Tuesday, May 31, 2011

जबलपूरचे दिवस पहिले दशक --part 3-7

part 8 about dad's interview and nana's death yet to input
पहिले दशक --3--
मी सात वर्षाची असतांना दादांना जबलपुरला हितकारिणी कॉलेज मधे बरी म्हणावी अशी लेक्चररची नोकरी मिळाली आणि आम्ही सर्व म्हणजे नाना, आई - दादा, मी, पाठची दोन भावंडं छाया, सतीश, आणि धाकटया आतेची मुलगी मंगल असे आम्ही सर्व जबलपुरला आलो. कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. बाजपेयी त्यांच्या स्वत:च्या मोठया घरांत एकटेच रहात - तिथलाच खालचा मजला आम्ही भाडयाने घेतला. शिवाय त्यांचे जेवणही आईने बनवायचे असेही ठरले. तेंव्हा पहिल्यांदा आम्ही कच्ची रसोई, पक्की रसोई हा प्रकार पाहिला. आम्ही ब्राह्मण आणि डॉ.बाजपेयी हे ही ब्राह्मण- म्हणून तर ते आईचा स्वैंपाक खाऊ शकत होते. पण त्याच्या मते ते अधिक उच्च ब्राह्मण होते - कांदा - लसूण न खाणारे - कान्यकुब्ज (कन्नौजी) ब्राह्मण . त्यामुळे आईला त्यांच्याकरता ``पक्की रसाई`` बनवावी लागे - म्हणजे कांय तर स्पैंपाकात कुठेही पाणी वापरायचे नाही त्या ऐवजी दूध वापरायचे - भात शिजवायल दूध, कणीक भिजवायला पण दूध. भाजी तेलांत नाही तर तुपावर करायची. पण आई ती सर्व पथ्य सांभाळत असे. अशा प्रकारे घरांत दोन वृद्घ माणसं आणि चार मुलं पण आईने मला कधीच घरातल्या कामाला लावलं नाही, मी स्वत: करीन तेवढच. मला पण गोष्टीची पुस्तकं आणि बाहेरचे खेळ यातून मधेच आठवण होई - मग मी कांहीतरी काम करून आपण आईला मदत केल्याचे समाधान मानत असे.

जबलपुरला साहाजिकच मला शाळेत घालण्यांत आले. पहिल्या दिवशी हेड मास्तरांनी तोंडी चाचणी घेऊन माझी सरळ तिसरीच्या वर्गांत रवानगी केली. तिये गणिताचा तास चालू होता. तोंडी गणितांचा. सगळयांनी पाटी जमीनीवर उलटी ठेऊन उभं रहायच - मास्तर सांगतील ते गणित तोंडी सोडवायच - बसा म्हटल की पटकन पाटीवर उत्तर लिहून पुन्हा लगेच उभं रहायच. जो उभ रहाण्याला उशीर करेल त्याला ओरडा. अशी वीस उत्तंर मी लिहिली. परीक्षा किंवा पाटीवर अनुक्रमपूर्वक उत्तर लिहिण्याची शिस्त हे सर्व मला नवीन होत. माझा अनुक्रम चुकला आणि, पन्नास पैकी फक्त सदतीस मार्क पाहून मला रडू कोसळलं. घरी कधीही माझं उत्तर चुकलेलं नव्हत आणि इथे ही नामुष्की ! तेवढयांत मास्तरांनी जाहीर केल - आजच्या परीक्षेत सर्वात जास्त मार्क आहेत सदतीस - कोणाचे मार्क आहेत, त्याने पुढे यावं ! मी रडतच पुढे गेले. मास्तर म्हणाले - रडतेस कांय ? सर्वात जास्त बरोबर तुझीच उत्तरं आहेत. मी म्हटल पण माझी तर सर्व उत्तरं बरोबर होती मास्तरांनी पुन्हा पाटी पाहिली - खरच माझी सर्व उत्तरं बरोबर होती - पण क्रम लिहितांना उलट - सुलट झाले होते. हे शीक, पुन्हा अशी चूक करू नको म्हणत मास्तरांनी मार्क तेवढेच ठेवले. घरी आल्यावर नानांनी हे ऐकल आणि तेंव्हापासून तोंडी गणिताऐवजी मोठी आणि पाटीवर सोडवायची गणित करून घेऊ लागले - हेतू हा की लेखी परीक्षांमधे मी मागे राहू नये.

