी मतदार जागृती करावी लागेल. गेल्या पाचशे-सहाशे वर्षांचा जागतिक इतिहास सांगतो की, मतदार जागृती होऊ शकते. आपल्या देशातही 1975-76मध्ये अणिबाणी लागू झाली, तेव्हा मतदार जागृतीच्या आधारानेच तिला उलथवणे शक्य झाले. अशी जागृती करण्यासाठी साधारणपणे मध्यवर्गातील युवा पुढे यावा लागतो. तसेच त्या जागृतीला काहीतरी नैतिक अनुष्ठान असावे लागते. हे नैतिक अनुष्ठान पुरवू शकतील अशी अभ्यासू, अनुभवी व चिंतक प्रौढ माणसेदेखील लागतात. जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, मधू लिमये यासारख्या चिंतक मंडळींनी 1975च्या जनजागृतीला चालना दिली. प्रचंड तफावत असूनही हे एकत्र आले. त्याचप्रमाणे नुकतेच आपण अण्णा हजारेंच्या आंदोलनातही साधारणपणे हीच प्रक्रिया अनुभवली. अशी आंदोलने सफल झाली की असफल, हा वेगळा मुद्दा असतो; पण समाजात मोठे विचारमंथन होते, हा फायदा नक्कीच असतो.
तरीही मोठया प्रमाणावर जनजागृतीची आंदोलने वारंवार होऊ शकत नाहीत आणि होऊही नयेत. यासाठी लोकप्रतिनिधींचे प्रबोधन हा एक अल्पगतीने फळ देणारा उपाय करता येऊ शकतो. स्वयंप्रेरणेने आदर्श वागणारे लोकप्रतिनिधीदेखील असतातच. त्यांचे उदाहरणदेखील प्रबोधनाला उपयुक्त ठरते. एक मात्र नक्की की मतदारांचे प्रबोधन आणि लोकप्रतिनिधींचे प्रबोधन एकमेकांना पूरक असते व त्या दृष्टीने प्रबोधनाची आखणी करायला हवी. मात्र आपल्या देशात ही एकूणच संकल्पना अजून बाल्यावस्थेत आहे.
आता न्यायपालिकेकडे वळू या. सुदैवाने देशातील उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेले निकाल आतापर्यंत बव्हंशी आश्वासक आणि आशादायक ठरलेले आहेत. राज्यघटनेतील सर्वात पहिली हमी आहे न्याय मिळण्याची. त्या अनुषंगाने न्यायालयांचे काम समाधानकारक मानावे लागेल. मात्र त्या कामगिरीचा आलेख चढता नसून उतरता आहे. न्यायालयांना आज काही गंभीर समस्या भेडसावतात. त्यामध्ये न्यायदानाला विलंब, कनिष्ठ न्यायालयांचे पसरत चाललेला भ्रष्टाचार, न्यायालयांमधील अपुरी व्यवस्था आणि अपुरी संख्या, वकील वर्गामध्ये तात्त्वि चिंतनाचा अभाव इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. याशिवाय गुन्हेगारी खटल्यांमध्ये खटले उभी करणारी जी सरकारी यंत्रणा - म्हणजे पोलीस, सरकारी वकील आणि फॉरेन्सिक प्रयोगशाळा यांचेही गुणवर्धन होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात या दृष्टीने पहिले पाऊल टाकले गेले असून एक खास यंत्रणा निर्माण केली आहे. आयजीपीसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सर्व सरकारी वकील आणि फॉरेन्सिक प्रयोगशाळा एकत्र आणून त्यांचे ऍनालिसिस व प्रबोधनाची सुरुवात करण्यात आली आहे.
न्यायप्रक्रियेत सुधारणा होण्यासाठी व विलंब टाळण्यासाठी दोन-तीन नवीन संकल्पना आवश्यक वाटतात. पहिली म्हणजे सध्या गुन्हे तपासणी फक्त पोलीस यंत्रणेमार्फतच होऊ शकते. खुद्द गुन्हे मात्र अशा वेगळया विषयांत घडत असतात, जिथे गुन्हे ओळखू शकणारी वेगळी यंत्रणा असते. अशा वेळी त्या त्या यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना आयपीसी व सीआरपीसीखाली तपासणी अधिकारी घोषित केल्याने तपासाला व कोर्टात खटले उभी करण्याला गती मिळू शकते. उदाहरणादाखल अन्न भेसळीचे गुन्हे, वाळू किंवा डोंगर फोडून खनिजे उपसण्याचे गुन्हे, बालशोषणाचे गुन्हे, प्रदूषणाचे गुन्हे या सर्वांमध्ये गुन्ह्याची दखल घेऊन पुरावे गोळा करणारी यंत्रणा वेगळी असते, पण त्यानंतर पुन्हा गुन्हा नोंदवून पोलीस यंत्रणेला पुन्हा तपास करावा लागत असल्याने खटले उभे राहण्यास दीर्घ काळ लागून खटल्यातील प्राणच निघून गेल्यासारखे असते.
दुसरी सुधारणा थोडयाफार प्रमाणात सुरू झाली आहे, ती म्हणजे टि्रब्यूनल पध्दती. यामध्ये न्यायधीशांच्या जोडीनेच त्या त्या विषयातील तज्ज्ञदेखील न्यायदानाचे कार्य व्यवस्थित पार पाडू शकतात, अशी संकल्पना आहे. या दिशेने पडलेली पावले म्हणजे कन्झ्युमर कोर्ट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टि्रब्यूनल, इन्कम टॅक्स टि्रब्यूनल, माहितीची कायदा इत्यादीखाली होणाऱ्या विषयतज्ज्ञांच्या नेमणुका. जपानसारख्या प्रगत देशात तर न्यायदानात जनसहभाग ही संकल्पना मोठया प्रमाणात पुढे नेण्यात येत आहे. तो अभ्यासही महत्त्वाचा आहे.
गेल्या वीस-तीस वर्षांतील नेत्यांनी जनतेची अशी वारंवार दिशाभूल केली आहे की, नवनवीन आणि कडक कायदे आणल्याशिवाय देशातील समस्या सुटू शकत नाहीत. खरे तर, असलेल्या कायद्यांमध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा व अगदी थोडया प्रमाणात नवे कायदे एवढयाचीच गरज आहे. खरी गरज आहे योग्य व झटपट अंमलबजावणीची. मोठे प्रयत्न व्हायला हवेत ते त्या दिशेने.
प्रजासत्ताकाचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे कार्यपालिका. यालाच 'सरकार', 'सत्तेचे दालन', 'शासन' इत्यादी संबोधने आहेत. ही यंत्रणा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली असते. सर्वात वेगवान सुधारणा घडवण्याचे, सुशासन लागू करण्याचे व ते टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य या यंत्रणेत आहे. ही झाली सैध्दान्तिक बाजू. प्रत्यक्षात मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून 68 वर्षे झाली, तरी अजूनही आपण 'डेव्हलपिंग कंट्री' याच सदरात मोडतो, यावरून या यंत्रणेच्या कामात सुधारणांची गरज आहे, हे दिसून येते. अशा किती सुधारणा हव्यात ते मोजायचे म्हटले, तर मोठी यादीच होईल.
पण शासनाच्या विभिन्न खात्यांमध्ये समन्वय नसणे, लोकप्रतिनिधी व कार्यालयीन अधिकारी यांच्यात विचारांचे आदान-प्रदान नसणे व चांगल्याला चांगले आणि वाइटाला वाईट न ओळखता येणे या काही अशी बाबी आहेत, ज्या होऊ घातलेल्या कित्येक सुधारणांचा विचका करतात.

राज्यघटनेत नावानिशीवार उत्तरदायित्व ठरवून दिलेले हे तीन आधारस्तंभ. पण समाजातूनही मोठया आधाराची गरज असते. समाजातील चिंतनशील व्यक्ती, दूरदृष्टीने विचार करणारी मंडळी, कृतिशील व्यक्ती, समाजाची चिंता वाहणाऱ्या व्यक्ती या समाजासाठी आधारभूत ठरू शकतात. पण त्यासाठी एक अट आहे. या व्यक्तींचे एकेकटे चिंतन किंवा कृती समाजात दूरवर पोहोचविण्यासाठी काय यंत्रणा आहे? पूर्वी अशा यंत्रणा म्हणजे शिक्षणसंस्था आणि वर्तमानपत्रे या होत्या. आता त्यामध्ये दूरसंचार माध्यमे आणि सोशल मीडिया यांचाही समावेश आहे. मात्र या संस्थांचाही वापर कोण व कसा करतात ते महत्त्वाचे ठरते. आता पेड न्यूज व प्रायोजित कार्यक्रमांचा जमाना आहे. त्यामुळे 'बोलविता धनी' कोण आहे ते बघायला हवे. तसेच आता नवीन ट्रेंड येत आहे तो कॉर्पोरेट कंट्रोलचा. उद्योजक व उद्योग व्यवसाय हे देशाची संपन्नता वाढवण्यास मदत करतात हे खरे; पण तेच जेव्हा सत्ता काबीज करू पाहतात, तेव्हा त्यातून निर्माण होणारे समाज व्यवस्थापन हे प्रजाहितदक्ष असेलच असे नाही, हे अजून ठरायचे आहे. आतापर्यंत देशात जे प्रयोग झाले, त्यामध्ये वेगवेगळया प्रकारच्या 'सम्राटां'नी हजेरी लावली. कुणी सहकार सम्राट तर कुणी साखरसम्राट, तर कुणी शिक्षणसम्राट. यांनी वेगवेगळया संस्था स्थापून प्रगतीचा आभास निर्माण केला, पण दुसरीकडे त्यातून प्रचंड भ्रष्टाचारही झाला. त्यामुळे या संस्था आदर्श निर्माण करू शकलेल्या नाहीत. तसेच काही ठरावीक वर्षांपलीकडे चिरस्थायीही ठरल्या नाहीत. म्हणूनच समाजातील विविध संस्थांवर, प्रसारमाध्यमांवर आणि खुद्द सरकारवर कार्पोरेट कंट्रोल आल्याने प्रजासत्ताकाचे सामर्थ्य वाढेल असे म्हणता येणार नाही.
देशातील शोधसंस्था आणि शोधप्रवृत्ती हा निर्विवादपणे कोणत्याही देशाचा आधारस्तंभ असतात. आजची आपल्या देशातील शोधसंस्थांची संख्या, स्थिती आणि त्यांचे फलित ही फारच चिंतेची बाब आहे.
देशातील बुध्दिमान तरुण ज्ञानाची व शोधकार्याची भूक भागवण्यासाठी मोठया प्रमाणात विदेशी युनिव्हर्सिटींचा आश्रय घेतो. भारतीय मूळ असलेल्या व्यक्तीला (पण परदेशाचे नागरिक असणाऱ्या व्यक्तीला) नोबेल पुरस्कार, अवकाशयात्रा इत्यादी आपण ऐकतो, पण देशात अशा संधींचा प्रचंड अभाव आहे. त्यामुळे आधारस्तंभ ठरू शकणारे युवा परदेशात जाऊन तिथली समृध्दी वाढवतात, पण भारतात परत येण्यासाठी पुरेशी संधी किंवा प्रोत्साहन नसते. मागे उरलेले नागरिक पुरेसे संख्याबळ साठवू शकत नाहीत. म्हणून देशाचा गाडा ते जेमतेम ओढत आहेत, पण वेग घेत नाहीत, असे दिसते.
बुध्दिमान, चिंतक व दूरदृष्टी असणारी कृतिशील व्यक्ती हीच शेवटी खरी आधारस्तंभ ठरेल. अशांची संख्या पुरेशी होईल, तेव्हा प्रजासत्ताकाची प्रगती होईल. आज ती संख्या अपुरी दिसते; पण सुदैवाने एक चांगली गोष्ट दिसते की, कित्येक सामाजिक संस्था अशा व्यक्तींची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढे येत आहेत. प्रजासत्ताकाचे भवितव्य मला दिसते ते अशा संस्थांच्या अस्तित्वामुळे. निदान त्यांची गुणग्राहकता व संख्या तरी वाढो, ही सदिच्छा!
9869039054
leena.mehendale@gmail.com

























Sunday, December 6, 2015

नरेंद्र गोळे यांनी करून दिलेली ओळख -- अनुदिनी: प्रशासनाकडे वळून बघतांना

अनुदिनी: प्रशासनाकडे वळून बघतांना - Looking back at Governance
http://prashasakeeylekh.blogspot.com/

अनुदिनी लेखिकाः लीना मेहेंदळे

अनुदिनी लेखिकेची ओळखः लीना मेहेंदळे यांचा जन्म ३१ जानेवारी १९५० रोजी जळगाव जिल्ह्यात धरणगाव येथे झाला. त्या स्वतःस परिपूर्ण प्रशासक, विचारवंत आणि लेखक (बालवाचकांकरताही) मानतात. त्या भारताच्या सर्व भागाची पुरेशी ओळख राखतात. भारतातील एकूण ६५० जिल्ह्यांपैकी ४०० जिल्ह्यांत त्यांनी प्रवास केलेला आहे. त्या हिंदी, मराठी, बंगाली भाषा जाणतात; तर आसामी, उडिया, पंजाबी, गुजराती, नेपाळी, मैथिली आणि भोजपुरी भाषा त्यांना समजतात.

त्या पाटणा विद्यापीठातून १९७० मध्ये भौतिकशास्त्रात एम.एस.सी. झाल्या. १९७२-७३ मध्ये भौतिकशास्त्राची व्याख्याती म्हणून पाटणा विद्यापीठात काम केल्यावर, १९७४ मध्ये त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. सेवेत असतांना त्यांनी यु.के.मधील ब्रॅडफोर्ड येथून १९८९ मध्ये प्रोजेक्ट प्लॅनिंग या विषयात त्यांनी एम.एस.सी. पदवी प्राप्त केली. हिस्सार मधील जी.जे.विद्यापीठाची एम.बी.ए. पदवी त्यांनी २००७ मध्ये संपादन केली. २०१० मध्ये मुंबई विद्यापीठाची एल.एल.बी. पदवी मिळवली. १९७४ ते २०१० दरम्यान त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत काम केले. नंतर केंद्रिय प्रशासकीय लवादाच्या सदस्य (हे पद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या समकक्ष असते) म्हणून त्यांची बंगलुरू येथे नियुक्ती झाली.

भारतीय प्रशासकीय सेवेत अतिशय स्पर्धात्मक परीक्षेनंतरच प्रवेश मिळतो. त्या सेवेतील काम नियामक, विकासात्मक आणि न्यायविषयक स्वरूपाचे असते. वरिष्ठ पदांवर अधिकारी धोरणात्मक निर्णय घेतात आणि अंमलबजावणीवर देखरेख करतात. भारतीयांना, जिल्हाधिकारी (कलेक्टर), आयुक्त (कमिशनर), अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक (सी.एम.डी.) आणि सचिव इत्यादी प्रातिनिधिक भारतीय प्रशासकीय सेवांची ओळख असते.

