Sunday, December 6, 2015

नरेंद्र गोळे यांनी करून दिलेली ओळख -- अनुदिनी: प्रशासनाकडे वळून बघतांना

अनुदिनी: प्रशासनाकडे वळून बघतांना - Looking back at Governance
http://prashasakeeylekh.blogspot.com/

अनुदिनी लेखिकाः लीना मेहेंदळे

अनुदिनी लेखिकेची ओळखः लीना मेहेंदळे यांचा जन्म ३१ जानेवारी १९५० रोजी जळगाव जिल्ह्यात धरणगाव येथे झाला. त्या स्वतःस परिपूर्ण प्रशासक, विचारवंत आणि लेखक (बालवाचकांकरताही) मानतात. त्या भारताच्या सर्व भागाची पुरेशी ओळख राखतात. भारतातील एकूण ६५० जिल्ह्यांपैकी ४०० जिल्ह्यांत त्यांनी प्रवास केलेला आहे. त्या हिंदी, मराठी, बंगाली भाषा जाणतात; तर आसामी, उडिया, पंजाबी, गुजराती, नेपाळी, मैथिली आणि भोजपुरी भाषा त्यांना समजतात.

त्या पाटणा विद्यापीठातून १९७० मध्ये भौतिकशास्त्रात एम.एस.सी. झाल्या. १९७२-७३ मध्ये भौतिकशास्त्राची व्याख्याती म्हणून पाटणा विद्यापीठात काम केल्यावर, १९७४ मध्ये त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. सेवेत असतांना त्यांनी यु.के.मधील ब्रॅडफोर्ड येथून १९८९ मध्ये प्रोजेक्ट प्लॅनिंग या विषयात त्यांनी एम.एस.सी. पदवी प्राप्त केली. हिस्सार मधील जी.जे.विद्यापीठाची एम.बी.ए. पदवी त्यांनी २००७ मध्ये संपादन केली. २०१० मध्ये मुंबई विद्यापीठाची एल.एल.बी. पदवी मिळवली. १९७४ ते २०१० दरम्यान त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत काम केले. नंतर केंद्रिय प्रशासकीय लवादाच्या सदस्य (हे पद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या समकक्ष असते) म्हणून त्यांची बंगलुरू येथे नियुक्ती झाली.

भारतीय प्रशासकीय सेवेत अतिशय स्पर्धात्मक परीक्षेनंतरच प्रवेश मिळतो. त्या सेवेतील काम नियामक, विकासात्मक आणि न्यायविषयक स्वरूपाचे असते. वरिष्ठ पदांवर अधिकारी धोरणात्मक निर्णय घेतात आणि अंमलबजावणीवर देखरेख करतात. भारतीयांना, जिल्हाधिकारी (कलेक्टर), आयुक्त (कमिशनर), अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक (सी.एम.डी.) आणि सचिव इत्यादी प्रातिनिधिक भारतीय प्रशासकीय सेवांची ओळख असते.

त्यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

१. सांगलीच्या जिल्हाधिकारी असतांना आणि डब्ल्यू.एम.डी.सी. ह्या एका औद्योगिक कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक असतांना त्यांनी देवदासींच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम राबवला.

२. ऊर्जा संवर्धनाबाबत साप्ताहिक १८० भागांच्या दूरदर्शन मालिकांतून आणि आकाशवाणीवरील २५० भागांच्या मालिकेतून कौशल्य संपादन आणि संवर्धन यांकरता लोकजागृती केली.

३. पुण्यातील ’यशदा’ मध्ये ग्रामीणविकास आणि मानवसंसाधन प्राध्यापक म्हणून १९८९-९० आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उप-कुलगुरू (निसर्गोपचार संचालक) पदांवरून १९९६ मध्ये काम करत असता त्यांनी प्रशिक्षणाची धोरणे आणि संकल्पना निश्चित केल्या.

४. त्या नेहमीच, संगणकावर भारतीय भाषांचा प्रसार व्हावा याकरता काम करत राहिल्या.

५. एक विचारवंत आणि लेखक म्हणून त्यांनी, मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून हजाराहून अधिक व्याख्याने दिली, निरनिराळ्या विषयांवर २५ हून अधिक पुस्तके लिहिली आणि ६०० हून अधिक लेख लिहिले.

अनुदिनीची सुरूवातः जानेवारी २००६

अनुदिनीतील नोंदींचा तपशील: अगदी अलीकडील २०११ मधील नोंदी २ आहेत. “आम आदमी कुठे आहे” हा बजेटवरला आणि “लोकाभिमुख प्रशासन” ही फर्ग्युसन कॉलेजमधे दिलेल्या पद्मावती व्याख्यानाची संहिता. २०१० मध्ये एकूण १० नोंदी आहेत. त्यात “निवडणुकीत नापसंतीचा अधिकार हवा” हा लेख आहे. मरीन ड्राईव्ह कांडावरले काही लेख आहेत. “काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां?”, “त्या स्त्रियांच्या सोबतीसाठी”, “हक्कांसाठी स्त्रियांनी कोर्टाची पायरी अवश्य चढावी”, “प्रशासकीय लेखा-परिक्षण एकांगीच राहिले” इत्यादी सुरेख लेख आहेत.

२००९ मध्ये एकूण ९ नोंदी आहेत. त्यात “परस्परसवांद आणि सामंजस्य महत्वाचे”, “भ्रष्टाचार, चौकशी, शिक्षा, न्याय इत्यादि”, “आरोग्य सेवा आणि आरोग्य शिक्षण”, “योगत्रयी”, “पोलिसिंग म्हणजे नेमके कांय”, “परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल हवा” इत्यादी लेख आहेत.

