Tuesday, March 6, 2007

01 शिक्षणाने आपल्याला कांय द्यावे -- what should Education give us?

01 शिक्षणाने आपल्याला काय द्यावे
लीना मेहेदळे
दैनिक महाराष्ट्र टाइम्स
दिनांक १६.४.९५

लवकरच आपल्या देशाची लोकसंख्या १०० कोटी पर्यंत पोहचेल, आणि यापैकी किमान ४८ टक्के जनता आज निरक्षर आहे. ज्याला ख-या अर्थाने उत्पादनक्षम मट मानला जातो तो म्हणजे १५ ते ३५ हा वयोगट. या वयोगटातच सुमारे १२ कोटी लोकर निरक्षर आहोत. शिवाय ६ ते १५ या बयोगटात किमान अडीच कोटी निरक्षर आहेत. नुसत्या ९ ते १५ या वयोगटातील एकूण लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश ते एक पंचमांश मुले-मुली शाळे बाहेर असतात अशी कुठल्याही राज्याची सरासरी आहे. महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार १९९१-९२ मध्ये पहिली ते सातवी इयत्तेत एकूण 1 कोटी २० लाख मुले शिकत होती, तर याच वयोगटातील २० लाखा पेक्षा अधिक मुले शाळेबाहेर होती. थोडक्यात एक षष्ठांश मुले शाळे बाहेर होती. अगदी नाशिकचा विचार करावयाचा तर येथे ९ ते १५ वयोगटातील ४,१९,६०० मुलांपैकी ६३,००० मुले शाळेबाहेर आहेत. ही बालमजूर असतील हे उघड आहे. देशात बालमजूरांचे प्रमाण सरकारी आकडेवारीनुसार ४ कोटीच्या आसपास आहे.
१९९१ मध्ये देशात प्राथमिक शाळा सुमारे ६ लक्ष, तर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याची संख्या सुमारे ११ कोटी ११ लक्ष एवढी होती. मात्र असे दिसून येते की पहिलीत जेवढी मुले पंटावर नोंदली जातात, त्यापैकी ६० ते ७० टक्के मुले सातवी पर्यंत गळतात आणि आठवीच्या वर्गात फक्त ३० टक्के मुले प्रवेश घेतात. जर सातवी पर्यत मुलांची एवढी गळती आहे. तर सातवीच्या पुढे दहाची पर्यत, बारावी पर्यत आणि पंधरावी पर्यत मुलांची गळती केवढया मोठया प्रमाणांत असेल याबाबत आपण अंदाज लावू शकतो. तसेच पहिली ते सातवी या वर्गात दरडोई होणा-या खर्चाचे प्रमाण कमी असते. त्याच्या तुलनेने मुले जसजशी वरच्या वर्गात सरकतात तसतसा दरडोई खर्च वाढत जातो. यामुळे ही गळती मोठया प्रमाणवर थांबविणे अशक्य आहे हे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत निरक्षरांसाठी प्रौढ साक्षरता किंवा सर्वांसाठी शिक्षण अशा योजनांऐवजी शैक्षणिक पुनर्रचना ही अतिशय अवश्यक आणि महत्वाची गोष्ट आहे पण त्याआधी शिक्षणाने आपल्याला नेमके काय दिले पाहिजे याची थोडीशी चर्चा या ठिकाणी प्रस्तुत आहे.
देशाला ५० वर्षे स्वातंत्र्य मिळून झाल्यानंतरही आपल्याकडे आज समाजात नीतिमूल्यांचा अभाव दिसून येतो. ही एकच बाब देखील आपल्या सामाजिक आणि शैक्षणिक सिस्टमच्या अपयशाचे द्योतक ठरू शकते. देशात ५० वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही आ वासून उभे असलले प्रश्न म्हणजे लोकसंख्येची वाढ, दारिद्रय रेषे खाली असणा-या परिवारांच्या संख्येतील वाढ, गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील आर्थिक विषमता, शासकीय कार्यालयामधील करप्शन, अकार्यक्षमता व त्यामुळे ढासळत चाललेले प्रशासन, आपल्या कच्च्या मालाचा पुरेपूर फायदा घेण्याबाबत आपली अक्षमता सर्वत्र नीतिमूल्यांचा -हास, राष्ट्रभावनेबद्दल उदासीनता, बेकारी आणि ब्रेनड्रेन असे आपल्या देशातील काही प्रश्न आहेत. या सगळयांची गोळाबेरीज केली तर आपल्या देशातील सामाजिक सुव्यवस्था व समाजाची लय आणि एकतानता हे का आणि कशा मुळे निरंतर ढासळत चालले. आहेत ते समजून येते.
खरेतर या पैकी प्रत्येक समस्येवर त्या त्या समस्येपुरते वेगवेगळे अल्पकालीन उपाय असू शकतात पण एकत्रित आणि दीर्घकालीन उत्तर शाघायचे असेल तर ते उत्तर म्हणजे शिक्षण. दुर्दैवाने आपल्या देशात शिक्षण हे देखील प्लॅनिंग मघील इतर सेक्टर पैकी एक सेक्टर समजले गेले. जसे कृषी, वाणिज्य व रेल्वे ही सेक्टर्से तसेच शिक्षण हे एक सेक्टर मानले गेले. खर तर शिक्षणाने माणूस घडतो म्हणून या सेक्टरला वेंगळे महत्व आहे आणि या सेक्टरच्या विचाराकरीता एक संपूर्णपणे वेगळी नियोजन पध्दत असायला पाहिजे याचा नियोजन कर्त्यानी विचार केलेला दिसत नाही. शिक्षणाने माणूस घडतो असे जर आपण म्हणत असू तर कोणत्या पध्दतीच्या नियोजनाने ही माणूस घडण्याची प्रक्रिया सुरळीत चालत राहील याचे पुनर्विलोकन वारंवार करावे लागते.
आपण पहिल्यांदा असा विचार करू यां, की शिक्षणाने आपल्याला नेमके काय दिले पाहिजे. शिक्षणाचे उद्दिष्ट काय असले पाहिजे? या विषयीचा विचार खरेतर १९४७ पासून आणि त्याच्या आधीपासूनही खूप वेळा केला गेला आहे. तरी सुध्दा आजच्या परिस्थितीचा विचार करता मला वाटते की शिक्षणाचा उद्देश दोन वेगळ्या प्रकारांनी तपासायला हवे. सर्वांत पहिला, शिक्षणामुळे माणसाचे स्वतःचे काय साध्य होते, किंवा व्हायला हवे हा मुद्दा.




