Tuesday, August 30, 2011

पहिले दशक -1, 2 धरणगाव (म्हणून ते घर माझे आहे)

पहिले दशक

- 1 -
म्हणून ते घर अजूनही माझं आहे.

ते घर आता आमचे नाही. आता तिथे छोटू पाटील रहातो. त्याची आई आणि आजी निमंत्रण देऊन गेलेल्या आहेत -- ताई, एकदा घरी येऊन जा - घर अजूनही तुमचच आहे. मी माझ्या नेहमीच्या जळगांव दौ-यांमधे धरणगांवला जाण्याचा वेळ काढते. चिंतामण मोरया, तहसील कचेरी, बस स्टॅण्ड । पण घरी नव्हते गेले. पुढची किती काम राहिलीत अस मनाला बजावून आज तरी घरी जाण्याचा मोह सोड असा धाक देऊन, मी गेलेच नव्हते.
मग एक दिवस ठरवून वेळ काढला. छोटूला कांय सांगाचयी गरज - म्हणत कुणालाच सांगितले नाही. भाईसाहेबांच्या मुलांपैकी आता फक्त शशीच धरणगांवला रहातो. पण त्यानेही आता चिंतामण मोरया जवळ नवं घर बांधल आहे, तिकडेच रहातो. आयत्या वेळी वाटल तर त्याला सांगायच नाही तर एकटच जायचं असं ठरवून टाकलं.

मोरयाच दर्शन घेऊन त्या ओट्यावर पाच मिनिटं बसले - रिवाजा प्रमाणे - शशी आणि मीरा नेमके आजच बाहेरगांवी गेले होते. आता उठून ड्रायव्हरला सांगायच - तिकडे गांवात चलायचय बर आज !

आणि मनांत प्रचंड उलथापालथ झाली. अस वाटल की आता घरी जाऊन, सर्व घर पुन्हा एकदा नजरेत भरून घेतल्यासारख होणार नाही – ते पुढील काही काळासाठी शिदोरी म्हणून असणार नाही. आज घरी गेले तर परत निघतांना बहुतेक जुन्या सर्व आठवणी त्याच्या उंबरठयापाशी ठेऊन परतेन. ते दर्शन “पुनरागमनायच” असणार नाही. त्या भेटीनंतर घराशी असलेले भावनिक संबंध संपतील. आठवणी कायम रहातील पण त्रयस्थाप्रमाणे, फक्त वस्तुस्थितीदर्शक. तो अखेरचा निरोप ठरेल.
मग मी घरी गेलेच नाही. मोरयावरूनच जळगांव गाठलं आणि रात्रीच्या गाडीने मुंबई ! म्हणून ते घर अजूनही माझं आहे - अजून एक भेट होईपर्यंत तरी नक्कीच!
-------------------------------------------------------------------------------------

- 2 -

खूप जणांना बालपणातल्या अगदी लहान वयातल्या गोष्टी आठवतात. मला तेवढया नाही आठवत. आई सांगते - माझ्या वयाच्या दोन वर्षापर्यंत आम्ही लोणावळ्याला होतो - कैवल्यधाम इन्स्टिट्यूट मधे दादा नोकरी करत. पण त्यांना डॉक्टरेट मिळाली आणि इन्स्टिट्यूट ने आता तुम्ही जास्त चांगली नोकरी बघा असा निरोप दिला. आमच्या घरांत माझा अगदी छोट्या साइझ मधे फोटो आहे - पांढरा प्रॉक, हातात खूप फुलं आणि खूप हसरा चेहरा - मी एक - दीड वर्षाची असतांना दादांचे मित्र धोपेश्वरकर यांनी काढलेला - पुढे मोठेपणी एकदा त्यांच्याबरोबर फोन वर थोडे बोलणे झाले होते तेवढाच माझा आणि त्यांचा परिचय.

मग आम्हीं धरणगांवी आजोबांकडे (नानांकडे) रहायला आलो. दादांनी अनुक्रमे खांडवा (मध्य प्रदेश), व्यारा (गुजरात) आणि जबलपुरला नोक-या धरल्या - असे वयाच्या सातव्या वर्षी भी जबलपुरला आले. पैकी व्यारा येथील घराला मातीच्या भिंती आणि मातीची जमीन होती आणि आई त्यांना बाईकडून शेणाने सारवून घ्यायची एवढ मला आठवतं.

