Thursday, March 22, 2007

06 हिंदीला धोपटणे थांबवा (stop bashing Hindi)

06 हिंदीला धोपटणे थांबवा

सालावाद प्रमाणे मराठी साहित्य संमेलन आले आणि सालावाद प्रमाणे माझी भीती या वर्षीही खरी ठरली. ती भीती होती विनाकारण हिंदीला धोपटण्याची - बडवण्याची.
नोकरी निमित्ताने महाराष्ट्रात पहिल्या प्रथम पाऊन टाकले १९७४ मधे. तेव्हा पासून हे धोपटण पहात आले आहे. त्याच बरोबर मराठीचे अवमूल्यन देखील. पण त्याला केंद्र सरकार किंवा हिंदी संस्था जबाबदार नसून मराठी सारस्वत आणि मराठी बाबतचे शासनाचे धोरणच जबाबदार आहेत असं माझं मत आहे.
मराठीच काय पण सर्वच भारतीय भाषांच्या गळेचेपीला खरं कारण काय आहे- तर इंग्रजीचे आपणच वारेमाप स्तोम माजवले, इंग्रजीमधे आपले प्राविण्य दाखविले तरच प्रतिष्ठा मिळते ही दुरावस्था त्यातूनच निर्माण झाली. त्या प्रतिष्ठेसाठी आपण सर्वांनीच इंग्रजीची कास धरली. मग मराठी भाषकडे दुर्लक्ष झालं त्याच खापर फोडायला हिंदी बरी सापडली.
मला एक वेगळ उदाहरण आठवत. १९९० ते १९९३ पर्यंत मी राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा (नॅचरोपेथी), संस्थान पुणे या केंद्र सरकारच्या एका संस्थेत डायरेक्टर म्हणून काम पहात होते. त्या काळी बजेट विभागणी साधारण अशी कसे - आरोग्य खात्याच्या एकूण बजेट पैकी सुमारे ९० टक्के ऍलोपेथी वर तर उरलेले १० टक्के इंडियन सिस्टम्स आफ मेडिसन वर - यात आयुर्वेद, होमियोपथी, नॅचरोपथी, वगैरे सगळ आलं. सहाजिकच या दहा टक्कांपैकी ७ ते ८ टक्के आयुर्वेदाच्या वाट्याला येई - कारण आपल्या देशात सुमारे ५ लाख वैद्य आहेत. इतर होमियोपेथी वगैरे सगळे मिळून जेमतेम ५० हजार.
या सर्व इंडियन सिस्टम्स मधील मूळ सिद्धान्त एकमेकांशी बरेचसे सुसंगत आणि ऍलोपथी पेक्षा खूप प्रमाणात वेगळे आहेत. मग या सर्वांनी एकत्रितपणे एकमेकांना सपोर्ट दिला तर सर्वांची प्रगति जास्त चांगली होणार नाही कां? पण छे। आरोग्य मंत्रालयातील कुठलाही होमियोपेथी किंवा प्राकृतिक-चिकित्सा, योग-चिकित्सेचा ऍडवायझर किंवा कन्सल्टन्ट सदा आयुर्वेदाच्या नावाने खडे फोडायचा. यांच्यामुळे आमची गळचेपी होते म्हणायचा - ऍलोपथीमुळे नाही! देशात ऍलोपथीचे डाँक्टर्सही सुमारे पाच लाखच तरीही त्यांचे बजेट एवढे कसे असा प्रश्न इंडियन सिस्टमया माणूस विचारत नाही. इंग्रजी, हिंदी आणि मातृभाषेच्या संदर्भात आपण तेच करतोय. परकीय इंग्रजी भाषेला समर्थपणे सामोरे जाण्यास आपण कुठे कमी पडतो ते पहायला हवे त्याऐवजी आपण हिंदीला जबाबदार धरतो.