तरी पण शाई, निब, वही हे सर्व मला नवीन होत. वहीवर शाईचे डाग पडत - चार आखलेल्या ओळींमधे लिहिण्याची सवय नव्हती. आम्हाला शुद्घलेखनाची सवय लावण्यासाठी बाईंनी पहिल्या दिवशी अभ्यास दिला - पहिल पानभर एकच वाक्य लिहायच होतं, ते मला अजून आठवतं `` गाडी येऊन फलाटावर उभी राहिली`` हे ते वाक्य. फलाट म्हणजे स्टेशन (प्लॅटफार्म वरून) हे तेंव्हा कळल. मला त्या शब्दाची खूप गंमत वाटली. आमच्या घराच्या मागे अगदी जवळ मदनमहाल रेल्वे स्टेशन होते. तिकडे बोट दाखवून फलाट-फलाट म्हणत मी खूप हसले होते.

अक्षर चांगल दिसाव यासाठी एक युक्ति आहे - अस म्हणू­न बाईं­नी पहिल्या दिवशीच एक युक्ती सांगितली होती - अक्षरांच्या सर्व उभ्या रेघा काटेकोर उभ्या आणि आडव्या रेघा अगदी काटेकोर आडव्या काढायच्या - मग अक्षर आपोआप छान दिसतं. पण ही युक्ति शिकायला ­तशी सोपी ­नाही. काटेकोर उभ्या आणि आडव्या रेघा काढता येण्यासाठी हाताला ते वळण ­नीट बसवावं लागतं.

पुटे इतर ब-याच व्यक्तींची हस्ताक्षरं बघून कळल की ज्या व्यक्ती तिरक्या रेघा काढ­तात, त्यापैकी कांहींचं अक्षर छा­न दिसत, कारण त्यांच्या रेघा तिरक्या असल्या ­तरीही आपापसांत समांतर असतात. पण ज्यांच्या रेघा समांतर रहात नाहीत, त्यांच अक्षर चांगलं दिसत ­नाही.

पण बाईं­नी युक्ती सांगितल्यामुळे त्यातलं शास्त्र कळलं, एक वेगळी सौंदर्यबुद्घी आली आणी तेंव्हापासू­न चांगल्या हस्ताक्षराचं मला फार आकर्षण आहे.

त्याच बाई­ंनी आम्हाला पुस्तक कसं धरावं, कसं वाचावं, हे ही शिकवलं. मोठ्याने इतरां­ना वाचून दाखवायचे असेल तर वाक्य रचनेप्रमाणे कुठे किती थांबायचं, वाचता वाचता अनावश्यक भाग गाळत कस वाचायचं, पुस्तक बाजूला ठेऊन एखदी गोष्ट सांगायची असेल ­तेंव्हा त्या योष्टी­तील किंवा धडयातील खास खास उल्लेखनीय जागा कशा ­न विसरता उद्घृत करायच्या वगैरे. पुढे कॉलेजात एका शिक्षकां­नी रॅपिड रीडीग कस करायच, त्यासाठी पुस्तक आडव डावीकडून उजवीकडे आणि प्रत्येक रेघेच्या बरोबर अस ­न वाचता वरू­न खाली, आणि तरीही प्रत्येक रेघेतील महत्वाचे मुद्दे डोळ्यांनी टिपत वाचन कसं करतात ते शिकवल. या अशा ब-याच कौशल्याच्या बाबी आहेत - त्यांना मी युक्तीच म्हणते - त्या हल्ली शाळा कॉलेजात फारशा शिकवल्या जात ­नाहीत.