धरणगांवला नानांच्या घरांत सर्वत्र फरशी होती - फक्त स्वैंपाकघर आणि मडक्याची खोली सोडून. घर उत्तर - दक्षिण असं होतं - एल या अक्षराच्या आडव्या रेघेसारखं आणि उभ्या रेघेच्या जागी नानांचे धाकटे भाऊ अप्पा यांच घर होतं. माझा आजी वडिलांच्या लहानपणीच वारली होती. दादा त्यांच्या काकूलाच आई म्हणत. खानदेशांत अशी नात्यांची जवळीक फार. दूरच्या भावाच्या मामाला देखील सर्व मामाच म्हणणार. आई कोकणस्थ आहे, तिला फार पेच पडायचा नाती समजून घ्यायला.

अप्पांच्या घरातील बरीच मोठी जागा मातीची होती व तिला रोज शेणाने सारवले जाई. चुलत बहिणींमुळे मला तेही करता येऊ लागले आणि रांगोळीची कलापण. आसपासच्या मिळून एकूण सात घरांना अग्निहोत्री वाडा असे नांव होते, मात्र त्यापैकी एक घर पाटील यांचे व दुसरे एक सुतार यांचे होते. पाटीलांच्या कडील गाय, बैल, बकरी वगैरे सामाईक अंगणातच बांधली जात. त्यामुळे धारोष्ण दूध, सडा-सारवणासाठी हवे तेवढे शेण, गुराची सोबत या गोष्टी रोजच्यातल्या होत्या. त्यांचा कुत्रा वाघ्या आमचाही लाडका होता.

दादांच्या पडत्या काळातच आईने नागपूरच्या SNDT कॉलेजमधील सोईचा फायदा घेअन बाहेरून बीए करायचं ठरल. तेंव्हा ती परिक्षेपुरती दोन महीने नागपूरला होस्टेल मधे रहायची. त्या वेळी मी नानांकडेच असायची. एका आतेचे दोन मुलगे शिक्षणाला त्यांच्या कडेच रहात. अधून मधून दुस-या आतेचा मुलगा पण येई. शिवाय काकांच्या घरात माझ्यापेक्षा मोठी माझी चार चुलत भावंडं होती. त्यामुळे माझा सर्व वेळ धुडगुस घालण्यातच जाई. मला शाळेत घालायची घाई कुणालाच नव्हती. मात्र आईने मला अक्षर-ओळख, पाढे, लिहायला वाचायला आवर्जून शिकवले. तर नानांचा सपाटा असायचा सर्व पोरासोरांना तोंडी गणितं घालण्याचा. इतर मोठया भावडांना गांगरायला होत असतानाच मी मात्र पटापट तोंडी गणितं सोडवत असे. त्यामुळे मी नानांची लाडकी नात होते. त्यांनी मला अगदी लहान वयांत भूमिती पण शिकवली होती .

धरणागांव हे त्या पंचक्रोशीतील मोठं गांव- ते व्यापाराच ठिकाण होत. गांवाला म्युनिसिपाल्टी होती आणि बरेच रस्ते सीमेंट कांक्रीटंचे होते. फरशांनी व्यवस्थित बांधून काढलेला मोठा बाजार होता - त्याला कोट म्हणत. लांब गिरणा नदीवर धरण बांघलेलं होत. गांवात पोस्ट ऑफिस, तार ऑफिस आणि हायस्कुल होत. शिवाय भुसावळ - सूरत लाईन वर धावणारी एक्सप्रेस गाडी देखील धरणगांवी थांबायची - इतकं ते मोठं होतं. तरी पण गांवाला पिण्याच्या पाण्याची पर्मनंट सोय नाही म्हणून ब्रिटिशांनी तालुका ठिकाणासाटी एरंडोल या तुलनेने अत्यंत लहान गांवाची निवड केली होती. याची खंत सर्व गांवकरी बाळगून होते. अगदी अलीकडे म्हणजे सन् 2000 (?) मधे धरणगांव वेगळा तालुका करण्यांत येऊन धरणगांवी मामलेदार कचेरी आली तेंव्हा आता खंत संपली अस दादांनी बोलून दाखवलं.

धरणगांवी माझी मोठया चुलत बहिणींबरोबर संध्याकाळी फिरायला जायची ठिकाण म्हणजे राममंदिर, विट्ठल मंदिर - हे रोजचे. शिवाय कधी लांब जायचे ठरले तर बालाजीनानांचे मंदिर किंवा उलटया दिशेला चिंतामण मोरया ! बालाजी नानांचे मंदिरही विट्ठलाचेच होते पण त्यांच्या मागच्या अंगणात एक मोठा रथ अणि कृष्ण व पाचही पांडवांच्या पूर्णाकृती मातीच्या मूर्ती होत्या. दस-याला त्या रथांत पांडवांना बसवून रथयात्रा निघायची. त्या मंदिरात जाण्याच मुख्य आकर्षण ते रथ आणि मूर्ती हेच होते. या शिवाय चुलत भावा-बहिणींबरोबर कोटावर बाजाराला जाणे, पोस्टात जाणे, दळण आणायला गिरणीवर जाणे हे कमी प्रतीचे उद्योगही होते. मोठा उद्योग होता तो म्हणजे दुकानावर जाण्याचा.