त्यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

१. सांगलीच्या जिल्हाधिकारी असतांना आणि डब्ल्यू.एम.डी.सी. ह्या एका औद्योगिक कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक असतांना त्यांनी देवदासींच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम राबवला.

२. ऊर्जा संवर्धनाबाबत साप्ताहिक १८० भागांच्या दूरदर्शन मालिकांतून आणि आकाशवाणीवरील २५० भागांच्या मालिकेतून कौशल्य संपादन आणि संवर्धन यांकरता लोकजागृती केली.

३. पुण्यातील ’यशदा’ मध्ये ग्रामीणविकास आणि मानवसंसाधन प्राध्यापक म्हणून १९८९-९० आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उप-कुलगुरू (निसर्गोपचार संचालक) पदांवरून १९९६ मध्ये काम करत असता त्यांनी प्रशिक्षणाची धोरणे आणि संकल्पना निश्चित केल्या.

४. त्या नेहमीच, संगणकावर भारतीय भाषांचा प्रसार व्हावा याकरता काम करत राहिल्या.

५. एक विचारवंत आणि लेखक म्हणून त्यांनी, मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून हजाराहून अधिक व्याख्याने दिली, निरनिराळ्या विषयांवर २५ हून अधिक पुस्तके लिहिली आणि ६०० हून अधिक लेख लिहिले.

अनुदिनीची सुरूवातः जानेवारी २००६

अनुदिनीतील नोंदींचा तपशील: अगदी अलीकडील २०११ मधील नोंदी २ आहेत. “आम आदमी कुठे आहे” हा बजेटवरला आणि “लोकाभिमुख प्रशासन” ही फर्ग्युसन कॉलेजमधे दिलेल्या पद्मावती व्याख्यानाची संहिता. २०१० मध्ये एकूण १० नोंदी आहेत. त्यात “निवडणुकीत नापसंतीचा अधिकार हवा” हा लेख आहे. मरीन ड्राईव्ह कांडावरले काही लेख आहेत. “काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां?”, “त्या स्त्रियांच्या सोबतीसाठी”, “हक्कांसाठी स्त्रियांनी कोर्टाची पायरी अवश्य चढावी”, “प्रशासकीय लेखा-परिक्षण एकांगीच राहिले” इत्यादी सुरेख लेख आहेत.

२००९ मध्ये एकूण ९ नोंदी आहेत. त्यात “परस्परसवांद आणि सामंजस्य महत्वाचे”, “भ्रष्टाचार, चौकशी, शिक्षा, न्याय इत्यादि”, “आरोग्य सेवा आणि आरोग्य शिक्षण”, “योगत्रयी”, “पोलिसिंग म्हणजे नेमके कांय”, “परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल हवा” इत्यादी लेख आहेत.

२००८ मध्ये एकूण १५ लेख आहेत. यात “माय मराठीत विज्ञान आणि कायदा”, “तारा - लिंगभेदावर एक तीव्र प्रकाशझोत”, “मराठी लेखनाच्या ब्लॉगसाठी – इनस्क्रिप्ट”, “सत्यवचनाचे वैज्ञानिक तथ्य”, “कार्यक्षम व्यवस्थेसाठी”, “सांगलीचे दिवस”, “सुस्त दंड प्रक्रिया आणि तेलगी” इत्यादी लेख समाविष्ट आहेत.

२००७ मध्ये एकूण २१ लेख आहेत. यात “संस्कृती अशी घडते”, “कुसुमाग्रजाच्या कविता -अनुवाद”, “प्रशासनात संगणक कसा आणि किती वापरावा”, “चिंतामण मोरया आणि इतर लेख -- 3रा संग्रह”, “इथे विचारांना वाव आहे”, “बलसागर भारत -- साने गुरुजी-- हिन्दी अनुवाद”, “ठावकीच नाही”, “नीती आणि दंड या माझ्याच विभूति आहेत”, “जा जरा चौकटीपलीनिमित्ताने –पूर्ण” इत्यादी लेख आहेत.

२००५ सालचा एक लेख आहे “त्याची शरम वाटते? -- मरीन कडे!”, “बेरोजगारीवर उत्तम उपाय- रेशीम उद्योग”, “हिंदीला धोपटणे थांबवा”, “जळगांव स्कँडलाच्या ड्राइव्ह कांड” हा. २१ एप्रिल २००५ रोजी मरीन ड्राइव्हसारख्या मुंबईच्या पॉश वस्तीत समुदकिनाऱ्यावर हवा खात बसलेल्या एका तरुणीवर आधी दमदाटी करून एक कॉन्स्टेबल तिला पोलिस चौकीत घेऊन जातो आणि तिच्याबरोबर असलेल्या तरुणाला बाहेर बसवून तिच्यावर बलात्कार करतो ह्या घटनेवर परखड भाष्य करणारा.

अनुदिनी कशासाठी वाचनीय आहे? त्यांनी अनेक भाषांत विपुल लेखन केलेले आहे. ते सर्व महाजालावर उपलब्धही करून दिलेले आहे. त्या सर्व अनुदिन्यांची खालील यादी उपरोक्त अनुदिनीवर पाहायला मिळते.

१. Energy-matters : pcra http://pcra--works.blogspot.com/

२. bhagvadgeeta_rec... http://bhagvadgeeta-recital.blogspot.com/

३. leena mehendale on web pages http://web-references.blogspot.com/

४. कुछ गुजराती प्रयोग http://gujrati-prayog.blogspot.com/

५. भाषा--हिन्दी--मर... http://bhasha-hindi.blogspot.com/

६. My favorites and Urdu shers http://urdu-sher.blogspot.com/

७. my first blog आणि नवीन लेखन http://leenamehendale.blogspot.com/

८. Women Empowerment : India http://women-empowerment.blogspot.com/

९. diary-index http://diary-index.blogspot.com/

१०. जिन्हे नाज है हिन्द पर वो आ जायें http://naz-hai-hind-par.blogspot.com/

११. My English articles http://my-eng-articles.blogspot.com/

१२. मन ना जाने मन को http://man-na-jane-manko.blogspot.com/

१३. hrishi thesis work http://hrishi-thesis.blogspot.com/

१४. राजकीय चिन्तन (Political Thoughts) http://rajkeeya-chintan.blogspot.com/

१५. books, websites and films http://leenameh.blogspot.com/

१६. good-to-see http://good-to-see.blogspot.com/

१७. सुवर्ण पंछी Suvarna Panchhi http://suvarnapanchhi.blogspot.com/

१८. है कोई वकील ? http://prakritik-chikitsa.blogspot.com/

१९. निसर्गोपचार-प्रकृति आद्य शिक्षक http://prakritik-chikitsa.blogspot.com/

२०. संस्कृत की दुनिया : कौशलम् न्यास http://sanskrit-ki-duniya.blogspot.com/

२१. anu vigyan अणु विज्ञान http://anu-vigyan.blogspot.com/

२२. जनता की राय > janta ki ray http://janta-ki00ray.blogspot.com/

२३. देशासाठी -- these need fixing http://need-fixing.blogspot.com/

२४. आनन्दलोक -- कुसुमाग्रज की कविताएँ http://hindi-kusumagraj.blogspot.com/

२५. चरखा - चिंतन व प्रयोग http://charkha-system.blogspot.com/

२६. ये ये पावसा http://ye-ye-pawsa.blogspot.com/

२७. यशवंत सोनवणे http://sonavane-nashik.blogspot.com/

२८. प्रशासनाकडे वळून बघतांना http://prashasakeeylekh.blogspot.com/

२९. इथे विचारांना वाव आहे. http://marathi-lekh1.blogspot.com/

३०. मेरी प्रांतसाहबी http://my-prantsahebi.blogspot.com/

३१. समाज मनातील बिंब http://societal-reflections.blogspot.com/

“मेरी प्रांतसाहबी” ही हिंदी अनुदिनी त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीची ओळख करून देते. तिच्याबाबत माहितीही आपल्याला ह्या अनुदिनीत सापडते. प्रशासनसेवेत असतांना प्राकर्षाने जाणवलेल्या मंद दंड-प्रक्रिया, आरोग्यसुधारणा, ऊर्जासंवर्धन इत्यादी विषयावरले त्यांचे विचार ह्या अनुदिनीतील अनेक लेखांत वाचायला मिळतातच. शिवाय त्यांचे संस्कृतीविषयक लेखही यात आहेत. “संस्कृती अशी घडते” ह्या लेखात त्या म्हणतात, “'फिरन्तु' लोकांमुळे समाजाचं ज्ञान आणि विकासाची गति वाढते. ही बाब ज्यांच्या लक्षांत आली असेल त्यांनी अतिथी देवो भव ही कल्पना घालून दिली असेल आणि रुजवली असेल. जेणेकरून अशा फिरन्तु लोकांची योग्य ती सोय व्हावी. 'मा गृधः कस्यस्विद्धनम्'- दुसर्‍याने कमावलेल्या धनाची आस धरू नकोस किंवा 'सत्यमेव जयते नानृतं' - सत्याचाच विजय होईल - असत्याचा कदापि होणार नाही. अशा सारखी बीज वाक्य आपल्या उपनिषधामध्ये येण्यापूर्वी या विचारांचे किती मोठया प्रमाणात आणि किती मोठया काळापर्यंत मंथन झाले असेल त्याचा अंदाज घेणे कठीण आहे.” त्यांच्या अनुभवावर आधारित संस्कृतीच्या उदयाचा त्यांनी घेतलेला हा वेध वाचनीय आहे.

त्यांनी कुसुमाग्रजांच्या १०८ कवितांचा हिंदीत अनुवाद करून एक अत्यंत मौलिक काम केलेले आहे.

ह्या सर्व कविता http://hindi-kusumagraj.blogspot.com/ या अनुदिनीवर उपलब्ध आहेत. आपल्या समृद्ध मराठी कवितेला तेवढ्याच सशक्त हिंदी जाणकाराने हिंदीत न्यावे, ह्या सदिच्छेला त्यामुळे साकार होता आले आहे. साने गुरुजीच्या “बलसागर भारत होवो” चा सुरस हिंदी अनुवादही वाचनीय आहे. मात्र मला “खरा तो एकची धर्म” चा त्यांनी केलेला हिंदी अनुवाद विशेष आवडला.

याच अनुदिनीत “दंडो दमयतामस्मि, नीतिरस्मि जिगिषिताम्‌” विषद करतांना त्यांनी गीतेच्या विभूती योगाचेच रसग्रहण केलेले वाचता येते. “बेरोजगारीवर उत्तम उपाय- रेशीम उद्योग” या विषयावरला लेख उद्योजकतेस चालना देतो. “इथे विचारांना वाव आहे” या नियतकालीकांतील लोकप्रशासनात्मक लेखांवर आधारित पुस्तकाचीही इथेच ओळख करून दिलेली सापडते. “सत्यवचनाचे वैज्ञानिक तथ्य” हाही एक सुरेख लेख इथे वाचता येतो.

ही अनुदिनी म्हणजेच अशा एक ना अनेक सुरस साहित्यांचा खजिना आहे. हा मात्र केवळ परिचयच आहे. हा परिचय वाचून ती अनुदिनी मुळातच वाचावी असे आपल्याला वाटले, तर लिहिण्याचे सार्थक झाले असे समजता येईल. एवढेच लिहून ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरीच सुफळ संपूर्ण करतो.
.

Sunday, September 27, 2015

MM Karnik Patra



Friday, September 18, 2015

बालपणातील धरणगाव जडणघडण 2015 दिवाळी अंक


बालपणातील धरणगांव 

ते घर आता आमचे नाही. आता ते छोटू पाटीलने विकत घेतले आहे. त्याची आई आणि आजी निमंत्रण देऊन 
गेलेल्या आहेत -- ताई, एकदा घरी येऊन जा - घर अजूनही तुमचच आहे. मी  खूपदा माझ्या  जळगांव 
दौऱ्यांमधे धरणगांवला जाण्याचा वेळ काढते असे. चिंतामण मोरया, तहसील कचेरी, बस स्टॅण्ड -- पण घरी 
जात नव्हते. पुढची किती काम राहिलीत अस मनाला बजावून, आज तरी घरी जाण्याचा मोह सोड असा धाक देऊन, मी दुसरीकडे वळत होते. 

मग एक दिवस ठरवून वेळ काढला. छोटूला आधीपासून सांगाचयी कांय गरज - असं म्हणत कुणालाच सांगितले नाही. भाईसाहेबांच्या (काकांच्या) मुलांपैकी तेंव्हा फक्त शशीच धरणगांवला रहायचा. पण त्यानेही 
आता चिंतामण मोरया जवळ नवं घर बांधलेल होतं, तिकडेच रहायचा. आयत्या वेळी वाटल तर त्याला 
सांगायच, नाही तर एकटच जायचं असं ठरवून टाकलं. 

मोरयाच दर्शन घेऊन रिवाजा प्रमाणे त्या ओट्यावर पाच मिनिटं बसले -  - शशी आणि मीरा नेमके आजच बाहेरगांवी गेले होते. आता उठून ड्रायव्हरला सांगायच - तिकडे गांवात चलायचय बर आज ! 

आणि मनांत प्रचंड उलथापालथ झाली. अस वाटल की आता घरी जाऊन, सर्व घर पुन्हा एकदा नजरेत भरून घेतल्यासारख होणार नाही – ते निव्वळ पुढील काही काळासाठी शिदोरी म्हणून असणार नाही. आज घरी गेले तर परत निघतांना बहुतेक जुन्या सर्व आठवणी त्याच्या उंबरठयापाशी ठेऊन, रिक्त होऊन परतेन. ते दर्शन “पुनरागमनायच” असणार नाही. त्या भेटीनंतर घराशी असलेले भावनिक संबंध संपतील. आठवणी कायम रहातील पण त्रयस्थाप्रमाणे, फक्त वस्तुस्थितीदर्शक. तो अखेरचा निरोप ठरेल. 
मग मी घरी गेलेच नाही. मोरयावरूनच जळगांव गाठलं आणि रात्रीच्या गाडीने मुंबई ! म्हणून ते घर अजूनही माझंच आहे -  एक भेट होईपर्यंत तरी नक्कीच!
-------------------------------------------------------------------------------------

खूप जणांना बालपणातल्या अगदी लहान वयातल्या गोष्टी आठवतात. मला तेवढया नाही आठवत. आई सांगते - माझ्या वयाच्या दोन वर्षापर्यंत आम्ही लोणावळ्याला होतो - कैवल्यधाम इन्स्टिट्यूटमधे दादा (वडील) नोकरी करत. पण त्यांना डॉक्टरेट मिळाली आणि इन्स्टिट्यूटने आता तुम्ही जास्त चांगली नोकरी बघा असा निरोप दिला. 