अशीच एक युक्ती आजोबांनी मला शिकवली होती. साधारण पणे पाच-सात आकडयांची बेरीज करता­ना आपण आधी ­ते आकडे एकाखाली एक आणि एकम् खाली एकम् असे ­नीट रचून घेतो. पण ­आजोबांती मला आडवें लिहिलेले आंकडे असले तरीही त्यांची ­न चुकता बेरीज करणयाची सवय लावली होती. शिवाय एकाच वेळी कांही आकडे बेरजेचे व काही वजा घालवायचे असतील ­तरी तेही तिथल्या तिथेच कर­ायला मला शिकवले.

तसच आई­ने पाढे शिकवातां­ना युक्ती केली होती. शाळेत ­नेहमीच्या पद्घती­शिवाय एका वेगळ्या पद्धतीने पाढे पाठ करू­न घेतले होते. ती पद्घत म्हणाजे छोटया छोटया कामांच्या वेळी विचारायची - तिना आठे? पाच साते ? ­सहा चोक ? अगदी धरणगांवी विहिरीवर धुणी धुतां­ना ती माझे पाढे असे पक्के करू­न घेत असे.

मी पण मुलांना गणितं शिकव­ायला ही युक्ती वापरते .मी घरा­च्या भिंतीवर 9 खणांचे असे चौको­न चिकटवू­न ठेवले आहेत. दोन ­ते दहाच्या पाढ्यांसाठी सात चौको­न आणि अकरा ­ते वीस साठी आठ चौको­न. मुलां­नी रोज दो­न्ही गटातील एका-एका चौको­नातील उत्तरे धडाधड सांगून दाखवली पाहिजेत.

पहिले दशक --4--
जबलपूरला आल्यामुळे धरणगांवच्या तुलनेत माझ विश्व खूपच विस्तारल होतं - आणि कितीतरी माध्यमा­तून. धरणगांव ­ते जबलपुर हा रेल्वे प्रवासच कि­ती तरी मोठा होता, जबलपुर हे अफाट मोठ शहर हो­तं. इथे खूप विस्तारलेली ­नर्मदा ­नदी होती, भेडाघाटचे धबधबे अणि संगमरवरी दगडांचे डोंगर होते. शाळा होती.

दादा मला खूपदा सायकलवर बसवू­न फिरायला ­नेत. अशा एका प्रसंगी सकाळी ­नऊ-दहाच्या सुमारास ­नर्मदा­तीरी गेलो होतो. ­नर्मदेच्या वहात्या लाटांवर सूर्यकिरण पडू­न मोठाल्या हि-यांचा हार वहात जावा अस दृश्य तयार होत होतं. तो हार एक ठराविक अंतर वहात जाऊन दिसे­नासा होई कारण तिथे सूर्यकिरणांचा कोण बदलत असे .पण पुन्हा मागे पहिलं तर दुसरा हार येतां­ना दिसे. ते दृश्य अजू­नही मला आठवतं.

पुढे ­नववीत आम्हाला हिंदीचे श्रेष्ठ कवि जयशंकर प्रसाद यांची भारत भूमि बद्दल कविता होती ----

हिमालय के आंगन में उसे प्रथम किरणोंका दे उपहार ।
उषाने ­ हँस अभि­नंद­न किया और पह­नाया हीरक-हार ॥

तेंहा मला वाटलं - ­नक्की यां­नीही एखाद्या ­नदीच्या पात्रातली सूर्यबिंब पहिली असतील - ­नाहीतर हीरकहाराची उपमा कशी सुचेल ?

जबलपुरला एक गीता-प्रवच­न सोसायटी किंवा अशाच कांहीतरी ­नांवाची संस्था हाती - तिथे दादा मला खूपदा घेऊन जात - तिये बरेचदा लहा­न मुलांसाठी गीता-श्लोक पाठ­ांतराच्या स्पर्धा होत. पहिल्यांदा त्या स्पर्धे­त गेषे तेंव्हा बारावा अघ्याय पूर्ण म्हणू­न दाखवू­न मी पहिल बक्षिस पटकावल. दुसच्या वेळी पंधरावा अध्याय म्हणू­न. तिसच्या वेळपर्यंत मी पाचवा अध्याय पाठ केला होता. तो म्हटला पण बक्षीस ­नाही मिळालं - त्या ऐवजी चार-पांच श्लोक म्हणणा-या एका मुलाला मिळालं. दादां­नी तिथल्या परीक्षकां­ना कारण विचारल.