नाना पंचक्रोशीत हुषार म्हणून नांवाजले होते. त्यांच्या काळांत म्हणजे 1890च्या आसपास कधीतरी ते व्हर्नाक्युलर फायनल (म्हणजे सातवी) ही त्या काळातली मानाची परीक्षा पास होऊन शाळेत गणिताचे शिक्षक म्हणून नोकरीला लागले होते. पण संपूर्ण कुटुंबासाठी असेल असे कांही तरी कर असे त्यांच्या वडिलांनी सांगितल्यावरून त्यांनी शाळेची नोकरी सोडली आणि गांवाच्या अगदी एका टोकाला लाकडाचे दुकान काढले. त्यांचे पाहून कांही मुसलमान मंडळींनी देखील त्याच परिसरांत लाकडाची दुकाने, सॉ-मिल इत्यादी काढल्या. त्या आठदहा मुसलमान कुटुंबांच्या बरोबर नानांचा चांगला घरोबा होता. दुकानावर अर्थातच धाकट्या भावाला पण घेतले. दुकानावे सामान निवडण्यासाठी नाना गुजरातच कांय तर पार कलकत्त्यापर्यंत जाऊन आलेले होते . ते मराठी खेरीज गुजराती, आहिराणी इत्यादि पण छान बोलत. आजी लौकर वारली पण मुलांचा सांभाळ त्यांनीच केला. त्यांना कीर्तनाचा छंद होता. गांवात विणकर समाज (साळी समाज) खूप मोठा होता. हातमागावरच लुगडी, धोतरं आणि सतरंज्या उत्तम प्रतीच्या तयार होत असत. अशा त्या साळी समाजान नाना व बालाजी नाना मिळून कीर्तन करीत असत.

माझ्या लहानपणी दुकानावर नाना, अप्पा किंवा अप्पांची दोघं मुले - भाईसाहेब काका आणि बाळकाका ही असत. त्यांचा दुपारचा जेवणाचा डबा तयार करून घरून पाठवला जाई -तो बहुधा मी व चुलत भाऊ अनिल असे दोघे घेऊन जात असू. दुपारच्या उन्हांत पाय भाजायचे म्हणून आम्हीं अगदी पळत जात असू त्या काळांत मुलांना चपला वगैरे चंगळ नसायची.

नाना व अप्पांच्या दोन घरांच्या मधल्या जागेत सामाईक मोरी आणि मोठी विहिर होती. विहीरीवर तीन रहाट होते. एक आमच्या मोरीतील होता. दुसरा रहाट नानांच्या चुलत भावाचा होता आणि तिसरा गांवासाठी ठेवलेला होता - तिथे सकाळ संध्याकाळ गांवच्या सासुरवाशिणी, माहेरवाशिणींची बरीच गर्दी असाचयी. मी पण लहान वयातच रहाटावर पाणी काढायला शिकले. शिवाय दुकानांत जाताना वाटेत एक मोट लागत असे. तिथे थांबून पाणी काढणारे बैल पहाणे हा आमचा आवडता छंद होता.

खानदेशांत धाव्याची घरे असायची. म्हणजे असे की घरांच्या भिंती बहुधा माती किंवा विटा-चुनांच्या असत. त्यांच्यावर कांक्रीटचे छप्पर कसे चालणार? पण इतरत्र असतात तसे कौलाचे छप्पर देखील नसे. त्याऐवजी चटया व लाकडी वासे घालून त्यांच्यावर खारी मातीचे थर टाकीत. खानदेशांत सर्वत्र तापी नदीच्या गाळांत येणारी माती चिकण माती किंवा खारी म्हणून ओळखली जाते. तिचे थर टाकले की पाणी खाली झिरपत नसे, तर त्या मातीवरून वाहून जात असे. भिंतीच्या बरोबर वर एक फूट रुंद आणि एक-दीड फूट उंच अशी परोटी बांधली जायची. धाब्यामधेच मोठी चौकोनी जागा मोकळी सोडली असे त्यांना धारं म्हणतात त्यातून सूर्यप्रकाश खाली घरात जाई. पाऊस आला की शिडीने धाब्यावर चढून सर्व धारी त्यांच्या पत्राच्या झाकणांनी बंद करण्यासाठी एकच धांदल उडे. गांवातील बरीचशी धाबी एकमेकांना चिकटून असत. त्यांच्या वरून कुठेही जाण्यास लहान मुलांना मज्जाव नव्हता.