२००८ मध्ये एकूण १५ लेख आहेत. यात “माय मराठीत विज्ञान आणि कायदा”, “तारा - लिंगभेदावर एक तीव्र प्रकाशझोत”, “मराठी लेखनाच्या ब्लॉगसाठी – इनस्क्रिप्ट”, “सत्यवचनाचे वैज्ञानिक तथ्य”, “कार्यक्षम व्यवस्थेसाठी”, “सांगलीचे दिवस”, “सुस्त दंड प्रक्रिया आणि तेलगी” इत्यादी लेख समाविष्ट आहेत.

२००७ मध्ये एकूण २१ लेख आहेत. यात “संस्कृती अशी घडते”, “कुसुमाग्रजाच्या कविता -अनुवाद”, “प्रशासनात संगणक कसा आणि किती वापरावा”, “चिंतामण मोरया आणि इतर लेख -- 3रा संग्रह”, “इथे विचारांना वाव आहे”, “बलसागर भारत -- साने गुरुजी-- हिन्दी अनुवाद”, “ठावकीच नाही”, “नीती आणि दंड या माझ्याच विभूति आहेत”, “जा जरा चौकटीपलीनिमित्ताने –पूर्ण” इत्यादी लेख आहेत.

२००५ सालचा एक लेख आहे “त्याची शरम वाटते? -- मरीन कडे!”, “बेरोजगारीवर उत्तम उपाय- रेशीम उद्योग”, “हिंदीला धोपटणे थांबवा”, “जळगांव स्कँडलाच्या ड्राइव्ह कांड” हा. २१ एप्रिल २००५ रोजी मरीन ड्राइव्हसारख्या मुंबईच्या पॉश वस्तीत समुदकिनाऱ्यावर हवा खात बसलेल्या एका तरुणीवर आधी दमदाटी करून एक कॉन्स्टेबल तिला पोलिस चौकीत घेऊन जातो आणि तिच्याबरोबर असलेल्या तरुणाला बाहेर बसवून तिच्यावर बलात्कार करतो ह्या घटनेवर परखड भाष्य करणारा.

अनुदिनी कशासाठी वाचनीय आहे? त्यांनी अनेक भाषांत विपुल लेखन केलेले आहे. ते सर्व महाजालावर उपलब्धही करून दिलेले आहे. त्या सर्व अनुदिन्यांची खालील यादी उपरोक्त अनुदिनीवर पाहायला मिळते.