पाचव्या अध्यायांत एक कठिण श्लोक आहे - कृष्ण अर्जु­नाला सांगतो की माणूस कर्म करत ­नाही असा क्षणभरही ­नसतो - तो - क्षणोक्षणी - खूप कर्म करीतच असतो - आणि त्यातू­न त्याची इंद्रिय उपभोभ घेत असतात - पहाण्यातू­न, ऐकण्यातू­न, स्पर्शातू­न, वास धेण्यातू­न - - -
तो श्लोक दादांनी संधी विच्छेद करू­न म्हणायला शिकवला होता - हेतू हा की पाठांतराला सोपा व्हावा आणि अर्थ समजायला पण. मी ­तसाच म्हटला - पश्यन्‌, श्रृण्वन्, स्पृश­न्, जिघ्र­न्, अश्न­न्‌, गच्छ­न्, स्वप­न्‌, श्वस­न्‌ ।

संधीकरून लिहिला तर या आठ शब्दांचा मिळू­न एक शब्द होतो - ज्याला संधी सोडवायला येणार ­नाही त्याला हा श्लोक ­कधीच वाचा­यला येणार ­नाही. शिवाय संस्कृत मधील संधीच्या नियमा­नुसार अ­नुस्वाराचा उच्चार पुढल्या अक्षरावरू­न ठरत अस­तो त्यामुळे यातील कित्येक ­न्‌ चा उच्चार ञ असा होतो व तेही म्हणायला कठिण जाते .

पण परीक्षकां­ना कांही हा युक्तिवाद पटला ­नाही. तेंव्हा मी ठरवू­न टाकल की आपण मोठे झाल्यावर संस्कृत मधील संधी हा प्रकारच काढू­न टाकायचा.

जबलपुरला असतांना एकदा हिंदू-मुसलमा­न दंगल झाली. आमच्या शाळेतू­न सगळया मुलांना पटकन एका मोठया शाळेत हलवलं. खूप मुलां­ना त्यांचे आई- वडील घेऊन गेले. खूप कमी मुल उरली. घरी जाण्याचा रस्ता माही­त ­नाही. तेवढयांत सायकलवर­ दादा येता­ना दिसले - घामा­ने निथळणारे शरीर - डोळयांत अपार भिती. मुलीला कुठे कुठे शोधू हा असहाय्य भाव तोंडावर । तो चेहरा पण अजू­न आठवतो. आणि मला पाहिल्याबरोबर त्यांना किती हायसं वाटलं ते पण आठवतं. आम्ही तडक घर गाठलं. पुढे दो­न दिवस कर्फ्यू होता. उशीर झाला असला तर कदाचित त्यां­ना मला शोधायला बाहेर जाण्याची
परवा­नगी पण मिळाली ­नसती. अगदी अलीकडे बॉम्बे सि­नेमातील चित्रण पाहून मला जबलपुरचा प्रसंग आठवला.

ती दंगल का झाली मला माही­त नाही. खरे तर जबलपुरला मोहर्रमचे ताजिए पहायला जाण्याची मौज वाटायची. त्यांत खूपशी लहा­न मुले शरीरभर वाघाचे पट्टे रंगूवून ­नकली बाघ बनून फिरत. रात्री ताजियांवरची सजावट पहाण्यासारखी असायची. लोक आक्रोश का करत हे तेंव्हा कळत ­नसे. पुढे मुसलमा­नांमधील शिया - सुन्नी पंयांचा इतिहास वाचला तेंव्हा तो कळला.

जबलपुरचा दुसरा मोठा उत्सव म्हणजे होलिका दह­नाचा. सर्वत्र होलिका व प्रल्हाद यांच्या सुंदर मूर्ती बसवत - आपल्याकडील सार्वजनिक गणेशोत्सव असतो त्या प्रमाणे. शिवाय इतर देखावेही मांडले जात. पौर्णिमेच्या रात्री त्या पुतळयांचे दह­न केले जाई - त्यांत होलिका जळून जात असे - प्रल्हादाची मूर्ति वाचवली जायची. त्याच्या पुढे पाच दिवसां­नी रंगपंचमी यायची. त्यासाठी आम्ही शहरभर फिरून पळसाची आणि पांगा-याची फुले गोळा करीत असू -ती रात्रभर पाण्याच्या बादली­त ठेवली की पंचमीला रंग खेळप्यासाठी आमचे बादलीभर पाणी तयार होत असे. जबलपुरला असे पर्यंत रंगपंचमीच्या रंगांची हीच ब्याख्या होती.