आमच्या घरून बाहेर पडले की लगेचच मोठा रस्ता येई तो पिठाची गिरणी, पोस्ट ऑफिस, हायस्कूल वरून बस स्टॅण्डवर जाई. त्याच्या दुतर्फा इतर मोठी दुकानं होती. मग एक मोठा कमानीचा दरवाजा होता व त्या पलीकडे आठवडा बाजारासाठी विस्तृत मैदान. कमानीवर सुभाषचंद्र बोसांचे मोठे चित्र होते व दरवाज्याचे नांवही सुभाष दरवाजा होते. शिवाय गांवात एक जुनी पडकी इमारत होती व ते घर म्हणजे झांशीच्या राणीचे आजोळ असं काही लोक सांगत. खरं-खोट्याची पडताळणी अजून झालेली नाही. पण एवढं मात्र खरं की त्यामुळे झाशीची राणी व सुभाष हे माझे पहिले बालपणाचे हीरो होते.

नानांच्या मोठया घराच्या पश्चिमेला रस्ता होता. त्या बाजूच्या खोल्या बहुधा अडगळीचे सामान ठेवण्यासाठी वापरत. मात्र उन्हाळयांत तिथे अंबांच्या राशी येऊन पडत आणी गवताच्या गंजीत ते आंबे झाकून ठेवले जात पिकण्यासाठी. त्या मोसमांत माझा आवडता उद्योग असायचा गंजीतून पिकलेले आंबे शोधून खाणं. ही परवानगी फल मला होती, आते-भावांना, चुलतभावांना नव्हती. त्यामुळे मी लहानपणी मनसोक्त आंबे खाल्लेले आहेत -- ते सुद्धा विविध जातींचे. घरांत रोज आमरस-पोळीचे जेवण असे. पण मला आंब्याचा रस खाणे - तोही दूध-तूप-साखर इत्यादी घालून खाणे हा प्रकार कधीच आवडला नाही. कदाचित म्हणूनही मला हवे तेवढे आंबे खायला परवानगी होती.

नानांची एक मजेदार आठवण आई सांगते. माझा जन्म आमच्या घरांतच झाला. सकाळीच पोटात काही तरी वेगळ वाटतय म्हणून देवघराची मोठी खोली रिकामी करून तयार करून ठेवली होती. बाळंतपण करण्यासाठी माझी आत्या अणि सुईण होत्या. दुपारी नाना जेवायल घरी आले - तो पर्यंत माझा जन्म झालेला. मुलगी झाली म्हणून जरा हिरमुसले होऊन ते लौकरच दुकानात परत गेले. सायंकाळी दोन तरुण मुले त्यांच्याकडे आली. कधीकाळी त्यांच्या वडिलांनी नानांकडून कर्ज घेतले होते आणि नानांनी त्याची आशा सोडून दिली होती. पण त्या शेतक-याने मरतांना मुलांना सांगून ठेवले - ``अरे, त्या सज्जन माणसाचे कर्ज वुडवू नका ``. म्हणून वडिलांचे सर्व कार्य पार पाडल्यावर सर्वात आधी ने दोघे भाऊ नानांकडे दोन हजार रूपये परत देण्यासाठी आले होते. मग नानांचा मूड एकदमच पालटला . लगेच सोनाराकडून माझ्यासाठी गळ्यातली सोनसाखळी घेऊन व मिठाई घेऊन पहिली बेटी, धनाची पेटी म्हणत घरी आले. गंमत म्हणजे माझ्या वाढदिवसाला पुष्कळदा असे घडते की कुठले तरी जुने येणे- मग कधी ने अगदी किरकोळी असेल - पण माझ्या वडिलांना मिळत राहिलेले आहे. मी लाडकी नात असण्याच एक हे कारणही असेल.

धरणगांवच्या घरातले नाना मला फारसे आठवत नाही. एकदा तंबोरा घेऊन भजन म्हणायला बसले होते - तेवढेच आठवतात, आणि गणित विचारायचे तेवढे. स्वप्नांत मात्र कधीतरी दिसतात- म्हणजे चेहरा ओळखीचा नसतो-- पण संदर्भ त्यांचाच असतो.
---------------------------------------------------------------------------------------------

No comments: