तीन उत्साही पावले.-- शब्ददर्वळ दिवाळी अंक
...
... लीना मेहेंदळे
गेल्या दोन तीन वर्षांत देशामध्ये ज्या ब-याच घडामोडी झाल्या त्यांच्यापैकी तीन घटनांची नोंद मी अशी घेतली की, - होय - या घटनेने संपूर्ण भारतात जनमानस ढवळून निघाले आहे आणि भारतीय एकात्मकतेची वाढ देखील यांच्या मधून होऊ शकते. या तीन घटना म्हणजे इंडियन आयडॉल, रामदेव बाबा व राष्ट्रीय महामर्ग.
दूरदर्शन वर चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम पूर्वी देखील होत असत. आधी जुन्या जाणत्या दिग्गजांनी गाइलेली गाणी - नंतर तीच गाणी एखाद्या उत्तम कलाकारा कडून गाऊन घेतलेली - यांत सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन पासून सगळी नांवे होती. नंतर रिमिक्सच्या जमान्यात खुद्द आशाजीं सह इतरांची खूप रिमिक्स पुढे आली. यात सामान्य माणसाला वाव नव्हता. मग विविध अंताक्षरी कार्यक्रम सुरु झाले. त्यांत सामान्य माणसाला पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली पण ती त्यांच्यामधील कलागुणांसाठी नसून तीव्र स्मरणशक्ती आणि सिनेमांचा षौक - त्यातील मुरब्बीपणा यावर त्यांची कामगिरी अवलंबून होती.
झी टी.व्ही.ने सुरु केलेल्या सारेगामा आणि आताच्या सारेगामापा या कार्यक्रमाने सामान्य माणसांपैकीच पण गायकीचे चांगले अंग असणा-यांना छान आणि स्पर्धात्मक वाव मिळाला. यातून अलका याज्ञिक आणि श्रेया घोषाल यासारखे कलाकार पुढे आले. मात्र, सोनीच्या इंडियन आयडल कार्यक्रमाने ख-या अर्थाने भारतीय जनमानस ढवळून काढले. यात तीन टप्पे होते. पहिल्या टप्प्यांत देशातील प्रमुख शहरांमध्ये स्पर्धा घेऊन त्यातून कांही गायक निवडायचे. दुस-या टप्प्यात त्यांना अखिल भारतीय पातळीवर आणून त्यातून हळू हळू चाळणी लावत जायची - प्रत्येक कृतीला टी.व्ही. वर दाखवून तसेच जाहिरात करुन देशभरात उत्सुकता निर्माण करायची. याचबरोबर पुढे पुढे सरकणा-या स्पर्धकांना ट्रेनिंगची व्यवस्था - त्यांचे शो, याची काळजी दुस-या टप्प्यांत घेतली. रेडियो तसेच टी.व्ही. मधील इतर चॅनेल्सनी पार्टनरशिप घेतल्यामुळे, व तिथेही हेच फूटेज वेगळया त-हेने पेश केल्यामुळे लोकप्रियतेची व्याप्ती वाढली. तिसरा टप्पा होता लोकांना यात खेचण्याचा. सारेगामापा कार्यक्रमांत उत्सुकता होती, गायन कौशल्य होते, पण लोक त्यांत ओढले गेलेले नव्हते. इंडियन आयडल मध्ये पुढील निवडींसाठी लोकांची पसंती मागविल्यामुळे या कार्यक्रमातील लोकसहभाग खूप पटींनी वाढला. एकेका दिवशी दोन-तीन लाखांपर्यंत लोकांनी आपली पसंती कळवीत या निवडीमध्ये हिरिरीने भाग घेतला. पहिल्या इंडियन आयडल कार्यक्रमानंतर सारेगामा चॅलेंज, गुरुकुल फेम, इंडियन आयडल टू इत्यादी असे पुढचे कार्यक्रम निघाले.
एखाद्या घटनेने देश ढवळून निघाला - एवढयापुरतेच या घटनेचे महत्व नाही. त्याचे फलित कांय हे महत्वाचे आहे. कौशल्य व कलागुणांना प्लॅटफॉर्म मिळवून दिला हा या कार्यक्रमातील सर्वात महत्वाचा भाग मला वाटतो.