पहिले दशक --5--
जबलपुरचे सवंगडी
शाळेच्या वर्गातल्या हुषार मुलीमुलांमधे मी, छाया परांजपे, सरोज गोळवलकर या मुली व श्रीराम फडके ही नांवं मला आठवतात. छाया परांजपे लग्न होऊन महाराष्ट्रात आली आणि आता नाशकांत स्थायिक झाली आहे. तिचे यजमान महाराष्ट्र काडरचे आय्एएस अधिकारी श्री गिरीश गोखले हे नाशिकला डिव्हिजनल कमिशनर असतांना दोघांनी नाशिकला स्थायिक होऊन हॉटेलिंगच्या व्यवसायांत पडायच ठरवल, ख-या अर्थाने छायाच ते सांभाळते. आमच्या लहानपणी छाया हे नांव खूप पाप्युलर होत. सरोजची धाकटी बहीणही छाया, माझी धाकटी बहीणही छायाच. पण छाया परांजपेचं लग्नानंतर नाव मात्र लीना ठेवल, त्यामुळे आम्ही आता समनामी (गोड उर्दू शब्द - हमनाम) झालो . सरोजचे यजमान ज्युडिशियरी मधे होते ते नुकतेच सुप्रीम कोर्ट जजच्या पदावरून निवृत्त झाले.

शाळेनंतर खेळायला शेजारची मोजकी घरं होती. त्यामधे पोहनकर परिवार आणि दाते परिवार मला आठवतात. पोहनकर मावशी शास्त्रोक्त गायनासाठी जबलपुर मधे नांवाजल्या होत्या. त्या रियाजाला बसायच्या व कधी कधी त्यांचा धाकटा मुलगा सुधीर शिकाऊ तबला वाजवायला बसायचा. मोठा मुलगा अजय पण आईकडे गाण शिकायला बसायचा. आता त्या पंडित अजय पोहनकरांचे मोठे नांव झाले आहे. सुधीरचे नांव मात्र तबल्याच्या क्षेत्रांत ऐकायला मिळाले नाही. तसेच दात्यांची रसिका कुठे असते माहीत नाही. लहानपणी ती एकदम गोरीपान सुंदर परीसारखी दिसायची. अशी आम्ही सर्व मुल-मुली एकमेकांच्या अंगणात धुडगूस घालत असू. बाजपेयींच्या घराच्या मागे विलायती चिंचेचे मोठे झाड होते, त्यावर जिलबीच्या आकाराच्या शेंगा लागत. तसेच एक बकुळीचे झाड होते. त्या विलायती चिंचा व बकुळीच्या फळांनी आम्ही खिसे भरून घ्यायचो. त्यासाठी बाजपेयींची नजर चुकबून त्यांच्या गच्चीवर जावे हा एक छंद होता. पुढे त्यांचा मोठा मुलगा तिथेच रहायली आला तेंव्हा आमच गच्ची प्रवास बंद झाला.

त्यावेळी आमचा एक आवडता पण धोकादायक खेळ होता. घराशेजारून एक रस्ता मदन महाल स्टेशनच्या मागच्या बाजूला जाऊन संपायचा. त्या रस्त्यावर तासाला सुमारे एक किंवा दोन गाड्या (कार, मिनीबस, टेम्पो) जायच्या. त्या लांबून येतांना दिसल्या की आम्ही खेळ यांबबून रस्त्थाच्या कडेला उभे रहायचो. वाहन जवळ आले की त्याच्या गतिचा अंदाज घेउन धावत त्या वाहनासमोरून रस्ता क्रॉस करून जाणे हा आमचा खेळ होता. पुढे मी ड्रायव्हिंग करू लागले आणि गाडीसमोरून लहान मूले जातांना पाहिले तेंव्हा कुठे समजले की आम्ही त्या त्या ड्रायव्हरांच्या पोटांत कसा गोळा आणला असेल. आमचा कधीही अपघात झाला नाही याचे कारण आमची धावण्याची कला किंवा जजमेंट नसून त्या ड्रायव्हरने जिवाच्या आकांताने गाडीचा स्पीड कमी केला हेच असणार हे आता कळते.