मी ज्या काळात शाळेत होते त्या काळात राष्टाभिमानी असणं हा एक चांगला संस्कार मानला जाई आणि तो माइयात उतरला. याचा अर्थ इतर राष्टांचा व भाषांचा द्वेष केला पाहिजे असे नाही. पण हिंदी भाषा उत्तम प्रकारे येणं ही माइया दृष्टीने कसोटी होती राष्ट्राभिमानाची. तसेच उत्तम मराठी येणे ही पण कसोटी होती. कारण ती माझी मातृभाषा आहे- म्हणूनच बिहारसारख्या दूरवरच्या प्रातांत हिंदीतून संपूर्ण शिक्षण घेऊनही माझं मराठी इतकं चांगल होत की उन्हाळयाच्या सुट्टीत खानदेश मधे आल्यावर चुलत-मावस भावंडांना मी मराठी निंबध लिहून देत असे आणि त्यांच्या मराठी धडयांची तयारी त्यांच्यापेक्षा माझी पक्की असे.
याशिवाय माझं इंग्रजी पक्क होत - संस्कृत पक्क होत - ऊर्दू, बंगाली, नेपाली, मैथिली, भोजपुरी, येऊ लागल्या होत्या. अमचे हेडमास्टर फारसी आणि अरबी चे तज्ञ होते आणि मला हिंदी - हिंदी - संस्कृत ऐवजी फारसी - अरबी - ऊर्दू हे विषय निवडण्यासाठी खूप सांगत होते. ते न ऐकून मोठीच चूक केली अशी खंत अजून वाटते. पुढे मला चांगल्या येणा-या किंवा समजणा-या भाषांमध्ये पंजाबी, ओरिया, आसामी, गुजराथी, मारवाडी, हरियावाणी, अवधी, बज्र, छत्तीसगढ़ी, अहिराणी इत्यादि भाषा व बोलीभाषांची भर पडली.
या सर्व अनुभवातून मी ठामपणे सांगू शकते की भाषांचा बोजा पडतो असा आरडा-ओरडा लोक उगीचच करतात. एकजात सर्व भारतीय भाषा एकमेकांशी इतक्या समरस आहेत की त्यांची ट्रिक कळायचा अवकाश! मुख्य म्हणजे सर्वांची वर्णाक्षरे सारखीच, सर्वांचे व्याकरण सारखेच (लिंगांचे प्रकार सोडले तर) वाक्य रचना सारखी, पौराणिक कथा आणि दृष्टांतांचा वारसा - तोही सारखाच, छंदांचे, काव्य, नाट्य, गायन या सर्व प्रकारांचे मूळ स्ट्रक्चर सारखेच, मातृभाषेनंतर दुसरी भाषा शिकायला थोडा फार वेळ लागेल तेवढाच - त्यांनतर तिसरी, चौथी, पाचवी पटापट येऊ लागतात. याचा फायदा आपण घेतला नाही तर ती आपलीच चूक ठरते. तरीही आपण बालमनावर पडणा-या ओझ्याची काळजी सांगत इतर भाषांपासून अंतर वाढवण्याचे काम आपण करत असतो.
माझी धाकटी भाची - वय वर्षे पाच पासून तिला उत्तम प्रकारे हिंदी, मराठी, बंगाली, ओरिया, इंग्रजी आणि संस्कृत येऊ लागले - हसत खेळत - कुठला आलाय्‌ बोजा! आज तिच्या ज्ञानाच्या कक्षा इतरांपेक्षा कितीतरी अधिक विस्तीर्ण आहेत.
युरोप मधे प्रत्येक देशांत पाचवी पासून मुलांना दुसरी युरोपीय भाषा आणि आठवीनंतर तिसरी भाषा शिकावी लागते. तिथे नाही पडत बोजा!
कुणी म्हणेल की मला बालपणासून हिंदीतून शिकण्याची संधी मिळाली म्हणून मला हिंदीचा बोजा वाटत नाही. तर मग इतर महाराष्ट्रीय मुलांना ही संधी द्यायला काय हरकत होती किंवा अजूनही काय हरकत आहे? दूरदृष्टिचा अभाव, की फुटीरतेची जुनी भारतीय परंपरा! शेजारील राजा वरचढ होऊ नये म्हणून दूरदेशीच्या मुगल किंवा इंग्रज सैन्याला आमंत्रण देऊन शेवटी त्यांना बळी पडण्याची आपली परंपरा होतीच. ती स्वातंत्र्यानंतर आपण पुन्हा सुरू केली. फक्त मराठी माणसांनीच नाही, इतरांनीही तसेच केले. पण म्हणून आपला दोष संपत नाही. आपण काही वेगळ करू शकतो ते केलं पाहिजे.