१. Energy-matters : pcra http://pcra--works.blogspot.com/

२. bhagvadgeeta_rec... http://bhagvadgeeta-recital.blogspot.com/

३. leena mehendale on web pages http://web-references.blogspot.com/

४. कुछ गुजराती प्रयोग http://gujrati-prayog.blogspot.com/

५. भाषा--हिन्दी--मर... http://bhasha-hindi.blogspot.com/

६. My favorites and Urdu shers http://urdu-sher.blogspot.com/

७. my first blog आणि नवीन लेखन http://leenamehendale.blogspot.com/

८. Women Empowerment : India http://women-empowerment.blogspot.com/

९. diary-index http://diary-index.blogspot.com/

१०. जिन्हे नाज है हिन्द पर वो आ जायें http://naz-hai-hind-par.blogspot.com/

११. My English articles http://my-eng-articles.blogspot.com/

१२. मन ना जाने मन को http://man-na-jane-manko.blogspot.com/

१३. hrishi thesis work http://hrishi-thesis.blogspot.com/

१४. राजकीय चिन्तन (Political Thoughts) http://rajkeeya-chintan.blogspot.com/

१५. books, websites and films http://leenameh.blogspot.com/

१६. good-to-see http://good-to-see.blogspot.com/

१७. सुवर्ण पंछी Suvarna Panchhi http://suvarnapanchhi.blogspot.com/

१८. है कोई वकील ? http://prakritik-chikitsa.blogspot.com/

१९. निसर्गोपचार-प्रकृति आद्य शिक्षक http://prakritik-chikitsa.blogspot.com/

२०. संस्कृत की दुनिया : कौशलम् न्यास http://sanskrit-ki-duniya.blogspot.com/

२१. anu vigyan अणु विज्ञान http://anu-vigyan.blogspot.com/

२२. जनता की राय > janta ki ray http://janta-ki00ray.blogspot.com/

२३. देशासाठी -- these need fixing http://need-fixing.blogspot.com/

२४. आनन्दलोक -- कुसुमाग्रज की कविताएँ http://hindi-kusumagraj.blogspot.com/

२५. चरखा - चिंतन व प्रयोग http://charkha-system.blogspot.com/

२६. ये ये पावसा http://ye-ye-pawsa.blogspot.com/

२७. यशवंत सोनवणे http://sonavane-nashik.blogspot.com/

२८. प्रशासनाकडे वळून बघतांना http://prashasakeeylekh.blogspot.com/

२९. इथे विचारांना वाव आहे. http://marathi-lekh1.blogspot.com/

३०. मेरी प्रांतसाहबी http://my-prantsahebi.blogspot.com/

३१. समाज मनातील बिंब http://societal-reflections.blogspot.com/

“मेरी प्रांतसाहबी” ही हिंदी अनुदिनी त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीची ओळख करून देते. तिच्याबाबत माहितीही आपल्याला ह्या अनुदिनीत सापडते. प्रशासनसेवेत असतांना प्राकर्षाने जाणवलेल्या मंद दंड-प्रक्रिया, आरोग्यसुधारणा, ऊर्जासंवर्धन इत्यादी विषयावरले त्यांचे विचार ह्या अनुदिनीतील अनेक लेखांत वाचायला मिळतातच. शिवाय त्यांचे संस्कृतीविषयक लेखही यात आहेत. “संस्कृती अशी घडते” ह्या लेखात त्या म्हणतात, “'फिरन्तु' लोकांमुळे समाजाचं ज्ञान आणि विकासाची गति वाढते. ही बाब ज्यांच्या लक्षांत आली असेल त्यांनी अतिथी देवो भव ही कल्पना घालून दिली असेल आणि रुजवली असेल. जेणेकरून अशा फिरन्तु लोकांची योग्य ती सोय व्हावी. 'मा गृधः कस्यस्विद्धनम्'- दुसर्‍याने कमावलेल्या धनाची आस धरू नकोस किंवा 'सत्यमेव जयते नानृतं' - सत्याचाच विजय होईल - असत्याचा कदापि होणार नाही. अशा सारखी बीज वाक्य आपल्या उपनिषधामध्ये येण्यापूर्वी या विचारांचे किती मोठया प्रमाणात आणि किती मोठया काळापर्यंत मंथन झाले असेल त्याचा अंदाज घेणे कठीण आहे.” त्यांच्या अनुभवावर आधारित संस्कृतीच्या उदयाचा त्यांनी घेतलेला हा वेध वाचनीय आहे.

त्यांनी कुसुमाग्रजांच्या १०८ कवितांचा हिंदीत अनुवाद करून एक अत्यंत मौलिक काम केलेले आहे.

ह्या सर्व कविता http://hindi-kusumagraj.blogspot.com/ या अनुदिनीवर उपलब्ध आहेत. आपल्या समृद्ध मराठी कवितेला तेवढ्याच सशक्त हिंदी जाणकाराने हिंदीत न्यावे, ह्या सदिच्छेला त्यामुळे साकार होता आले आहे. साने गुरुजीच्या “बलसागर भारत होवो” चा सुरस हिंदी अनुवादही वाचनीय आहे. मात्र मला “खरा तो एकची धर्म” चा त्यांनी केलेला हिंदी अनुवाद विशेष आवडला.

याच अनुदिनीत “दंडो दमयतामस्मि, नीतिरस्मि जिगिषिताम्‌” विषद करतांना त्यांनी गीतेच्या विभूती योगाचेच रसग्रहण केलेले वाचता येते. “बेरोजगारीवर उत्तम उपाय- रेशीम उद्योग” या विषयावरला लेख उद्योजकतेस चालना देतो. “इथे विचारांना वाव आहे” या नियतकालीकांतील लोकप्रशासनात्मक लेखांवर आधारित पुस्तकाचीही इथेच ओळख करून दिलेली सापडते. “सत्यवचनाचे वैज्ञानिक तथ्य” हाही एक सुरेख लेख इथे वाचता येतो.

ही अनुदिनी म्हणजेच अशा एक ना अनेक सुरस साहित्यांचा खजिना आहे. हा मात्र केवळ परिचयच आहे. हा परिचय वाचून ती अनुदिनी मुळातच वाचावी असे आपल्याला वाटले, तर लिहिण्याचे सार्थक झाले असे समजता येईल. एवढेच लिहून ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरीच सुफळ संपूर्ण करतो.
.

Sunday, September 27, 2015

MM Karnik Patra



Friday, September 18, 2015

बालपणातील धरणगाव जडणघडण 2015 दिवाळी अंक


बालपणातील धरणगांव 

ते घर आता आमचे नाही. आता ते छोटू पाटीलने विकत घेतले आहे. त्याची आई आणि आजी निमंत्रण देऊन 
गेलेल्या आहेत -- ताई, एकदा घरी येऊन जा - घर अजूनही तुमचच आहे. मी  खूपदा माझ्या  जळगांव 
दौऱ्यांमधे धरणगांवला जाण्याचा वेळ काढते असे. चिंतामण मोरया, तहसील कचेरी, बस स्टॅण्ड -- पण घरी 
जात नव्हते. पुढची किती काम राहिलीत अस मनाला बजावून, आज तरी घरी जाण्याचा मोह सोड असा धाक देऊन, मी दुसरीकडे वळत होते. 

मग एक दिवस ठरवून वेळ काढला. छोटूला आधीपासून सांगाचयी कांय गरज - असं म्हणत कुणालाच सांगितले नाही. भाईसाहेबांच्या (काकांच्या) मुलांपैकी तेंव्हा फक्त शशीच धरणगांवला रहायचा. पण त्यानेही 
आता चिंतामण मोरया जवळ नवं घर बांधलेल होतं, तिकडेच रहायचा. आयत्या वेळी वाटल तर त्याला 
सांगायच, नाही तर एकटच जायचं असं ठरवून टाकलं. 

मोरयाच दर्शन घेऊन रिवाजा प्रमाणे त्या ओट्यावर पाच मिनिटं बसले -  - शशी आणि मीरा नेमके आजच बाहेरगांवी गेले होते. आता उठून ड्रायव्हरला सांगायच - तिकडे गांवात चलायचय बर आज ! 

आणि मनांत प्रचंड उलथापालथ झाली. अस वाटल की आता घरी जाऊन, सर्व घर पुन्हा एकदा नजरेत भरून घेतल्यासारख होणार नाही – ते निव्वळ पुढील काही काळासाठी शिदोरी म्हणून असणार नाही. आज घरी गेले तर परत निघतांना बहुतेक जुन्या सर्व आठवणी त्याच्या उंबरठयापाशी ठेऊन, रिक्त होऊन परतेन. ते दर्शन “पुनरागमनायच” असणार नाही. त्या भेटीनंतर घराशी असलेले भावनिक संबंध संपतील. आठवणी कायम रहातील पण त्रयस्थाप्रमाणे, फक्त वस्तुस्थितीदर्शक. तो अखेरचा निरोप ठरेल. 
मग मी घरी गेलेच नाही. मोरयावरूनच जळगांव गाठलं आणि रात्रीच्या गाडीने मुंबई ! म्हणून ते घर अजूनही माझंच आहे -  एक भेट होईपर्यंत तरी नक्कीच!
-------------------------------------------------------------------------------------

खूप जणांना बालपणातल्या अगदी लहान वयातल्या गोष्टी आठवतात. मला तेवढया नाही आठवत. आई सांगते - माझ्या वयाच्या दोन वर्षापर्यंत आम्ही लोणावळ्याला होतो - कैवल्यधाम इन्स्टिट्यूटमधे दादा (वडील) नोकरी करत. पण त्यांना डॉक्टरेट मिळाली आणि इन्स्टिट्यूटने आता तुम्ही जास्त चांगली नोकरी बघा असा निरोप दिला. 