शाळा व शेजार या खेरीज आमचा खेळण्याचा अजून एक ग्रूप होता. दादांच्या कॉलेजमधले एक फिजिकल ट्रेनिंगचे प्राध्यापक श्री बेहरे यांच्याकडे आम्ही चौघ मुलं खूपदा खेळायला जायचो. बेहरेकाका नवे नवे खेळ शिकवायचे. त्याआधी मी धरणगांवी खेळलेले खेळ म्हणजे विटी-दांडू, भोवरा, पतंग आणि कांचेच्या गोटया हे मुलांचे खेळ आणि सागरगोटे, रांगोळी स्पर्धा किंवा काचापाणी हे मुलींचे खेळ . घराशेजारी फक्त लपाछपी, आंधळी कोशिंबिर, लंगडी आणि भेंड्यांचे खेळ होते. पण बेहरेकाकांकडे दोरीवरच्या वेगवान उड्या, चेंडू-लगोरी, साधा चेंडू आपटवण्याचा खेळ, असे कितीतरी नवीन खेळ शिकायला मिळायचे. टप्प्याच्या खेळांमुळे पाढे पक्के करून घेता येतात हे मी कधीतरी ओळखले व मोठेपणी त्याचा वापर केला.

या शिवाय एक खेळायचा ग्रूप म्हणजे जबलपुरला आमच्या घरापासून बरेच लांब आमचे एक चुलत काका महाजन रहात असत, त्यांचे घर. त्यांना नीरा, निमा, निरूपमा, नीना अशा चार मुली होत्या त्यापैकी निमा माझ्या वर्गांत होती. त्यांच्याकडे सागरगोटे खेळण्यासाठी राजस्थानी पद्घतीने खास घडवून घेतलेले चौकोनी आकाराचे रंगी-बिरंगी लाखेचे खडे होते. त्यावर आम्ही खेळत असू. मी धरणगांवी मोठ्या चुलत बहिणींमुळे या खेळांत प्रवीण होते. माझ्या कडचा डाव खूप वेळ जात नसे . मग निमा म्हणायची - देवा जाऊ द्या ना हो. मला आश्चर्य वाटायचे की यांच्या घरांत देवाला अहो का म्हणतात. आमच्या घरांत देखील कृष्णभक्तीची परंपरा होती. देवघरांतल्या मूर्तीची सांगड महाभारतातल्या कृष्णाशी होती. त्याला महाभारतातील सर्व पात्र अरे कृष्णा असच म्हणायची. गीताप्रेस गोरखपुरचे महाभारताचे नऊ खण्ड आम्ही गोष्ट समजून नेहमी वाचन असू. त्यामुळे अगदी भीष्माने शिशुलाल-वधाच्या प्रसंगी स्तुती केलेला कृष्ण असो की अर्जुनाला गीता सांगणारा कृष्ण असो - त्याचे संबोधन माझ्या दृष्टीने नेहमी एकवचनीच होते - महाजनांचा घरांत मात्र देवासाठी आदरार्थी बहुवचन वापरले जाते हे मी पहिल्यांदा बघितले . त्यांच्या घराच्या आसपास नेहमी वाळूचे मोठे ढीग पडलेले असायचे. त्यांत वाळूची घरे बनवणे आणि शंख शिंपले व चांगले दगड शोधणे हाही माझा आवडता छंद. असे मी जमवलेले छान छान दगड आणि शंख शिपले घरातील इतर मंडळींनी कांय ही अडगळ म्हणून फेकून दिल्याच्या घटना खूपदा झाल्या आहेत त्यामुके माझा छंद आता हट्ट या संवर्गात गेला आहे असा त्यांचा आक्षेप आहे.