आज तामिलनाडू मधे इंग्रजी, व तामिल खेरीज इतर भाषा चालणार नाहीत अशी गर्जना झाली आहे - ती खूप खूप वर्षापूर्वी देखील होती. बंगाल मधे तेच झाले. पंजाब मधे तेच झाले. सीमावादामुळे बेळगाव निपाणी मधे तेच झाले. आज ही प्रवृत्ती असेल तर उद्या एक राष्ट्र असावे ही प्रवृत्ती टिकू शकेल का? हरियाणा मधे लोकांनी पंजाबी शिकू नये म्हणून त्यांची पर्यायी भाषा तेलगू असेल अशी घोषणा झाली. एक तरी दक्षिणी भाषा शिकावी अशी भलावण झाली - चांगली होती. पण मग ते धोरण यशस्वी करण्याचे प्रयत्न किती झाले? हरियाणवी - आंध्र सद्भावना किती वाढली?
मराठी किंवा इतर गैरहिंदी भाषिकांनी हिंदी विरूद्ध गळा काढण्याच एक कारण मला दिसत. जर संपूर्ण देशाचा कारभार हिंदी भाषेतून चालणार असेल तर ज्यांची मातृभाषा हिंदी आहे त्यांना नैसर्गिक लाभ मिळणार, राज्यकर्ते किंवा विचारवंत म्हणून ते जास्त प्रभावी ठरणार, आपण मागे पडू, आपल्याला वर्चस्व गाजवता येणार नाही, ही खरी भीती होती. त्याऐवजी ना तुमची, ना आमची अशी इंग्रजी जर संपर्क भाषा आणि राज्य करण्याची भाषी झाली तर आम्ही त्या हिंदीवाल्यांपेक्षा वरढच आहोत, हे सहज दाखवून देऊ असे ते गणित होते. जर आम्ही ते दाखवण्यात पुढे येऊ शकणार नसलो तर निदान आम्ही अमेरिकत तरी निघून जाऊ असही गणित होत. शेवटी कांय झाल? दिल्लीतल्या सरकारी फाईली जशा जास्तीत जास्त इंग्रजी-धार्जिण्या होत गेल्या तशाच त्या मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, लखनऊ इथेही झाल्या. राज्य कारभारात आपापली राजभाषा पुढे आणण्यासाठी आवश्यक, तसेच सोप्या आणि सुटसुटीत शब्दावल्या निर्माण होतील यासाठी मी मी म्हणणा-या साहित्यिक आणि भाषांविदापैकी कोणीही पुढाकार घेतला नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, सामाजिक शास्त्र इत्यादि शिक्षण मातृभाषेतून मिळवता यावे यासाठी हिरिरीने लेखन कार्य झाले नाही. मातृभाषा ही विचारांची भाषा म्हणून रूजली नाही. ती रूजावी असं कुणाला वाटलं नाही.
मराठी किंवा इतर गैरहिंदी भाषिकांनी हिंदी विरूद्ध गळा काढण्याच एक कारण मला दिसत. जर संपूर्ण देशाचा कारभार हिंदी भाषेतून चालणार असेल तर ज्यांची मातृभाषा हिंदी आहे त्यांना नैसर्गिक लाभ मिळणार, राज्यकर्ते किंवा विचारवंत म्हणून ते जास्त प्रभावी ठरणार, आपण मागे पडू, आपल्याला वर्चस्व गाजवता येणार नाही, ही खरी भीती होती. त्याऐवजी ना तुमची, ना आमची अशी इंग्रजी जर संपर्क भाषा आणि राज्य करण्याची भाषी झाली तर आम्ही त्या हिंदीवाल्यांपेक्षा वरढच आहोत, हे सहज दाखवून देऊ असे ते गणित होते. जर आम्ही ते दाखवण्यात पुढे येऊ शकणार नसलो तर निदान