समाज म्हणजे काय? तर खेळीमेळीने, एकतानतेने व एकात्मतेने राहू शकणारी काही मंडळी म्हणजे समाज. ही एकात्मता टिकू शकली तरच समाज प्रगत होतो, एकात्मता बिघडली तर समाज ढासळू लागतो, समाज टिकवण्याची प्रक्रिया म्हणजे त्यांतील प्रत्येक व्यक्तीने विचारप्रवण असणे. प्रगल्भ असणे, सुशिक्षित असणे आणि समाजाच्या प्रगतिबाबत चिंतन, चर्चा व कार्य करत रहाणे. याचसाठी शिक्षण व्यवस्था अशी असावी की ज्याच्या मुळे समाज संपन्न होईल, वाढीला लागेल, वाचवला जाईल आणि एकंदरीत शिक्षणातून समाजाची एकात्मता वाढू शकेल.
समाजाची प्रगति झाली किंवा नाही हे ठरवायला जे निकष आपल्याला वापरता येतील. ते म्हणजे.
समाज आर्थिकदृष्टया उन्नत आणि श्रीमंत होत आहे का? देशात उत्पादन आणि उत्पादनक्षमता मोठया प्रमाणावर वाढत आहे का? ते वाढलेले उत्पादन सर्वाना समतोलपणे वाटप होते का? ते वाढलेले उत्पादन सर्वाना समतोलपणे वाटप होते का? सामान्य माणसाच्या जीवनामधील रोजरोजचे निरर्थक श्रम कमी होतांना दिसतात कां? उदा. धक्काबुक्की करून बस मध्ये चढावे लागणे, पाणी किंवा जळणाचे लाकूड आणण्यासाठी तासन्‌ तास वणवण करावी लागणे, रेल्वे तिकिटाच्या रांगेत तीन-चार तास उभे रहावे लागणे हे सर्वच निरर्थक श्रम असून ते समाजाचा बहुमूल्य वेळ फुकट घालवत असतात. समाजात एकूण 'कर्मसुकौशलम्‌' म्हणजे कोणतेही काम जास्तीत जास्त चांगल व्हाव, ही कल्पना रुजली आणि पटलेली आहे का? समाजातील एकूण वातावरण यासाठी पोषक आहे का? देश आणि आपल्या देशाच्या संस्कृतिबरोबर आपले काही ऋणानुबंध आपण मानतो का? समाजातील व्यक्ति म्हणून आपण समाजात कोणत्या नीतिमूल्यांना अग्रक्रम देतो? समानता, स्वातंत्र्य आणि निर्भयता या तीन नीतिमूल्यांची वाढ समाजरचनेत व्हावी यासाठी समाज ठाम आहे कां? समाधान हे महत्वाचे उद्दिष्ट मानले जाते का? आणि सत्य हे अंतिम ध्येय मानले जाते का?
यापैकी कुठल्याही एखाद्याच मुद्याचा विचार केला तरी प्रगती एकांगी ठरू शकते ही स्थिती आज आपल्याला पाश्च्िामात्य देशांत दिसते. आर्थिक संपन्नता असेल, तरी देखील समाधान नसेल तर समाजामधील ताणतणाव कोठल्या थरापर्यंत जाऊ शकतात याचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळते.
स्वतः व्यक्तिच्या दृष्टिकोनातून शिक्षण कशासाठी हा विचार केला तर शिक्षणाने कोणत्याही व्यक्तीला सर्वप्रथम स्वतःची भाजी भाकर मिळवण्याचे सामर्थ्य दिलेच पाहिजे. त्याच बरोबर त्या व्यक्तिच्या मनात स्वतःची उन्नती आणि नैपुण्याबाबत ऊर्मि आणि अभिलाषा निर्माण केली पाहिजे. आपल काम उत्तमांत उत्तम होईल यासाठी झटण्याची महत्वाकांक्षा शिक्षणातून निर्माण झाली पाहिजे. आपण समाजाचे, देशाचे आणि जगाचे ऋण देणे लागतो आणि ते फेडण्यासाठी आपल्या मनात इतरांबाबत बंधूभाव, समानुभूति रुजण्याची शिकवण देखील शिक्षणातून मिळायला हवी. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला समाजाच्या एकात्मतेची गरज व महत्व पटले पाहिजे. अशा एकात्म समाजातच त्याचा स्वतःचा परमोच्च विकास होऊ शकतो हे त्याला शिक्षणाने पटवले पाहिजे सर्वात महत्वाचे म्हणजे मानवी जीवन आणि मानवीय श्रम यांचे मूल्य व आदरणीयता आपल्याला शिक्षणातून समजली पाहिजे. आणि आचरता आली पाहिजे.
आपल्यापैकी फारच थोडया लोकांना ही जाणीव असते की शिक्षण नसल्यामुळे त्या अशिक्षित माणसाचे जे कांही बिघडत असते त्यापेक्षा कित्येक पटींनी समाजाचे नुकसान होत असते. अशिक्षित माणसाच्या जीवनाबद्दलच्या उर्मि फार लवकर मावळून जातात. पण समाजातल्या प्रगतीचा वेग ही माणसे थोपवून धरू शकतात. एकतर समाजात ज्या सोई सुविधा पुरवल्या जातात त्याबाबत या व्यक्तींना कांही घेणे- देणे नसते. देशातल्या किती शाळांना खडू-फळे नाहीत याचा विचार रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी मुल करतील कां? इतरांची संपन्नता बघूनही त्यांच्या मनात त्याबद्दल उदासीनता किंवा निराशाच उत्पन्न होते. कांही वेळा तर आपण धाक दाखवून किंना चोरून मारून ही संपन्नता थोड़ा काळ मिळवावी या दृष्टीने त्यांचे काम सुरू होते. थोडक्यांत समाजाला मागे ओढण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच सर्वानी शिकावे याची जास्त गरज कुणाला असेल तर ज्याला सन्मार्गाने स्वतःची प्रगती साधायची आहे त्याला.