पहिले दशक --6--
दादांनी त्यांच्या कॉलेज वयापासून ज्योतिष विद्या चांगली शिकून घेतली होती. आम्ही त्यांचे वर्तवलेले भविष्य कधाही खोटे पडलेले पाहिले नाही. एकदा सकाळी त्यांची त्यांचे स्वप्न सांगितले . एक अंगुष्ठ-मात्र मुलगा त्यांना विचारत होता - मी तुमच्याकडे येऊ कां ? तेंव्हा त्यांनी महाजनांच्या घराच्या दिशेने बोट दाखवून म्हटले - अरे त्यांचा घरी तुझी गरज आहे, तिथे जा. कांही दिवसांनी काकूंना दिवस गेल्याचे त्यांनी आईला सांगितले व यथावकाश त्यांच्या कडे मुलगा जन्माला आला.

एकदा आईला स्वप्न पडलेले तिने नाना व दादांना सांगितले. नानांचे मोठे भाऊ - त्यांना रामभाऊ काका म्हणत, त्यांना धरणगांवच्याच दुस-या एका अग्निहोत्री कुटुंबाने दत्तक घेतले होते . पण दुर्देवाने रामभाऊकाका व सीताकाकू हे जोडपे पण निपुत्रिकच होते . त्यांची संपत्ती आम्हा सर्वांच्या मानाने खूप जास्त होती. नानांच्या घराला लागून जे अप्पांचे घर होते त्याच्या पलीकडे लागूनच रामभाऊकाकांचे एक लांबोळे घर होते – चार पाच खोल्यांचे . पण ते तिथे रहात नसत. तिथून थोडया अंतरावर त्यांचे एक आणखीन मोठे घर होते, तिथे रहात. आम्हीं जबलपूरला आलो त्या सुमारास ते वारले होते व सीताकाई एकट्याच रहात होत्या. आमच्या घरांत अजूनही दोन आतेभाऊ शिक्षण पूर्ण करायला राहिलेले होते . त्यापैकी श्रीकृष्ण हा आतेभाऊ व अप्पांचा धाकटा मुलगा बाळकाका हे साधारण एकाच वयाचे होते . ते दोघे सीताकाकूं ची कांही कामं करून देण्यासाठी जात. त्यावेळी खूपदा त्यांनी घरांत नाग पाहिला होता . असा समज पसरला होता की रामभाऊकाका स्वत:च नाग होऊन संपत्ती रक्षणासाठी तिथे राहिले होते . असो .

तर आईने स्पप्न पाहिले की सीताकाकू वारल्या आहेत व त्यांच्या शेवटच्या क्रिया कोणी पूर्ण करायच्या याचा वाद झाल्याने प्रेत तसेच पडून आहे. साधारणपणे आईला कुठलेच स्पप्न पडत नाही (किंवा दादा म्हणतात ना - तिला उठेपर्यत आठवण विसरलेली असते) हे स्वप्न ऐकल्यावर दादा मनांतून चरकले - त्याकाळांत फोन करून विचारण्याची सोय नव्हती. फार तर तार पाठवता येईल - मग तारेचे उत्तर येणार - मग तयारी करणार – दादांनी विचार केला आणि सरळ धरणगांवी जायला निघाले. तिथून परन आल्यावर सांगितलेली हकीकत अशी - दादा धरणगांवी पोचले तेंव्हा खरोखरीच आईने स्वप्नांत पाहिल्याप्रमाणे सीताकाकूंचे निधन झालेले होते . त्या निपुत्रिक असल्याने त्यांच्या मागे राहिलेल्या दोन घरांवर दादांचे काका अप्पा यांनी दिराच्या नात्याने हक्क सांगितला होता. मात्र त्यांच्या शेवटच्या आजारपणांतील उस्तवारी त्यांच्या भावाने केली असून तोही संपत्तीत वाटा मागत होता. त्या वादामुळे प्रेत उचलले जात नव्हते. दादा पोचल्यावर त्यांनी सांगून टाकले का ते या वादात वाटेकरी नाहीत . त्यानंतर दोन्हीं गटांमधे समझौता झाला. सीताकाकूंचे रहाते घर त्यांच्या भावाने घेतले आणि अप्पांच्या घराला लागून असलेले घर अप्पांनी घेतले त्यानंतरच सीता काकूंचे सर्व विधी पार पडले .