मग आम्हीं धरणगांवी आजोबांकडे (नानांकडे) रहायला आलो. दादांनी अनुक्रमे खांडवा (मध्य प्रदेश), व्यारा (गुजरात) आणि जबलपुरला नोक-या धरल्या - असे वयाच्या सातव्या वर्षी मी जबलपुरला आले.तोपर्यंतचा बराच काळ धरणगांवी नानांकडे गेला.

व्यारा येथील घराला मातीच्या भिंती आणि मातीची जमीन होती आणि आई त्यांना बाईकडून शेणाने सारवून घ्यायची हे मला आठवतं. त्या तुलनेत धरणगांवला नानांच्या घरांत सर्वत्र फरशी होती - फक्त स्वैंपाकघर आणि मडक्याची खोली सोडून. घर उत्तर - दक्षिण असं होतं - एल या अक्षराच्या आडव्या रेघेसारखं, आणि उभ्या रेघेच्या जागी नानांचे धाकटे भाऊ अप्पा यांच घर होतं. त्यांच्याकडील बहुतेक खोल्या  मातीच्या होत्या. मोठ्या चुलत बहिणी सगळी जमीन शेणाने सारवत. लांब हात करून छान वर्तुळाकार आणि विविध नक्षींचे ते सारवणे असायचे. त्या नक्षी आणि तो वास मला खूप आवडायचा. चुलत बहिणींमुळे मला सडा घालणे, शेणाने सारवणे, येऊ लागले आणि रांगोळीची कलापण. म्हणूनच आजही शेण, माती, चिखल हे मला कचरा वाटतच नाहीत, उलट व्यवस्थित न वापरलेल्या प्लॅस्टिकचा मात्र खूप कचरा होतो. 

माझा आजी वडिलांच्या लहानपणीच वारली होती. दादांच्या काकूलाच सर्व मोठी आई म्हणत. खानदेशांत अशी नात्यांची जवळीक फार. दूरच्या भावाच्या मामाला देखील सर्व मामाच म्हणणार. माझी आई कोकणस्थ आहे, तिला फार पेच पडायचा नाती समजून घ्यायला. नात्यांच्या या प्रकारामुळे मोठ्या आईच्या माहेरचे, माझ्या काकूंच्या माहेरचे आणि आईच्याही माहेरचे असे सगळेच मामा मावश्या होत असत. त्यांत माझा कधी गोंधळ नाही झाला.

आसपासच्या मिळून एकूण सात घरांना अग्निहोत्री वाडा असे नांव होते, मात्र त्यापैकी एक घर पाटील यांचे व 
दुसरे एक सुतार यांचे होते. अप्पा आणि पाटीलांच्या कडील गाय, बैल, बकरी वगैरे सामाईक अंगणातच बांधली जात. त्यामुळे धारोष्ण दूध, सडा-सारवणासाठी हवे तेवढे शेण, गुरांची सोबत या गोष्टी रोजच्यातल्या होत्या. पाटीलांचा कुत्रा वाघ्या आमचाही लाडका होता. त्यांच्या घरी पूर्ण शाकाहार असे. महिन्या-दोन महिन्यातून आमची फेरी त्यांच्या शेतावर होई. भुईमूग, कापूस, हरभरा, ज्वारी ही पिकं नित्य परिचयाची झालेली. ज्वारीच्या तोट्यांपासून बैलगाडीसकट निरनिराळी खेळणी आम्ही करत असू. शिवाय पत्रावळी, द्रोण  बनवणं. बुरुड गल्लीत ते लोक दोऱ्या कसे वळतात, झाडणी, सूप, टोपल्या कसे बनवतात हे ही पहायला मोठ्यांपैकी कुणीतरी घेऊन जात. रोज गुराखी येऊन गाईंना चरायला नेत आणि संध्याकाळी घरी आणून सोडत. गावातील कामे सामाइकरीत्या कशी चालत त्याचा तो नमूना होता.

दादांच्या पडत्या काळातच आईने नागपूरच्या SNDT कॉलेजमधील सोईचा फायदा घेअन बाहेरून बीए करायचं 
ठरल. लग्नावेळी ती मॅट्रिक झालेली होती.पण तिला शिकायची इच्छा होती. या बाबतीत नानांचाही फार कटाक्ष होता -- तू हुशार आहेस तेंव्हा शिक्षण पुढे ने असे कायम प्रोत्साहन होते. बीए साठी चार वर्ष लागणार होती. 
परिक्षेपुरती दोन महीने नागपूरला होस्टेल मधे राहून अभ्यास करण्याची सोय होती. त्या काळांत मी नानांकडेच असायची. एका आतेचे दोन मुलगे शिक्षणाला त्यांच्या कडेच रहात. अधून मधून दुस-या आतेचा मुलगा पण 
येई.एकत्र कुटुंब-पद्धतीचा हा फायदा मी अनुभवला कि सोय असेल तिथे इतर कित्येक जण येऊन आपापला मार्ग प्रशस्त करून घेऊ शकत होते. त्याचवेळी माधुकरी हा प्रकारही मी जवळून पाहिला. नाना आणि अप्पा 
मिळून चार-पाच मुलांची माधुकरीची जबाबदारी उचलत. घरात शिजलेल्या स्वयंपाकातून पहिला त्यांचा वाटा बाजूला काढून ठेवत. आर्थिक परिस्थितीमिळे कुणाचे शिक्षण मागे राहू नये यासाठी केवढी मोठी सामाजिक 
जबाबदारी प्रत्येक कुटुंब पार पाडत असे!

काकांच्या घरात माझ्यापेक्षा मोठी माझी चार चुलत भावंडं होती. त्यामुळे माझा सर्व वेळ धुडगुस घालण्यातच जाई. मला शाळेत घालायची घाई कुणालाच नव्हती. मात्र आईने मला अक्षर-ओळख, पाढे, लिहायला वाचायला आवर्जून शिकवले. तर नानांचा सपाटा असायचा सर्व पोरासोरांना तोंडी गणितं घालण्याचा. इतर मोठया भावडांना गांगरायला होत असतानाच मी मात्र पटापट तोंडी गणितं सोडवत असे. त्यामुळे मी नानांची लाडकी नात होते. त्यांनी मला अगदी लहान वयांत भूमिती पण शिकवली होती . 

धरणागांव हे त्या पंचक्रोशीतील मोठं गांव- ते व्यापाराच ठिकाण होत. गांवाला म्युनिसिपाल्टी होती आणि बरेच रस्ते सीमेंट कांक्रीटंचे होते. फरशांनी व्यवस्थित बांधून काढलेला मोठा बाजार होता - त्याला कोट म्हणत. लांब गिरणा नदीवर धरण बांघलेलं होत. गांवात पोस्ट ऑफिस, तार ऑफिस आणि हायस्कुल होत. शिवाय भुसावळ - सूरत लाईन वर धावणारी एक्सप्रेस गाडी देखील धरणगांवी थांबायची - इतकं ते मोठं होतं. ते गाव होत पण खेडं नव्हतं -- तरी पण गांवाला पिण्याच्या पाण्याची पर्मनंट सोय नाही म्हणून ब्रिटिशांनी तालुका ठिकाणासाठी एरंडोल या तुलनेने अत्यंत लहान गांवाची निवड केली होती. याची खंत सर्व गांवकरी बाळगून होते. अगदी अलीकडे म्हणजे सन् 2000 च्या आसपास  धरणगांव हा वेगळा तालुका करण्यांत येऊन धरणगांवी मामलेदार कचेरी आली तेंव्हा आता खंत संपली अस दादांनी बोलून दाखवलं. धरणगांवच्या मानाने एरंडोल व इतर गांवे खूप छोटी वाटत. तिकडल्या नातेवाईकांकडे गेल्यावर मनोमन मला धरणगावात सिमेंटचे रस्ते, हायस्कूल रेलवे स्टेशन, पोस्ट-तार ऑफिस असण्याचा अभिमान वाटायचा. पण पुढे जबलपुर आणि मुंबई पाहिल्यानंतर शहर -गांव-खेडं ही उतरंड मला समजू लागली. 

धरणगांवी माझी मोठया चुलत बहिणींबरोबर संध्याकाळी फिरायला जायची ठिकाणं म्हणजे राममंदिर, विट्ठल मंदिर - हे रोजचे. शिवाय कधी लांब जायचे ठरले तर बालाजीनानांचे मंदिर किंवा उलटया दिशेला चिंतामण मोरया ! बालाजी नानांचे मंदिरही विट्ठलाचेच होते पण त्यांच्या मागच्या अंगणात एक मोठा रथ अणि कृष्ण व पाचही पांडवांच्या पूर्णाकृती मातीच्या मूर्ती होत्या. दस-याला त्या रथांत पांडवांना बसवून रथयात्रा निघायची. त्या मंदिरात जाण्याच मुख्य आकर्षण ते रथ आणि मूर्ती हेच होते. या शिवाय चुलत भावा-बहिणींबरोबर कोटावर बाजाराला जाणे, पोस्टात जाणे, दळण आणायला गिरणीवर जाणे हे कमी प्रतीचे उद्योगही होते. मोठा उद्योग होता तो म्हणजे दुकानावर जाण्याचा. 

नाना पंचक्रोशीत हुषार म्हणून नांवाजले होते. त्यांच्या काळांत म्हणजे 1890 च्या आसपास कधीतरी ते व्हर्नाक्युलर फायनल (म्हणजे सातवी) ही त्या काळातली मानाची परीक्षा पास होऊन शाळेत गणिताचे शिक्षक म्हणून नोकरीला लागले होते. पण स्वतःपुरती नोकरी न करता  संपूर्ण कुटुंबासाठी असेल असे कांही तरी कर असे त्यांच्या वडिलांनी सांगितल्यावरून त्यांनी शाळेची नोकरी सोडली आणि गांवाच्या अगदी एका टोकाला लाकडाचे दुकान काढले. त्यांचे पाहून कांही मुसलमान मंडळींनी देखील त्याच परिसरांत लाकडाची दुकाने, सॉ-मिल इत्यादी काढल्या. त्या आठदहा मुसलमान कुटुंबांच्या बरोबर नानांचा चांगला घरोबा होता. दुकानावर अर्थातच धाकट्या भावाला पण घेतले. दुकानाचे सामान निवडण्यासाठी नाना गुजरातच कांय तर पार कलकत्त्यापर्यंत जाऊन आलेले होते . ते मराठी खेरीज गुजराती, आहिराणी  पण छान बोलत. आजी लौकर 
वारली पण स्वतःच्या चारही मुलांचा  सांभाळ त्यांनीच केला. त्यांना कीर्तनाचा छंद होता. गांवात विणकर समाज (साळी समाज) खूप मोठा होता. हातमागावरच लुगडी, धोतरं आणि सतरंज्या उत्तम प्रतीच्या तयार होत असत. अशा त्या साळी समाजान नाना व बालाजी नाना मिळून कीर्तन करीत असत. हा साळी समाजही बहुतांशी शाकाहारी होता. खूप पुढे बिहारमधे गेल्यावर तिथे या तुलनेने मांसाहार जास्तच दिसायचा. यातील सर्व कारणांमधे महाराष्ट्रातील पंढरपुर वारी हे ही एक कारण होते हे मोठेपणी जाणवले. साळी समाजात पूर्ण श्रावणभर नाना आणि बालाजीनाना कीर्तन करीत. नाना वारल्यानंतर ती जबाबदारी दादांनी उचलली आणि दर उन्हाळ्याच्या सुट्टीत साळी समाजासाठी महिनाभर ज्ञानेश्वरीचे विवेचन करीत ते थेट १९९९ पर्यंत. कीर्तने, पारायणे, भागवत-पाठ, देवीचा जागर इत्यादि सामूहिक कार्यक्रमांनी सबंध भारतभर समाजातील मूल्ये टिकवून ठेवली, पण आता आधुनिकतेच्या नावाखाली आपण तेी समाजमूल्य आणि ते कार्यक्रम या दोघांना हरवत चाललो आहोत असे वाटते.  

आमच घर तसं बरच मोठ. घराच्या पश्चिमेला रस्ता होता. त्या बाजूच्या खोल्या बहुधा अडगळीचे सामान ठेवण्यासाठी वापरत. मात्र उन्हाळयांत तिथे अंबांच्या राशी येऊन पडत आणी गवताच्या गंजीत ते आंबे झाकून 
ठेवले जात पिकण्यासाठी. त्या मोसमांत माझा आवडता उद्योग असायचा गंजीतून पिकलेले आंबे शोधून 
खाणं. ही परवानगी फक्त मला होती, आते-भावांना, चुलतभावांना नव्हती. त्यामुळे मी लहानपणी मनसोक्त आंबे खाल्लेले आहेत -- ते सुद्धा विविध जातींचे. घरांत रोज आमरस-पोळीचे जेवण असे. पण मला आंब्याचा 
रस खाणे - तोही दूध-तूप-साखर इत्यादी घालून खाणे हा प्रकार कधीच आवडला नाही. कदाचित म्हणूनही मला हवे तेवढे आंबे खायला परवानगी होती. त्या आंब्यांमधे शापू आंबे हा ही एक प्रकार असे. म्हणजे काही 
आंब्यांच्या झाडांवर कुठून तरी शापूचे गुणजनुक चिकटतात आणि त्या झाडाच्या आंब्यांना शापूची वास येऊ लागतो. खूप जणांना हा वास आवडत नाही, मला मात्र आवडत असे. त्याकाळी आमच्याकडे नित्यनेमाने आंबे विकणारी भागाबाई येत असे. तिने भरलेले आंबे कधी शापू असले तर हमखास गिऱ्हाइक कोण हे तिला माहीत 
असे. खूप नंतर मला श्री रणदिवे या आंबातज्ज्ञांनी सांगितले कि शापूची चव हमखास आंब्यात उतरेल असे 
प्रयोग त्यांना करायचे आहेत कारण त्यामुळे आंब्याची चव स्टॅण्डर्डाइज करता येईल आणि एक्सपोर्टसाठी ते 
अनुकूल ठरेल. एकूण काय तर तऱ्हेतऱ्हेचे आंबे आवडीने खाणे हा मला धरणगांवने शिकवलेला गुण. एरवी खूपजण हापूस शिवाय इतर आंबा खाऊच शकत नाहीत.

