युगान्तर घडतांना
नेहमी आपण ऐकतो कि हिंदू धर्मांत चार वेद संगितले आहेत -- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तसेच चार वर्ण आहेत -- ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आश्रम पण चार आहेत -- ब्रह्मचर्य, गार्हस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. युगे देखील चार आहेत -- सत्ययुग, त्रेतायुग द्वापरयुग आणि कलीयुग. मला तरी वाटते की या सर्व संकल्पना एकांत एक गुरफटलेल्या आहेत.
असे मानतात की सत्ययुगांत समाज ही संकल्पना उदयाला आली होती पण राजा आणि राज्य ही संकल्पना मात्र उदयाला आलेली नव्हती. आगीचा शोध, आकडयांची व गणिताची संकल्पना या सर्वांच्या पुढे मानवजात पोचलेली होती. शेतीला तसेच पशुपालनाला सुरुवात झाली होती पण तरीही ज्ञानाच्या कक्षा फारश्या रुंदावल्या नव्हत्या. माणूस समाजात रहात होता, तरी शेती आणी गांव-समाजावर अवलंबून नव्हता. अजूनही वने त्याला तेवढीच जवळिकीची होती ज्ञानसाधना मोठया प्रमाणावर होण्याची गरज होती. ज्ञानाच्या नव्या कक्षा शोघणे शोघलेल्या ज्ञानाचा प्रसार इतरांपर्यंत करणे आणी त्या ज्ञानाच्या आधारे उपजीविका करण्याची घडी बसवणे या तीनही बाबी महत्वाच्या होत्या. म्हणूनच जंगलात राहून ज्ञानासाधना चालत असे. तिथेच ज्ञानाच्या प्रसारासाठी गुरुकुलेही चालत. अशी मोठी गुरुकुले चालवणारे ऋषि आपल्याकडे विद्यार्थी आणून ठेवीत. त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करीत. त्यांच्याकडून कामेही करून घेत. फार मोठी विद्यार्थी संख्या असेल त्या ऋषिंना कुलगुरु हे नाव संबोधन होते. या संबोधनाचा वापर महाभारतात झालेला आहे.
एकीकडे व्यवसायज्ञानाचा प्रसार होऊन शेती, पशुसंवर्धन, शस्त्रास्त्रांचा शोध इत्यादि गोष्टी घडत होत्या. आरोग्य रक्षणासाठी आयुर्वद निर्माण होत होता. जलदगति वाहने तयार होत होती. शंकराचा नंदी, दुर्गेचा सिंह, विष्णूचा गरुड, कार्तिकेयाचा मयूर, गणपतिचा मूषक, लक्ष्मीचे घुबड, सरस्वतीचा हंस, यमाचा रेडा, सूर्याचा घोडा या सारखी वाहने नेमकी कुठल्या दिशेने संकेत करतात हे आज समजणे कठीण आहे. पण वायुवेगाने जाणारा व तशी गति लाभावी म्हणून जमीनी पासून काही अंगुळे वरून चालणारा इंद्राचा रथ होता तसेच पुढील काळांत आकाश मार्गे जाणारे पुष्पक विमान कुबेराकडे व त्याच्याकडून लंकाधिपती रावणाकडे आलेले होते. त्याही पलीकडे मनाच्या वेगाने संचार करण्याची व तीनही लोकांत कुठेही क्षणार्धात पोचण्याची युक्ति नारदाकडे होती. प्रसंगी आपल्या बरोबर ते इतंरानाही या प्रवासात सामिल करुन घेऊ शकत होते. थोडक्यांत तीव्र गतीच्या वाहनांचा शोध खगोल शास्त्र आणि अंतरिक्षशास्त्र या सारखे विषय लोकांना अवगत होते. या भौतिक विषयां बरोबरच जीवन म्हणजे कांय, मरण म्हणजे कांय, जीव कुठून आला, चैतन्य म्हणजे कांय, मरणोत्तर माणसाचे काय होते हे प्रश्न देखील माणसाच्या कुतूहलाचा विषय होते. सत्य आणि अमरत्वाचा कांहीतरी गहन संबंध आहे व तो नेमका काय याची चर्चा वारंवार होताना दिसते. कठोपनिषदात यम नचिकेत संवादातला कांही भाग मला नेहमीच विस्मित करतो. वडिलांनी सांगितले -- जा, तुला मी यमाल दान करतो. म्हणून नचिकेत उठून यमाकडे जातो, व तो घरी नाही म्हणून त्याच्या दारात तीन दिवस रात्र वाट बघत बसतो. याचा अर्थ यम ही कोणी आवाक्या बाहेरील व्यक्ति नव्हती. पुढे आलेली सावित्रीची कथा किंवा कुंतीने यमाला पाचारण करून त्यापासून युधिष्ठिरासारखा पुत्र मिळवणे या कथाही हाच संकेत देतात. यमाची पत्नी त्याला सांगते -- हा ब्राह्मण तीन दिवस कांही न खातापिता आपल्या दारांत बसून राहिला आहे. आधी त्याला कांहीतरी देऊन शांत कर जेणेकरून त्याचा आपल्यावर क्रोध न होवो व आपले कांही नुकसान न होवो.