आजची आपली लोकसंख्या अफाट म्हणजे एकशे दहा कोटींच्या आसपास असून त्यातली सुमारे पन्नास टक्के ही किशोर-तरुण पिढी आहे. या पिढीचे स्वप्न आहे - पैसा मिळविणे, श्रीमंत होणे. यात चूक कांय? अर्थ हे पुरुषार्थाचे लक्षण मानले गेले आहे. पण त्यासाठी मार्ग कोणता? सचोटीचा का कुछ भी करके पैसा मिळविण्याचा? आणि सचोटीच्या मार्गाने खूप वर्षे वाट पहावी लागणार असेल तर? सचोटी असूनही व हुषारी, विद्बता किंवा हुन्नर असूनही शिफारशी किंवा लाचलुचपती खेरीज पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होत नसेल तर? म्हणूनच झटपट कसाही मिळालेला पैसा आणि दीर्घकाळाने तोही मिळेल न मिळेल असा सचोटीचा पैसा यांच्याबाबत तरुण पिढीच्या मनांत अंर्तद्बंद्ब आहे. लॉटरी, करोडपति किंवा खेलो इंडिया, डील या नो डील सारख्या कार्यक्रमातून सुध्दा थोडासा स्मार्टनेस आणि बरेचसे फ्ल्यूक किंवा भाग्य यांच्या सहाय्याने कांही मोजके श्रीमंत होऊन जातात. ते तरुण पिढीच्या नजरेत भरते आणि कित्येक तरुण तो प्रयत्न करतातच. पण तो मार्ग आणि तो पैसा दोन्हींही खरे नाहीत. याउलट इंडियन आयडल किंवा सारेगामापा सारख्या कार्यक्रमात कलाकार तरुण-तरुणींना कलागुणांच्या जोरावर पटकन पुढे येण्याची, चमकण्याची आणि श्रीमंत होण्याची संधी मिळत आहे. म्हणून मला यांचे अप्रूप वाटते. तरुण कलाकारांना त्यांची हुन्नर आणि कलागुण दाखविण्यासाठी एवढया मोठया प्रमाणात वाव मिळाल्याने इतरही खूप तरुण त्यांच्यासारखेच पुढे येऊन दाखविण्याची, त्यासाठी मेहनत घेण्याची जिद्द बाळगतात. देश घडायचा असेल तर तो अशा जिद्द, मेहनत आणि कलागुणांपासून येणा-या श्रीमंतीमुळेच पुढे येईल. लॉटरी इत्यादीने फक्त श्रम न करता झटपट श्रीमंतीचे तत्वज्ञानच पसरते. त्याने कांही लोक श्रीमंत झाले तरी मेहनत आणि कौशल्याचे तत्वज्ञान पसरत नाही - म्हणूनच त्याने देशही पुढे जाऊ शकत नाही.
देशाला ढवळून काढणारी व जागरुक करणारी दुसरी घटना म्हणजे गेल्या दोन वर्षात स्वामी रामदेव यांना त्यांच्या ‘प्राणायामातून स्वास्थ्य’ या मोहिमेमध्ये मिळालेले अफाट स्वास्थ्यदायक परिणाम आणि त्यातून आलेली प्रसिध्दी, अनुयायी आणि पैसा. प्राणायामातून स्वास्थ्य रक्षण होते आणि रोगमुक्ती मिळते हे सिध्दांत रुपाने सर्व प्राचीन ग्रंथात मांडले होते. मात्र ते निव्वळ प्राणायामाने मिळत नसून इतर पूरक अशा आसन, व्यायाम, यम, नियम, आहार, विहार यांच्या प्रदीर्घ साधनेनंतरच मिळू शकेल अशी समजूत होती. पण रामदेव यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिध्द करुन दाखविलेल्या उपाययोजनेत निव्वळ प्राणायामाच्या सहाय्याने मोठया प्रमाणावर रोगमुक्ती, पूरक अभ्यासाने अधिक लाभ आणि बहुतेक सर्व प्रकारांच्या रोगांवर ब-यापैकी समाधान मिळते हे दिसून आले. यामुळे देशभरांतील लोक त्यांच्याकडे वळले. आस्था चॅनेलने पहिल्या प्रथम त्यांचे वैशिष्टय ओळखून चॅनेलवर चांगले सलग दोन तास त्यांना दिल्यानंतर रामदेव यांच्या कार्यक्रमाने कमालीची लोकप्रियता गाठली. जगातील शंभर-दीडशे देशांमध्ये त्यांचे कार्यक्रम पोचू लागले. भले भले संशयात्मा करुन तरी बघावे म्हणून करु लागले. निव्वळ टी.व्ही.वर कार्यक्रम बघून आणि त्याप्रमाणे प्रयत्न करुन कित्येकांना फायदा झाला. याबाबत चर्चा वाढली तशी अनुयायांची संख्या पण वाढली. स्वास्थ्य रक्षणाचे पुरातन काळापासून चालत आलेले विविध उपाय या निमित्ताने लोकांसमोर पुन: आले. आयुर्वेद, योगसाधना, ऍक्युप्रेशर, प्राकृतिक चिकित्सा यांतील विविध सिध्दान्ताची उजळणी, छाननी आणि प्रचीती घेणे सुरु झाले. स्वास्थ्याला हानिकारक असणा-या बाबी टाळण्यासाठी रामदेव यांचे आवाहन इतके प्रभावी ठरले की, कोका-कोला सारख्या दिग्गज मल्टीनॅशनल कंपनीला ‘ठंडा याने कोका-कोला’ ही लोकप्रियतेचे शिखर गाठलेली जाहिरात काढून घ्यावी लागली. आयुष्यभर गोळया खाण्यासाठी मनाची तयारी केलेल्या हजारो रुग्णांनी बरे झाल्याचे व औषधे, ऑपरेशन्स यापासून सुटका झाल्याचे सांगितले. इतरही चॅनेल्सना या लोकप्रियतेची दखल घ्यावी लागली आणि कुठे रामदेव यांचेच प्राणायामाबाबतचे कार्यक्रम तर कुठे इतर आसनादि कार्यक्रम सुरु झाले. आपले स्वास्थ्य रक्षण गोळया-औषधांखेरीज इतर उपायांनीही होऊ शकते - ते चिरस्थायी असते. त्याने औषधांचे साइड-इफेक्टस् देखील टळतात आणि हे सर्व शक्य आहे, घडत आहे, हजारो लोक लाभान्वित होत आहेत हा आत्मविश्र्वास देशातील सामान्यापासून तर व्हीआयपी पर्यन्त कित्येकांना मिळाला. या यशाची पावती म्हणजे कोटयावधी रुपये किंमतीचा हरिद्बार येथे उभा राहिलेला दिव्य योग मंदीर ट्रस्ट व त्यांचे कार्य. गेल्या शतकांत आयुर्वेदाची लोकांना पुन्हा एकदा ओळख होऊ लागण्यामागे ज्या कांही महत्वाच्या घटना नोंदवाव्या लागतील, त्यांतही रामदेव यांचे श्रेय मोजावे लागेल.
वीस-पंचवीस वर्षांपूर्वी गोएंका यांच्या विपश्यना शिकवणीमध्ये देखील त्या साधनेच्या अनुषंगाने कित्येक रोग बरे होत असल्याने मोठया प्रमाणावर विपश्यना साधनेचा प्रसार झाला होता. ती साधना तत्वचिंतनाच्या अंगाने जाणारी असली तरीही तिकडे वळणारे बरेच लोक मात्र आरोग्याच्या कारणासाठी आकर्षित झाले होते. मात्र, जसा रामदेव यांना अलीकडे झाला तसा त्या काळात त्यांना टीव्ही चॅनेल्सचा तेवढा फायदा झाला नाही. त्यामुळे देशभर ठसा उमटवण्याची क्षमता असूनही ज्या गतीने रामदेव यांना जमले त्या गतीने गोएंका यांना जमले नाही. त्याप्रमाणे ज्या आग्रहाने रामदेव यांनी मल्टीनॅशनल्सच्या विरुध्द, विशेषत: त्यांच्या अवास्तव आणि अफाट जाहिरात तंत्राविरुध्द मोहिम उघडली तिच्याकडेही एक आर्थिक रणनीती म्हणून लक्षपूर्वक पाहिले पाहिजे. देशाचा पैसा स्विस व अमेरिकन बँकामध्ये आहे. तो त्यांना वापरायला मिळतो पण आपला देश गरीब रहातो. आपल्या लोकसभेतील खासदार इत्यादींनी ठरवले तर हा पैसा देशांत परत आणता येईल. फिलिपाइन्स सारख्या देशाने हे करुन दाखवले होते व त्यांच्या पूर्वीच्या भ्रष्ट राष्ट्रपतींचा पैसा परत आणला होता. अशासारखे विषय योग शिबिरामधून त्यांनी लावून धरले. ते केवळ आर्थिक नसून राजकीय देखील आहेत. कदाचित ते पब्लिसिटी स्टंट म्हणूनही वापरले असतील. पण आरोग्य रक्षणाची चांगली शक्यता हीच त्यांची खरी पब्लिसिटी होती व टी.व्ही. माध्यमांची त्यांना चांगली साथ मिळाली. त्यांच्या योगा शिबिरांनी सर्व देश पिंजून काढला आणि योगसाधनेतून आरोग्य हे तत्व जनतेच्या मनांत बिंबले.