नानांची एक मजेदार आठवण आई सांगते. माझा जन्म आमच्या घरांतच झाला. सकाळीच पोटात काही तरी वेगळ वाटतय म्हणून देवघराची मोठी खोली रिकामी करून तयार करून ठेवली होती. बाळंतपण करण्यासाठी माझी आत्या अणि सुईण होत्या. दुपारी नाना जेवायल घरी आले - तो पर्यंत माझा जन्म झालेला. मुलगी झाली म्हणून जरा हिरमुसले होऊन ते लौकरच दुकानात परत गेले. सायंकाळी दोन तरुण मुले त्यांच्याकडे आली. कधीकाळी त्यांच्या वडिलांनी नानांकडून कर्ज घेतले होते आणि नानांनी त्याची आशा सोडून दिली होती. पण 
त्या शेतकऱ्याने मरतांना मुलांना सांगून ठेवले - ``अरे, त्या सज्जन माणसाचे कर्ज वुडवू नका ``. म्हणून वडिलांचे सर्व कार्य पार पाडल्यावर सर्वात आधी ते दोघे भाऊ नानांकडे दोन हजार रूपये परत देण्यासाठी आले होते. मग नानांचा मूड एकदमच पालटला. लगेच सोनाराकडून माझ्यासाठी गळ्यातली सोनसाखळी घेऊन व 
मिठाई घेऊन पहिली बेटी, धनाची पेटी म्हणत घरी आले. गंमत म्हणजे माझ्या वाढदिवसाला पुष्कळदा असे 
घडते की कुठले तरी जुने येणे- मग कधी ते अगदी किरकोळी असेल - पण माझ्या वडिलांना मिळत राहिलेले 
आहे. मी लाडकी नात असण्याच एक हे कारणही असेल. 

माझ्या लहानपणी दुकानावर नाना, अप्पा किंवा अप्पांची दोघं मुले - भाईसाहेब काका आणि बाळकाका ही असत. त्यांचा दुपारचा जेवणाचा डबा तयार करून घरून पाठवला जाई -तो बहुधा मी व चुलत भाऊ अनिल असे दोघे घेऊन जात असू. दुपारच्या उन्हांत पाय भाजायचे म्हणून आम्हीं अगदी पळत जात असू. त्या काळांत मुलांना चपला वगैरे चंगळ नसायची. जाता येता पोस्टात जाऊन टपालही आणत असू -- तिथले पोस्टमास्तर तार कशी करावी-- वजन कसे करावे इत्यादी दाखवत असत. तीच तऱ्हा रेलवे स्टेशनवरही होती. हा घरोबाही 
आता हरवत चालला आहे. एव्हाना दुकानाची वाढ होऊन तिथे फरशी आणि इतरही सामान ठेवले जाऊ लागले 
होते. पुढे दादांना जबलपुरची बरी नोकरी मिळाल्यावर नानांनी दुकानाचे सर्व व्यवहार भावाच्या नावावर केले, 
पण आमचे दुकानावर येणे जाणे मात्र कायम राहिले.

नाना व अप्पांच्या दोन घरांच्या मधल्या जागेत सामाईक मोरी आणि मोठी विहिर होती. विहीरीवर तीन रहाट होते. एक आमच्या सामाईक मोरीतील होता. दुसरा रहाट नानांच्या चुलत भावाचा होता आणि तिसरा सार्वजनिक -- गांवासाठी ठेवलेला होता. हे पण मी शिकलेले एक मूल्य. विहीर जरी नानांनी खणलेली होती तरी पाण्याचा एक भागात सर्व गावासाठी होता.  तिथे सकाळ संध्याकाळ गांवच्या सासुरवाशिणी, माहेरवाशिणींची 
बरीच गर्दी असाचयी. आई, काकू, सगळ्या आत्या यांची सगळ्यांशी ओळख आणि मैत्री असे. मी पण लहान 
वयातच रहाटावर पाणी काढायला शिकले.  शिवाय दुकानांत जाताना वाटेत एक मोट लागत असे. तिथे थांबून पाणी काढणारे बैल पहाणे हा आमचा आवडता छंद होता. पुढे माझ्या मुलांना आणि भाचरांना ते धरणगावी 
आल्यावर मी आणि आई आवर्जून हे सर्व उद्योग शिकवीत राहीलो. त्यामुळे ग्रामीण आयुष्याचा थोडाफार लळा त्यांनाही लागलाच.

आमच्या घरून बाहेर पडले की लगेचच मोठा रस्ता येई तो पिठाची गिरणी, पोस्ट ऑफिस, हायस्कूल वरून बस स्टॅण्डवर जाई. त्याच्या दुतर्फा इतर मोठी दुकानं होती. मग एक मोठा कमानीचा दरवाजा होता व त्या पलीकडे आठवडा बाजारासाठी विस्तृत मैदान. कमानीवर सुभाषचंद्र बोसांचे मोठे चित्र होते व दरवाज्याचे नांवही सुभाष दरवाजा होते. शिवाय गांवात एक जुनी पडकी इमारत होती व ते घर म्हणजे झांशीच्या राणीचे आजोळ असं लोक सांगत. खरं-खोट्याची पडताळणी अजून झालेली नाही. पण एवढं मात्र खरं की त्यामुळे झाशीची राणी व सुभाष हे माझे पहिले बालपणाचे हीरो होते. असा समृद्ध वारसा असूनही आपण तो जपत नाही -- पुढील पिढीला शिकवतही नाही याची खंत वाटते. फक्त चारपाचशे वर्षांचा युरोपियन संस्कृतीचा इतिहास. पण अगदी छोटीशी सांस्कृतिक विरासतही ते लोक जपून ठेवतात. तिच्या अवती-भोवती म्यूझियम, स्मृती-वन, ग्रंथशाळा, इत्यादि वास्तू उभारतात -- ते एक पर्यटन-केंद्र बनून गांवासाठी व्यवसाय पुरवते.

खानदेशांत त्या काळी धाव्याची घरे असायची. म्हणजे असे की घरांच्या भिंती बहुधा माती किंवा विटा-चुनांच्या असत. त्यांच्यावर कांक्रीटचे छप्पर कसे चालणार? पण इतरत्र असतात तसे कौलाचे छप्पर देखील नसे. त्याऐवजी चटया व लाकडी वासे घालून त्यांच्यावर खारी मातीचे थर टाकीत. खानदेशांत सर्वत्र तापी नदीच्या गाळांत येणारी माती ही चिकण माती किंवा खारी म्हणून ओळखली जाते. तिचे थर टाकले की पाणी खाली झिरपत नाही, तर त्या मातीवरून वाहून जाते. भिंतीच्या बरोबर वर एक फूट रुंद आणि एक-दीड फूट उंच अशी परोटी बांधली जायची. धाब्यामधेच मोठी चौकोनी जागा मोकळी सोडली असे त्यांना धारं म्हणतात त्यातून सूर्यप्रकाश खाली घरात जाई. पाऊस आला की शिडीने धाब्यावर चढून सर्व धारी त्यांच्या पत्राच्या झाकणांनी बंद करण्यासाठी एकच धांदल उडे. गांवातील बरीचशी धाबी एकमेकांना चिकटून असत. त्यांच्या वरून कुठेही 
जाण्यास लहान मुलांना मज्जाव नव्हता. खानदेशांत पर्जन्यमान खूप नाही, तसेच वर्षातील आठ महिने तरी कोरडेच त्यामुळे धाब्याची घरे हा सर्वांत स्वस्त पर्याय चालतो. खारी टाकायची असेल तेंव्हा ज्या घरांत खारी 
येईल त्यांच्या आसपासची सर्वजण मिळून खारी उतरवून घेऊन ती धाब्यावर टाकत-- तुझे काम मी का करू हा भाव नसे. हाच प्रकार उन्हाळ्यातील बायकांच्या बेगमीच्या कामाबाबत. ज्या घरी वर्षभरासाठी पापड, शेवया, कुरडया करायचे असतील तिथून सकाळी-सकाळी निमंत्रण येई. मग इतर बायकांनी आपापले पोळपाट-लाटणे 
वगैरे घेऊन त्या घरातील बायकांच्या मदतीला जायचे. लहान मुलांना तर अशा वेळी खूप कामे असायची. शेवये हातावर पेलून वाळत घालणे, पापड वाळत टाकणे, लाटून देणे आणि मनमुराद लाट्या खाणे. या सर्व प्रिझर्व्हेटिव्ह न घातलेल्या, वेगवेगळ्या घराची वेगवेगळी चव असलेल्या साठवणींच्या पदार्थांची चव ही मला अजूनही पर्वणीच वाटते. ही खाद्यसंस्कृतीही आपण विसरत चाललो आहोत. खरे तर "" पापड-शेवया 
घालण्याचा  सीझन """ असाही आपला एक पर्यटन-सीझन असू शकतो -- हल्ली हुरड्याचा सीझन झाला आहे 
तसाच. 

जबलपुरनंतर दोनच वर्षांत दादांना बिहार सरकारच्या प्रथितयश मिथिला संस्कृत रिसर्च इन्स्टिट्यूट मधे 
प्रोफेसरशिप मिळाली. त्याच वेळी नानांचे निधन झाले. तोवर आम्हीं तिघे भावंडं होतो. उन्हाळ्याची मोठी सुटी असायची. त्यांमुळे दरवर्षी सुटीत आम्ही धरणगावी येत असू. इथल्या शाळेतही मी चुलत भावंडांसोबत जात असे. त्यामुळे हे ही धडे पक्के होत असत. अशाप्रकारे आम्हा तिघांना मराठी व हिंदी दोन्ही भाषा उत्तम येऊ लागल्या. मुख्य म्हणजे वेगवेगळ्या प्रांतांची वेगळी संस्कृति, वेगळा इतिहास आणि तरीही सांस्कृतिक 
जवळीक मला दिसली आणि भावली. धरणगांवी आल्यावर धुळे, अंमळनेर, चालीसगांव, चोपडा आदि ठिकाणी नातेवाईकांकडे फिरणे होई. मनुदेवी, पद्मालय,  उनपदेवचे गरम झरे आणि खुद्द धरणगांवचा चिंतामण मोरया, इथे नेहमी जाणेयेणे होई. मुंबई आणि आईचे माहेर--कोकणातले देवरुख इथेही फेऱ्या होत असत. शिक्षणानंतर मी भारतीय प्रशासन सेवेत आले व मला केडरही महाराष्ट्रच मिळाले, त्यामुळे धरणगांवचे ऋणानुबंध कधी संपलेच नाहीत, संपूही नयेत.

मात्र इतक्या वर्षांमधे धरणगावात काही बदल निश्चितच झाले आहेत. इथला विणकर समाज आपले कौशल्य व त्यातून मिळणारी उपजीविका दोन्ही हरवून बसला आहे. विकेंद्रित एकॉनॉमीची जागा सेंट्रलाइज्ड एकॉनॉमीने घेतली आहे. त्यामुळे भांडवली गुंतवणूकीसाठी मोठे आर्थिक पाठबळ असलेल्यांपुरता जिनिंगचा व्यवसाय वाढला आहे. सुभाष दरवाजा कधीच मोडीत निघाला आणि आता इतर पुतळे असले तरी पुन्हा कोणी सुभाषचंद्र बोसांची आठवण ठेवलेली नाही. गावात हायस्कूल सोबत दोन कॉलेजेस आहेत पण बेरोजगारी आणि बकालपणाही खूप आलेला आहे. रस्ते जसजसे खराब होत गेले तसतशी निगा राखलेली नाही. खानदेशातील जवळपास सगळ्याच गांवांची हीच स्थिती आहे. तरीही खानदेशी मातीत एक प्रकारची जिद्द, टिकाऊपणा आणि आदरातिथ्य आहे, असे मला वाटते. त्यामुळे अचानक या सुरवंटाचे फुलपाखरू होऊ शकते.

मला धरणगांवची एक आठवण आवर्जून नमूद करावीशी वाटते. कॉलेजात असताना सर्वांचे धरणगावी येण्याचे 
तिकिट काढलेले आणि माझी परीक्षा अचानक पुढे ढकलली गेली. एव्हाना मला रेलवेने एकटीने लांबचा प्रवास करण्याची सवय झालेली होती म्हणून बाकी सर्व मंडळी धरणगावी आली.   मी मैत्रिणीकडे राहून परीक्षा आटोपून यायचे असे ठरले. आम्हाला भुसावळ किंवा जळगावला गाडी बदलावी लागत असे. जळगांव येण्याची वेळ सकाळी पाच आणि पुढे धरणगांवची गाडी सात वाजता -- त्यामुळे मी घरी यायला आठ तरी होणार हा सर्वांचा हिशोब. पण रात्री मी चुकून भुसावळलाच उतरले आणि समोरच भुसावळ-सूरत फास्ट लागली होती ती पकडून पाच वाजताच मी धरणगांव स्टेशनवर उतरले. अंधारी रात्र. पण कोटावर जाणारी दोघ -तिघ होती त्यांच्या सोबतीने मी तशा आंधारातच घरी पोचले देखील -- आणि अचानक मला जाणवले -- या गावात आपण कधीही कुठेही बिनदिक्कत जाऊ-येऊ शकतो -- जणू सगळा गांव हे  माझ्या घराचे आंगणच. गॉन विथ दी विण्ड या कादंबरीतील नायिका म्हणते की कधीही संकट आले की आपल्या जन्मगावी येऊन तिला स्वस्थता लाभे आणि मार्गही दिसे -- तशीच माझीही अवस्था धरणगावच्या बाबतीत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------



















Monday, November 3, 2014

छोट्या छोट्या सुधारणा -- स्त्रग्धरा दिवाळी अंक -- 2000


छोट्या छोट्या सुधारणा

स्त्रग्धरा दिवाळी अंक -- 2000
लीना मेहेंदळे

     महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे १० कोटी आहे. त्यापैकी १ कोटी मुंबईत आहे. सुमारे ६ कोटी लोकवस्ती शहरांत आणी ४ कोटी खेडोपाड्यांत आहे. भारत जरी खेड्यापाड्यांचा देश असला तरी महाराष्ट्रात मात्र झपाट्याने शहरीकरण होत आहे.

     महाराष्ट्र शासनाचा कारभार चालवणा-या प्रशासन यंत्रणेत अधिकारी व कर्मचारी मिळून साडे सहा लाख व्यक्ति आहेत. या शिवाय इतर शासकीय उपक्रम उदा. कार्पोरेशन्स किंवा इन्स्टिट्यूट इत्यादि मधून तीन लाखांच्या आसपास व्यक्ति आहेत. जिल्हा परिषदा व म्युनिसिपल बॉडीज मधील कर्मचा-यांची संख्या देखील प्रत्येकी तीन- तीन लाख आहे. या शिवाय सर्व शाळांच्या, मग त्या सरकारी असोत अगर खाजगी, सर्व शिक्षकांच्या पगाराची रक्कम त्या त्या संस्थेला अनुदान स्वरूपाने दिली जाते. अशा शिक्षकांची संख्या देखील सहा लाखांच्या वर आहे. ही सखोल आकडेवारी देण्याची गरज अशी की इतक्या लोकांचे पगार जनतेच्या खिशातून दिले जातात- म्हणजे सुमारे वीस- बावीस लाख लोकांचे. त्यामुळे सामान्य जनांना या सर्व यंत्रणेकडून कशी वागणूक मिळते, जनतेची काम किती लौकर किंवा उशीरा होतात हा त्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न तर आहेच पण अधिकारवाणीने विचारण्यासारखाही आहे.