आजच्या शिक्षण व्यवस्थेचा विचार केला तर वरील पैकी कित्येक उद्दिष्टे शिक्षणातून साध्य होत नाहीत असे विसून येते. शैक्षणिक व्यवस्थेलील जे काही गॅप किंवा चुका आहेत त्याचा विचार आपल्या शिक्षण तज्ञांनी वारंवार केलेला आहे. यामध्ये रिसोर्स क्रंच हे मुख्य कारण असल्याचे विवेचन ब-याच वेळा केलेले आहे आणि आर्थिक तरतूद वाढवून दिली तर शिक्षणाचा दर्जा सुधारेल हा आशावाद ब-याच जणांनी बोलून दाखवलेला आहे. माझे या बाबत संपूर्णपणे वेगळे मत आहे. मात्र त्यांनी दाखवून दिलेल्या दोषांपैकी मला जाणवलेले जे ठळक दोष आहेत त्यांची चर्चा न करता त्यांचा पुनरुच्चार फक्त इथे करीत आहे. आजच्या शिक्षण व्यवस्थेतून आपल्याला सामाजिक नीतिमूल्यांचे शिक्षण मिळल नाही तसेच या शिक्षणातून कदाचित इन्फरमेशन गॅदरींग होत असेल. पण विचार करण्याची ताकद येत नाही. मुळात आपली सध्याची शिक्षण पद्धती दीडशे वर्षापूर्वी इंग्रजानी सुरु केली होती आणी त्यांचे उद्दिष्ट फार स्पष्ट होते. त्यांना इथे राज्य करता यावे यासाठी नोकरशाहीची एक भक्कम फळी हवी होती- त्या नौकरशाहीत क्लार्क, बड़ा बाबू, गॅझेटेड ऑफिसर अशा पदव्या व नोक-या सांभाळू शकणारी माणस तयार करायची. त्यांची तयारी नीट झाली की नाही ते पारखून त्यांची निवड करायची यासाठी निर्माण केलेली परीक्षा व्यवस्था. म्हणूनच त्यांतून उत्पादन कुशल आणि कार्यप्रवीणते बद्दल अभिमान असलेला कार्यक्षम कारीगर किंवा एक उत्तम तत्वचिंतक आज घडत नाही. आजचे आपले शिक्षण त्याला चिंतन शिकवित नाही. आपल्यापैकी कित्येक जणांना कल्पना नसेल की लॉजिक आणि फिलॉसॉफी हे विषय शिक्षणक्षेत्रातून आज जवळ जवळ बाद झाल्यासारखे आहेत. तंत्र शिक्षणाचा अभाव हा तर आपल्या शिक्षण व्यवस्थेतील एक फार मोठा दोष आहे असे म्हणावे लागेल. जे तंत्र शिक्षण उपलब्ध आहे ते उच्च पातळी नंतर दिले जाणारे, अति खर्चाचे व फारच थोडया लोकांसाठी उपलब्ध असलेले आहे. परंतु ज्याला मधल्या फळीचे तंत्रशिक्षण म्हणता येईल त्याची विशेष सोय नाही, त्याला प्रतिष्ठा नाही आणि मधल्या फळीवर असलेल्या तंत्रज्ञ माणसाला आपली तंत्रक्षमता मोठया प्रमाणावर वाढवता येईल अशी खास सोयही नाही. महाराष्ट्रात महर्षी कर्वे, सावित्रीबाई फुले इत्यादिंनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला तर लोकहितवादी, आगरकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊसाहेब पाटील, बाबासाहेब आंबेडकर या सारख्या मंडळींनी एकूणच शिक्षणाचा पाया मजबूत केला आणि शिक्षणाचं महत्व ठामपणे लोकांसमोर मांडले. १९५० मध्ये देशात जवळ जवळ २० टक्के जनता