आम्ही अमेरिकत तरी निघून जाऊ असही गणित होत. शेवटी कांय झाल? दिल्लीतल्या सरकारी फाईली जशा जास्तीत जास्त इंग्रजी-धार्जिण्या होत गेल्या तशाच त्या मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, लखनऊ इथेही झाल्या. राज्य कारभारात आपापली राजभाषा पुढे आणण्यासाठी आवश्यक, तसेच सोप्या आणि सुटसुटीत शब्दावल्या निर्माण होतील यासाठी मी मी म्हणणा-या साहित्यिक आणि भाषांविदापैकी कोणीही पुढाकार घेतला नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, सामाजिक शास्त्र इत्यादि शिक्षण मातृभाषेतून मिळवता यावे यासाठी हिरिरीने लेखन कार्य झाले नाही. मातृभाषा ही विचारांची भाषा म्हणून रूजली नाही. ती रूजावी असं कुणाला वाटलं नाही. ही शास्त्र एखाद्या भाषेत जरी लिहिली गेली असती तरी एकीतून दुस-या भाषेचा प्रवास सोपा होता, पण आजही सगळ्याच भाषांकडे ठणठणाटच आहे.
मराठी भाषा म्हणजे काय याचे उत्तर संत वाड्मय, कथा, कांदब-या, नाटकं, कविता, आणि फार तर मराठी सिनेमे एवढेच आहे का? की विज्ञानावरील एखादे उत्कृष्ट पुस्तक, बलात्काराच्या प्रश्नावरील चांगला लेख, एखाद्या राजकीय घटनेचे विश्लेषण यांना देखील साहित्य म्हणता येईल? या परिभाषा कोण आणि कस ठरवतं? हे साहित्य असेल तर त्याची किंवा त्याच्या अभावाची आतापर्यंत कुणी दखल का घेतली नाही, मराठी साहित्य संमेलनांमधे चर्चा का झाली नाही आणि हे साहित्य नसेल तर साहित्य-संस्कृती मंडळापेक्षा वेगळ शास्त्र आणि समाज-विज्ञान मंडळ का निर्माण होत नाही, त्याचा आग्रह का धरला जात नाही?
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून साहित्य संस्कृती मंडळाने या बाबत किती प्रभावीपणे अशा पुस्तकांच्या निर्मिती आणि प्रचाराचा प्रयत्न केव्हा याचा शोध घेतला ता फारस चांगल चित्र दिसून येत नाही. किती चांगले शास्त्रज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञ मराठीतून लिहिते झाले? दर वर्षी होणा-या साहित्य संमेलनांमधून ही खंत कितीदा व्यक्त झाली? ज्यांनी असे थोडे फार प्रयत्न केले त्यांचा कधी सत्कार झाला?
वॉल्ट डिस्नेने लहान मुलासांठी अणुबॉम्बवर एक शास्त्रशुद्ध पुस्तक लिहिले व त्याला 'माझी श्रेष्ट साहित्यिक कृति' म्हटले आहे. असं किती लेखकांना जमल हा प्रश्न साहित्य संमेलनात विचारला जात नाही, हिंदीच्या नावाने मात्र खडे फोडले जातात. हा नाचता येईना सारखा प्रकार तर नाही ना?
त्याऐवजी मराठी जर ठामपणे हिंदीच्या पाठीमागे उभी राहिली तर अजूनही हिंदीला राष्ट्रभाषेचा आदर, सन्मान प्राप्त होईल आणि तो आपोआप मराठीलाही मिळेल. नाही म्हटले तरी जगभराच्या सहा अब्ज लोकसंख्यपैकी एक ते सव्वा अब्ज आपल्या देशात असून त्यातील सत्तर कोटी लोकाना हिंदी समजते तर सुमारे बारा कोटींना मराठी समजते. या सर्वांनी एकमेकाना सहाय्य केले तरच आपण सगळी एकत्रपणे पुढे जाणार. हे न समजल्याने हिंदीला डावलून इंग्रजी आणण्याच्या धोरणाचे पर्यवसन शेवटी मराठीला डावलून आय्.टी. आणण्याच्या धोरणातच झालेले आपण पाहिले.
मराठी ऐवजी पर्याय म्हणून आय्.टी. हे धोरण मला योग्य वाटते कां? नाही! कारण मराठी शिकून तिला टिकवली तरच आपली भारतीय आणि महाराष्ट्रीय एकात्मता कायम रहाते अस मला वाटत. कुणी म्हणेल मराठी भाषा शिकून भाकरी मिळत नाही. पण त्यासाठी मराठीतून किंवा मराठी शिकणारा माणूस उपाशी राहणार नाही यासाठी धोरण आखायचे की मराठीच बंद पाडायचे या मुद्यावर नीट चर्चा झाली पाहिजे.
एक पर्याय म्हणून मला वाटते की ज्यांना मराठी शिकून शिवाय आय्.टी. शिकायच आहे त्यांच्यासाठी दोन्ही विषय शिकण्याची किंवा त्यांत वेगळी परीक्षा पास होऊन सर्टिफिकेट मिळवण्याची संधी देणं हे खरं उत्तर आहे. ती संधी आपण का नाही निर्माण करत? जर एखाद्याचं मराठी कोणात्याही बी.ए. किंवा एम्.ए. च्या विद्यार्थ्याइतकच उत्कृष्ट असेल तर थेट परीक्षा देऊन ते सिद्ध करण्याची, त्याबाबत सर्टिफिकेट मिळवण्याची व त्या जोरावर इतर प्रमोशन्स मिळण्याची संधी त्याला का असू नये? त्यासाठी कॉलेज प्रवेश घेणे, हजेरी लावणे, टयुटोरियल्स भरणे हे जाचक प्रकार कशासाठी? किंवा एखाद्याला अर्थशास्त्रामधे थेट मास्टर्स डिग्रीचे सर्टिफिकेट हवे असेल तर तशा परीक्षेला बसण्याची संधी आणि सुविधा दिल्याने काय बिघडते? थोडक्यात काय तर अशी सुविधा निर्माण करणे हे जास्त चांगले धोरण ठरले असते - हे किंवा ते एकच निवडा असा कूपमण्डूकी पेच टाकणे हे चुकीचे धोरण आहे अस मला वाटत.
त्याचप्रमाणे पहिलीपासून इंग्रजीच आक्रमण लादण्याचे धोरण. हे ही चुकीचे असे मला वाटते. कारण त्यामुळे आपण हिंदी आणि इतर भारतीय भाषांना अजून दूर लोटणार आहोत.
उद्या देशातल्या प्रत्येक हिंदीतर भाषिकांनी हिंदी नको, इंग्रजी हवी असे म्हणण्याने आज हिंदीचे सामर्थ्य कमी होईल तसे उद्या त्यांच्या मातृभाषेचे सामर्थ्य देखील कमीच होईल अस मला वाटत. नव्हे, इतक्या वर्षांत तेच दिसलं.
कुणी म्हणेल चूक - उलट पहिलीपासून मराठी - इंग्रजी शिकली की आमची मुलं लग्गेच दोन्हीं भाषांतून साहित्य निर्मीती करतील - त्यांच साहित्य वैश्र्विक होईल! ती कधीही परदेशात येऊ जाऊ शकतील- त्यांच जीवन वैश्र्विक होईल! ते चांगल साहित्य मराठीच्या माध्यमातून लिहिण्याची गरजच उरणार नाही- कारण त्यांना इंग्रजी येत असेल. ते दिल्लीतही राज्य करू शकतील कारण ते वैश्र्विक भाषेतून राज्य करतील. हिंदी चांगल येत नसल्यामुळे यशवंतराव चव्हाण दिल्लीत अप्रभावी ठरले, पण आता तस होणार नाही, कारण दिल्लीचीच भाषा हिंदीऐवजी इंग्रजी करून टाकू किंवा दिल्लीकडे बघायची गरजच काय? त्यापेक्षा अमेरिकेकडे बघण केव्हाही जास्त फायद्याचं. इसाक असिमोव्ह ने वर्तवल्याप्रमाणे जेव्हा वैश्र्विक सरकार येईल आणि इंग्रजीतूनच वैश्र्विक सरकारचा कारभार चालेल तेव्हां हिंदी भाषिकांपेक्षा आम्ही पुढे असू!