मग आम्हीं धरणगांवी आजोबांकडे (नानांकडे) रहायला आलो. दादांनी अनुक्रमे खांडवा (मध्य प्रदेश), व्यारा (गुजरात) आणि जबलपुरला नोक-या धरल्या - असे वयाच्या सातव्या वर्षी मी जबलपुरला आले.तोपर्यंतचा बराच काळ धरणगांवी नानांकडे गेला.

व्यारा येथील घराला मातीच्या भिंती आणि मातीची जमीन होती आणि आई त्यांना बाईकडून शेणाने सारवून घ्यायची हे मला आठवतं. त्या तुलनेत धरणगांवला नानांच्या घरांत सर्वत्र फरशी होती - फक्त स्वैंपाकघर आणि मडक्याची खोली सोडून. घर उत्तर - दक्षिण असं होतं - एल या अक्षराच्या आडव्या रेघेसारखं, आणि उभ्या रेघेच्या जागी नानांचे धाकटे भाऊ अप्पा यांच घर होतं. त्यांच्याकडील बहुतेक खोल्या  मातीच्या होत्या. मोठ्या चुलत बहिणी सगळी जमीन शेणाने सारवत. लांब हात करून छान वर्तुळाकार आणि विविध नक्षींचे ते सारवणे असायचे. त्या नक्षी आणि तो वास मला खूप आवडायचा. चुलत बहिणींमुळे मला सडा घालणे, शेणाने सारवणे, येऊ लागले आणि रांगोळीची कलापण. म्हणूनच आजही शेण, माती, चिखल हे मला कचरा वाटतच नाहीत, उलट व्यवस्थित न वापरलेल्या प्लॅस्टिकचा मात्र खूप कचरा होतो. 

माझा आजी वडिलांच्या लहानपणीच वारली होती. दादांच्या काकूलाच सर्व मोठी आई म्हणत. खानदेशांत अशी नात्यांची जवळीक फार. दूरच्या भावाच्या मामाला देखील सर्व मामाच म्हणणार. माझी आई कोकणस्थ आहे, तिला फार पेच पडायचा नाती समजून घ्यायला. नात्यांच्या या प्रकारामुळे मोठ्या आईच्या माहेरचे, माझ्या काकूंच्या माहेरचे आणि आईच्याही माहेरचे असे सगळेच मामा मावश्या होत असत. त्यांत माझा कधी गोंधळ नाही झाला.

आसपासच्या मिळून एकूण सात घरांना अग्निहोत्री वाडा असे नांव होते, मात्र त्यापैकी एक घर पाटील यांचे व 
दुसरे एक सुतार यांचे होते. अप्पा आणि पाटीलांच्या कडील गाय, बैल, बकरी वगैरे सामाईक अंगणातच बांधली जात. त्यामुळे धारोष्ण दूध, सडा-सारवणासाठी हवे तेवढे शेण, गुरांची सोबत या गोष्टी रोजच्यातल्या होत्या. पाटीलांचा कुत्रा वाघ्या आमचाही लाडका होता. त्यांच्या घरी पूर्ण शाकाहार असे. महिन्या-दोन महिन्यातून आमची फेरी त्यांच्या शेतावर होई. भुईमूग, कापूस, हरभरा, ज्वारी ही पिकं नित्य परिचयाची झालेली. ज्वारीच्या तोट्यांपासून बैलगाडीसकट निरनिराळी खेळणी आम्ही करत असू. शिवाय पत्रावळी, द्रोण  बनवणं. बुरुड गल्लीत ते लोक दोऱ्या कसे वळतात, झाडणी, सूप, टोपल्या कसे बनवतात हे ही पहायला मोठ्यांपैकी कुणीतरी घेऊन जात. रोज गुराखी येऊन गाईंना चरायला नेत आणि संध्याकाळी घरी आणून सोडत. गावातील कामे सामाइकरीत्या कशी चालत त्याचा तो नमूना होता.

दादांच्या पडत्या काळातच आईने नागपूरच्या SNDT कॉलेजमधील सोईचा फायदा घेअन बाहेरून बीए करायचं 
ठरल. लग्नावेळी ती मॅट्रिक झालेली होती.पण तिला शिकायची इच्छा होती. या बाबतीत नानांचाही फार कटाक्ष होता -- तू हुशार आहेस तेंव्हा शिक्षण पुढे ने असे कायम प्रोत्साहन होते. बीए साठी चार वर्ष लागणार होती. 
परिक्षेपुरती दोन महीने नागपूरला होस्टेल मधे राहून अभ्यास करण्याची सोय होती. त्या काळांत मी नानांकडेच असायची. एका आतेचे दोन मुलगे शिक्षणाला त्यांच्या कडेच रहात. अधून मधून दुस-या आतेचा मुलगा पण 
येई.एकत्र कुटुंब-पद्धतीचा हा फायदा मी अनुभवला कि सोय असेल तिथे इतर कित्येक जण येऊन आपापला मार्ग प्रशस्त करून घेऊ शकत होते. त्याचवेळी माधुकरी हा प्रकारही मी जवळून पाहिला. नाना आणि अप्पा 
मिळून चार-पाच मुलांची माधुकरीची जबाबदारी उचलत. घरात शिजलेल्या स्वयंपाकातून पहिला त्यांचा वाटा बाजूला काढून ठेवत. आर्थिक परिस्थितीमिळे कुणाचे शिक्षण मागे राहू नये यासाठी केवढी मोठी सामाजिक 
जबाबदारी प्रत्येक कुटुंब पार पाडत असे!