     ज्या गतीने लोकसंख्या वाढते त्यापेक्षा कितीतरी जास्त वेगाने सरकारी- दरबारी करावी लागणारी कामे वाढतात. तिथे एकास एक हे प्रमाण चालत नाही. या उलट लोकसंखेच्या गतीने  शासकीय कर्मचा-यांशी संख्या वाढवता येत नाही. कारण त्यांच्यावर होणारा खर्च बाजार भावाच्या तुलनेने जास्त असतो. दुसरे कारण असे की प्रशासकीय यंत्रणा लोकसंख्येच्या गतीने वाढवायची की त्याही पेक्षा जास्त गतीने निर्माण होणा-या प्रश्नांच्या गतीने वाढवायची? कोणतेही उत्तर घ्या, अशी वाढवलेली यंत्रणा पुरेशी असणार नाही आणि परवडणार देखील नाही हे उघड आहे.

     यावर मला सुचलेला व मी वेळोवेळी वापरलेला उपाय असा की प्रशासकीय कामांच्या पध्दती बदलायच्या, कित्येक जुनाट झालेले नियमही बदलायचे, कांही गतिमान पध्दती आणायच्या, तरच प्रशासकीय कामांचा वेगाने उरक होऊ शकेल.

    सध्याची प्रशासकीय घडी इंग्रजांनी बसवली व सुमारे शंभर- दीडशे वर्षात ती व्यवस्थित बसली. त्यांच्या आधी महाराष्ट्रात शिवाजी  व पेशवेकालीन राज्यव्यवस्था होती. तसेच देशात इतरही त्यांच्या पुरत्या पध्दती व यंत्रणा होत्याच. पण त्यांची चर्चा इथे अप्रस्तुत आहे. इंग्रजांच्या पध्दतीत कितीतरी गुण होते पण सगळ्यांत मोठा एक दोष असा होता की एका परकीय सत्तेने एतद्देशीयांवर हुकुमत गाजवण्यासाठी राववलेली ती यंत्रणा होती. नेटिव्ह लोकांवर अविश्वास ही त्या यंत्रणेतील एक पायाभूत बाब होती व नेटिव्ह यंत्रणेने इंग्रज राज्यकर्त्यांशी ईमान राखाव ही त्यांच्याकडून अपेक्षा  होती. त्यामुळे स्टिक अॅण्ड कॅरेट नियम, डबल अकौंटिंग चा नियम, चेक्स अॅण्ड बॅलन्सचा नियम इत्यादि सध्याच्या मॅनेजमेंट शास्त्राच्या पुस्तकांतून कालवाह्य झालेले कित्येक सिध्दान्त त्या पध्दतीत लागू होते व आजही आहेत.

      प्रशासन किंवा मॅनेजमेंट हे एक गतिशील शास्त्र आहे. दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी घालून दिलेली चौकट आज जागोजागी तुटलेली, पिचलेली, न चालणारी दिसत असेल तर त्यांत आश्र्चर्य कांहीच नाही. अगदी सिमेंट कांक्रीटचा रस्ता बनवला आणि त्याला मेन्टेनन्सचा खर्च कांहीच नाही म्हणून आनंदात राहिलो तरी सुमारे चाळीस ते साठ वर्षानंतर त्याचे आयुष्यमान संपून त्याची नव्याने बांधणी करावी लागते. मुद्दा हा की यंत्रणा कुठलीही असो, तिची दरवर्षी डागडुजी, व रंगसफेदी करावी लागते, तसेच कांही काळानंतर ती स्क्रॅप करून तिची पुनर्बांधणी करावी लागते. स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षांत आपण ते केलेले नाही व तसे करू शकण्याची आपल्या आजच्या प्रशासनाची क्षमता आहे का यावरच एक प्रश्नचिह्न लागलेल आहे.

     तरीपण वेळोवेळी या यंत्रणेत लहान मोठे सुधार घडवून आणणे शक्य झालेले आहे. कांही सुधारणा कायमस्वरूपी झाल्या तर कांही तात्पुरत्या ठरल्या व त्या करणारे अधिकारी बदलून गेल्यानंतर पुढील आलेल्या अधिका-यांनी त्याच्याकडे विशेष लक्ष दिले नाही. तरी त्यांचे महत्व कमी होत नाही, कारण अशा झालेल्या
तात्पुरत्या सुधारणा देखील लगेचच बिघडून जात नाहीत- त्यालाही थोडा काळ लागतोच आणि त्याच काळांत एखादा चांगला अधिकारी मिळाला तर आणि त्याने तीच सुधारणा उचलून धरली तर तिची चांगली फळे लौकर मिळून जातात.

      अलीकडे संगणकामुळे कित्येक सुधारणा सोप्या आणी सहजशक्य झाल्या आहेत. ज्या अधिका-यांना संगणक कळला, (इथे येणे आणि कळणे या दोन गोष्टीत फरक समजून घेतला पाहिजे.) त्यांनी त्याचा नीट उपयोग करून घेतला. तरीही संगणक प्रणालीचा खरा उपयोग म्हणजे प्रशासन यंत्रणेतील संख्यिकी माहितीचटकट हाताळून त्यांच्या आधाराने प्रशासकीय चौकटीत योग्य ते बदल घडवणे. ते अजून कित्येकांना जमलेले नाही.

    संगणाकाचा उपयोग त्यांत एक महत्वाची खुबी आहे. या सुधारणेमुळे तयार केलेली नवी पध्दत संपूर्णपणे संगणकावर सोपवायची नसते, तर त्यापैकी वीस- एक टक्के पध्दत तरी माननीय यंत्रणेच्याच हातात ठेवायची असते. अशा संमिश्र हाताळणीचे कित्येक फायदे मला दिसून आलेले आहेत. पूर्णपणे संगणकीय पध्दत कित्येकदा अवाढव्य खर्चाची ठरते त्या ऐवजीसंमिश्र पध्दत कमी खर्चात भागते. जे कर्मचारी या पध्दतीपैकी वीस टक्के काम स्वतःच हाताळतात, त्यांचे संगणकीय ज्ञान व समजूत झपाट्याने वाढते. त्यांचा आदर्श घेऊन इतरही कर्मचारी पटकन संगणक शिकतात.

     संगणक पध्दत तयार करतांना मला आलेला दुसरा अनुभव देखील महत्वाचा आहे.   अशी पध्दत तयार करण्यासाठी बाहेरून तज्ज्ञ माणसे आणली की खान्यातील किचकचपणाची पुरेशी जाणीव त्यांना कधीच येऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या कार्य पध्दतीत हटकून चुका रहातात आणि त्या सुधारण्यासाठी खात्यातील जुनी जाणती मंडळी हतबळ ठरतात. उदाहरणार्थ वीज . बिलांचे संगणकीकरण झालेतेंव्हा निल- बिल हा प्रकार पण असतो हे प्रोग्राम तयार करणा-यांना माहीत नव्हते. त्यातून निर्माण झालेले घोळ आणि ग्राहकांना सोसावी लागलेली अडचण संपवायला कित्येक वर्ष लागली. अशीच कित्येक उदाहरणे देता येतील, जिथे संगणकाचे काम बाहेरून केल्यामुळे खात्यातली माणस निरूत्साही झाली.

     संगणकांचा वापर जगोजागी सुरू झाल्यानंतर अशीही एक समजूत पसरली की सरकारी सुधारणा म्हणजे संगणकाचा भरपूर वापर. ही समजूतही चुकीची आहे. कित्येक सुधारणा संगणकाशिवायच करायच्या असतात कारण तिथे मूळ प्रश्न प्रवृत्तीचा देखील असतो.

    मी सेटलमंट कम्शिनर असतानाची घटना. खात्यातील कित्येक कर्मचारी व अधिकारी निलंबित होते. या सर्वांना तीन महिन्यापुरतीच निलंबन - भच्याची आईर काढता येते- तीन महिन्यांनी पुनः दुसरी काढायची. प्रत्येक ऑर्डर साठी सेटलमेंट कमिश्नरचीच सही हवी.

    खर तीन महिने म्हणजे अगदी कॅलेंडर वर बोट ठेऊनच हवे कां? त्या ऐवजी एखादी ऑर्डर ९३ किंवा १०७ दिवसांसाठी नसू शकते कां? पण ते करायला कुणाही अधिका-याचा धीर होत नाही किंवा तसे सुचवायची कुणाही क्लार्क, किंवा डेस्क अधिका-याची जबाबदारी नाही. बरं, ऑर्डर कमी दिवसांची तरी असू शकते की नाही?

    प्रत्येक निलंबित कर्मचा-याची ऑर्डर वेगवेळ्या फाईल मधे वेगवेगळ्या दिवशी यायची. आपल्याकडे किती जण निलंबित आहेत अस विचारल तर कुणाला पटकन उत्तर सांगता यायच नाही. कामाची एकूण व्याप्ति किती हा अंदाज घेण्याची सवय नाही. त्याऐवजी येईल ती फाईल येईल तेंव्हा हाताळायची हा खाक्या. निलंबन आदेश ही एक बाब झाली. अशा कित्येक बाबींमधे कामाची हीच पध्दत सर्व सरकारी कार्यालयांमधून चालत असते.
    मी एक केल- प्रत्येक फाईल वर सही करतांना तो निलंबन भत्त्याचा आदेश एखाद्या महिन्याच्या अखेरीपर्यंत येईल अशा पध्दतीने त्याच्या तारखा दुरुस्त केल्या जेणेकरून पुढची आर्डर एक तारखेपासून असेल. डेस्क अधिका-यांना आदेश दिले की कोणतीही फाईल ठेवतांना त्या एक तारखेला एकूण किती आदेश निघायला हवे होते त्यांची यादी द्या व सर्वांचे आदेश एकत्र एकाच ऑर्डर मधे काढा. या पध्दतीमुळे तिथून पुढे आमचे निलंबन भत्त्याचे आदेश निघतांना एकाच आदेशाव्दारे कधी सात- आठ तर कधी पंधरा-वीस कर्मचा-यांचे आदेश एकत्र निघू लागले. यामुळे कामातला खर्ची पडणारा वेळ वाचून कार्यक्षमता वाढली - ती कशा कशा पध्दतीने?

      पहिली गोष्ट म्हणजे दिरंगाई टळली कारण प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला कुणाचे आदेश निघणे अपेक्षित होते ती यादी मला द्यावी लागत असे.
   
      प्रत्येक कर्मचा-यासाठी एक असे कित्येक आदेश टाईप करणे, तपासणे, आऊटवर्ड रजिस्टरला नोंदी घेणे ही कामे वाचली- त्या ऐवजी एकदाच टाईप करून काम भागले.

      ज्यांचे आदेश एकत्र निघत होते त्यांना त्यांची स्वतःची प्रत मिळाली नाही तर इतरांना विचारून आदेश निघाल्याची माहिती मिळत होती. या सर्वामुळे निलंबन भत्ता मिळाला नाही अशा तक्रारी देखील थांबल्या.

     तक्रारी अर्जांची एक गोष्ट असते. एक तक्रारी अर्ज आला की त्याची नोंद घेणे, त्याची फाईल हुडकणे, त्यावर वाचन व विचार करणे, त्यावर चौकशी करणे व जमल्यास निर्णय घेणे. त्यांना आधी पोच देणे व नंतर उत्तर देणे या सर्व प्रक्रियेसाठी एका तक्रारी अर्जामागे किमान पंधरा मनुष्य दिवस जातात. हा सर्व सरकारी कार्यालयांमधला अनुभव आहे. यात भरपूर वेळ जातो. पण म्हणून आलेला तक्रारी अर्ज केराच्या टोपलीत टाकणे हे त्याचे  उत्तर नसते. तरी कांही ठिकाणी हे केले जाते. याच उलट टोक म्हणजे कार्यालयात हे कितीss काम आहे अस म्हणून खूष होणारे लोक ही असतात कारण आपण खूप काम केले असे सांगता येते. पण जनतेच्या पैशाच्या दृष्टीने विचारल तर हा अपव्ययच असतो. त्याऐवजी तक्रारी थांबतील अशी काळजी घेतली तर वाचलेल्या वेळामधे कित्येक नवी, चांगली कामं होऊ शकतील. त्यासाठी बर सांगितल्याप्रमाणे गठ्ठा पध्दतीने कामे निपटायची युक्ति वापरता आली पाहिजे. त्या साठी सिस्टम मधे लागतील ते बदल केले पाहिजेत. या बदलांबाबत हाताखालच्या कर्मचा-यांच व अधिका-यांच प्रबोधन केल पाहिजे. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

     सन् १९७५ साली देशभरात कमाल शहरी जमीन धारणा संबंधी कायदा लागू झाला. त्यांत असे म्हटले होते की शहरी भागात ज्यांची जमीन असेल त्यांनी सर्वांनी स्वतःहून सरकारला आपल्या जमीनीची माहिती  द्यावी. ही माहिती ठराविक तारखेच्या आंत सरकारी कार्यालयात जमा न केल्यास शिक्षेची तरतूद होती. पुण्याच्या कार्याल्यांत खूप अर्ज येत होते . त्या वेळी तिथे करंदीकर नांवाचे अधिकारी होते. त्यांनी झटकन निर्णय घेतला की अर्ज स्वीकारतांना फक्त सिरीयल नंबर न टाकता त्याच्या मागे नावाचे आद्याक्षर देखील टाकायचे. हा निर्णय अगदी चटकन आणि वेळेत घेतलेला असा म्हणावा लागेल. पुढे चार-सहा वर्षाने मी त्या पोस्टवर गेले असता या निर्णयाचं महत्व लक्षात आल. (इतर मोठ्या शहरांत ही पध्दत नव्हती). कदाचित त्यावेळी तो निर्णय घेतला गेला नसता तर पुढे पुण्यामधल्या सुमारे पंधरा हजार केसेस मधे समोर आलेल्या माणसाची केस पटकन शोधणे कितीतरी कठिण गेल असत. त्या काळात संगणक नव्हते हे लक्षांत घेतल म्हणजे या निर्णयाचे महत्व कळत. अजूनही कित्येकदा संगणक नसले तरी असे कल्पक निर्णय घेण शक्य असत. पण अशी सिस्टम, किंवा घडी योग्य रीतिने बसावी म्हणून सगळेच अधिकारी जागरूक किंवा सक्षम असतातच असे नाही.

     मी पुण्याला कमाल शहरी जमीन धारणा कायद्याखाली अॅडिशनल कलेक्टर असतानीच गोष्ट.  ज्यांच्या केसचा निकाल लागलेला नसेल त्यांना जमीनीसंबंधी कोणताही व्यवहार किंवा बांधकाम करायला मज्जाव होता. केसचा निकाल कसा लावला जायचा? तर त्या त्या व्यक्तीने कायद्याच्या कलम ६ खाली अर्जात भरून दिलेली माहिती  महसुली यंत्रणेकडून तपासून घ्यायची. त्यापैकी जेवढी मर्यादित जमीन त्याच्या जवळ शिल्लक ठेवायला कायद्याची परवानगी आहे तेवढी नकाशावर दाखवायची. बाकी सरकार- जमा करायची. मात्र त्या आधी त्या व्यक्तीला नोटिस काढून, सूचना देऊन त्यांची कोणती जमीन सरकारजमा करणार त्याबद्दल त्यांच म्हणणं मांडायला परवानगी द्यायची. त्यासाठी ४५ दिवसांची मुदतही द्यावी लागायची. सरकारने ठरवल होत की ज्या केसेस मधे मोठमोठ्या जमीनी सरकारजमा होण्याची शक्यता असेल तीच प्रकरणे आधी करायची. या प्रमाणे मी येण्याआधीच अशा बारा- पंधराशे प्रकरणांची यादी तयार झालेली होती. मात्र यातील प्रत्येक संबंधित व्यक्ति वरपर्यंत पोचू शकत असल्याने  वकीलामार्फत किंवा अन्य उपायांने केस लांबणीवर टाकू शकत असे. प्रत्यक्ष एखाद्या दिवसभरांत जेमतेम दोन केसेसही निघायच्या नाहीत.