ठीक आहे. पण मग यात राष्ट्र ही सकंल्पना कुठे आहे, राष्ट्राभिमान असावा की नसावा हे प्रश्न कुणाला पडतात का? मी अजून तरी राष्ट्र आणि राष्ट्रभिमान या कल्पनांना फाटा दिलेला नाही. '' जिन्हे नाज है हिन्द पर उनको लाओ '' हा माझा शोध चालू आहे.
नोकरीच्या अगदी सुरवातीला उत्तर प्रदेश मधून महाराष्ट्र कॅडर मधे आलेल्या एका भाप्रसे आधिका-याने मला म्हटले,
'' मी माइया मुलांना कॉन्व्हेन्ट मधे टाकलय म्हणजे मराठी चांगल आलं, नाही आलं ही भानगड नको ''
''आणि मातृभाषेच काय?''
''इंग्रजी हीच मातृभाषा मानायला काय हरकत आहे? त्यांना पुढे तिकडेच जायच आहे! त्याना कुठे उत्तर प्रदेशात परत जायचय्‌?''
''मी पण मुलांना कान्व्हेंट मधे घातल आहे. पण घरी मी त्यांना आवर्जून हिंदी, मराठी आणि संस्कृत शिकवते. पाढे व तोंडी गणितं मराठीत सोपी पडतातच, पण इतिहास भूगोलही ती मराठीतून पण वाचतात.''
''हा दुराग्रह आहे - मुलांवर एवढं ओझ लादून काय उपयोग? शिवाय मराठी, हिंदी मधे वाचण्यासारखं काय ठेवलय जे न वाचून चालणार नाही?''
त्यांच्या मुद्यामधला शेवटचा भाग बरोबर होता असं माझ्या मुलांनी मला वेळोवेळी सांगितल आहे - मराठी, हिंदी मधे वाचायला काय आहे? स्कूटर कशी रिपेअर करायची- आहे? एरोडायनॅमिक्स काय असते- आहे? कॅल्क्यूलस शिकायची सोय- आहे? फटाके बनवण्याच चांगल पुस्तक- आहे? अर्थशास्त्र लहान मुलांना कळेल (लहान म्हणजे ६ ते ८ वर्ष वयोगट) अशा प्रकारे- आहे? कॅमे-याची माहिती- आहे? नाही ना? मग आम्हाला ''पण लक्षात कोण घेतो?'' किंवा ''बटाटयाची चाळ'' वाचायला लावू नकोस. ''प्रेमचंद'' किंवा ''साहिर लुधियानवी'' पण वाचायला लावू नकोस. कधी मघी तूच वाचून दाखवलस तर चालेल. प्रत्येक मूल ललित साहित्याचा चाहता असणार नाही. आम्ही बार्बरा कार्टलंड किवा शेक्सपियर तरी कुठे वाचतो? पण आम्हाला जे काहींही वाचावस वाटत ते इंग्रजीत हमखास मिळेल याची गॅरंटी आहे - ते तशाच स्टॅण्डर्डने हिंदी मराठीतून असेल तर आम्ही ते पण वाचू !
हिंदीच्या आक्रमणामुळे मराठीची गळचेपी होते असं म्हणणा-याना मला सांगावस वाटत की मराठीत ''सर्वस्पर्शी वाचनीय'' नसल्यामुळे मराठीचे अवमूल्यन होत आहे - हिंदीमुळे नाही. खुद्द हिंदीतही तसे साहित्य नसल्याने हिंदीचीही गळचेपी होत आहे. ते निर्माण करण्यासाठी मराठीच्या लेखक, प्रकाशक, साहित्य निर्मीती मंडळे यांनी प्रयत्न करायला हवे आहेत. मल्याळी भाषेत असे प्रयत्न झाले आहेत. साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी निदान अशा मल्याळी पुस्तकांची एक यादी तरी मराठीतून प्रकाशित करावी.
