हे वाचत्येय-- लोकसत्ता वाचनरंग दि 08-07-09
लोकसत्ता
हे वाचतेय....
गुप्तहेर कथांमधील गूढपणामूळे आजही रॉ चं आकर्षण आहे.
बाबुराव अर्नाळकरांचा काळा पहाड, त्यानंतर जे.बी. जासूस यांची गुप्तहेर कथांची मालिका वाचनात आली. त्या कथांनी मला रमवलं. गुप्हेर कथांमधला गूढपणा, त्यातील चातुर्य या साऱ्यांची मोहिनी आजही कायम आहे. इतकी की आज जर मला विचारल, की या क्षणी कुठलं काम करायला आवडेल, तर 'रॉ' चं प्रमुख व्हायला असं माझं उत्तर असेल. असा माझ्यावर या पुस्तकांचा प्रभाव होता. अजूनही आहे.
एका सुसंस्कारित कुटुंबात जन्मल्याने वाचनाचे संस्कार सहजच झालेत. लेक वाचतेय अस लक्षात आल्यावर घरच्यांनी सगळ्यात प्रथम हाता दिलं ते चांदोबा मासिक. वयानुसार वाचन बदललं असलं तरी चांदोबा आजही हातात घेतलं की तितक्याच आवडीनं मी वाचते. राम, श्रीकृष्ण यांची ओळख मला चांदोबातून झाली. त्यामध्ये येणाऱ्या रामायण, महाभारत कथांच्या मालिकेमुळे ते वाचण्याची गोडी वाढली. राजपुतांचा इतिहास मला त्यातून कळला. वडिलांनी गोडी लावलेल्या श्रीमद्भगवद्गीतेचा प्रभाव आजही कायम आहे. त्यामुळेच की काय आताही भगवद्गीता मला कंठस्थ आहे.
सध्या नंदन नीलेकणी यांचं 'इमॅजनिंग इंडिया- आयडियाज फॉर द न्यू सॅच्युरी' हे पुस्तक वाचतेय. डॉ. कलाम यांनी व्हीजन-2020 या पुस्तकातून सांगितलेल्या 2020च्या भारताच्या वास्तववादी स्वप्नांच्या दिशेने केलेली प्रत्यक्ष वाटचाल, असं हे पुस्तक आहे. कलामांनी सांगितल्याप्रमाणे प्रशिक्षित, सुशिक्षित युवाशक्ति हीच उद्याचा भारत घडवेल. नीलेकणींनी याच युवकांच्या डोळ्यांत स्वप्न पेरण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे ज्यांनी कलाम वाचलेत, त्यांनी आवर्जून हे पुस्तक वाचावं. तशा अर्थांने हे पुस्तक कलामांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं केलेली आगेकूच !
जबलपूरला आमच्या शाळेत पहिली, दुसरीच्या वर्गांना वरच्या वर्गातले विद्यार्थी शिकवित असत. त्या शिकवणाऱ्यांमध्ये मी होते. त्यामुळे अभ्यासासोबतच अवांतर वाचनाची सवय जडली. आम्हाला श्री दाणी नावाचे मुख्याध्यापक होते. आम्ही वर्गात शिकवताना ते येऊन बसत. त्याचा प्रभाव शिकवताना पडत असे. अशा वातावरणातच वाढल्यामुळे वाचनाचे संस्कार खोलवर झालेत ते कायमस्वरूपीच. भौतिकशास्त्र, अध्यात्म हे माझे आवडते विषय. गोविंद वल्लभ पंत यांची भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावरील 'अमिताभ' ही कादंबरी अजूनही स्मरते. त्यातील भाषा, वर्णन, रसाळ शैलीमुळे सिद्धार्थ कळला, समजला, उमगला. नंतर इगतपुरीला विपश्यनेस जाण्याचाही योग आला. पण जेंव्हा जेंव्हा बुद्ध, त्यांचे विचार वाचायला घेतले, तेव्हा तेव्हा सारखं वाटायचं की हे पात्र माझ्या परिचयातलं आहे. त्याला मी ओळखते. या आधी मी ते समजून घेतल आहे. एका पुस्तकामुळे पुढचं तत्वज्ञान समजून घ्यायला अशी मदत झाली.
त्यानंतर रामधारी सिंह दिनकर' यांचं 'रश्मीरथी' हे दानशूर कर्णाच्या जीवनावरचं हिदींतलं खंडकाव्य वाचनात आलं. या पुस्तकाचं वर्णन मी हिदींतले 'मृत्युंजय' असं करीन. त्यामुळे कर्ण समजला.