      ज्यांच्या जमीनी कमाल धारणेपेक्षा म्हणजे पुण्यासाठी हजार चौरस मीटर पेक्षा थोड्याच जास्त असतील, त्यांना थो सूट देण्याची सोय होती. याशिवाय कित्येक केसेस अशा होत्या जिथे सूट देऊनही थोडीच जमीन सरकार जमा होऊ शकणार होती. पण अशा सर्व केसेस मागे ठेवण्याबाबत तोंडी सूचना होत्या असे म्हणता येईल.

    एकदा मला एक म्हातारे सज्जन भेटायला आले. एव्हाना कायदा येऊन पाच वर्ष झाली होती व त्यांना रिटायर होऊनही तेवढाच काळ लोटला होता. त्यांनी मला विचारल- मी एक प्रामाणिक सरकारी अधिकारी होतो. कधी काळी एक प्लॉट घेऊन ठेवला होता. पण सैन्याच्या नोकरीमुळे घर बांधता आल नव्हत. निवृत्तीनंतर छोट घर बांधून स्वतःच्या घरात राहायची कल्पना होती. पण जमीन गेली- पाच वर्ष तुमच्याकडे अडकून आहे. नवीन बांधकामाला जमीन किंवा परवानगी मिळू शकत नसल्याने सर्वत्र भाड्याच्या घरांचे भाव भडकले आहेत. अशा परिस्थितीत मला अजून किती वर्ष माझी जमीन उपभोगायला मिळणार नाही हे कळू शकेल कां?

     या घटनेनंतर मी माझ्या ऑफिस पुरती प्रायोरिटी बदलली. ज्यांच्या जमीनी पटकन सुटू शकत होत्या त्याच केसेस आधी घेतल्या. पंचेचाळीस दिवस मुदतीची नोटिस दिली असेल तरी जमीन मालकाने स्वतःच मला एवढी मुदत नको, नोटिस मान्य आहे अस लिहून दिल तर, त्यांची सुनवाई आधी करायला घेतली. मोठ्या जमीनींची प्रकरण करून जास्तीत जास्त जमीन सरकार जमा का करत नाही असा वरिष्ठ अधिका-यांचा रोष होऊन त्यातील एकाने तर कान्फिडेन्शियल रिपोर्टला नोंद घेईन हे ही सांगितले व पुढे त्यांना करायचे तेच केले. पण लेखी आदेश मात्र दिले नाहीत. मी ही माझी प्रायोरिटी थांबवली नाही.

     या प्रकरणांत महत्वाची गोष्ट अशी की एक म्हातारे गृहस्थ पोटतिडकीने त्यांची अडचण सांगतात म्हणून त्यांच्यापुरती केस करून टाकून पुनः नेहमीच्या रूटिनवर येण शक्य होत. पण एका प्रकरणांतून जनरल प्रश्न लक्षांत आला आणि कित्येकांना तोच प्रश्न भेडसावत असला तर त्या संपूर्ण प्रश्नालाच हात घातला पाहिजे अशा भावनेने काम केले. सिस्टम मधे असले बदल अधिका-यांना करता आले नाहीत तर शेवटी लोकांचा त्रास वाढवणारच.

     त्याच काळांत या कायद्याचा फोलपणा, त्यातून लोकंना झालेला त्रास, निर्माण झालेली जमीन टंचाई आणि त्याचे फायदे उपटणारे कित्येक जण हे देखील समोर दिसत होते. ज्यांची पुष्कळ जमीन सरकारजमा होणार असूनही ज्यांनी सज्जनपणे कायद्याच्या उदिष्टाचा मान राखला त्यांची जमीन सरकारजमा झाली. या उलट जे जमीनीचे व्यापारी होते, सरकारी नियम धाब्यावर बसवून शेतीची जमीन बिगर शेतीकडे वळवत होते, अशांनी निरनिराळ्या उपायांनी स्वतःच्या जमीनीची सुटका करून घेतली. इतके असूनही हा कायदा रद्द करावा असा ठाम सल्ला मी शासनाला दिलेला नव्हता किंवा माझ्या माहितीत इतरही कुणी अधिका-याने आपणहून दिलेला नाही. अजूनही हा कायदा धड रद्द नाही आणि धड राबवला जात नाही अशाच अवस्थेत आहे. याच एक कारण लक्षात येत -- सरकारची कांही धोरण चुकत आहेत, अस जर अधिका-यांना प्रांजळपणे वाटत असेल तर त्यांनी याबद्दल सरकारला कळवाव, मंत्रालयात त्याबद्दल चर्चा घडवून आणावी, निदान चार- सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ग्रुपने हे मत ऐकून घ्याव, यासाठी कनिष्ठ अधिका-यांना प्रोत्साहन दिल जात नाही. फार फार तर त्याच खात्याचे सेक्रेटरी तोंडी चर्चेत ऐकून घेतात. तेही स्वतः तेवढे चौकस असले तरच.

      पण अशी सुधारणा किंवा चर्चेची सिस्टम बसवावी याची गरज कुणाला वाटते? पुढा-यांना, अधिका-यांना की ज्यांचे प्रश्न यामुळे लोकर सुटू शकणार आहेत त्या जनतेला? माझ्या मते कांही वैयक्तिक उदाहरणं सोडली तर कुणालाही नाही.

    पण सेटलमेंट कमिशनर असतानाच एक प्रयोग मी केला होता. दर महिन्याला आमच्या  सर्व चाळीस जिल्हा पातळीवरील अधिका-यांची बैठक होत असे. त्या मधे कुणी किती काम केल, किती उदिष्ट मागे राहिल, याच बरोबर खात्यांत कांही नव्या पध्दती आणण शक्या आहे का, कांही प्रश्न आहेत कां किंवा कांही सर्क्युलर्स काढावी कां अशी  चर्चा घडवून आणायला मी सुरुवात केली. मी अशीही पद्धत सुरु केली की या बैठकीला प्रत्येक विभागातून एक- दोन तालुका पातळीचे अधिकारी तर कांही हेड- क्लार्क पातळीचे अधिकारी पण बोलवायचे. यासाठी वर्षभराचे बैठकींचे दिवस आधीच ठरवून दिले. त्याचवेळी कोणत्या बैठकीला कोणत्या तालुक्यांचे कोण अधिकारी येतील हे पण ठरवून त्यांना वर्षारंभीच कळवून टाकले. या सभांमधे लक्षात आल की त्या आधी होणाऱ्या आमच्या चर्चेमधे कित्येक विषय वरवरच बोलले जायचे पण ही मंडळी बैठकांना येऊ लागल्यानंतर योजना राबवण्यामधल्या अडचणी ख-या कळू लागल्या. मला आठवत, आधी कधीतरी माझे एक घनिष्ठ सहकारी चीफ सेक्रेटरींचे खास अधिकारी नियुक्त झाले होते. तेंव्हा मंत्रालयातील कलेक्टर कान्फरन्स मधे कांही डेप्युटी कलेक्टर्स, कांही तहसिलदार या मंडळींना देखील बोलवाव अस मी सुचवल होत, व यावर आम्ही थोडी चर्चा केली होती. (पण ते झाल नाही.) नंतर मी नाशिक कमिशनर म्हणून नियुक्त झाले तेंव्हा मला या चर्चेचा विसर पडला होता त्यामुळे तिथल्या मीटींग्स मधे हे करता आल असत, तरीही केलं गेल नाही. पण त्यानंतर सेटलमेंट कमिशनर झाल्यावर ही पध्दत मी राबवली. म्हणूनच मला एका कार्यक्षम आय्. ए. एस् अधिका-याचे शब्द आठवतात- आपण सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असूनही कितीतरी संधी आपण वाया घालवत असतो.

      प्रशासनात डेलिगेशन ऑफ अॅथॉरिटी ही महत्वाची बाब आहे. कित्येक निर्णय खालच्या पातळीवर लौकर व जास्त सयुक्तिक पणे दिले जाऊ शकतात. पण आपण डेलिगेट केलेल्या अॅथॉरिटीच्या अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही हे मॉनिटरिंगच तंत्र ब-याच अधिका-यांना जमत नाही. मॉनिटरिंग साठी मागवली जाणारी माहिती कशी असावी? माझा नियम असा की ती शक्यतो एकाच पानात मावणारी, सात-आठ अधिकाऱ्यांची किंवा सात- आठ भौगोलिक क्षेत्रांची एकाच वेळी तुलना करू शकणारी व एका दृष्टिक्षेपातच वरिष्ठ अधिकारी खालील अंमलबजावणी मधे झालेल्या चुका ओळखू शकेल अशी असावी. या साठी मॉनिटरिंगचे फॉर्म काळजीपूर्वक ठरवले पाहिजेत. त्याचबरोबर वरिष्ठ अधिका-याला नेमक माहीत असल पाहिजे की खालील पातळीवर चुका कुठे आणि कशा पध्दतीने होतात आणि मॉनिटरिंगच्या रिपोर्ट मधे या चुका आपोआप उठून दिसण्यासाठी रिपोर्टचे डिझाईन नेमके कसे करायचे?

     याचा नमुना म्हणून नाशिकचे उदाहरण घेता येईल. प्रत्येक तहसिलदार ऑफिसची ऑडिट तपासणी सरकारच्या ऑडिट पथका कडून व्हावी लागते. पण हे पथक एका वर्षात कांही मोजक्या तालुक्यांनाच भेटी देऊ शकत. मग फक्त तिथलेच गोंधळ उघडकीला येतात.

    मी कमिशनर असतांना एकपानी चार्ट करवून घेतला. त्यांत उभ्या आडव्या रेघा आखून खण पाडले. उभ्या कॉलम्समधे १९७५ ते १९९५ ही वीस वर्ष तर आडव्या ओळींमधे मधे एकेका तालुक्याच नांव. प्रत्येक तालुक्याच्या पुढे ज्या त्या वर्षी तपासणी पथक तिथे गेले नसले तर फुली मारायची आणि गेले असले तर त्यांनी किती शक काढले होते ती संख्या लिहायची. हा मास्टर चार्ट एका जिल्ह्याची पूर्ण माहिती एका पानावर देवू शकत होता. त्यावरून तत्क्षणी दिसून यायच की काही तालुक्यात कुठे पंधरा तर कुठे दहा वर्षांत तपासणी पथक गेलेलच नव्हत. त्यामुळे त्यांना त्या तालुक्यांना जायचे आदेश देता आले. पुढे कलेक्टरच्या मीटींगला आम्ही मास्टर चार्ट  वरून विचारू लागलो- अमक्या वर्षी काढलेले (इतके जुने!) शक कधी पूर्तता करणार? इत्यादि! तसेच कित्येक शक एक सारखेच म्हणजे तोच शक वेगवेगळ्या तालुक्यांत किंवा एकच शक सतत दोन- तीन वेळा निघालेला असे. अशा वेळी त्या सर्व  शकांसाठी एकच वेगळी फाईल बनवून प्रत्येक ठिकाणी त्याची पूर्तता करून घेऊन पुनः त्या चुका भविष्यांत होऊ नयेत यासाठी सूचना देता येणे शक्य झाले.

     खरीप हंगामात प्रत्येक कलेक्टर कडून दर आठवड्याला शासनाला पीक पहाणी अहवाल पाठवला जातो. हा तालुकावार असतो. त्यामधे जून-जुलैत तालुक्यांत त्या आठवड्यांत किती पाऊस झाला, किती क्षेत्रात पेरण्या झाल्या, कालांतराने उगवण कशी झाली, पिकांची वाढ कशी आहे, मधेच कांही नैसर्गिक संकट आल तर त्यामुळे किती क्षेत्रातील पिकांना धोका किंवा नुकसान झाला, वगैरे करत शेवटी ऑक्टोबरमधे कापणी किती झाल्या, पीक कसे आले इथपर्यंत वर्णन असते. त्यानंतर रबी मोसमासाठीही नोव्हेंबर ते मार्च असेच अहवाल जातात.

      या विषयाची फाईल अत्यंत जाडजूड व वजनदार असते. संबंधित क्लार्क दर तालुक्याचे एक पान या प्रमाणे पंधराएक पानी अहवाल, त्या सोबत शासनाला कव्हरिंग लेटर, अस सर्व तयार करून मधल्या एक किंवा दोन अधिका-यांमार्फत कलेक्टरला सादर करतात. कलेक्टर साधारणपणे फक्त कव्हरिंग लेटर वाचून आपण शासनाकडे कोणत्या आठवड्याचा अहवाल पाठवत आहोत, आणि त्यांत आपण फार उशीर केला नाही ना एवढे तपासतात आणि सह्या करतात. मग ते जाडजूड पाकीट शासनाकडे रवाना होत.

     मी सांगलीला कलेक्टर म्हणून रूजू झाल्यावर या फाइलीवर सही करतांना लक्षात आल की इतकी पानं वाचायला कलेक्टरला कुठे वेळ असतो? म्हणून चार्टवर उभे- आडवे कॉलम पाहून त्यांत एकाच पानावर सर्व  तालुक्यांची माहिती  मागवली. अशी एक पानी माहिती असल्यामुळे ती वाचली. आणी मी उडालेच. कारण फेब्रुवारीचा अहवाल सांगत होता की भाताच्या दुस-या लागण्या पूर्ण होऊन पिके सुस्थितीत आहेत ! म्हणजे कधीतरी ऑक्टोबर मधे गेलेले अहवाल तसेच पुढे चालू राहिले होते! तो पंधरा पानी अहवाल कदाचित मी देखील पानन् पान- आणि तेही दर आठवड्याला- वाचला नसता.

   त्यानंतर मी दोन सुधारण केल्या. मूळ अवजड फाईल सोबत एक पातळ फाईल तयार करायला लावली ज्यामधे फक्त दर आठवड्याचा एका पानी अहवाल एकावर एक ठेवला जाईल- जेणेकरून मला वाटेल त्या आठवड्याच्या अहवालाची व मागच्या अहवालांची तुलना फार वेळ न घालवता करता येईल. दुसर म्हणजे शासनाकडे अहवाल पाठवण बंद केल. मग मंत्रालयातून फोन येऊ लागले. आधी चिटणीसांकडे, मग प्लॅनिंग ऑफिसर कडे, मग अंडर सेक्रेटरीचा फोन माझ्या पी. ए. कडे! सगळ्यांना उत्तर एकच - कलेक्टरांनी अहवाल पाठवण बंद करायला सांगितल आहे. मग एक दिवस डेप्युटी सेक्रेटरींचा मला फोन आला- “तुमचे अहवाल कां येत नाहीत?”