काकांच्या घरात माझ्यापेक्षा मोठी माझी चार चुलत भावंडं होती. त्यामुळे माझा सर्व वेळ धुडगुस घालण्यातच जाई. मला शाळेत घालायची घाई कुणालाच नव्हती. मात्र आईने मला अक्षर-ओळख, पाढे, लिहायला वाचायला आवर्जून शिकवले. तर नानांचा सपाटा असायचा सर्व पोरासोरांना तोंडी गणितं घालण्याचा. इतर मोठया भावडांना गांगरायला होत असतानाच मी मात्र पटापट तोंडी गणितं सोडवत असे. त्यामुळे मी नानांची लाडकी नात होते. त्यांनी मला अगदी लहान वयांत भूमिती पण शिकवली होती . 

धरणागांव हे त्या पंचक्रोशीतील मोठं गांव- ते व्यापाराच ठिकाण होत. गांवाला म्युनिसिपाल्टी होती आणि बरेच रस्ते सीमेंट कांक्रीटंचे होते. फरशांनी व्यवस्थित बांधून काढलेला मोठा बाजार होता - त्याला कोट म्हणत. लांब गिरणा नदीवर धरण बांघलेलं होत. गांवात पोस्ट ऑफिस, तार ऑफिस आणि हायस्कुल होत. शिवाय भुसावळ - सूरत लाईन वर धावणारी एक्सप्रेस गाडी देखील धरणगांवी थांबायची - इतकं ते मोठं होतं. ते गाव होत पण खेडं नव्हतं -- तरी पण गांवाला पिण्याच्या पाण्याची पर्मनंट सोय नाही म्हणून ब्रिटिशांनी तालुका ठिकाणासाठी एरंडोल या तुलनेने अत्यंत लहान गांवाची निवड केली होती. याची खंत सर्व गांवकरी बाळगून होते. अगदी अलीकडे म्हणजे सन् 2000 च्या आसपास  धरणगांव हा वेगळा तालुका करण्यांत येऊन धरणगांवी मामलेदार कचेरी आली तेंव्हा आता खंत संपली अस दादांनी बोलून दाखवलं. धरणगांवच्या मानाने एरंडोल व इतर गांवे खूप छोटी वाटत. तिकडल्या नातेवाईकांकडे गेल्यावर मनोमन मला धरणगावात सिमेंटचे रस्ते, हायस्कूल रेलवे स्टेशन, पोस्ट-तार ऑफिस असण्याचा अभिमान वाटायचा. पण पुढे जबलपुर आणि मुंबई पाहिल्यानंतर शहर -गांव-खेडं ही उतरंड मला समजू लागली. 

धरणगांवी माझी मोठया चुलत बहिणींबरोबर संध्याकाळी फिरायला जायची ठिकाणं म्हणजे राममंदिर, विट्ठल मंदिर - हे रोजचे. शिवाय कधी लांब जायचे ठरले तर बालाजीनानांचे मंदिर किंवा उलटया दिशेला चिंतामण मोरया ! बालाजी नानांचे मंदिरही विट्ठलाचेच होते पण त्यांच्या मागच्या अंगणात एक मोठा रथ अणि कृष्ण व पाचही पांडवांच्या पूर्णाकृती मातीच्या मूर्ती होत्या. दस-याला त्या रथांत पांडवांना बसवून रथयात्रा निघायची. त्या मंदिरात जाण्याच मुख्य आकर्षण ते रथ आणि मूर्ती हेच होते. या शिवाय चुलत भावा-बहिणींबरोबर कोटावर बाजाराला जाणे, पोस्टात जाणे, दळण आणायला गिरणीवर जाणे हे कमी प्रतीचे उद्योगही होते. मोठा उद्योग होता तो म्हणजे दुकानावर जाण्याचा. 

नाना पंचक्रोशीत हुषार म्हणून नांवाजले होते. त्यांच्या काळांत म्हणजे 1890 च्या आसपास कधीतरी ते व्हर्नाक्युलर फायनल (म्हणजे सातवी) ही त्या काळातली मानाची परीक्षा पास होऊन शाळेत गणिताचे शिक्षक म्हणून नोकरीला लागले होते. पण स्वतःपुरती नोकरी न करता  संपूर्ण कुटुंबासाठी असेल असे कांही तरी कर असे त्यांच्या वडिलांनी सांगितल्यावरून त्यांनी शाळेची नोकरी सोडली आणि गांवाच्या अगदी एका टोकाला लाकडाचे दुकान काढले. त्यांचे पाहून कांही मुसलमान मंडळींनी देखील त्याच परिसरांत लाकडाची दुकाने, सॉ-मिल इत्यादी काढल्या. त्या आठदहा मुसलमान कुटुंबांच्या बरोबर नानांचा चांगला घरोबा होता. दुकानावर अर्थातच धाकट्या भावाला पण घेतले. दुकानाचे सामान निवडण्यासाठी नाना गुजरातच कांय तर पार कलकत्त्यापर्यंत जाऊन आलेले होते . ते मराठी खेरीज गुजराती, आहिराणी  पण छान बोलत. आजी लौकर 
वारली पण स्वतःच्या चारही मुलांचा  सांभाळ त्यांनीच केला. त्यांना कीर्तनाचा छंद होता. गांवात विणकर समाज (साळी समाज) खूप मोठा होता. हातमागावरच लुगडी, धोतरं आणि सतरंज्या उत्तम प्रतीच्या तयार होत असत. अशा त्या साळी समाजान नाना व बालाजी नाना मिळून कीर्तन करीत असत. हा साळी समाजही बहुतांशी शाकाहारी होता. खूप पुढे बिहारमधे गेल्यावर तिथे या तुलनेने मांसाहार जास्तच दिसायचा. यातील सर्व कारणांमधे महाराष्ट्रातील पंढरपुर वारी हे ही एक कारण होते हे मोठेपणी जाणवले. साळी समाजात पूर्ण श्रावणभर नाना आणि बालाजीनाना कीर्तन करीत. नाना वारल्यानंतर ती जबाबदारी दादांनी उचलली आणि दर उन्हाळ्याच्या सुट्टीत साळी समाजासाठी महिनाभर ज्ञानेश्वरीचे विवेचन करीत ते थेट १९९९ पर्यंत. कीर्तने, पारायणे, भागवत-पाठ, देवीचा जागर इत्यादि सामूहिक कार्यक्रमांनी सबंध भारतभर समाजातील मूल्ये टिकवून ठेवली, पण आता आधुनिकतेच्या नावाखाली आपण तेी समाजमूल्य आणि ते कार्यक्रम या दोघांना हरवत चाललो आहोत असे वाटते.  