घरात आईवडीलांनी वाचनसंस्कृती रूजवली. मी इयत्ता चौथीमध्ये पहिली आल्यांतर 'अरेबियन नाईटस बक्षीस मिळालं. ते वाचून खरं बोलण्याचा संस्कार आपोआपोच झाला. आपलं आयुष्य सच्चेपणानं जगता आलं पाहिजे. इतरांनाही ते शिकवता आल पाहिजे, हा संस्कार दृढ झाला. अजून एक इंग्रजी पुस्तक ज्याचा उल्लेख करावासा वाचतो. ते म्हणजे 'द गुड अॅण्ड द ग्रेट' महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चार महामानवांवरचं हे पुस्तक आम्हाला दहावी-अकरावी साठी होतं. त्यातला गांधींजींनी सांगितलेला सत्याग्रह आजही आठवतोय. ते म्हणत, सत्याग्रह म्हणजे 'स्टॅडिंग फर्म ऑन द ग्राउंड ऑफ ट्रुथ युझींग ओन्ली द फोर्स ऑफ लव्ह'. यामुळे सत्याग्रहानं अवघा भारत ढवळून निघाला होता. गांधींच्या जीवनामध्ये स्वावलंबनाचं प्रतीक असलेल्या चरख्यानं अगदी अलीकडच्या काळात मलाही आकर्षित केल. मी स्वत वेळ काढून सूत कातायला शिकले. नंतर एक प्रयोग करून बघितला, चालताना टकळीवर सूत कातण्याचा, अन् तो जमलाही. त्यामुळे यंदाच्या आषाढीच्या वारीत मी स्वतः वारकऱ्यांसमवेत सूत कातत वारीत फिरले.
असच एक पुस्तक मी वयाच्या साधारण सोळाव्या वर्षी वाचलं. 'लाल रेखा'. बिहारच्या जीवनावर, तेथील संस्कृतीवर असलेलं हे पुस्तक आजही विस्मरणात गेलेलं नाही. एका क्रांतिकारकाची ही कथा. त्याची आई आसपासच्या गावातल्या लोकांकडे चरख्यावर विणण्यासाठी पेळू देते व गावकऱ्यांनी कातलेलं सूत त्यांना मोबदला देऊन परत केंद्रात घेऊन जाते. असं हे साधं काम. पण आजारी असताना तू हे काम करू नकोस, असं तो मुलगा त्याच्या आईला विनवतो. तेव्हा आईच उत्तर असत – "अरे, आज जर मी हे काम केल नाही तर त्यांच्या घरात सात दिवस चूल पेटणार नाही". तत्कालीन भारतांच,, त्यातही बिहारमधील दारिद्र्याच हे चित्र. मला मात्र त्यातून उमगलं ते चरख टकळीचं तत्वज्ञान, जे आजही आचरणात आण्याचा प्रयत्न करतेय.
आयएएसच्या परीक्षेसाठी अभ्यासासाठी म्हणून केटलबी यांच 'युरोपियन हिस्ट्री' या पुस्तकातून इतिहास नव्यानं समजून घेतला. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील कथा नव्हे, तर तत्कालीन समाजपरिवर्तनाचे संदर्भ, उत्थान, पतन साऱ्यांचा ऊहापोह म्हणजे इतिहास हे समजाऊन देणार ते पुस्तक अजून आठवतय.
अलिकडच्या काळात एडवर्ड डी बोनो यांची 'लॅटरल थिंकिंग' वरची पुस्तकहीं भावली. पीटर ड्रकर हा लेखकही वाचून काढला. कुठलं पुस्तक वाचावं, या प्रश्नावर मात्र आता मुलांची मदत होते. कारण ते निश्चितच काळासोबत राहतात. वाचतात. टीव्हीमुळे मुलं वाचनापासून दूर गेली हे काही अंशीच खरं आहे. सध्या संघर्षपूर्ण कथा, वास्तविक जीवनाशी नाळ जोडणाऱ्या साहित्याकडे मुलांचा कल मला दिसतो.
काही पुस्तके अकारण गाजली, असंही मला वाटतं. भालचंद्र नेमाडयांचं कोसला हे त्यातलच एक. त्यामध्ये केवळ हॉस्टेलभोवती फिरणार कथानक, नायकाला आलेलं अन् शेवटपर्यंत टिकलेलं वैफल्य. परत तशाच वैफल्यावस्थेत झालेला पुस्तकाचा शेवट, यामुळे मला कदाचित तसे वाटत असेल. याखेरिज पुलंचं अपूर्वाई, पूर्वरंग या पुस्तकांनी मला रमवलं. गो.नी. दांडेकरांचं 'मोगरा फुलला' व श्री.ना. पेंडसे यांचं रथचक्र त्यातील भाषेमुळे व आशयामुळे मला आवडलं.
अर्थात माझ्या लहानपणीच्या काळात किर्लोस्कर, वसंत यातून अनेक लेखकांशी वाचनामुळे ओळख झाली. सिंदबादच्या सफरी, शेक्सपिअरची नाटकं वाचलीत. ' धर्मयुग' हे साप्ताहिक, पराग यांसारख्या मासिकाच्या वाचनातून वाचनाचे चिरस्थायी संस्कार झालेत. या साऱ्या वाचनप्रवासात एक अजून उमगलं. जे जे चांगलं वाचलयं ते ते इतरांना सांगितल पाहिजे. रामदासांनी म्हटलच आहे, 'जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे,, सकल जन. यातूनच रवींद्रनाथ पराशर या एका आयएएस आधिकाऱ्याने इंग्रजीत लिहिलेल्या द लास्ट पास या कादंबरीचे मराठीत भाषांतर केले. खिंडिच्या पलीकडे ही ती कादंबरी. जे जे सर्वोत्तम आपणास मिळेल, त्याचा वाटा सर्वांना दिला पाहिजे, इतरांना अर्पण केला पाहिजे, ही भावना दिवसेंदिवस अधिकच दृढ होतेय. वारीतून सूत कातणे असो किंवा प्रशासनातले काम असो. कदाचित हे सारं त्यातूनच येत असेल.