       “कारण तुम्ही त्यांच कांय करता ते मला कळत नाही- किंवा अस म्हणू या कि तुम्हाला त्याची गरज कांय ते मला कळत नाही!” त्यांना कळेना की माझ्या अज्ञानाला कांय उत्तर द्यावे. पण मग मी त्यांना कारण सांगितल- तिथे तरी कुणी हे रिपोर्ट वाचतात कां? वाचले असते तर तुमच्या ध्यानांत आल असत की आम्ही ऑक्टोबरचेच रिपोर्ट तसेच नकल करुन पाठवतोय्?

     माझी शंका अजूनही कायम आहे- की मंत्रालयात जाणारे रिपोर्ट कुणी वाचत कां!
   
     मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन असा एक सिध्दान्त आहे- तो मला समजला तो असा की नियम करा- पण ते नियम सामान्यपणे ८०- ८५ टक्के घटनांची किंवा कामाचीच काळजी घेऊ शकतील. उरलेल्या १५ टक्क्यांच कांय? याला सरकारी उत्तर अस की उरलेल्यांना तुमचे काम सरकारी नियमांत बसत नाहीत अस सांगून मोकळ व्हा. पण चांगली मॅनेजमेंट ती, जी यापैकी निदान कांही परिस्थितींवर मात करू शकेल. याच एक उदाहरण म्हणजे महानगर टेलीफोन निगम ची दोष- सुधार- सेवा. आता आपण १९८ नंबरला फोन केला की पूर्वीप्रमाणे ऑपरेटर तक्रार ऐकत नाही, तर ती ठराविक प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून ती आपोआप रेकॉर्ड केली जाते. उदा.- खराब टेलीफोनचा नंबर डायल करा, मग “डायल टोन नसेल तर १ डायल करा, लाईन वर गोंगाट असेल तर ३ डायल करा, टेलिफोन सेट खराब असेल तर ५ डायल करा इतर दोष असेल तर ७ डायल करा!”

     यामधे समजा तुमचे पहिले तीन प्रकारचे बिघाड नसून इतर कांही असेल आणि तुम्ही ७ डायल केलत तर कांय होत?
     कांहीही नाही. कारण म. टे. निगम कडल्या ८० टक्के फोनच्या तक्रारी पहिल्या तीन प्रकारच्या असतात. त्यांची दुरुस्ती रुटिन कर्मचारी करू शकतात- आणि करतात. इतर प्रकारची तक्रार असेल (म्हणजे ७ डायल केलेली) तर टेलिफोन ऑपरेटर किंवा सुपरिटेंडंटने स्वतः लाइनवर यावे किंवा आपल्याकडे फोन करून कांय तक्रार आहे हे विचारावे अशी आपली अपेक्षा असते.
    पण अस कांही करायच असत किंवा करता येऊ शकत हे सरकार मधे माहीत नसत!

    मी सांगलीला असताना शासनाने मंत्रालयात नव्याने स्केअर्सिटी रिलीफ कमिशनर ही पोस्ट निर्माण केली व एका अति वरिष्ठ सेक्रेटरीची नेमणूक केली. आदल्या वर्षाची दुष्काळी परिस्थिती आणि धावाधाव लक्षात घेऊन त्यांनी असा नियम काढला की प्रत्येक कलेक्टरने दररोज प्रत्येक तालुक्यातील पावसाचा अहवाल “बाय स्पेशल मेसेंजर” मागवायचा (म्हणजे कालचा अहवाल आज दुपारपर्यंत येणार) आणि सायंकाळी ते सर्व अहवाल गोळा करून प्रत्येक कलेक्टरने दररोज “बाय स्पेशल मेसेंजर” मुंबईला पाठवायचे! या सेक्रेटरींबद्दल सर्व कलेक्टर्सना खात्री होती की ते प्रत्येक रिपोर्टाचे प्रत्येक पान दररोज न दमता, न कंटाळता वाचणार आणि शिवाय पुढली योग्य ती कारवाई करण्यासाठी निर्देश देण्याइतका वेळ ते ऑफिस मधे बसून असणार. गंभीर संकट असल्यास रात्री एक वाजता त्यांच्या घरी फोन केला तरी शक्यतो फोनवर तिथल्या तिथे उपाय सुचवणार, नाही तर दुस-या दिवशी तरी  संकटावर मात करण्यासाठी लागणारे शासन- निर्देश आपल्या ऑफिसात येऊन पोचलेले असणार. अशा सेक्रेटरींपुढे या रोज-रोजच्या रिपोर्टामुळे आम्हाला खूप काम कराव लागत हे कलेक्टर्स कोणत्या तोंडाने सांगणार? तरी पण मी त्यांच्याकडून सूट मिळवलीच “सर, मला कलेक्टर म्हणून पूर किंवा पाणी टंचाईबाबतची माझी जबाबदारी थोडी फार कळते, असा तुम्हाला भरोसा वाटतो ना.”
      “ मग मला् एक परवानगी द्या- मी तालुक्यांचे रिपोर्ट रोज स्वतः वाचीन. नेहमीपेक्षा कांही  वेगळ असेल तर
तुम्हाला त्या दिवसाचा खास मेसेंजर पाठवीन, शिवाय फोनही करीन. नेहमीपेक्षा वेगळ नसेल तर आठवड्यातून एकदाच एकत्र अहवाल पाठवीन.”
     “आणि हीच सूट तू तुझ्या तहसिलदारांना दिलीस तर? मग गोंधळ होईल. मी तुझ्यावर भरोसा टाकण, आणि तूही पुढे तहसिदारांवर भरोसा टाकण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्केअर्सिटी मॅनेजमेंट ही क्रिटिकल गोष्ट असते -- दोन लेव्हल्स वर तीच सूट दिली तर धोका दुपटीपेक्षा जास्त वाढतो!”
     “कबूल. मी त्यांना सूट देणार नाही.”
          मात्र मी तहसिलदारांना अशी सूट दिली की त्यांनी रोज मी असेन तिथे मला फोन करून पावसाच्या अहवाल सांगायचा व  लेखी रिपोर्ट मधे आठवड्यातून एकदा कळवायचा.

      सरकारमधे तोंडी माहितीवर विश्वास टाकणे हे खूप धोक्याचे मानले जाते. म्हणून कामांची कटकट आणि लागणारा वेळ वाढला तरी लोकांना लेखी रिपोर्ट लागतात . मात्र या एका बाबतीत तोंडी (पण स्वतः तहसिलदारांनी स्वतः कलेक्टरांकडे) रिपोर्ट करण्याची परवानगी देऊन मी स्पेशल मेसेंजरचा रोजचा त्रास वाचवला. पुढे हिवाळा आला तसे मंत्राल्यानेही रोजचे रिपोर्टिंग बंद केले. मात्र मला दिलेली सूट सर्वत्र लागू केली नाही. इतर सहकाऱ्यांनी मला वेड्यात काढले -- का तर अशी सूट मिळवून मी सर्व मेसेंजर्सचा त्रास कमी केला तरी स्वतःची जबाबदारी मात्र वाढवून घेतली.

    मला मात्र वाटते की दुस-या एखाद्या कमी क्रिटीकल बाबतीत मेसेंजर सिस्टमच - (पण दररोज नाही) बरोबर ठरेल. क्रिटिकल बाब असेल तेंव्हा मात्र अधिका-यांनी स्वतः लक्ष घालण्याची गरज असते. ते त्यांनी केले पाहिजे आणि त्यासाठी त्यांना  कमीत कमी वेळ द्यावा लागेल अशीच मॉनिटरिंगची पध्दत शोधली गेली पाहिजे.

    संगणकांचा शासनात वापर खरा वाढला तो १९९५ नंतर. पण अजूनही त्याचा उपयोग सांख्यिकी माहितीच्या अॅनॅलिसिस साठी किंवा त्यावरून धोरणं ठरवण्यासाठी किंवा एकाच पध्दतीचा प्रश्न एकत्र सोडवण्यासाठी केला जात नाही. त्याऐवजी फार मर्यादित उपयोग केला जातो.

    शासनाकडे आलेल्या टपालाचेच उदाहरण घेऊ या. संगणक आपल्यापासून टपालाची नोंदणी संगणकावर होते. यामुळे कुणीही आपल्या टपालाची तारीख किंवा नाव सांगितल तर संगणकात ती नोंद पटकन ओळखता येते आणि संबंधित फाइल कुठे आहे ते तत्काळ सांगता येत. सध्या या माहितीचा एवढाच उपयोग केला जातो. ब-याचदा ही माहिती सुध्दा लोटस किंवा एक्सेल सारखे सांख्यिकी अॅनॅलिसिस करू शकणारे, चार्ट प्रोसेसिंग सॉफ्टवेअर न वापरता वर्ड सारखे वर्ड- प्रोसेसिंग सॉफ्टवेअर वापरूनच संगणकात भरली जाते. त्यामुळे अॅनॅलिसिस साठी या माहितीचा उपयोग होत नाही. त्या ऐवजी कांय कांय त-हेने ही माहिती वापरून कार्यक्षमता वाढवता येईल? सर्वप्रथम ही माहिती एक्सेल वर टाकली जावी, कारण त्यात वाटेल तेंव्हा नवीन कॉलम्स वाढवता येतात. शासनाच्या टपाल रजिस्टर मधे एक कॉलम टपाल कोणत्या क्लार्ककडे
पाठवल यासाठी असतो. तर मग दिवसाच्या शेवटी ज्या त्या क्लार्क प्रमाणे सॉर्टिंग करून प्रत्येक क्लार्कचा प्रिंट-आऊट काढून व हवे असल्यास सॉफ्ट कॉपी देखील  त्या क्लार्कडे दिली तर त्याचा पुनः स्वतःचे वर्कशीट लिहून काढायचा वेळ वाचतो.
     मी १९९५ नंतर सातत्याने दर ऑफिसात ही पध्दत राबवली- म्हणजे नाशिक कमिशनर , सेटलमेंट कमिशनर, शेती महामंडळ व आता राष्ट्रीय महिला आयोग. पण इतरत्र कोणत्याच कार्यालयात टपाल म्रॅनेजमेंट करतांना संगणकांमधे एकदा केलेल्या नोंदी वापरून इतर कारकुनांचा वर्कशीट लिहून काढण्याचा वेळ वाचवला असे चित्र दिसलेले नाही. यामधे किती मनुष्य-दिवस विनाकारण वाया घालवले जातात याचा विचार व अंदाज सहजासहजी कुणालाही येत नाही. पण शासणाकडे आलेल्या प्रत्येक टपालाची नोंद किमान पाच क्लार्क पाच ठिकाणी करतात हे लक्षांत घेतले तर या अपव्ययाची कल्पना येऊ शकते. टपाल नोंद करतांना ते कोणत्या जिल्ह्यातून आले याचा पण एक वेगळा कॉलम केला तर कांय होईल? कामांच्या पेन्डसीची जिल्हावार माहिती तत्काळ मिळू शकेल. ती संपूर्ण यादी जिल्ह्याधिकारी, इतर अधिकारी, पालकमंत्री, आमदार - खासदार यांना दर महिन्याला पाठवून देता येईल व त्यांना त्या प्रश्नांचा पाठपुरावा करता येईल.

     टपाल नोंदवतांना त्यातील विषयाचे ढोबळ स्वरूप (नेचर) कांय होते हाही कॉलम केला तर कांय होईल? शासनाकडे येणारे प्रत्येक कामाची पंचवीस- तीस प्रकारच्या स्वरूपात वर्गवारी करता येते. तशी केली तर कामाच्या नेचर-वाईज-सॉर्टिंग दर आठवड्याला करता येऊन एकाच त-हेच्या कित्येक कामांचा एकत्र आढावा घेता येईल-- प्रत्येक फाईल एकेक करून उपसावी लागणार नाही.

     इथे एक महत्वाचा मुद्दा आहे. शेवटी क्लार्कच्या पातळीवर प्रत्येक फाईल एकेक करुनच उपसावी लागते, तेंव्हाच त्यामधले काम संपवता येते. पण वरीष्ठ अधिका-यांनी फक्त फाईली संपवायच्या नसतात- त्यांचा आढावा घेण, प्रायोरिटी ठरवून देण, कांही नियम बदलावे लागत असतील तर ते बदलण, यामधून अधिका-याची कार्यक्षमता ठरत असते. हे सर्व करण्यासाठी संगणकाच्या नोंदी वापरता आल्या पाहिजेत, वापरल्या गेल्या पाहिजेत.
   
    एक अजून उदाहरण देते. सेटलमेंट कमिशनरच्या कार्यालयात मी रजू झाले तेंव्हा आपल्या सर्व- म्हणजे सुमारे पाचशे अधिका-यांचे सर्व्हिस पर्टिक्युलर्स संगणकावर टाकलेले आहेत मला असे सांगण्यात आले. ते दाखवा म्हटल्यावर  प्रत्येक अधिका-याची पूर्ण माहिती देणारे दोन पानी प्रिंट आऊट असा एक जंगी गठ्ठा माझ्या समोर ठेवण्यात आला. अशी माहिती ज्या त्या अधिका-याच्या फाईलीला लावण्यास अत्यंत योग्यच आहे हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे ‘त्या’ अधिका-याची फाइल उघडली की ती माहिती पटकन समोर येणार.
   
    पण एकत्रित प्रश्नांचे कांय?  उदाहरणार्थ या महिन्याला त्यातले किती जण निवृत्त होणार अस विचारल्यावर या माहितीसाठी सात दिवस (बर, चला तीन दिवसांत देतो) अस उत्तर मिळाल आणि तीन दिवसांत उत्तर देता याव म्हणून त्या डेस्क अधिका-याला व त्याच्या क्लार्कला कित्येक तास जादा बसाव लागणार होत. याचे कारण की त्यांनी ही सर्व माहिती वर्ड या सॉफ्टवेअरमधे तयार केली होती.
 
    मग मी पुनः सर्व माहिती एक्सेल सॉफ्टवेअर वापरून भरायला लावली. त्यांत निवृत्तिचा महिना व वर्ष हा कॉलमही टाकला. त्यामुळे त्या कॉलमवर सॉर्ट केल की कधी, किती व कोणकोण निवृत्त होणार ही एकत्र यादीच समोर यायची. त्याप्रमाणे त्यांच्या कागदपत्रांची तयारी आधीपासूनच सुरू होऊ लागली. ऑफिसचा बराच वेळ वाचू लागला.
   