साक्षर किंवा शिक्षीत होती. ते प्रमाण आज ५० टंक्क्यांच्या आसपास आलेले आहे. म्हणजे शिक्षणाचा प्रसार झालेला आहे. पण असे वाटते की, शिक्षण तज्ञांना जे शिक्षण अपेक्षित होते, ज्याला खरोखरच जीवनाला आवश्यक असे शिक्षण म्हणता येईल उसे शिक्षण आज आपल्याला मिळते का ? आजचे शिक्षण आपल्याला नोक-या मिळवून देते, किंवा प्रोफेशनल स्किल्स मिळवून देते. पण ही शिक्षण व्यवस्था आपल्याला उत्पादनक्षम व्यक्ती बनवित नाही. फार क्वचित प्रमाणात उत्पदान करण्याचे शिक्षण दिले जाते. दुसरी कडे शेतकरी हा उत्पादनक्षम आणि उत्पादक वर्ग आहे. परन्तु त्या वर्गामध्ये शिक्षणाचा मोठया प्रमाणावर अभाव अजूनही आढळून येती जी मंडळी स्वतः उप्तादक नाहीं. उत्पादनक्षम नाहीत अशी सर्व मंडळी काही झाले तरी परोपजीवीच आहेत असे म्हणावे लागेल, त्यांना स्वतःचे अस्तित्वच जणू काही नसते. दुसरे कोणी आहेत म्हणून यांचे अस्तित्व टिकून असते. लोक आजारी पडतात म्हणून डॉक्टराचे अस्तित्व असते. लोकांना प्रशासनाची गरज. वाटते किंवा तसे भासविले जाते म्हणून प्रशासकीय अधिकार्‍यांची गरज असते. पण शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेल्या या मंडळींना स्वतःचा कौशल्यावर, स्वतःच्या दोन हातांच्या सामर्थ्यावर विश्र्वास नसतो आणि त्यामुळेच त्यांना मानवी श्रमाचे आणि मानवी सामर्थ्याचे मूल्य कळत नाही असे वारंवार दिसून येते. किंबहूना बरेचदा अशी माणसे इतर श्रमजीवी माणसांना हेय किंवा कमी प्रतिष्ठेची ठरवतात हे चित्र समाजात जास्त प्रकर्षाने दिसून येते. थोडक्यांत आजच्या शिक्षणानं आपल्याला योग्य शक्ति, युक्ति आणि दृष्टि दिली का याही प्रश्नाचे उत्तर नाही असेच म्हणावे लागते.
मात्र माझ्या मते आजच्या शिक्षणाची सर्वात मोठी उणीव ही की त्याच्यात आपण काळाचे भान अजिबात ठेवलेले नाही. वयाची दहा-पंधरा व कांही वेळा बीस-बावीस वर्ष शिक्षणासाठी घालवण्याची ऐपत आज समाजात किती जणांना आहे? ज्यांना ही ऐपत आहे त्यांच्यासाठी ऐश्र्वर्याचे दालन खुले आणि ज्यांना ही ऐपत नाही त्यांना दारिद्रयाची खोल दरी असे आजचे चित्र आहे एखाद्याच्या आयुष्यांत चारच वर्ष शाळेसाठी देण्यासारखी असतील तर या चार वर्षाच्या इन्व्हेस्टमेंट मुळे त्याचे फारसे काही भले दोणार नसते. मग सहाजिकच विचार येतो की ही चार वर्ष तरी शाळेत फुकट का घालवा? बरं समजा ही चार वर्षे शाळेत घालवून एखादा मुलगा आपल्या सामान्य जीवनाकडे कळला तर पुढे दहा पंघरा वर्षानंतर त्याच्या जीवनात या चार शैक्षणिक वर्षामुळे कांही आनंद, काही विकास निर्माण झाला असे आपण छातीठोक पणे सांगू शकू कां? चारच काय पण अगदी दहावी बारावी शिकलेली मुले मुली देखील त्यांना मिळालेल्या शिक्षणाचे पुरते मोल समाजाला देऊ शकतांत कां?