आमच घर तसं बरच मोठ. घराच्या पश्चिमेला रस्ता होता. त्या बाजूच्या खोल्या बहुधा अडगळीचे सामान ठेवण्यासाठी वापरत. मात्र उन्हाळयांत तिथे अंबांच्या राशी येऊन पडत आणी गवताच्या गंजीत ते आंबे झाकून 
ठेवले जात पिकण्यासाठी. त्या मोसमांत माझा आवडता उद्योग असायचा गंजीतून पिकलेले आंबे शोधून 
खाणं. ही परवानगी फक्त मला होती, आते-भावांना, चुलतभावांना नव्हती. त्यामुळे मी लहानपणी मनसोक्त आंबे खाल्लेले आहेत -- ते सुद्धा विविध जातींचे. घरांत रोज आमरस-पोळीचे जेवण असे. पण मला आंब्याचा 
रस खाणे - तोही दूध-तूप-साखर इत्यादी घालून खाणे हा प्रकार कधीच आवडला नाही. कदाचित म्हणूनही मला हवे तेवढे आंबे खायला परवानगी होती. त्या आंब्यांमधे शापू आंबे हा ही एक प्रकार असे. म्हणजे काही 
आंब्यांच्या झाडांवर कुठून तरी शापूचे गुणजनुक चिकटतात आणि त्या झाडाच्या आंब्यांना शापूची वास येऊ लागतो. खूप जणांना हा वास आवडत नाही, मला मात्र आवडत असे. त्याकाळी आमच्याकडे नित्यनेमाने आंबे विकणारी भागाबाई येत असे. तिने भरलेले आंबे कधी शापू असले तर हमखास गिऱ्हाइक कोण हे तिला माहीत 
असे. खूप नंतर मला श्री रणदिवे या आंबातज्ज्ञांनी सांगितले कि शापूची चव हमखास आंब्यात उतरेल असे 
प्रयोग त्यांना करायचे आहेत कारण त्यामुळे आंब्याची चव स्टॅण्डर्डाइज करता येईल आणि एक्सपोर्टसाठी ते 
अनुकूल ठरेल. एकूण काय तर तऱ्हेतऱ्हेचे आंबे आवडीने खाणे हा मला धरणगांवने शिकवलेला गुण. एरवी खूपजण हापूस शिवाय इतर आंबा खाऊच शकत नाहीत.

नानांची एक मजेदार आठवण आई सांगते. माझा जन्म आमच्या घरांतच झाला. सकाळीच पोटात काही तरी वेगळ वाटतय म्हणून देवघराची मोठी खोली रिकामी करून तयार करून ठेवली होती. बाळंतपण करण्यासाठी माझी आत्या अणि सुईण होत्या. दुपारी नाना जेवायल घरी आले - तो पर्यंत माझा जन्म झालेला. मुलगी झाली म्हणून जरा हिरमुसले होऊन ते लौकरच दुकानात परत गेले. सायंकाळी दोन तरुण मुले त्यांच्याकडे आली. कधीकाळी त्यांच्या वडिलांनी नानांकडून कर्ज घेतले होते आणि नानांनी त्याची आशा सोडून दिली होती. पण 
त्या शेतकऱ्याने मरतांना मुलांना सांगून ठेवले - ``अरे, त्या सज्जन माणसाचे कर्ज वुडवू नका ``. म्हणून वडिलांचे सर्व कार्य पार पाडल्यावर सर्वात आधी ते दोघे भाऊ नानांकडे दोन हजार रूपये परत देण्यासाठी आले होते. मग नानांचा मूड एकदमच पालटला. लगेच सोनाराकडून माझ्यासाठी गळ्यातली सोनसाखळी घेऊन व 
मिठाई घेऊन पहिली बेटी, धनाची पेटी म्हणत घरी आले. गंमत म्हणजे माझ्या वाढदिवसाला पुष्कळदा असे 
घडते की कुठले तरी जुने येणे- मग कधी ते अगदी किरकोळी असेल - पण माझ्या वडिलांना मिळत राहिलेले 
आहे. मी लाडकी नात असण्याच एक हे कारणही असेल. 