यम नचिकेताला तीन वर मागायला सांगतो. त्यापैकी दोन वरातून नचिकेत वडिलांचे प्रेम व पृथ्वीतलावरील सौख्य मागतो पण तिसर्या वरातून मात्र मृत्युपलीकडील ज्ञानाची मागणी करतो. यम त्याला परावृत्त करण्यासाठी स्वर्गसुख व अमरत्व देऊ करतो तेंव्हा नचिकेत उत्तरतो --ज्या अर्थी तू मला या ज्ञानाऐवजी ती सुखे देऊ करतोस त्या अर्थी या ज्ञानाची महती नक्कीच त्या सुखा पेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणून मला तेच ज्ञान हवे. त्यानंतर यम प्रसन्न होऊन त्याला यज्ञाचा अग्नि कसा सिद्ध करायचा व त्यातून सत्याचे ज्ञान कसे मिळवायचे व त्यातून मृत्युपलीकडील गूढ रहस्य कसे समजून घ्यायचे हे शिकवतो.
दुसर्या सत्यकाम जाबालीच्या कथे मधे देखील जाबालीच्या सत्य आचरणावर प्रसन्न होऊन
स्वत आग्नि हा हंसाचे रूप धारण करून चार वेळा त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो. त्याचे वर्णन करताना -- ऐक, आज मी तुला सत्याचा पहिला पाद काय ते शिकवतो -- अशी भाषा वापरली आहे. त्रिलोकाच्या पलीकडे जाऊन अंतरिक्षातील ज्ञानाच्या संबंधात जे सात लोक सांगितले आहेत त्यापैकी सर्वांत शेवटच्या व सर्वात तेजोमय लोकाचे नाव सत्यलोक असे आहे. तिथे पोचण्यासाठी ब्रह्मज्ञान आवश्यक आहे. ईशावास्योपनिषदात याच ज्ञानाला विद्या व पृथ्वीवरील भौतिक ज्ञानाला अविद्या असे म्हटले आहे पण विद्या आणि अविद्या या दोन्ही सारख्याच महत्वाच्या मानल्या आहेत. जाणकार माणसे विद्या आणि अविद्या या दोघांना पूर्णपणे समजून घेतात मग अविद्येच्या सहाय्याने मृत्युपर्यंत पोचून मृत्यूला पार करून विद्येच्या सहाय्याने अमरत्वाचे प्राशन करतात -- म्हणूनच ईशोपनिषदात सत्यधर्माय दृष्टये ही प्रार्थना तर मांडूक्योपनिषदात सत्यमेव जयते नानृतम् हे ठाम प्रतिपादन केलेले आहे. अशा या सत्ययुगात देखील गणितशास्त्र फार पुढे गेलेले होते. विशेषत कालगणनेचे शास्त्र. पृथ्वीतलावरील कालगणना वेगळी आणी ब्रह्मलोकातील कालगणना वेगळी होती. ब्रह्मलोकातील अवघा एक दिवस म्हणजे आपत्याकडील कित्येक हजार वर्षे असे गणित होते. विविध देवतांनी किंवा असुरांनी कित्येकशे वर्ष तपस्या केली. पार्वतीने शंकरासाठी एक हजार वर्षे तप केले या सारखी वर्णने जर सुसंगत असतील तर त्यांचा संबध या इतर लोकांशी असावा असे मला वाटते. अशा कालगणनेच्या आधारे पृथ्वीतलावर सत्ययुगाचा काळ वर्षे आहे अस सांगितले आहे. त्या काळांत ज्ञानाच्या शोध आणि विस्तार हे समाजाचे प्रमुख ध्येय होते.