तिसरे चांगले पाऊल म्हणजे मोठया प्रमाणावर राबविण्यांत आलेला नॅशनल हायवेचा प्रोग्रॅम. गेल्या दहा एक वर्षात केंद्र शासनाने रस्ते बांधणीच्या कामासाठी फार मोठया प्रमाणावर पैसा उपलब्ध करुन दिला. हा निव्वळ सरकारी कार्यक्रम म्हणून याकडे बघून चालणार नाही. देशाच्या पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण टोकांना जोडणारे चार मोठे राष्ट्रीय महामार्ग, सुवर्ण चौकोन तसेच उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम टोकांना थेट जोडणारे दोन महामार्ग. यासाठी दरवर्षी पन्नास हजार कोटीच्या आसपास बजेट उपलब्ध करुन दिले गेले. त्याच बरोबर खाजगी गुंतवणूकदारांना संधी देऊन त्यांचाही पैसा या कामासाठी उपलब्ध व्हावा म्हणून एक अभिनव योजना आखण्यांत आली. ती म्हणजे सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर एक टोल नाका उभारुन त्या मधून येणारा पैसा गोळा करण्याची परवानगी रस्ता बांधणी करणा-या कंपनीलाच द्यायची. यामुळे स्पर्धा सुरु झाली पण तिच्यावर कंट्रोल नॅशनल हायवे ऍथॉरिटीचा असल्याने गुणात्मक दर्जा राहण्याची शक्यता निर्माण झाली. गेल्या दहा वर्षांत देशभरात मोठया चौपदरी, सहापदरी, क्वचित आठपदरी रस्त्यांची संख्या वाढली आहे. त्याचा वाहतूक व्यवसायदारांना मोठा फायदा झाला आहे. विशेषत: क्रेटची वाहतूक जोरात होऊन एक्सपोर्ट सेक्टरला चांगला लाभ मिळाला. नुकतेच मी एका चीन दौ-यावर गेले असतांना तिथले आठपदरी रस्ते, शहरांच्या अक्षरश: डोक्यावरुन जाणारे हायवेज, तसेच तीन-चार लेव्हल वर बांधलेले उड्डाणपूल इत्यादी पाहून थक्क झाले होते. पेचिंग शहरांत तर कांही ठिकाणी चोवीस पदरी रस्ते आहेत. तेवढे नसले तरी आपल्याही देशांत राष्ट्रमार्गांची बांधणी मोठया प्रमाणावर झाली. त्याने आपले सिमेंट आणि स्टीलचे उद्योग देखील भरभराटीला आणले. सामान्य माणसाकडे याची थेट दखल झाली नसली तरी ट्रक वाहतूकदार आणि लांबचा प्रवास करणा-या लक्झरी बसेस याची साक्ष देऊ शकतात.
मात्र, एवढया चांगल्या हायवेजचा परिणाम खाजगी गाडया वाढवण्यात न होता उत्तम पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम निर्माण होण्यांत झाला तर त्याचे श्रेय कित्येक पटींनी वाढेल.
एकविसावे शतक सुरु झाल्यानंतर देशाला प्रगती कडे नेणा-या ज्या कित्येक घडामोडी झाल्या त्यामध्ये पोखरणची अणुचाचणी दिल्ली मेट्रो रेल, अशा अनेक घटना आहेत. या सर्वांची नोंद पुढच्या पिढीसाठी जतन करायला हवी.
**********
No comments:
Post a Comment