मी स्वतः अर्थशास्त्र कसं शिकले? तर इंग्लड मधे असताना आठ वर्षांखालील वयोगटासाठी लेडी-बर्ड सिरिजमधे असलेले एक पुस्तक आणि पंधरा वर्षांखालील वयोगटासाठी त्यांनीच काढलेले दुसरे पुस्तक वाचून! हे जर साहित्य नसेल तर काय आहे? आणि इंग्रजीची कास धरणा-यानी इंग्रजांचे अनुकरण म्हणून कां होईना मराठी मधून अशा ''असाहित्यिक'' प्रकाराला प्रोत्साहन द्यायला काय हरकत आहे? की त्यापेक्षा मुलांना पहिलीपासून इंग्रजी शिकवून ''ती'' पुस्तक वाचायला देण सोप आणि शहाणपणाचं आहे?
आज माझी मुलं ई-मेल पाठवताना रोमन लिपी मराठी भाषा असा प्रकार करून पाठवतात. त्यांच्या हिदी भाषिक मित्रांना रोमन लिपी हिंदी भाषा अशी पाठवतात. हळू हळू त्याच्या मानसातून लिपी बाजूला होणार. अगदी सुरवातीला मी प्रयत्न केले त्यांनी देवनागरी लिपी वापरावी म्हणून. पण कम्प्यूटर वर देवनागरी लिपीच्या वाटयाला जे दुदैंव सरकारने आणि सी-डॅक ने लिहून ठेवल आहे त्याची एक वेगळीच कहाणी आहे, जिचे मूल्यमापन देखील अत्यावश्यक आहे. तिची एक एवढीच झलक देता येईल की संस्कृत शिकण्यासाठी मी कम्पयूटर वर तयार केलेली एक अर्धी-मुर्धी साईट पाहून कॅनडा मधील संस्कृत शिकू पाहाणा-या एका अभारतीय मुलाने मला लिहून कळवल की कम्प्यूटर वर आपली लिपी कशी आणावी याबाबत तुमच्या देशाने इस्त्राईल कडून खूप काही शिकायची गरज आहे.
हिंदीला दूषणे देण्याऐवजी साहित्य संमेलनामधे हिंदीचे ऋण मान्य करायले हवे. हिंदीमुळेच स्वातंत्र्य-संग्रामाच्या वेळी सपूर्ण देश एकत्र येऊ शकला. विवेकानंद किंवा दयानंद सरस्वती सारख्या मंडळींनी आपल्या कडील विचारवंतांबरोबर चर्चा केल्या. स्वातंत्र्यानंतर देशातील इतर भाषांच्या हिंदी अनुवादाने ते साहित्य मराठीत आणण्याकामी मोठी भर घातली आहे.
हिंदी भाषेचे मोठे बलस्थान म्हणजे वेगवेगळया प्रातांत बोलली जाणारी, वेगवेगळया लकबींची हिंदी। बंगाली माणसाची हिंदी वेगळी, राजस्थानी हिंदी वेगळी, हैद्राबादची वेगळी, अलाहाबादाची वेगळी, नेपाळी लोकांची हिंदी वेगळी, मुंबईची वेगळी आणि पुणेरी माणसाची तर त्याहून वेगळी. विभिन्न प्रांतीयांनी हिंदीला वेगवेगळे पैलू पाडले आहेत, तिचे सौंदर्य खुलवले आहे.
ज्यांनी गोनिदांच्या लिखाणांतील मराठी भाषेचा प्रांतवार वेगळेपणा अनुभवला असेल त्यांना हा मुद्दा पटेल. हिंदीतील अशा लकबी आणि शब्दावल्या देखील मराठीत आणल्या जाऊ शकतात.
आज मराठी मंडळींनी हिंदीसाठी पुढे सरसावण्याची गरज आहे. ते कसे होईल याची चर्चा साहित्य संमेलनांत व्हावी. हिंदीची पीछेहाट होत असतांना मराठी मात्र पुढे जाऊ शकेल असे होणार नाही. म्हणूनच हिंदीला धोपटले जाऊ नये.