त्यानंतर आलेल्या त्रेतायुगाची कालगणना वर्षे सांगितली आहे. या काळात राजा ही संकल्पना उदयाला आली. तानचा विस्तार होताच पण आता जोडीला नगर रचना, वास्तुशास्त्र, भवन निर्माण, शिल्प यासारखे व्यावहारिक पैलू महत्वाचे ठरू लागले. ज्ञानातून सृजन झाले व संपत्ती निर्माण झाली, त्याच बरोबर संपत्तीचे रक्षण महत्वाचे ठरले. धनुर्वेदाचे शास्त्र जन्माला आले. आग्नेयास्त्र, महेंद्रास्त्र, वज्र, सुदर्शन चक्र, ब्रह्मास्त्र यासारखी बलाढय अस्त्र शस्त्र निर्माण झाली. समाजाचे रक्षण करण्यासाठी तसेच समाजातील व्यवस्था टिकवून धरण्यासाठी राजे राजवाडे आले. त्यांनी सैन्य ठेवले. त्याचा खर्च भागवण्यासाठी कर बसविण्याची कल्पना उदयाला आली. शेतीच्या जमीनींवर मालकी हक्क निर्माण झाले. उत्पादनावर कर बसवला जाऊ लागला. हे सर्व सांभाळले जावे म्हणून समाजाची धुरा क्षत्रियांच्या खांद्यावर आली. ज्ञानसाधनेच्या कारणासाठी ब्राह्मणांचा मान कायम होता पण पुढारीपण क्षत्रियांकडे आले. महत्वाच्या प्रसंगी राजगुरूंचा सल्ला घेतला जाई -- ब्रह्मदंडाचा मान राजदंडाच्या मानापेक्षा मोठा होता. पण राजगुरू व ब्रह्मदंड या दोघांचा वापर नैमित्त्िाक होता.
रोजच्या व्यवस्थेसाठी राजा हाच प्रमाण झाला. राजाच्या रूपाने विष्णु भगवान् स्वतचा वावरतात अशी संकल्पना पुढे आली. संपती निर्माण होण्यासाठी इतर कित्येक नवे व्यवसाय आणि तंत्रज्ञान पुढे यायला हवेत. भवन निर्माणासाठी धातुशास्त्र हवे तसेच सुतार लोहार ओतारी हवेत. इतर गोष्टींसाठी विणकर धनगर चांभार हवेत. आयुर्वेदातील स्वस्थवृत्तातील यम-नियम दुय्यम महत्वाचे होऊन औषध निर्मितीला अधिक महत्व आले कारण लढाईतील जखमांवर औषधे हवीत पशुवैद्यकातील ज्ञान एवढे वाढले की सहदेव नकुल आणि भीम यांच्या सारखे क्षत्रिय अनुक्रमे गाई-घोडे आणी हत्तींच्या वंशवृद्धिच्या शास्त्रात पारंगत होते. रथ निर्मिती, रथ हाकणे, होडया, रस्ते, बांधणे तलाव धरणे आणी कालवे बांधणे ही शास्त्र लोकांनी हस्तगत केली. भगीरथाने तर प्रत्यक्ष गंगाच स्वर्गातून उतरवून पृथ्वीवर आणल्याची कथा आहे- हिमालयातून निघून पश्च्िामेकडे वहाणार्या गंगेचा प्रवाह ज्या तहेने एकाएकी पूर्वाभिमुख झाला आहे त्यावरून धरणांचे शास्त्र देखील प्रगत झाले असावे असे कळते. रामाने समुद्रातच पूल बांधला. नाणी, विडा आरसे, धातुंचे शिल्प इत्यादी कित्येक उद्योग जन्माला आले.