या ठिकाणी पुनः नीतिमूल्यांचा प्रश्न निर्माण होतो. आपण समाजाकडून जे कांही घेतो त्याचा पुरेपूर मोबदला समाजाच्या पदरांत कोणता माणूस टाकू शकतो तर ज्याच्यात कांही उत्पादकता आहे, सचोटी आहे व ज्याच्या मनांत कांही शाश्र्वत मूल्ये आहेत- असाच माणूस. जो माणूस दुस-याच्या उत्पादनाची आणी श्रमाची लूट करून स्वतःची संपन्नता वाढवत असतो तो माणूस समाजाकडून घेत असतो पण समाजाला समृद्ध करत नसतो. तर मग आजच्या शिक्षणातून तयार झालेली मुल जर समाजाला कांही देऊ शकणार नसतील व समाजाकडून त्यांच घेणच चालू रहाणार असेल तर असे शिक्षण देऊन आपण काय मिळवतो याचा पण विचार केला पाहिजे.
शिवाय आजचा विद्यार्थी त्याला मिळत असलेल्या शिक्षणाकडे कोणत्या दृष्टीने बघत असतो? बरेचदा त्याला फक्त एक ठप्प्याचा, एक सही शिक्क्याचा कागदच हवा असतो. एखादी उत्तम नोकरी हवी असेल किंवा खूप पैसा कमवून, खूप संपन्नतेने रहायचे असेल तर त्यासाठी आजचे शिक्षण, कष्ट, साधन-शुचिता इत्यादि गोष्ठी तद्दन टाकाऊ आहेत असच चित्र त्याला आजूबाजूला दिसते. पैसा, थाटमाट किंवा प्रतिष्ठा मिळवायचे उपाय वेगळेच आहेत. तुम्ही दुस-यावर कशाप्रकारे कुरघोडी करू शकता, दुस-याला कशा प्रकारे खिंडीत गाठू शकता- त्याच्या नांवाने गजर करून, त्याची सेवा करत असल्याचे भासवून स्वतःसाठी कांय मिळवू शकता? भ्रष्टाचार, फसवाफसवी, कायद्यातील पळवाटा, वशीलेबाजी, धाकदपट, टोळीबाजी, गुंडगिरी, अशा कमी कष्टाच्या, कमी श्रमाच्या व डोकेबाजीच्या आणी शक्तिप्रदर्शनाच्यां गुणांमधून आज पैसा मिळतो. तशा मिळालेल्या पैशाला आणि श्रीमंतीला उज्जवलतेची झालर लावण्यासाठी एखादी उच्च शैक्षणिक पदवी बरी आणि प्रतिष्ठेची असते. एवढीच आजच्या शिक्षणाची विद्यार्थ्यांजा किंमत दिसून येत असेल तर या शिक्षणाने समाजाची उन्नति किंवा समृद्धी आपण कशी घडवू शकणार आहोत?
आज शिक्षित असलेल्या किती व्यक्ति इतराना शिकवू शकतात हे ही फार महत्वाचे आहे. शेवटी समाजात शिक्षण आणी ज्ञान जोपासले जावे असे वाटत असेल तर समाजाच्या खर्चाने शिक्षण घेणा-या प्रत्येक व्यक्तिने ज्ञानदानाने समाजाच्या त्या इन्व्हेस्टमेंटची परतफेड केली तरच समाजात ज्ञान टिकून रहाणार असते. आणी तरच समाज पुढे जाणार असतो. असे शिक्षण आणण्याच्या दृष्टिने कांय प्रयत्न करता येतील ते पहाणे ही काळाची गरज आहे.
------------------------------------------------------------------------------------------------