      तरी सुरवातीला सगळ्यांची एक शंका होती   (अजूनही कित्येकांच्या मनात ती येईल.) एक्सेल मधे एखाद्या अधिका-याची संपूर्ण माहिती टाकायची तर तीस- चाळीस कॉलम करावे लागतील. त्याचा प्रिंट आऊट कसा घेणार? म्हणून ही कॉलम पध्दत नको. मी त्यांना एक सोपा उपाय सांगितला- बहुधा वेगवेळ्या कामांसाठी सात- आठ कॉलम मधली माहितीच पुरणारी असते. तेवढेच प्रिंट आउट वर घ्यायचे, बाकी माहिती संगणकावरच ठेवायची.  किंवा दुसरा सोपा उपाय आहे. पहिले २ कॉलम (म्हणजे अनुक्रमांक आणि नांव) कायम ठेऊन एका पानावर कॉलम नं १,२ अधिक ३ ते १० कॉलम्सचा प्रिंट आउट घ्यायचा. दुस-या कागदावर कॉलम नं १,२ सोबत ११ ते १८ कॉलम्सचा प्रिंट आऊट घ्यायचा..... अशा प्रकारे १२- १५ जणांची संपूर्ण माहिती तीन ते चार पानांत घेता येईल. अगदी शेवटी सगळ्यांची सगळी माहिती एकत्र केली तर तोही गठ्ठा आधी इतकाच जाडजूड होईल, पण या दुस-या गठ्ठ्यात माहितीची उलाढाल, किंवा उपसा-उपसी अत्यंत सोईस्कर रीत्या करता येईल. पहिल्या पध्दतीत ते अशक्य आहे.

     अगदी हाच नियम गांवोगांवच्या सात- बारा उता-यांसाठी लागू पडतो. सात- बाराच्या नमुन्यामधे एका पानावर जमीनीच्या एकाच तुकड्याची संपूर्ण माहिती असते. पण गांवात नमुना नं एक नांवाचे एक रजिस्टर असते, त्यांत कॉलम पडून अनुक्रमांक देऊन सगळ्या तुकड्यांची संपूर्ण माहिती असते. कोणत्याही वरिष्ठ अधिका-याला या माहितीची जास्त गरज असते- त्यामुळे तो लोकांचे प्रश्नही जास्त चांगल्या त-हेने सोडवू शकतो. शासनात मात्र जमीन तुकड्यांची माहिती संगणकावर टाकतांना अजूनही सात- बाराची पानं तयार करण्यची पध्दतच वापरली जाते. त्यामुळे शेतक-याला चटकन व लीगल व्यवधानापासून मुक्त असा उतारा मिळतो की नाही ही शंका आहेच. शिवाय संगणकामधे भरलेल्या या भाराभर (भारे भरभरून) माहितीचा उपयोग सिस्टम सुधारण्यासाठी किंवा वरिष्ठांचे तपासणीचे काम आणि ज्या त्या गावांचे जमीन महसूलाचे प्रश्न कार्यक्षमतेने सोडवण्यासाठी होत नाही तो नाहीच. यामुळेच या कामामधे निरुत्साह दिसून येतो त्याचा सोयीस्कर अर्थ असा लावला जातो की तालाठ्यांना किंवा महसूली अधिका-यांना त्यांची सत्ता इतरत्र जाऊ द्यायची नाही.

      संगणकातील एक्सेल सॉफ्टवेअर वापरून माहिती तयार करणारे व तिचे अॅनॅलिसिस करणारे अधिकारी देखील आहेत- त्यांनी अजून एक पायरी पुढे जायची गरज आहे- ते म्हणजे, ही माहिती नकाशांवर कलर- कोडिंग वापरून टाकणे. अहमदनगर जिल्ह्यांचा एक रंगीन नकाशा भूजल सर्वेक्षण खात्याने मला दाखवला होता. प्रत्येक विहिरीत मागील वर्षाच्या तुलनेत पाण्याची पातळी किती खाली गेली ती माहिती त्यांत भरून अंतर कमी असेल तिथे हिरवा रंग आणि जास्त असेल तिथे लाल रंग असा नकाशा संगणकावरच तयार करून घेतला तेंव्हा लाल रंगाचे पट्टेच्या पट्टे पहायला मिळाले आणि तेवढ्याच गांवांची एकत्र सभा घेऊन त्यांना याबद्दल जागरूक करता आले.
      ओरिसा मधे असेच कुपोषित मुलांची माहिती संगणकावरून नकाशावर टाकून बघितल्यानंतर कुपोषणाचे झोन्स ओळखता आले. त्याद्वारे नियोजन करून ग्रेड थ्री व ग्रेड फोरचे कुपोषण संपूर्ण थांबवण्याची मोहीम हाती घेता आली. आपल्याकडे मेळघाट, तलासरी, नाशिकचे आदिवासी तालुके या मधेही हे अॅनॅलिसिस करता येऊ शकेल.
     ओरिसाच्याच महिला, बाल कल्याण सेक्रेटरीने दिलेली माहिती -- महिलांनी केलेल्या आत्महत्येच्या माहितीत तिचे वय पण लिहिलेले असते. त्यावरून सॉर्ट करून, तसेच लग्न झाले होते किंवा नाही या कॉलमवरून सॉर्ट करून असे दिसून आले की महिलांनी आत्महत्या केल्यापैकी ऐंशी टक्के केसेस मधे अठरा ते पंचवीस वयोगटातील लग्न झालेल्या स्त्रिया होत्या. यावरून हुंडाबळी किंवा सासरी होणा-या छळाची कल्पना जास्त चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. त्याच अॅनॅलिसिस मधे कांही पट्ट्यांत अठरा ते बावीस वयोगटातील लग्न न झालेल्या मुलींचे प्रमाण जास्त दिसत होते- तपास केल्यावर तिथल्या कॉलेजच्या मुलींना लग्नाचे आश्वासन देऊन फसविणा-या बाहेरगांवच्या टोळ्यांची माहिती उघडकीला आली.

      मी नाशिक कमिशनर असतांना एक मोठी नाटकीय घटना घडली.
      आपल्याकडे कुणाला नवीन विहिर खणायची असेल तर काटकसर किंवा अनुभवामुळे अजूनही भूजल खात्याच्या तंत्रज्ञाऐवजी पाणाड्यांना बोलावतात. ज्याचे अंदाज जितके चांगले त्या पाणाड्याचा जास्त मान! पाण्याचे अनुमान करण्यासाठी ते इतर विहिरीपण बघतात.
     असाच धुळ्याकडील एक पाणाड्या बराच प्रसिध्द झाला. दरवर्षी उन्हाळ्यांत तो नगर जिल्ह्यामधे यायचा. सल्ले द्यायचा. बराच फिरायचा. विहिरीही बघायचा.
    आणि एकदा त्याने कांही तरी वेगळच बोलून दाखवल. त्याच्या मते मागील दोन- तीन वर्षांत विहिरींमधे खाली गेलेली पाण्याची पातळी आणि त्या वर्षी दिसणारी पातळी यात बराच फरक असून एकूण सगळ्या विहिरींचे चित्र भूकंपाची शक्यता दर्शवत होते आणि त्याचा केंद्रबिंदु संगमनेर होता. याला अंधविश्वास म्हणून उपेक्षा करणे शक्य होत. त्याने उगीच लोकांमधे भिती पसरवली अस सांगून खटला भरणेही शक्य होत. पण लातूरची आठवण ताजी असल्यामुळे सगळी विचारत पडली- “पण त्याच भाकित खर ठरल आणि भूकंप आला तर कांय?”
   
       मग आम्ही दिल्लीच्या भूकंप मोजमाप केंद्राची मदत मागून पृथ्वीच्या पोटात मधून मधून जे कंप निर्माण होतात त्यांचे मोजमाप घेणारी दोन यंत्र मागवली. पैकी एक नाशिक तर एक संगमनेर येथे बसवल. दोन्ही यंत्रात जो फरक होता त्यातूनही सरकारी वृत्ति समजून घेता येईल. कारण संगमनेरच्या यंत्राला एक ड्रम जोडला होता व त्यावरून एक सतत पुढे चालणारा कागद गुंडाळला जात होता- इसीजी मशीन मधे असतो तसा. पृथ्वीच्या पोटातले लहान मोठे धक्के दर पाचेक मिनिटांना एक रेघ अशा त-हेने ड्रमवरून कागदावर उतरवले जात. त्या रेघेच्या उंचीवरून धक्क्याच्यी तीव्रता कळत असे. चार रिश्टरच्या धक्क्याची किती उंच असेल ते दर्शवणारी खूण पण ड्रमवर होती आणी तिच्या मानाने कागदावरच्या रेघांची उंची खूपच कमी होती. ते स्वतःच्या डोळ्यांनी बघायला बाया- माणस आणी शाळा- कॉलेजची मुल- मुली येत आणि स्वतःच्या मनाला थोडासा दिलासा देत. या उलट नाशिकच यंत्र वेगळ होत. तिथे कागदावर तीन ठिकाणी छोटी वर्तुळ उमटत. त्यांच्या वरून बरीच मोठी गणित करून व ती माहिती दिल्लीला पाठवून सुमारे चार दिवसांनी तिथल्या धक्क्यांच्या तीव्रतेबद्दल अंदाज घेता यायचा, तो देखील त्या खात्याच्या नियमाप्रमाणे गुप्त माहिती  या सदरांत मोडत असल्याने लोकांना त्याबद्दल कांहीच सांगितल जात नसे. खरे तर संगमनेरच्या माहिती बद्दलही तिथे दिल्लीहून आलेले खास अधिकारी कोणतही “अधिकृत” वक्तव्य देऊ शकत नव्हते. पण लोकांना स्वतः काय निष्कर्ष किंवा अंदाज काढायचे ते काढण्याची मोकळीक आणि कांही दृश्य माहिती समोर असायची. तसा नाशिकमधे नव्हत. त्यामुळे नाशिकमधील भितीच वातावरण जात नव्हत.
     संगमनेर टाईपच दुसरं मशीन भारत सरकारकडे त्यावेळी उपलब्ध नव्हत आणि लोकांना माहिती द्यायची की नाही हा निर्णय खात्यांत अजूनही झालेला नाही.
     पण लोकांना माहिती दिल्याने किती अफवा वाचू शकतात याचं आणखीन एक उदाहरण त्याच काळांत घडल. संगमनेर- पुणे हायवे वरच्या एका गांवचा किस्सा.
     एक माणूस भल्या पहाटे उठून रोजच्या प्रमाणे प्रतिर्विधीसाठी शेतात चालला असता वाटेत एका झाडाची फांदी त्याच्या डोक्यावर आपटली. त्याच म्हणण, तो रोज त्याच झाडाखालून ये- जा करायचा पण कधीही फांदीला डोक आपटल नाही. ते आता आपटल याचा अर्थ झाड जमीनीत खाली खचल आहे- ते खचत चालल आहे- कारण भूकंप येणार आहे- त्या झाडाखालची पृथ्वी खोल कुठेतरी सरकत असणार म्हणून झाड खचतय वगैरे!
      यातून सुरू होणा-या अफवा तत्काळ थांबवायला हव्या होत्या. पण त्याहून महत्वाच अस होत की झाड खरच खचतय का हे ही समजण गरजेच होत. आणि खचत असेल तर त्याचा खचण्याचा वेग मंदच असणार होता.
     मी तत्काळ एक युक्ति सांगून एक डेप्युटी कलेक्टर व एक तहसिलदार त्या गांवी पाठवले. त्यांनी तलाठी व वनखात्याच्या कर्मचा-यांतर्फे सर्व गांव गोळा करून सर्वांसमोर फुटपट्टीने मोजून अगदी जमीनीपासून सुरुवात करून झाडावर सहा- सहा इंच रुंदीचे एकाआड एक असे चुन्याचे आणि गेरुचे पट्टे रंगवून घेतले. आता जर झाड खचत असेल तर त्याचा अंदाज व खचण्याचा वेगही दोन चार दिवसातच कळणार होता. तोही फक्त शासनालाच नाही, तर पूर्ण गांवाला आणि सर्व जनतेला कळणार होता.
     सुदैवाने झाड खचत नव्हत आणि याची खात्री प्रत्येक जण स्वतः झाड बघून करु शकत होत. हा दिलासा त्या शंकेच्या काळात इतका महत्वाचा होता की हायवेवरील ट्रक व बसेस देखील थोडीशी वाट वाकडी करुन झाडापर्यंत जाऊन स्वतः बघून येत. पुढे संकटाची तारीख उलटून गेल्यानंतर लोक त्या झाडावर पूजा वगैरे करू लागल्याचही मी ऐकल.
     पण इतक होऊनही भूकंप मोजमाप खात्याने त्यांच्या एकूण गुप्त माहिती पैकी थोडी बहुत माहिती जाहीर करावी असा सुधारित नियम करुन घ्यायला कांही मला जमलले नाही. तसे मी प्रयत्नही फारसे केले नाहीत, करत राहिले तरी त्यातून कांही निष्पन्न होईल का हा प्रश्नही खरा! मग या देशाच प्रशासन सुधारणार कस?

     एवढ मात्र निश्चितकी ज्या त्या कार्यालय प्रमुखावर खूप कांही अवलंबून असत. प्रमुखच जेंव्हा ढेपळतो किंवा उदासीन, अकार्यक्षम अगर भ्रष्टाचारी असतो तेंव्हा त्या कार्यालयामार्फत विशेष कांही साध्य होऊ शकत नाही. तिथल्या उत्साही कर्मचा-यांची उमेद मंदावते. मात्र कार्यालय प्रमुख जेंव्हा पुढाकार घेतो तेंव्हा कित्येक सुधारणा जलद गतीने घडवून आणू शकतो.
   
 दुसरी महत्वाची गरज म्हणजे विभिन्न कार्यालयांमधे आणि कार्यप्रमुखांमधे एकत्र बसून विचार करण्याची पध्दत हवी. “सं वो मनांसि जानताम्” हे वेदवाक्य सतत उद्धृत करण्याची अलीकडे एक फॅशन झाली आहे, पण प्रत्यक्षांत मात्र एकत्र बसून , एकमेकांची मनं आणी सल्ला मानून शासन व्यवहार होतांना दिसत नाही. त्यामुळे शासनात प्रत्येक जण इतरांच्या अकर्मण्येतेमुळे स्वतः देखील हतबल होत जातो.

     मग वाटत की एकच उपाय आहे- जर जनता या प्रश्नांमागे उभी राहू शकली तर कित्येक सुधारणा होतील- होऊ शकतील. कांही सुधारणा अधिकारी करत आहेत- कांही कोर्ट करवून घेत आहे- कुठे एखादा राजकीय नेता कांही चांगल करतोय्. या सगळ्या एकेकट्याने लढणा-या राजपूत वीरांना एकत्र आणल आणि “प्रशासकीय गैरकारभार” नांवाच्या शत्रूबरोबर एकत्रपणे लढायला लावल तर कदाचित कांही सुधारणा होऊ शकतील.
-------------------------------------------------------------------------------------------------------------