मी तेंव्हा जेमतेम सात वर्षांची असेन. पण या प्रकारामुळे माझ्या मनांत संपत्ती लोभाच्या संबंधीने एक प्रकारची वितृष्णा निर्माण झाली तो संस्कार पुढेही दृढ़ होत गेला आणि साध्या रहाणीकडे माझा कल वळत गेला.

पहिले दशक --7--
मी पाचवीत जात असतानाची गोष्ट. मागील दोन वर्षात सगळयाच मास्तरांची मी लाडकी विद्यार्थिंनी होते. पण चवथीची ऐन परीक्षा तोंडवार आली असतांना गणित विषयाचे एक नवीन मास्तर आले आणि कां कुणास ठाऊक त्यांनी फटकन माझ्यावर रागच नाही तर डूख धरला. माझ्यावर ओरडण्याची संधी ते शोधत असत. आमच्या शाळेत दाणी मास्तरांच्या शिस्तीमुळे मुलांना छडी मारण्यास इतर शिक्षकांना बंदी होती आणि स्वत: हेडमास्तर असलेजे दाणी मास्तर हळूवार पणे छडी मारत असत. शिवाय माझे गणित पक्के होते आणि हस्ताक्षरही चांगले व सुवाच्य होते. मला फार कधी ऐकावे लागले नव्हते. तरीही नव्या मास्तरांना ओरडयासाठी कांही तरी संधी मिळतच असे.

एकदा धाकट्या सतीशने खूप हट्टकेला की मी पण शाळेत येणार. त्या काकांत शाळांचे वातावरण मोकळे-चाकळे असायचे. धाकटया भावाला कां आणलस असं कुणी विचारल नसत. म्हणून आम्हीं दोघी बहिणी त्याला शाळेत घेऊन गेलो. गणिताची परिक्षा होती. तीन तासांचा पेपर. आता परीक्षा सुरू होणार तेवढ्यांत त्याने रडायला सुरुवात केली. चारच वर्षांचा होता तो - एवढे अनोळखी चेहरे पाहून पहिली दहा पंधरा मिनिट त्याने कसाबसा उत्साह टिकवून धरला होता, पण आता त्याला घरी जायचे होते . शेवरी मास्तरांची परवानगी घेऊन मी त्याला घरी पोचवायला निघाले. त्याला कडेवर घेअन जेवढं पळण शक्य होत, तेवढं पळत. त्याला घरी सोडून पुन्हा पळत शाळेत आले. दोन्ही वेळा विसाव्यासाठी एक - दोन मिनिटं सुमारे मध्यावर असलेल्या प्रेम मंदिरात थांबले होते . अजूनही आठवतात सकाळच्या बिनगर्दीच्या वातावरणांत त्या मंदिरांत ती एक दो मिनिट फक्त मी व ती सुबक संगमरवरी, पूर्णाकृती राधा कृष्णाची मूर्ति एवढेच होतो पण त्यानेच मला धीर आला होता

पळत शाळेत आले तो अर्धा तास पाऊण तास होऊन गेलेला. पण माझी हरकत नव्हती . पुढल्या तासा -दीड-तासांत सर्व पेपर सोडवून मी मास्तरांच्या हातात दिला . त्यांना खूप आश्चर्य वाटले . मला म्हणाले थांब, किती चुका केल्यास त्या बघतो, तीन तासांचा पेपर आहे हा. त्यांनी पूर्ण पेपर चाळला - एकदा, दोनदा - सर्व गणितं बरोबर होती. त्यांनी बोलून दाखवले - सगळी बरोबर आहेत, हुषार दिसतेस हं. त्यानंतर मला पुन्हा त्या मास्तरांना तोंड द्यावं लागल नाही .
-----------------------------------------------------------------
part 4 about dad's interview and nana's death