सत्ययुगामधे शेतीचा जन्म झाला पण द्वापर युगात उद्योग व हस्तकलांचा जन्म झाला त्याचबरोबर वर्णाश्रमांची संकल्पना मोठया प्रमाणात मूळ धरू लागली. ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार करेल तो ब्राह्मण. लढाया व राज्यकारभार बघेल तो क्षत्रिय. कृषि, गोरक्ष, व्यवसाय किंवा व्यापार करेल तो वैश्य आणि सेवा शुश्रुषा व देखभाल करेल तो शूद्र असे वर्ण भेद पडले. तरीपण हे प्रत्येक माणसाच्या जन्मावर अवलंबून नसून गुण व कर्मावर अवलंबून आहेत असे भगवद् गीता सांगते. त्याप्रमाणे खरेच विष्णुला क्षत्रिय तर त्याचाच पुत्र असलेल्या ब्रह्मदेवाला ब्राह्मण मानले जाते. शंकर वर्णांच्या पलीकडे आहे पण गणपति मात्र ब्राह्मण मानला जातो. पण कार्तिकेय मात्र क्षत्रिय. अश्र्िवनी कुमार व धन्वन्तरी कोण म्हणायचे? पण ही एवढी थोडी उदाहरणं सोडली तर समाजात मात्र एखाद्याचा जन्मजात वर्ण वेगळा असूनही अंगी असलेले गुण व केलेले कर्म यांच्या आधारे त्याचा वर्ण वेगळा ठरला असे विश्र्वामित्रासारखे एखादेच उदाहरण त्या काळाच्या वाड्मयात सापडते. की हे फक्त समाज धुरिणांचे स्वप्नच राहिले असे म्हणायचे? असो.
त्रेतायुगानंतर आलेल्या द्वापर युगाचा काळ वर्ष मानला जातो. या युगांत राज्य ही संकल्पना पूर्ण पणे भरभराटीला आली. असे मानतात की महाभारत युद्ध हे द्वापर युगाच्या शेवटच्या टप्प्यात घडले. या काळांत राज्य व्यवस्थेबरोबरच व्यापार व्यवस्था भरभराटीला आली. महाभारताच्या युद्धात त्या काळी शीर्षस्थ असलेले बहुतांश राजे व क्षत्रिय मारले गेले तेंव्हा सुव्यवस्या टिकवण्यासाठी कशाप्रकारची समाज रचना झाली किंवा आधी सत्ययुगांत राजे नव्हते तेंव्हा, त्यानंतर परशुरामाने एकवीस वेळा क्षत्रियांसोबत युद्ध करून निक्षत्रिय पृथ्वी केली त्या काळांत व महाभारत युद्धामुळे क्षत्रियांचा संहार झाला. त्याही काळांत राजे व राज्यव्यवस्था फारसे प्रभावी राहिलेले नसूनही समाज व्यवस्था कशी टिकून राहिली हा एक अभ्यासाचा विषय आहे. त्यानंतर आले ते कलियुग. त्याचा कालावधी वर्षांचा सांगितला जातो. सध्या त्यापैकी ---वे वर्ष चालू आहे. त्यामधे गेल्या दोन अडीच हजार वर्षात जे घडले ते आपल्या समोर आहेच. इ.स.च्या पंधराव्या शतकात लोकशाहीची कल्पना पुढे आली व गेल्या पाचशे वर्षात जगभर ही कल्पना ग्राहय होऊन तीच राज्यव्यवस्था ठरली. कांही देशांचे राजे व डिक्टेटर्स वगळता लोकशाही हा शब्द परवलीचा होऊन बसला.
याचाच अर्थ असा झाला की त्रेता व द्वापर युगांत जी राजा ही संकल्पना रूढ झाली ती आता कालबाह्य ठरत आहे. सोळाव्या शतकापासून खुष्कीच्या मार्गाने ससैन्य आक्रमण इत्यादिंच्या जोडीने समुद्री मार्गातून प्रवास व त्यातूनच व्यापार उदीम ही कल्पना उदयाला आली. काल्पनिक असूनही सिंदबादच्या सफरींच्या गोष्टींना अरेवियन नाइट्स मधे मानाचे स्थान होते. या कालांत इंग्लंड स्पेन पोर्तुगात या देशांमधे समुद्र सफरी, सागर मार्गांचे नकाशे तयार करणे, उच्च दर्जाच्या नौका व नौदल बांधणे हे महत्वाचे ठरले. त्या काळांत खुष्कीच्या मार्गाने व्यापारासाठी भारतातून यूरोपात येणारा माल उच्च कोटीचा असे त्यामधे कापड, रेशीम, जडजवाहिर, कलाकुसर, मसाले इत्यादि असत. त्याच्या बदल्यांत या देशांकडे व्यापारासाठी शस्त्रास्त्रे होती. तलवारी आणी तीरकामठयांचा जमाना चालू राहिला पण त्या जोडीला तोफा आल्या. हळू हळू बंदुका पण आल्या. भारता बरोबर व्यापार चालू ठेवायचा तर शस्त्रास्त्रातील प्रगति वाढायला पाहिजे. इथूनच पुढे यूरोपात शस्त्रनिर्मिती हा मोठा उद्योग आणि व्यापार बनून वाढू लागला.