-----------------------------------------------------------

4 comments:

Marathimedley said...

अत्यंत दुर्दैवी लेख लिहिला आहे आपण. मराठीला वाईट दिवस आले असताना आणि शहरात-गांवात काष्ठी पाषाणी हिंदी फोफावताना आपण हिंदीचे गुण गाणे हास्यास्पद आहे व आपले वर्तन निव्वळ महाराष्ट्रद्रोही आहे.

१)मराठी वर इंग्रजीचे नाही तर हिंदीचे आक्रमण होत आहे.
युपी-बिहार व अन्य परप्रांतिय सर्रास हिंदीचा वापर करतात,इंग्रजीचा नव्हे. सार्वजनिक ठिकाणी हिंदी बोलली जात आहे,इंग्रजी नव्हे.त्यामुळे सर्व भारतीय भाषांना हिंदीचा धोका आहे,इंग्रजीचा नव्हे. इंग्रजी केवळ ५-१०% भारतीयांना समजते. तसेच आजच्या जगांत इंग्रजी शिवाय पोट भरले जाऊ शक्त नाही. त्यामुळे हिंदी नको-इंग्रजी हवी.

२)हिंदी ही राष्ट्रभाषा नाही
भारतीय संविधान कुठल्याही भाषेला तो दर्जा देत नाही. इंग्रजी व हिंदी ह्या केंद्राच्या शासकीय भाषा आहेत. महाराष्ट्रात मराठी हीच एकमेव राजभाषा आहे. कृपाकरुन हिंदीचे विष पसरवायुला मदत करु नका.

हिंदीची चिंधी केल्याशिवाय मराठी जगणार नाही. मराठी लोकांनी हिंदीचा संबंध तोडावा व महाराष्ट्रात फक्त मराठीचा वापर करावा. इंग्रजी ही 'पोट्भाषा' आहे तर दक्षिणात्यांप्रमाणेच या भाशेत प्रगती करावी व हिंदीच्या मगरमीठीतून महाराष्ट्र मुक्त करावा हीच प्रार्थना

लीना मेहेंदळे said...

माझ्यापुरते तरी भारत की महाराष्ट्र आणि हिन्दी की मराठी असे संभ्रम नाहीत. लोकमान्य टिळक वंगभंगाविरुद्ध त्वेषाने, आवेशाने लढले आणि मंडाल्याच्या तुरुंगात आनंदाने गेले. राजगुरु लाहोरला जाऊन भगतसिंग सोबत लढले आणि फांशी गेले. मी अजून त्यांचा आदर्श जपते. त्यांना ही हा संभ्रम नव्हता. ङाँ, गलोबलायझेशन की राष्ट्रवाद असे द्वंद असेल तेंव्ङा मी राष्ट्रवाद जपेन. ङिन्दीची चिन्धी किंवा भारताचे चिथडे होवोत असं नी म्हणणार नाही.

Nandan said...

आपला लेख आवडला, त्यातले विचार पटले. 'सर्वस्पर्शी वाचनीयतेचा' मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. मराठीकडे जर नवीन मुलांना वळवायचे असेल तर केवळ भावनिक कारण देणे उपयोगाचे नाही. मातृभाषा काही प्रमाणात का होईना ज्ञानभाषा होणेही गरजेचे आहे.

सतीश पंचम said...

पु.ल.देशपाण्डे से संबंधित एक लेख की तलाश में सर्च कर रहा था तो आपका यह लिंक दिखा। काफी अच्छी तरह से आपने अपने विचार अभिव्यक्त किये हैं. दरअसल लोग केवल एक दूसरे का डर दिखाकर अपने आप में ही भयग्रस्त होने में लगे हुए हैं। हो सकता है कहीं न कहीं कुछ अपवाद हुए हों लेकिन समूची भाषा को कटघरे में खड़ा करना बहुत ही बेवकूफी होगी.

दरअसल लोग एक दूसरे की भाषा, उनके साहित्य को पढ़ना चाहते हैं लेकिन पूर्वाग्रह और कुंद मानसिकता वाले लोगों के चलते इस तरह के पढ़ नहीं पा रहे या फिर पढ़ना भी चाहें तो संशय बना रहता है.