2 comments:

Gayatri said...

नमस्ते लीनाताई. सुमारे १२ वर्षांपूर्वी तुम्ही लिहिलेला हा लेख, आजसुद्धा तितक्याच चपखलपणे लागू होतोय दुर्दैवानं :(
१.
उच्च शिक्षण घेतल्यानंतर, ज्ञानदान करून त्या समाजऋणाची परतफेड करण्याबाबतचे तुमचे विचार पूर्णांशानं पटले..किंबहुना या क्षणी, पदवी संपवून पदव्युत्तर शिक्षणाचे पर्याय निवडताना 'कशामुळे ज्ञानदान करण्याची सर्वाधिक पात्रता आपल्याला येईल' हाच विचार प्राधान्यक्रम ठरवताना उपयोगी पडला. या विषयावर तुमच्याशी चर्चा करायला खूप आवडेल.

माझा email address gayatrinatu@gmail.com आहे, मला तुमचा email address द्याल का?

२.तुमच्या लेखात 'सत्य हे अंतिम ध्येय' असं तुम्ही म्हटलंय..या वाक्याचं अजून स्पष्टीकरण द्याल?

लीना मेहेंदळे said...

नमस्ते गायत्री, माझा ईमेल leena.mehendale@gmail.com
आहे. या विषयावर चर्चा करायला हवी खूप खूप. पण दुर्दैवानं ते होत नाही. आता मराठीतून ब्लॉग्स लिहिल्यावाचल्याने ते होऊ शकेल.
'सत्य हे अंतिम ध्येय' कारण तेच अंतिम सत्य आहे. आजच माझा अर्धा लिहिलेला ब्लॉग टाकलाय तो पण पहा. लौकरच बोलू.