समुद्री मार्गानेच भारतात यायचे हे ठरवून वास्को डि गामा सर्व प्रथम भारतात पोचला. त्यानंतर भारत शोधायला निघालेल्या कोलंबसने अमोरिका हा नवा प्रदेश, नवे जग शोधून काढले. हा प्रदेशही खनिजांच्या दृष्टीने सुसंपन्न होता. यूरोपीय देशांतून बोटीने भारतात तसेच अमेरिकेतही फे-या सुरू झाल्या. इकडे आपण मात्र त्याच सुमारास समुद्रोल्लंघन हे धर्माबाहेरचे ठरवून टाकले. पृथ्वी प्रदक्षिणा आणि वसुधैव कुटुम्वकम् ही संकल्पना असणा-या आपल्या देशांत समुद्र ओलांडायचा नाही, समुद्रयात्रा निषिद्ध ही संकल्पना कशी व कां आली? जर समुद्रोल्लंघन करणारा मारूति हा पूजनीय तर इतरांना समुद्रयात्रा कां बरे निषिद्ध? असो. पण कधी काळी हे झाले खरे. अठरावे व एकोणविसावे शतक दोन तर्हेने विशिष्ट म्हणता येईल. याकाळांत विज्ञानाची प्रगति भरधाव झाली. तसेच प्रगत व शस्त्रे आणि नौदल बाळगून असणार्या देशांनी इतर देश जिंकून तिथे आपली राजवट प्रस्थावित केली. एव्हाना लोकशाठीची कल्पना सगळीकडेच मूळ धरू लगली होती. विसाव्या शतकांत ज्यांनी वसाहतवादाच्या विरूद्ध लढा दिला त्यांनी लोकशाही आणि त्यातील तीन तत्वे समता, बंधुता आणि न्याय यांच्यावर भर देऊनच लढा दिला. आज आपल्याल सर्वत्र लोकशाही रूढ झालेली दिसते त्याचे कारण देखील हेच आहे.
लोकशाही मधे राजे संपले पण समाजव्यवस्था चालण्यासाठी राज्यव्यवस्था मात्र अजूनही आवश्यक राहिली. या नव्या राज्यव्यवस्थे मधे प्रत्यक्ष सैन्य, त्याने भूभाग जिंकणे समोरा समोरच्या लढाया इत्यादी संकल्पना मागे पडल्या. व्यापावी संकल्पना समोर येऊ लागल्या आहेत उत्पादनक्षम व्यावसायिक व्यापारी तसेच ज्याला आज आपण सर्विस सेक्टर म्हणतो ते म्हणजेच विविध प्रकारच्या सेवा पुरवू शकणा-या कंपन्या पुढे आल्या आहेत. ब्रह्मदंड किंवा राजदंडापेक्षा आता आथिर्क शक्ति अधिक प्रभावी ठरू लागली आहे. त्याच बरोबर काम हा पुरुषार्थ -- उपभोग घेणे, हेही समाजात जास्तीत जास्त मान्यता पाऊ लागले आहे. परंतु उपभोगवाद जास्त पसरला की त्याचे रूप विकृत होऊ शकते. महाभारत काळांतही असा प्रसंग आला की युद्धानंतर पृथ्वीवरील जवळ जवळ सगळीच राज्ये नष्ट झाली किंवा संपली. उरले ते हस्तिनापूर येथे युधिष्ठिराचे आणि लांब द्वारकेत यादवांचे. यादवांनी लढाईत भाग घेतलेला नव्हता. मग द्वारकेत चंगळवाद वाढू लागला. मद्य, शिकार, खेळ, मनोरंजन यातच सर्व गुरफटले. शेवटी त्या मनोरंजनाची परिसीमा झाली ती ज्ञानी सच्छील मुनींची टिंगल टवाळी करण्यांत आणि त्यांच्या शापातून यदुवंशी वीरांनी आपापसात भांडणे करून एकमेकांना नष्ट केले.
आज जगाकडे पहातांना अर्थकारण, अर्थव्यवहार, व्यापारी उलांढाली यांना अतिशय महत्व आलेले आहे हे कळून येते. याचा उगमही यूरोप मधे अठराव्या शतकांत जी औद्योगिक क्रान्ती आली त्यामधून झाला. उद्योगधंदे किंवा उत्पादन हे केंद्रित असू शकते तसेच विकेंद्रित देरवील असू शकतो विकेंद्रित उत्पादन व्यवस्था बहुतांश सर्वसमावेशक असते. तशीच ती टिकाऊ असते. दीर्घकाळ चालणारी असते. पण केंद्रित उत्पादन व्यवस्थेमधे त्या मानाने हजारोपट मोठी उत्पादनक्षमता असते. अशी क्षमता असेल तेंव्हा सर्व तर्हेचे मागचे व पुढचे धागेदोरे देखील त्याच पद्धतीने विणावे लागतात. उदाहरणार्थ एक फळ प्रक्रियेचा कारखाना असेल तर त्याला दररोज इतकी टन फळे, इतके पाणी, इतकी वीज, इतके टिनचे डबे लागणारच. तसेच तितके गिर्हाईक, तितके मार्केट, तितकी जाहिरातबाजी लागणारच. अशा वेळी नैतिक अनैतिक हा विचार फार जास्त करता येत नाही. अमेरिकेला तिथल्या शस्त्र कारखान्यांत बनणारी शस्त्रे विकली जायला हवी असतील तर जगांत कुठल्या तरी दोन देशांना आपसांत लढत ठेवणे हे देखील ओघाने आलेच. किंवा एखाद्या कंपनीने लाखो युनिट इन्सुलिन बनवणारा कारखाना काढला तर तेवढया लोकांना डायबिटिस होणे गरजेचे आहे तरच इन्सुलिन खपेल. असो ही टोकाची उदाहरणे आहेत. पण वस्तुस्थितीला धरूनच आहेत.
अठरावे आणि एकोणविसावे शतकांत हे औद्योगिक उत्पादन वाढीचे शतक होते. आधीची कृषिवर आधारित अर्थव्यवस्था झपाटयाने उद्योग आधरित बनत गेली. प्रायमरी सेक्टर चे वर्चस्व जाऊन सेकंडरी सेक्टर (उद्योग) पुढे आले. त्याबरोबर त्याला लागणारे वेगळ्या त-हेचे कसब पुढे आले. पूर्वीची कृषिला पोषक अशी बारा बलुतं मोडीत निघून नव्या प्रकारच्या कौशल्याची गरज निर्माण झाली. विसाव्या आणि एकविसाव्या शतकांत सेकंडरी सेक्टर देखील मागे पडले आहे. आता तिसरा टप्पा टर्शियरी किवा र्सव्हिस सेक्टरचा आहे. याला लागणारी कौशल्ये आणि प्रशिक्षण हे पुन्हा ओद्योगिक काळांत लागणा-या कौशल्यापेक्षा वेगळे असते.
या ही पुढे जाऊन आर्थिक क्षेत्रांत आता अर्थ उत्पादनाचा विचार करतांना प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी क्षेत्राखेरीज तीन सेक्टर्स महत्वाची टरत आहेत. आपण हवेतर त्यांना चौथे, पाचवे आणि सहावे क्षेत्र म्हणूं. त्यातले एक इन्फ्रास्टूक्चर किंवा मूलभूत सुविधा निर्माण करण्याचे क्षेत्र व दुसरे इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन चे क्षेत्र आहे. त्यांचा अंतर्भव पूर्वी जरी तिस-या सेक्टर मधे व्हायचा तरी आता त्यांची वेगळी नोंद घेण्याची गरज वाटू लागली आहे. सहावे सेक्टर आहे ते आरडी-एचआरडी चे. म्हणजे संशोधन आणि त्याचबरोबर मानव विकासाचे. म्हणूनच आता कौशल्य- प्रशिक्षण, पेटंट, इन्टेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट हे विषय वेगळे सेक्टर म्हणून हाताळण्याची गरज जाणवू लागली आहे. कदाचित उद्याचे युगांतर घडतांना ते या मुळेच घडेल.
या आधी औद्योगिक क्रान्ति ने एक नव्या युगाला जन्म दिला होता तसेच विजेचा शोध आणि त्याही पेक्षा मोठया अर्थाने विजेच्या बल्बच्या शोधाने एक नवे युगान्तर घडवले. बल्बचा आविष्कार एडिसन ने केला त्या अगोदर सर्वत्र तेलावर चालणारे दिवे किंवा मशाली होत्या. रात्रीवर अंधाराचे साम्राज्य असायचे. फार थोडया जागी व फार थोडया प्रमाणात रात्रीच्या वेळी व्यवहार चालू शकत. आता चोवीस तास उजेडाची व चोवीस तास काम करत रहाण्याची सोय झाली आहे ती या आविष्कारामुळे. बल्ब आले आणि रात्रीची अशी एक वेगळी संस्कृती तयार झाली. अशीच क्रान्ति रेडियो, टीव्ही, कम्प्यूटर व मोबाइल यांनी आणली आहे. टिशू कल्चर आणि क्लोनिंग मधून एक वेगळी क्रान्ति निर्माण होणार आहे. पण निव्वळ अशी क्रान्ति म्हणजे युगांतर नाही. जेंव्हा त्या नव्या आविष्काराने समाजाचे जीवन मूल्यच बदलते, समाज व्यवस्था बदलून जाते तेंव्हा युगान्तर घडतं.
थोडक्यांत कांही नवे आविष्कार व त्यांच्या सोबत एक नवी वैचारिक दिशा, नव्या मूल्यांचा आकृतिबंध आणि त्यांची पडताळणी असे सर्व कांही जुळून येतात तेंव्हा युगांतर घडते. यासाठी मूल्यांची चर्चा सतत होत राहिली पाहिजे. महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता संपवून एका नवीन मूल्याचं वळण लावल. एक युगान्तर घडवलं. राजा रायमोहन राय यांनी विधवा स्त्रीया सती जाण्याची प्रथा बंद पाडून तर कर्वे आणि सावित्री बाईनी स्त्रीशिक्षणाचा पाया रचून एक युगान्तर घडविले. अशा युगान्तराच्या वेळी वर्णव्यवस्था अर्थव्यवस्था कौशल्य प्रबंधन. राज्यव्यवस्था अशा सर्वांचीच कसोटी लागते. आणि तावून सुलाखून जे निघते ते टिकते. तसे कांहीच निघाले नाही तर एक अराजकाची परिस्थती तयार होते त्या अराजकाच्या परिस्थितीत कांही समाज, सभ्यता पार पुसून जातात तर कांही समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील गटांची कांस धरून टिकून रहातात, त्यांची डोळसपणे नोंद ठेवली तरी पुढच्या पिढींना मार्गदर्शक ठरते. आरडी-एचआरडी चे महत्व आहे ते यासाठीच.
Wednesday, September 24, 2008
युगान्तर घडतांना लोकप्रभा 18.5.2007
----------------------------------------------------------------------------------------
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 10:59 AM 0 टिप्पणियाँ
Friday, September 19, 2008
3/ माय मराठीत विज्ञान आणि कायदा -- on rajkeeya-chintan
read here माय मराठीत विज्ञान आणि कायदा
दै.सकाळ २.६.९६
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 7:18 AM 0 टिप्पणियाँ
3/अभियांत्रिकी प्रवेश : एका पालकाचा सुखद अनुभव-with corrections
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 7:17 AM 0 टिप्पणियाँ
Sunday, September 14, 2008
12 रोजगार हमी योजनेचे महाराष्ट्रातील स्थान Imp of EGS
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 8:21 AM 0 टिप्पणियाँ
3/ आयुर्वेदाला उत्तेजन देण्यासाठी
आयुर्वेदाला उत्तेजन देण्यासाठी
दै.सकाळ - ०२.६.९६
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 8:05 AM 0 टिप्पणियाँ
Subscribe to:
Posts (Atom)