माझ्या लहानपणी दुकानावर नाना, अप्पा किंवा अप्पांची दोघं मुले - भाईसाहेब काका आणि बाळकाका ही असत. त्यांचा दुपारचा जेवणाचा डबा तयार करून घरून पाठवला जाई -तो बहुधा मी व चुलत भाऊ अनिल असे दोघे घेऊन जात असू. दुपारच्या उन्हांत पाय भाजायचे म्हणून आम्हीं अगदी पळत जात असू. त्या काळांत मुलांना चपला वगैरे चंगळ नसायची. जाता येता पोस्टात जाऊन टपालही आणत असू -- तिथले पोस्टमास्तर तार कशी करावी-- वजन कसे करावे इत्यादी दाखवत असत. तीच तऱ्हा रेलवे स्टेशनवरही होती. हा घरोबाही 
आता हरवत चालला आहे. एव्हाना दुकानाची वाढ होऊन तिथे फरशी आणि इतरही सामान ठेवले जाऊ लागले 
होते. पुढे दादांना जबलपुरची बरी नोकरी मिळाल्यावर नानांनी दुकानाचे सर्व व्यवहार भावाच्या नावावर केले, 
पण आमचे दुकानावर येणे जाणे मात्र कायम राहिले.

नाना व अप्पांच्या दोन घरांच्या मधल्या जागेत सामाईक मोरी आणि मोठी विहिर होती. विहीरीवर तीन रहाट होते. एक आमच्या सामाईक मोरीतील होता. दुसरा रहाट नानांच्या चुलत भावाचा होता आणि तिसरा सार्वजनिक -- गांवासाठी ठेवलेला होता. हे पण मी शिकलेले एक मूल्य. विहीर जरी नानांनी खणलेली होती तरी पाण्याचा एक भागात सर्व गावासाठी होता.  तिथे सकाळ संध्याकाळ गांवच्या सासुरवाशिणी, माहेरवाशिणींची 
बरीच गर्दी असाचयी. आई, काकू, सगळ्या आत्या यांची सगळ्यांशी ओळख आणि मैत्री असे. मी पण लहान 
वयातच रहाटावर पाणी काढायला शिकले.  शिवाय दुकानांत जाताना वाटेत एक मोट लागत असे. तिथे थांबून पाणी काढणारे बैल पहाणे हा आमचा आवडता छंद होता. पुढे माझ्या मुलांना आणि भाचरांना ते धरणगावी 
आल्यावर मी आणि आई आवर्जून हे सर्व उद्योग शिकवीत राहीलो. त्यामुळे ग्रामीण आयुष्याचा थोडाफार लळा त्यांनाही लागलाच.

आमच्या घरून बाहेर पडले की लगेचच मोठा रस्ता येई तो पिठाची गिरणी, पोस्ट ऑफिस, हायस्कूल वरून बस स्टॅण्डवर जाई. त्याच्या दुतर्फा इतर मोठी दुकानं होती. मग एक मोठा कमानीचा दरवाजा होता व त्या पलीकडे आठवडा बाजारासाठी विस्तृत मैदान. कमानीवर सुभाषचंद्र बोसांचे मोठे चित्र होते व दरवाज्याचे नांवही सुभाष दरवाजा होते. शिवाय गांवात एक जुनी पडकी इमारत होती व ते घर म्हणजे झांशीच्या राणीचे आजोळ असं लोक सांगत. खरं-खोट्याची पडताळणी अजून झालेली नाही. पण एवढं मात्र खरं की त्यामुळे झाशीची राणी व सुभाष हे माझे पहिले बालपणाचे हीरो होते. असा समृद्ध वारसा असूनही आपण तो जपत नाही -- पुढील पिढीला शिकवतही नाही याची खंत वाटते. फक्त चारपाचशे वर्षांचा युरोपियन संस्कृतीचा इतिहास. पण अगदी छोटीशी सांस्कृतिक विरासतही ते लोक जपून ठेवतात. तिच्या अवती-भोवती म्यूझियम, स्मृती-वन, ग्रंथशाळा, इत्यादि वास्तू उभारतात -- ते एक पर्यटन-केंद्र बनून गांवासाठी व्यवसाय पुरवते.

खानदेशांत त्या काळी धाव्याची घरे असायची. म्हणजे असे की घरांच्या भिंती बहुधा माती किंवा विटा-चुनांच्या असत. त्यांच्यावर कांक्रीटचे छप्पर कसे चालणार? पण इतरत्र असतात तसे कौलाचे छप्पर देखील नसे. त्याऐवजी चटया व लाकडी वासे घालून त्यांच्यावर खारी मातीचे थर टाकीत. खानदेशांत सर्वत्र तापी नदीच्या गाळांत येणारी माती ही चिकण माती किंवा खारी म्हणून ओळखली जाते. तिचे थर टाकले की पाणी खाली झिरपत नाही, तर त्या मातीवरून वाहून जाते. भिंतीच्या बरोबर वर एक फूट रुंद आणि एक-दीड फूट उंच अशी परोटी बांधली जायची. धाब्यामधेच मोठी चौकोनी जागा मोकळी सोडली असे त्यांना धारं म्हणतात त्यातून सूर्यप्रकाश खाली घरात जाई. पाऊस आला की शिडीने धाब्यावर चढून सर्व धारी त्यांच्या पत्राच्या झाकणांनी बंद करण्यासाठी एकच धांदल उडे. गांवातील बरीचशी धाबी एकमेकांना चिकटून असत. त्यांच्या वरून कुठेही 
जाण्यास लहान मुलांना मज्जाव नव्हता. खानदेशांत पर्जन्यमान खूप नाही, तसेच वर्षातील आठ महिने तरी कोरडेच त्यामुळे धाब्याची घरे हा सर्वांत स्वस्त पर्याय चालतो. खारी टाकायची असेल तेंव्हा ज्या घरांत खारी 
येईल त्यांच्या आसपासची सर्वजण मिळून खारी उतरवून घेऊन ती धाब्यावर टाकत-- तुझे काम मी का करू हा भाव नसे. हाच प्रकार उन्हाळ्यातील बायकांच्या बेगमीच्या कामाबाबत. ज्या घरी वर्षभरासाठी पापड, शेवया, कुरडया करायचे असतील तिथून सकाळी-सकाळी निमंत्रण येई. मग इतर बायकांनी आपापले पोळपाट-लाटणे 
वगैरे घेऊन त्या घरातील बायकांच्या मदतीला जायचे. लहान मुलांना तर अशा वेळी खूप कामे असायची. शेवये हातावर पेलून वाळत घालणे, पापड वाळत टाकणे, लाटून देणे आणि मनमुराद लाट्या खाणे. या सर्व प्रिझर्व्हेटिव्ह न घातलेल्या, वेगवेगळ्या घराची वेगवेगळी चव असलेल्या साठवणींच्या पदार्थांची चव ही मला अजूनही पर्वणीच वाटते. ही खाद्यसंस्कृतीही आपण विसरत चाललो आहोत. खरे तर "" पापड-शेवया 
घालण्याचा  सीझन """ असाही आपला एक पर्यटन-सीझन असू शकतो -- हल्ली हुरड्याचा सीझन झाला आहे 
तसाच. 

जबलपुरनंतर दोनच वर्षांत दादांना बिहार सरकारच्या प्रथितयश मिथिला संस्कृत रिसर्च इन्स्टिट्यूट मधे 
प्रोफेसरशिप मिळाली. त्याच वेळी नानांचे निधन झाले. तोवर आम्हीं तिघे भावंडं होतो. उन्हाळ्याची मोठी सुटी असायची. त्यांमुळे दरवर्षी सुटीत आम्ही धरणगावी येत असू. इथल्या शाळेतही मी चुलत भावंडांसोबत जात असे. त्यामुळे हे ही धडे पक्के होत असत. अशाप्रकारे आम्हा तिघांना मराठी व हिंदी दोन्ही भाषा उत्तम येऊ लागल्या. मुख्य म्हणजे वेगवेगळ्या प्रांतांची वेगळी संस्कृति, वेगळा इतिहास आणि तरीही सांस्कृतिक 
जवळीक मला दिसली आणि भावली. धरणगांवी आल्यावर धुळे, अंमळनेर, चालीसगांव, चोपडा आदि ठिकाणी नातेवाईकांकडे फिरणे होई. मनुदेवी, पद्मालय,  उनपदेवचे गरम झरे आणि खुद्द धरणगांवचा चिंतामण मोरया, इथे नेहमी जाणेयेणे होई. मुंबई आणि आईचे माहेर--कोकणातले देवरुख इथेही फेऱ्या होत असत. शिक्षणानंतर मी भारतीय प्रशासन सेवेत आले व मला केडरही महाराष्ट्रच मिळाले, त्यामुळे धरणगांवचे ऋणानुबंध कधी संपलेच नाहीत, संपूही नयेत.

मात्र इतक्या वर्षांमधे धरणगावात काही बदल निश्चितच झाले आहेत. इथला विणकर समाज आपले कौशल्य व त्यातून मिळणारी उपजीविका दोन्ही हरवून बसला आहे. विकेंद्रित एकॉनॉमीची जागा सेंट्रलाइज्ड एकॉनॉमीने घेतली आहे. त्यामुळे भांडवली गुंतवणूकीसाठी मोठे आर्थिक पाठबळ असलेल्यांपुरता जिनिंगचा व्यवसाय वाढला आहे. सुभाष दरवाजा कधीच मोडीत निघाला आणि आता इतर पुतळे असले तरी पुन्हा कोणी सुभाषचंद्र बोसांची आठवण ठेवलेली नाही. गावात हायस्कूल सोबत दोन कॉलेजेस आहेत पण बेरोजगारी आणि बकालपणाही खूप आलेला आहे. रस्ते जसजसे खराब होत गेले तसतशी निगा राखलेली नाही. खानदेशातील जवळपास सगळ्याच गांवांची हीच स्थिती आहे. तरीही खानदेशी मातीत एक प्रकारची जिद्द, टिकाऊपणा आणि आदरातिथ्य आहे, असे मला वाटते. त्यामुळे अचानक या सुरवंटाचे फुलपाखरू होऊ शकते.

मला धरणगांवची एक आठवण आवर्जून नमूद करावीशी वाटते. कॉलेजात असताना सर्वांचे धरणगावी येण्याचे 
तिकिट काढलेले आणि माझी परीक्षा अचानक पुढे ढकलली गेली. एव्हाना मला रेलवेने एकटीने लांबचा प्रवास करण्याची सवय झालेली होती म्हणून बाकी सर्व मंडळी धरणगावी आली.   मी मैत्रिणीकडे राहून परीक्षा आटोपून यायचे असे ठरले. आम्हाला भुसावळ किंवा जळगावला गाडी बदलावी लागत असे. जळगांव येण्याची वेळ सकाळी पाच आणि पुढे धरणगांवची गाडी सात वाजता -- त्यामुळे मी घरी यायला आठ तरी होणार हा सर्वांचा हिशोब. पण रात्री मी चुकून भुसावळलाच उतरले आणि समोरच भुसावळ-सूरत फास्ट लागली होती ती पकडून पाच वाजताच मी धरणगांव स्टेशनवर उतरले. अंधारी रात्र. पण कोटावर जाणारी दोघ -तिघ होती त्यांच्या सोबतीने मी तशा आंधारातच घरी पोचले देखील -- आणि अचानक मला जाणवले -- या गावात आपण कधीही कुठेही बिनदिक्कत जाऊ-येऊ शकतो -- जणू सगळा गांव हे  माझ्या घराचे आंगणच. गॉन विथ दी विण्ड या कादंबरीतील नायिका म्हणते की कधीही संकट आले की आपल्या जन्मगावी येऊन तिला स्वस्थता लाभे आणि मार्गही दिसे -- तशीच माझीही अवस्था धरणगावच्या बाबतीत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------